आकलन

महाराष्ट्रात भाजपच्या वाढीसाठा दोन्ही काँग्रेस या समप्रमाणात जबाबदार आहेत. काही अंशी राष्ट्रवादीचं नेतृत्व थोडं अधिक जबाबदार आहे. केंद्रात, राज्यात सत्ता असणाऱ्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढण्यासाठी थोडेसे जास्त प्रिविलेजेस मिळतात ही गोष्ट सत्य आहे. 2012 साली केवळ 31 जागांवर सीमीत असलेल्या भाजपाला आज घसघशीत 82 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे भाजपाचे यश थोडेथोडके नव्हे तर 151 टक्क्यांनी वाढलेले आहे. दिडशे टक्क्यांनी वाढलेले हे यश सहजासहजी वाढलेले नाही. भाजपच्या प्रचारतंत्राचा यात मोठा सहभाग तर आहेच शिवाय दोन्ही काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा हातभार त्याहून अधिक आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर जर आता राबवत असलेल्या प्रासंगिक युती प्लस आघाडीचा पॅटर्न राबवून सेनेला सत्तेत बसवले असते तर आज महाराष्ट्रात भाजप एवढी फोफावली नसती. काँग्रेस नेतृत्व नेमका मोका साधण्यात अपयशी ठरलं. तर एनसीपीच्या नेतृत्वाकडून केवळ गुगली खेळण्यात समाधान मानल्यामुळे सेनेची गोची होऊन त्यांनीही सरकारला रडत खडत पाठिंबा दिला. दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्या. आज भाजपात असलेले निम्मे हे मुळचे काँग्रेसी आहेत. काँग्रेसला मत देणाऱ्यांची पीढी आज रिप्लेस होऊन भाजपला मत देणाऱ्या पीढीत कनवर्ट झालेली आहे. त्यामुळे येत्या दशकभरात तरी भाजपला कडवं आव्हान देऊ शकेल असे सध्या तरी आशादायक चित्र दिसेनासे झाले आहे.

बाळ ठाकरेंची सेना ते उद्धव ठाकरेंची सेना असा मोठा प्रवास शिवसेनेने गेल्या दहा वर्षांत पार पाडला आहे. आताची सेना कुणाशी तुच्छता बाळगत नाही. केडर आधीपेक्षाही नीट जपून ठेवते आहे. सगळ्या युनीयनशी, कामगारांशी अगदी शिताफीने पण लपून संपर्कात राहते आहे. भावनिक राजकारण करून योग्य वेळेस लोकांच्या दृष्टिकोनाचं इनसेप्शन घडवून आणते आहे. तेच काम भाजपा जरा जास्त ताकदीने करतोय.

याउलट दोन्ही काँग्रेस ब्लॉक लेवलच्या कमीटीसाठी सुद्धा पक्षनेतृत्वाच्या होकाराची आदेशाची वाट पाहत बसतात. आजही हे दोन्ही पक्ष संघटना म्हणून नव्हे तर काही राजकीय घराण्यांचं एक फेडरेशन म्हणून काम करत आहेत. A federation of Few Political Families म्हणून जगत असलेल्या या दोन्ही काँग्रेस मध्ये कार्यकर्ते कमी, तर त्या त्या परिसरातील राजकीय कुटूंबांचा भरणा अधिक आहे. उदा. नाशकातून भुजबळ गेले तर तिथं राष्ट्रवादीला घरघर लागली. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

या दोन्ही पक्षांनी आता सिंहावलोकन करून ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, मराठा राजकारणाचं वंशश्रेष्ठत्व, जमीनी शेतींचं वैयक्तिक स्वार्थासाठीचं राजकारण बाजूला ठेऊन नव्याने पक्ष-संघटनेचा मेनिफेस्टो रचला पाहीजे. तरच काहीतरी वेगळं घडू शकेल.

आंबेडकरी पक्ष, डावे पक्ष अजूनही स्वप्रेमाच्या रोमँटीसीझम मधून बाहेर आलेले नाहीत. महाराष्ट्रातले समाजवादी तर इग्नोर केलेलेच बरे. स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडून स्वतःचं अपयश झाकण्यात हे जितके तरबेज आहेत तितके तर खुद्द नरेंद्र मोदी थापा मारण्यात सुद्धा तरबेज नाहीत. आपल्या समुहातून येणाऱ्या तरूणांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करू शकत नाही याचा प्रचंड न्यूनगंड या दोन्ही प्रवांहांतील नेत्यांना अगदी अचूक ठाऊक आहे म्हणून ते कायम त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वाभिमान, तत्वांचं गाजर दाखवत राहतात. परंतू राजकारण हे सत्ताप्राप्तीसाठीच केलं जातं हा मुख्य उद्देश जाणीवपूर्वक लपवून ठेवला जातो. सत्तास्थापनेसाठी भाषणं गरजेची नसतात तर मतदार संघांची बांधणी गरजेची असते. आपल्या मतदार संघात राहणारी लोकं आपल्यासारखी कट्टर नसतात याची पुरेशी जाण आधी दोहोंनी करून घ्यायला हवी. जनसंपर्क वाढवताना आपल्या मतदारांना लेबलिंग करून आयडेंटिफाय करण्याऐवजी वन वोट वन व्हॅल्यू म्हणून कधी आयडेंटिफाय करणार हा खरा प्रश्न आहे. राजकारण हे राजकारणासारखंच केलं पाहीजे. आणि हे आपल्याला नीट कळालं पाहीजे. ते कधी कळेल ठाऊक नाही. असो…

Advertisements

आयसीयू – Intensive Care Unite

ऑपरेशन झाल्यानंतर किंवा रोगी अधिकच अत्यवस्थ असेल तर त्याला तेथे ठेवण्याची जागा अतिदक्षता विभाग. चकाचक लाईट्स, मनूष्याच्या आवाजाचा क्वचितच संचार, थंडगार एअर कंडिशन्डने गारठलेलं वातावरण, व्हेंटिलेटरच्या मशीनीचा सातत्याने येणारा बीप साऊंड भल्या भल्यांच्या ऊरात धडकी भरवतो. भरीस भर म्हणून नखशिखांत कपड्यात गुंडाळून घेतलेल्या नर्सेस, वॉर्डबॉईज, मावशी बाया (आया), डॉक्टर… आहट मधल्या सिरियलसारखा फिल यावा फक्त त्यांचे डोळेच तेवढे आपल्याला दृश्यमान. रांगेने बेड्स सलग झोपलेले असतात. हो झोपलेलेच असतात बेड्स. ते कसलाही आवाज करत नाही. कसलीही हालचाल करत नाहीत. पेशंट सोडला तर त्यावर इतर कुणालाही साधा टेकू मिळू देत नाहीत. निष्प्राण पडलेल्या बेडच्या अवयवांना तेवढ्या निरनिराळ्या कॅथरेटरची सवय मात्र झालेली असते. आणि बेड्स सुद्धा आपल्या स्वभावधर्माला जागून साऱ्या कॅथेरटर्सना स्वतःच्या अंगावरून मुक्त संचार करू देतात. पेशंट्स येतात – जातात पण बाकी सारी आहे त्या जागीच स्थिर राहतं.

23 सप्टेंबर 2005 साली माझं ऑपरेशन झालं. संध्याकाळी सहाच्या सुमारास आयसीयूत दाखल केलं. दहाच्या आसपास डोळे उघडले. थोडी शुद्ध आली. संतोष पवार नावाचा ओळखीचा वॉर्डबॉय जवळ आला. म्हणाला आताच मामा येऊन गेले.. तू झोपला होता.. उठून बसवतो तुला फक्त समोर पाहू नको. झोपून घे परत..

मी त्याला मुक्या नजरेनं होकार दिल्याचं मला स्मरतंय. पण समोर पाहू नकोस हे का म्हणाला असावा यावर फार विचार न करता मी पुन्हा झोपी गेलो. साधारण तीनच्या आसपास पुन्हा जाग आली. समोरच्या बेडवर कालपरवा पर्यंत माझ्या बाजूला अॅडमिट असलेला शाहिद नावाचा मुलगा पहुडला होता. युरीन कॅटरेटर, आय वी कॅथरेटर, ऑक्सीजन मास्क, आणि बरंच काही काही त्याला जोडलेलं होतं. हलकेच मान वरून पहायचा प्रय़त्न केला तर त्याला व्हेंटिलेटर वर टाकलाय असं कळालं. शाहीद 14 वर्षाचा मुलगा. त्याला ल्युकेमिया आहे हे फार उशीरा डिटेक्ट झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा तो चौथ्या स्टेज ला होता. एकुलता एक मुलगा. किमोथेरपीसाठी अॅडमीट झाला तेव्हा मला भेटून बराच खुश झाला होता. म्हणाला भाई आप आओगे ना मेरे घर.. इधर ही नूर मुहल्ले में रहता हूँ.. मी त्याला खोटं खोटं हो म्हणून टाकलं. तो हसला. मला बरं वाटलं. हसताना त्याचे खोल खोल गेलेले डोळे थोडे चमकून गेले. डोक्यांवर, भुवयांवर शोधून सापडेल असा एकही केस शिल्लक राहीला नव्हता. जरा काही खाल्लं की उलटी अन् ब्लीडींगही. खंगत चालला होता. त्याचा बाप यायचा. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचा. मिनिट दोन मिनिट त्याच्याकडे पहायचा. आणि तडक परत निघून जायचा. बाप लेकांच्या मुक नजरानजरीकडे पाहून शाहीदची आई मात्र हमसून रडायची. बापाला रडताना मात्र पाहीलं नव्हतं. हा सारा प्रकार सहा दिवस असाच चालू होता. शाहीदच्या बापाचं येणं म्हणजे हातात भरमसाठ औषधं आणि पोरासाठी एखादा ज्युस आणि खिशात पैशांची तजवीज.

माझ्या ऑपरेशनच्या दिवशी सकाळी त्याला ग्रीट केलं आणि निघालो. तशी त्याची तब्येत खूपच खंगली होती. इतक्या लवकर हा खेळ सोडेल अशी काही लक्षणं नव्हती. पण टिकला नाही तो. नंतर मला दिसला तो थेट आयसीयू मध्येच. शाहीदच्या बापाची धावाधावच दिसत होती. त्याची आई त्याच्या बेडजवळ खाली जमीनीवर पडून होती. काहीच हालचाल नाही. अगदी स्तब्ध पुतळ्यासारखी. अंदाज आलाच होता. पोराला व्हेंटिलेटरवर टाकलंय. आता काही फार आशा नाही. पहाटे सहाच्या सुमारास डॉक्टरांनी आणि त्याच्या वडीलांनी अगदी आमच्या दोघांच्या बेडमधल्या जागेवर उभं राहून चर्चा केली. स्पष्ट ऐकू येईल अशा भाषेतच…

बाप म्हणाला.. बच्चे को बस आज के उगते सुरज तक रखना था… अब इसे आझाद कर दो इसका दर्द देखा नही जाता… डॉक्टर म्हणाले.. बस्स आपकी तसल्ली की लिए ये मशीने चालू थी…

डॉक्टरांनी नंतर सगळ्या मशीनी बंद केल्या. त्याच्या बापानं त्यातही मदत केली. नर्सेसनी त्याच्या आईला वॉर्ड बाहेर नेलं. आणि शेवटची क्रिया म्हणून हिरवं कापड आणलं. ( प्रत्येकाला जाड हिरव्या किंवा निळ्या कापडात गुंडाळतात) पूर्ण कापड गुंडाळलं. मग एका प्लास्टिक बॅग मध्ये पार्थिव चैनीने पॅक केलं. पुन्हा त्यावर हिरवा कापड गुंडाळून बॉडी पॅक केली. आत्ता चेहऱ्यावर सुद्धा कापड गुंडाळलं होतं. चेहरा कापडाआड बंदिस्त झाला अन् बापानं इकडं स्वतःला मोकळं केलं. बऱ्याच वेळानंतर तो सावरला. पण तोवर इथं त्या बेडवर नवी चादर आली. नवी उशी आली. आणि नवा क्रिटीकल पेशंट पण आला होता.

 

धर्मांतर …

 

14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातील सर्वात मोठे असे धर्मांतर घडवून आणत भारतात बुद्धविचाराची पुनःस्थापना केली. हा भाग धर्मांतराचा होता. परंतू त्याहीपेक्षा मोठं पाऊल होतं ते तत्कालीन सात कोटी अस्पृश्यांवर लादल्या गेलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचा. बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहीले परंतू दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने त्यात अनेक लुप होल्स शोधून बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकुण एक प्रय़त्नांना सुरूंग लावला. इंग्रज सरकारच्या काळात सत्ता हस्तगत करून त्यांनी जमेल तितके अस्पृश्यांच्या उत्थानाचे कार्य साधले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीच्या माध्यमातून अस्पृश्यता पालनाला कायद्याने चाप लावला. पण मना मनात असलेली जात घालवण्याइतका वेळ बाबासाहेबांकडे नव्हता. त्यामुळे आता हिंदू धर्म सुधारणा होणं शक्य नाही हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला होता आणि त्यातूनच त्यांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?’

आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की,
माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते. येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील. आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील. मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात. मी बुद्धाचा स्विकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत आहे. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेले असेल.

माझ्या मते धर्मांतर ही कधीच प्रतिक्रिया नव्हती. तो अगदी नेटकेपणाने, विचाराअंती घेतलेला निर्णय आणि परिपूर्ण असा कार्यक्रम होता. या कार्य़क्रमाने काय साध्य झालं? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी आपल्या घरातील शेवटच्या सहा पिढ्या तपासून पहायला हव्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांमधील 90 टक्क्यांहून अधिक मोठा समुह अतिशय विचित्र अवस्थेत जगत होता. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करताना लोकांना आपल्या कपड्यांचा त्याग करायला लावला. प्रत्येकाने दिक्षा समारंभासाठी येताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले पाहीजेत असा दंडक घातला. धर्मांतराची प्रक्रिया सुरू होण्याआधी त्यांनी काही पत्रके काढली. ठिकठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्त्या स्थापल्या आणि तेथील अस्पृश्यांना जातीव्यवस्थेने लादलेली कामे सोडायला भाग पाडली. ती भाग पाडताना आता आपण नव्या हिंदू धर्मातून बाहेर पडत आहोत तेव्हा सडलेले मांस खाणं सोडा, मेलेली जनावरं ओढणं सोडा सारखे कार्यक्रम दिले. लोकांनी आपले कपडे बदलले, व्यवसाय बदलले, चालणं – बोलणं, राहणं, खाणं बदललं. खिशातून चान्या घेऊन रस्ताभर खात हिंडण्याची सवय सुद्धा हळूहळू नाहीशी झाली. हे झाले प्राथमिक बदल. पण सर्वात महत्त्वाचे बदल घडले ते म्हणजे. लोकांना स्वाभिमानाने स्वतःची ओळख सांगता येऊ लागली. आयडेंटीटी क्रायसीस हा खुप मोठा प्रश्न आहे आणि समस्या सुद्धा. बाबासाहेबांनी तमाम अस्पृश्यांना स्वत्वाची जाणीव करून दिली. अस्पृश्य या स्थितीवाचक संज्ञेतून बाहेर काढत बौद्ध या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बिरूदाची देणगी दिली. बाबासाहेबांनी इथल्या भूमिपुत्राला त्याच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून दिली. धर्मांतर करणं ही बाबासाहेबांची टोटल पॉलिटकल अक्शन होती. ती खऱ्या अर्थाने जातीव्यवस्थेने बरबटलेल्या हिंदू धर्माचं अस्पृश्यांच्या मानसिकतेतून विध्वंसन करण्याची ती क्रिया होती. याची सुरूवात मनूस्मृतीच्या दहनाने झाली होती आणि अंत धर्मांतराने हे विशेष अधोरेखित करावे.

येथे अजून एक कारण देणे मला अतिशय महत्त्वाचे वाटते. हे मी एका भाषणातून आपणासाठी येथे देत आहे. वक्ते बहुधा सुनिल रामटेके असावेत.. त्यांचा उतारा येथे उद्धृत करत आहे.

सिद्धार्थ २९ वर्षाचा होतो आणि म्हातारा,रोगी आणि मृत व्यक्तीला बघून वैराग्य निर्माण होऊन प्रव्रजीत होण्याचा निर्णय घेतो हे कारण तर्कसंगत आनि बुद्धीला पटणारे नाही.परंतु बाबासाहेबांनी शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वारंवार होणारे युद्ध आणि शाक्यांच्या सभेत सेनापतीच्या युद्धाच्या प्रस्तावाला सिद्धार्थाने केलेला विरोध आणि त्यासाठी देश सोडून जाणे, देहांताची शिक्षा किंवा वडिलांचे राज्यपद हिरावून घेणे या तीनपैकी देश सोडून प्रव्रजीत होण्याचा निर्णय सिद्धार्थाने घेतला.परंतु पारंपारिक बौद्ध धम्मीय पहिले कारणच योग्य मानतात.म्हणून बाबासाहेबांच्या ‘दि बुद्ध आणि धम्म’ या पुस्तकाला विरोध करतांना हा बाबासाहेबांचा धम्म आहे म्हणून हिणविले.परंतु काही कालावधीने बाबासाहेबांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ याचा स्वीकार जगातील बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे.बाबासाहेबांनी खाटमांडू मध्ये भरलेल्या बौद्ध धम्म संगीतीला संबोधित करतांना ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण देताना बुद्धाच्या धम्मावर मार्क्सवादाचा प्रभाव होऊ नये यासाठी मार्क्सवाद हे जगातील समस्या सोडविण्यासाठी कसे निरर्थक आहे हे प्रतिपादित केले.मार्क्सने मजुरांच्या हुकुमशाहीचे समर्थन केले होते तर बुद्धाने शोषक व्यवस्था ती कुठलीही असो तिला विरोध केला होता.बुद्धाने स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,सामाजिक न्याय,करुणा या उदात्त मुल्यांचा पुरस्कार करून नीतीमान आणि आदर्श समाज निर्माण झाला तर मनुष्याची दुःखातून मुक्तता होईल असे सांगितले.बुद्ध कसे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी पटवून दिले.

 

का घेतला बाबासाहेबांनी वीस वर्षांचा कालावधी?

बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल वीस वर्षांचा कालावधी घेतला. या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खुप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही दर्शन पद्धतींचा अवलंब केला आहे.

वेदांत ( उपनिषद) पहिल्या सहा मधे येते.सांख्य आस्तिक मधे मोडत नाही. कपिलमुनीचा उल्लेख आहे तेथे म्हटले आहे. वैशेषिक मूलतः नास्तिक होते. ईश्वर जर परिपूर्ण होता तर त्याने सृष्टि निर्माणच कशाला केली? हा तर्क वैशेषिक मधून आला आहे. सांख्य मधे ईश्वर किंवा परमात्मा घुसडून योग या तत्वज्ञानचे निर्माण करण्यात आले.
डॉ. आम्बेडकर, राहुल सांकृतायन आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी या विषयावर के भाष्य केले आहे ते आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यासता येईल.

 

माझ्या एकुण अभ्यासाप्रमाणे मला ठाऊक असलेली नऊ दर्शनं पुढीलप्रमाणे. त्यातील पहिली सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शन म्हटलं जातं ती अशी.. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. ही सहाही दर्शने वेदप्रामाण्य मानतात. वेदांचे अस्तित्व पूर्णतः मान्य करतात. म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं गेलं आहे. ऊर्वरित तीन दर्शने जैन, बौद्ध आणि लोकायत ही वेदांचे अस्तित्व मुळापासून झिडकारतात. ती नास्तिक आहेत. राष्ट्र, पितृभूमी, शस्त्रास्त्रांनी युक्त असं राष्ट्र, देशभक्ती वगैरे वगैरे सारख्या संकल्पना कोणत्या नास्तिकत्त्वात बसत नाही. बुद्धाच्या विचार यापेक्षा कोणते वेगळे आहेत.

आता वळूयात बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माच्या स्विकाराकडे…

बाबासाहेबांचं बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोझर हे केळुस्कर गुरूजींकडून आलेलं होतं. भीमा मॅट्रीकच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी केळुस्कर गुरूजींना भीमाला बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. तेथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडे असलेला कल हळूहळू वाढत गेलेला होता. बाबासाहेबांनी बुद्धाची विचारप्रणाली ही मार्क्सच्या एकुण एका सिद्धांतावर सुद्धा तपासून पाहीली. बुद्धाचा स्विकार करण्याआधी ईश्वर ही संकल्पना नाकारणाऱ्या कपिलमुनीच्या सांख्य दर्शनाचा त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच बुद्धाचा स्विकार केला आहे.

बुद्धाचा विचार हा विज्ञानवादी आहे. तो कालसुसंगत आहे. त्यात कट्टरता नाही. त्यात तर्कसुसंगतपणा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तिचे स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना पूर्ण स्थान आहे. बुद्ध टोकाचा विचार नाही. तो सुवर्णमध्य साधण्याचा विचार सुचवतो. बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक, ईश्वरी अवतार वा ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा क्लेम केलेला नाही. बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे. पुरोगामी विचारधारा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्वे बुद्धाने जगाला दिली. बुद्धाच्या एकुण नितीनियमांमध्ये चर्चेला स्थान होते. संहिता ही संविधानाचं फ्युचरिस्टिक रुप होती. यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्विकार केला.

बाबासाहेबांनी इस्लाम, ख्रिस्ती आणि शीख धर्माचा स्विकार का नाही केला…
तर बाबासाहेबांचा ओढा तीनही धर्मांकडे गेलाच होता. शीख धर्मीयांची पाच क साठी असलेली सक्ती, शीखांमध्ये असलेली जातीव्यवस्था, कट्टरता त्यांना शीखांपासून क्रमाक्रमाने लांब नेत गेली. बाबासाहेबांचा काळ्या शेरवानी मधला फोटो हा शीख धर्माचा अभ्यास करतानाचा आहे.

इस्लामच्या बाबतीतही तीच गत होती. दार-उल-हरब, दार-ऊल-इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणे शक्यच नव्हत्या. शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेला जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा झाला असता…

बुद्धाचा स्विकार करणारे वास्तविकतेत जगणारे असतात.. धर्मांतरा नंतर एका पत्रकाराने 2 प्रश्न विचारले,

बाबासाहेब तुमचा हा धम्म हीनयान कि महायान, बाबासाहेब म्हणतात दोन्हीपैकी कोणते हि नाही, याला नवयान म्हणा.

तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक

बाबा म्हणाले मी नास्तिक हि नाही आस्तिक हि नाही

मी वास्तविक आहे

बुद्ध आचरण्याची गोष्ट आहे.. पाळण्याची नाही.

 

 

बाबासाहेबांनी आयडेंटिटि क्रायसीस कसा सोडवला?

बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत 1945 साली स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत 1950 मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध समाजात धम्माने स्वाभिमान जागवला. बौद्धांनी देव्हाऱ्यातील देवदेवतांचे विसर्जन करून टाकले. गंडेदोरे तोडले. वस्त्या-वस्त्यात बुद्धविहार आले. मुलांची, घरांची, वस्त्यांची नावे बदलली. लग्नविधी, नामकरण विधी बदलले. घरादारांवर बौद्ध स्थापत्यकला अवतीर्ण झाली. कर्मकांडे बंद झाली.  (बी.व्ही. जोंधळे यांच्या लेखातून आलेला उतारा)

१४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतरित झालेले बाबासाहेबांचे बहुसंख्य अनुयायी हे अडाणी होते.परंतु बाबासाहेबांच्या शब्दांना प्रमाण मानून,बाबासाहेबांच्या २२ प्रतिद्न्या शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर बाबासाहेबांनी ज्या उच्च शिक्षित लोकांवर धम्माचा रथ पुढे नेण्याची जी जबाबदारी सोपविली होती ती पार न पाडता उच्च शिक्षित मंडळी हे गटातटाच्या राजकारणात गुंग झाले आणि सामाजिक आणि धम्म कार्याला गती देण्याऐवजी समाजकारणात आणि धम्मकार्यात हि राजकारण शोधू लागली.
बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पनांतील मूलभूत फरक विशद केलेला आहे. धर्म आणि धम्मातील मूलभूत फरक मात्र आज बहुसंख्य विसरले आहेत. धर्माचा संबंध देवाशी आहे, तर धम्माचा संबंध मानवाशी आहे. धर्म हा बुद्धिप्रामाण्य नाकारतो. धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन. धम्म म्हणजे स्वातंत्र्य. धर्म म्हणजे चमत्कार, भाकडकथा, दैववाद, तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि धम्मात केलेला हा फरक नजरेआड केल्यामुळेच आज बौद्ध समाज पुन्हा एकदा जीर्ण-शीर्ण हिंदू रूढी-परंपरांकडे वळला आहे. बौद्धांची मानसिक स्थिती आज जुने सोडवेना आणि नवे स्वीकारता येईना अशी झाली आहे. बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचे उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचे होते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावयाची होती. लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणे हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता. त्या अनुषंगाने आपण किती प्रगती केली याचे चिंतन आपण आज करायला हवे की, शतकानुशतकांच्या जोखाडातून अगदी सायंटिफिकली, पॉलिटीकल प्रोग्रामद्वारे आपल्याला बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांना ते कसे चुकीचे होते यावर प्रश्न विचारले पाहीजे हा मुख्य मुद्दा इथं उपस्थित राहतो.

प्रश्न जरूर विचारला जावा. पण तो प्रश्न विचारताना आधीच एक बरोबर आणि एक चूक हा निष्कर्ष काढणे कधीही योग्य ठरत नाही. कदाचित आज मध्यमवर्गीय मानसिकता किंवा ज्याला आपण पोस्ट ग्लोबलाईज्ड माईंडसेट म्हणतो त्यात 1956 चे संदर्भ फिट बसणार नाहीत. बसूही नयेत. पण ते फिट न बसणाऱ्यांचा वर्ग आकाराने आणि संख्येने फार छोटा आहे. बौद्ध म्हणून असलेली आयडेंटीटी ही कदाचित या वर्गाला फारशी महत्त्वाची नसेल. नसावी. त्यात फार कौतुक किंवा नुकसाना नाही. पण कोणत्याही आयडेंटीटी विना जगणं हा कदाचित रमाबाई कॉलनी सारख्या देशातील तमाम वस्त्यांत राहणाऱ्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या मानसिक स्थैर्याचा प्रश्न आहे.

लेख संपवताना फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की, मी स्वतः बौद्ध आहे. पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे. ती राजकीय कशी आणि का यासंबंधी नंतर विवेचन करीनच. ते करण्यासाठी ही जागा योग्य नाही. पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा, पंचशील म्हटलेच पाहीजे हा अट्टाहास माझ्याठायी नाही. किंवा तो बाबासाहेबांच्या विचारधारेतही नव्हता कधीच. ती माझ्यासाठी जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे. नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची, जगण्याची वृत्ती आहे. पण भारतीय परिप्रेक्षात बहुसंख्यांक नास्तिक … इथं बहुसंख्यांक हा शब्द वापरला आहे, तर बहुसंख्यांक नास्तिक हे जातप्रश्नावर भूमिका घेत नाहीत. त्यांच्या धर्मविध्वंसनाच्या भूमिका ह्या जर तरच्या आहेत. धर्म-धम्म या संकल्पनावर समीक्षा करायची तयारी नसते. बुद्धाला विचार म्हणून न स्विकारता त्याला धर्माची ओळख देण्याच्या संकुचितपणाची आहे.

बुद्ध हा तर्काने आलेला विचार आहे. म्हणून तो बाबासाहेबांनी दिला.
आणि म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षांत बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकाने भरून काढला आहे.

आता यात काही कट्टरतावादी, अतिगामी सामील आहेत. तो त्यांच्या विनाशी बुद्धीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण संपूर्ण चळवळीला, बाबासाहेबांच्या 56 सालच्या राजकीय कृतीला तर दोष देऊ शकत नाही ना… जर दोष द्यायचा असेल तर आपली कृती आणि कार्यक्रम काय?

क्रांतिसूर्य जोतिबा फुले

क्रांतिसूर्य जोतिबा फुले… भारतीय इतिहासातलं असं एक सोनेरी पान जे उलगडल्याखेरीज आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणं वा त्याचा विचार करणं केवळ अशक्य. बुद्ध आणि कबीरानं जन्माला घातलेल्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कुणी दिला असेल तर तो फक्त जोतीराव आणि त्यांची सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस बांधला.

तात्यासाहेबांचा जन्म एका सधन कुटूंबात झाला. वडिल गोविंदराव पीढीजात फुलांचा व्यवसाय करणारे. पुण्यातील फुलांच्या बाजारपेठेवर प्रचंड दबदबा राखून असलेले. मुळचं आडनाव गोरे पण फुलांच्या व्यवसायामुळे फुले नावाची उपाधी अंगी आली आणि कालांतराने तेच आडनावही झाले. गोविंदराव फुलबागांचे मोठे बागायतदार. लाख दोन लाख रुपयाची सहज उलाढाल करणारे शेतकरी आणि व्यापारी. घरी-शेतीवर नोकर चाकर असा चांगला रूबाब गोविंदरावांच्या ठायी होता. जोतीबांचा जन्म झाला आणि अवघं नऊ महिन्यांचं वय असताना जोतीबांच्या आईचं निधन झालं. पुढे जाऊन गोविंदरावांनी दुसरा विवाह केला. चिमाबाई (पूर्वीचं नाव विमला) जोतीरावांच्या सावत्र आई बनल्या. त्यांच्याच देखरेखीखाली जोतिबांचा सांभाळ, जडणघडण सुरू झाली.

जोतिराव लहानपणापासून खमक्या आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाचे होते. ब्रिटीश राजवटीविरोधात जर लढायचं असेल तर आपण आपलं शरिर कमावलं पाहीजे. सदृढ शरिराशिवाय कोणत्याही प्रकारचे सामाजिक प्रबोधन करणं शक्य नाही ही त्यांच्या मनी असलेली प्रबळ भावनाच त्यांना उस्ताद लहुजींच्या आखाड्यात घेऊन गेली. लहुजीबाबांच्या देखरेखीखाली तरूण जोतीरावांची कसरत सुरू झाली. जोर-बैठका वेगात होऊ लागल्या. गुडघे, पोटऱ्या, खांदे, दंड बळकटीकरणाचे व्यायाम सुरू झाले. सूर्यनमस्काराचे जोर शंभर-शंभरात सुरू झाले. म्हणता म्हणता जोतिरावांची प्रकृती एकदम बलदंड होऊ लागली होती. शरीर काटक, सडपातळ असले तरी मजबूत स्नायू आणि पिळदार मांसल बनलं होतं. मग तालीम सुरू झाली कुस्तीची. या कुस्तीच्या तालमीत त्यांचे साथीदार असायचे ते धोंडीबा, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर. हे सर्व साथीदार जोतीरावांच्या सामाजिक चळवळीतही अखेरपर्यंत साथीदार म्हणून वावरले. यांपैकी धोंडीबा राऊत हा उस्ताद लहुजी यांचा मुलगा. धोंडीबा लहुजींना कुस्तीचा आखाडा चालवण्यास सहकार्य करी. त्याचं शिक्षण जोतीरावांच्याच शाळेत झालं. वडिलांच्या पश्चात धोंडीबानंच कुस्तीचा आखाडा चालवला. एवढंच नव्हे तर जोतीबांच्या सांगण्यावरून जोतीरावांच्या शाळेत शिकायला येणाऱ्या हरेक विद्यार्थ्याला त्यांनी कुस्तीसोबत सर्व प्रकारची प्रशिक्षणं दिली. चांगल्या शरिराशिवाय आपण कोणतंही कार्य तडीस नेऊ शकत नाही याची जोतिबांना पूर्ण जाणीव होती. नुसतं शरिर असून फायदा नसतो. हाती शस्त्रं चालवण्याची कलाही अवगत असलीच पाहीजे. म्हणून त्यांनी उस्ताद लहुजींकडून आधी दांडपट्टा, तलवार, नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं. कालांतराने बंदुका चालवणं आणि कुस्तीचे सारे डावपेच शिकून त्यात निपूण झाले. जोतिराव उत्तम नेमबाज होते. पण ते फक्त विद्या म्हणून त्यांनी आत्मसात केलेलं एक शास्त्र. तसं त्यांच्या घरी दोन बंदुका आणि काही गुप्त्या असत. त्यांचा वापर त्यांनी कधी केला नाही. पण बोथाडी फिरवणं, लाठी-काठी, दांडपट्टा चालवणं, पट्टा फेकणं, शिस्त धरणं, नेम धरणं यात ते प्रचंड पारंगत होते.
तसं पाहीलं गेलं तर पुरूषार्थ ही संकल्पना प्रचंड भारतीय संकल्पना आहे. ज्यात पुरूषानं शरिराचं बळ एखाद्याच्या दमनासाठी वापरणं हे गृहित धरलेलं असतं. पण जोतिरावांनी हा समज सर्वात आधी पुसून काढला. आपलं बलदंड शरिर हे उत्तम आरोग्याचं प्रतिक आहे हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केलं. खरं पाहीलं तर आज व्यायामशाळांत जोतिबांचे फोटो इन्स्पिरेशन म्हणून लावायला काही हरकत नसावी.

जोतिरावांचं रुप अतिशय देखणं होतं. डोळे पाणीदार आणि तेजस्वी होते. उंची साधारण सहा फुटाच्या आसपास असावी. त्यामुळं भव्यता ही काही औरच असायची. जोतिबांना दाढी मिश्या वगैरे वाढवून राहण्याची बिल्कूल सवय नव्हती. जमदाडे नावाचा न्हावी नियमितपणे येऊन त्यांची दाढी कापत असे. मिशी एका कट मध्ये असे. केसही कधी वाढलेले नसायचे. ते रोज सकाळी उठत. दुधात शिळ्या भाकऱ्या चुरून न्याहारी होई मग हातात मोठी काठी घेऊन त्यांचा मॉर्निंग वॉक सुरू व्हायचा. सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना पायघोळ अंगरखा, धोतर, लांब काठी सोबत असे. कपड्यांचा रंग मात्र पांढरा असायचा. कधी कधी सकाळी बाहेर फिरायला निघताना ते घोड्यावर निघत असे. हा शिरस्ता त्यांना लकवा मारेपर्यंत कायम होता. जोतीबा जेव्हा केव्हा बाहेर निघत, लोकांना भेटण्यासाठी तेव्हा कधीच गबाळे किंवा साध्या पेहरावात बाहेर निघत नसत. बंडी, लांब कोट, तांबड्या रंगाची खास फुले पगडी बांधलेली, कोटाला लेखणी, पायात मोजडीसारख्या वहाणा, उंची धोतर ते ही कडक इस्त्रीचं, खांद्यावर जरीचं उपरणं असे. अशा शानदार पेहरावातला माणूस जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरून चालत असेल तेव्हा बघणाऱ्यांच्या नजरा काय विचार करत असतील याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. जोतिरावांच्या साथीनं सावित्रीमाई सुद्धा अगदी भव्य वाटायच्या. त्या अंगावर अलंकार नेसत नसत. गळ्यात काळ्या मण्यांमध्ये सोन्याचा एक मणी असलेलं मंगळसुत्र असायचं. कपाळावर कुंकू पण त्यांच्या साड्या आणि चोळ्या मात्र उंची असत. पण अनेकदा त्यांच्याबद्दल लिहीताना अनेक लेखकांनी मुद्दाम त्यांच्यावर साधेपणाचा आरोप करत त्याचं ग्लोरिफिकेशन केलेलं आढळलं आहे. आपले कपडे चांगलेच असावेत असा दोन्ही उभयंताचा विचार असे. सावित्रीमाई जेव्हा शाळेला निघत तेव्हा त्या सोबत एक एक्स्ट्रा लुगडं ठेवत. आता ते का ठेवत याबद्दल वेगळं सांगायला हवं का? जेव्हा कुणी एखादी गरिब, पीडीत स्त्री सावित्रीमाईंसमोर येई अन् तीचं मळलेलं, फाटकं लुगडं त्यांना दिसे तेव्हा माई त्यांना स्वतःचं लुगडं, चोळी देऊन परत पाठवत असे.
आज जोतिरावांचं अनेक फोटो उपलब्ध आहेत. पण त्यातील एकच फोटो खरा आहे ज्यात जोतीबा एका खुर्चीवर बसलेले असून डोक्यावर पगडी आहे. त्यात त्यांच्या दाढीचे थोडेसे खुंट वाढलेले आहे. त्यामुळे शासनमान्य असा तो एकच फोटो. त्यांच्या बाजूला टेबल होता की नव्हता हे ठाऊक नाही. कारण जेव्हा तो फोटो मिळाला तेव्हा अतिशय जीर्ण अवस्थेत होता. त्यावर हळद कुंकवाचे डाग होते. तेलाचे डाग होते. फोटो प्रोसेस करून मग एक फायनल कॉपी तयार केली गेली. दूर्दैवानं सावित्रीमाईंचा अधिकृत फोटो उपलब्ध नाही. जोतीबा बरेच काही होते. आदर्श शिक्षक, सहचर, उद्योजक होते.
आज 28 नोव्हेंबर, तात्यासाहेबांचा स्मृतीदिन. तात्यासाहेबांच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने हा छोटासा प्रपंच क्रांतिसूर्य मधून साभार…

वैभव छाया..
#Krantisurya

नोट पे खर्चा..


एक नोट छापण्यासाठी किती खर्च येतो बरं… गुगलवर शोधलं तर एक इमेज मिळेल, त्यात एका नोटेसाठी कमीत कमी दिड रुपया ते जास्तीत जास्त पावणे दोन रुपयांचा खर्च मांडलेला आहे. पण ते पुरेसं सत्य नाही. नोटा छापण्याची प्रोसेस ते ग्राहकाच्या हातात नोट येईपर्यंत नोट कित्येक प्रोसेस मधून जात असते त्यावर थोडा डोळा काना करून पाहूया. कारण टिका केली तर देशद्रोही म्हणतील.
 
नोटा छापण्याची प्रोसेस सुरू होते ती जंगलकटाईपासून. नोटा बनवण्यासाठी लागणारा कागद हा लाकडापासून बनवला जातो. उसाच्या चिपाडापासून बनलेला कागद चालत नाही. त्यावर विविध रंगांच्या शाईचं प्रिटींग होऊ शकत नाही. शिवाय तो भिजल्यावर लगेच लगद्यात रुपांतरित होतो म्हणून लाकडाचाच कागद. तर आपल्या अर्थव्यवस्थेला दरवर्षाला साधारण साडे बावीस हजार मेट्रीक टन इतका मोठा कागद फक्त नोटा छापायला लागतो. याचं परिमाण जर रिम मध्ये कनवर्ट केलं तर साधारण 90 लाख रिम एवढं भरतं. तर 90 लाख रिम कागद मिळवण्यासाठी सर्वात आधी दरवर्षी साडे पाच लाख झाडांची आपण कत्तल करतो.
 
झाडं तोडणं, त्यापासून मिळणाऱ्या लाकडाला प्रोसेस करणं, त्याचा कागद तयार करणं यासाठी येणारा खर्च भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम ला आरटीआय टाकून विचारलं तरी उत्तर देत नाहीत. पर्यावरण वादी ही या मुद्द्याकडे डोळेझाक करतात. अर्थव्यवस्थेचा हा दोष असतो.
 
तर गंम्मत अशी आहे की आपल्या अर्थव्यवस्थेच्या उत्पादन खर्चातून शिल्लक राहीलेली 35 टक्के रक्कम फक्त कागदाच्या निर्मीतीवर खर्च करतोय. आता येऊयात अॅक्चुअल प्रिटींगवर. प्रिंटींगसाठी कागद तर मिळाला पण शाई, छापखाना, वर्किंग ह्युमन अवर्स यावर सुद्धा नजर टाकूया.
 
भारतातील १६.२४ लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी ८६% चलन (सुमारे १४ लाख कोटी) हे ५०० व १००० च्या नोटांच्या स्वरूपात आहेत. (मार्च २०१६ मध्ये ५०० रुपयांच्या १५७० कोटी नोटा तर १००० रुपयांच्या ६३२ कोटी नोटा)
ह्या नोटा नव्याने (५००, १०००, २०००, १००, इ. स्वरूपात) छापण्यासाठी सुमारे १ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. भारतीय चलन छपाईची मासिक क्षमता सुमारे ३०० कोटी नोटा.
 
नुकत्याच संपलेल्या जून महिन्यात जे वर्ष पूर्ण झालं त्या कालावधीत आरबीआयने साधारणपणे 21 अब्ज नोटा छापल्या आणि त्याला प्रिटिंगसाठी केवळ 3421 कोटी रुपये खर्च आला.
 
आता या छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँक अहमदाबाद, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, बेलापूर (नवी मुंबई), कोलकता, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई (फोर्ट), नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरूवअनंतपूरम येथील कार्यालयांमध्ये पाठवते. मग तेथून कोषागार शाखा, तेथून बँका, एटीम आणि एंड युजर असतो तो ग्राहक.
 
तर मुद्दा असा आहे की, या नोटा प्रिंट झाल्यानंतर हजारो लीटर डिझल, आणि लाखो मनुष्यबळाचे तास वापरून व्यवस्थेत कार्य़रत होते. या सगळ्यांचा हिशोब लावला तर एक नोट कितीला पडली बरं?
 
मग आता तब्बल 14 लाख कोटींचं चलन जेव्हा एकाएकी रद्द झालंय अशा वेळेस आपल्या अर्थव्यवस्थेला किती खर्व निखर्वचा घोडा लागलाय याचा अंदाज बांधता येईल का? बरं नव्या नोटा छापण्याची प्रोसेस सुद्धा अशीच.. त्याचा खर्च कुठून येणारे?
ते माहीत नाही…
 
1. रेग्युलर औषधं घेणाऱ्यांनी औषधांचा साठा करून घ्या.
2. तांदूळ डाळी गहू यांचे भाव मार्चनंतर भरमसाठ वाढणारेत.
3. कांदा रडवेल, लसून दिसणार नाही.
4. शेतकऱ्यांसोबत, शेतमजुरांच्याही आत्महत्या वाढतील.
5. यात भर पडेल ती नाका कामगार, रोजंदारी वर जगणारे बिगारी लोक
6. सर्वात पहिल्या मृत्यूमुखी पडतील त्या स्त्रिया आणि लहान बाळे.
 
संकुचित राष्ट्रवाद या महायुद्धाची बीजं रोवत चालतो. बँकिंग सिस्टीम की प्लेअर असते. जगाचं राजकारण आणि संकुचित राष्ट्रवाद फोफावणारी तत्वं सत्तेत आहेत. बाकी आपण सुज्ञ आहात.

मेमरी

काल कधी नव्हे ते 2013 सालची मेमरी पोस्ट दिसली. लिहीलंच नव्हतं काहीही फारसं अख्ख्या वर्षात. हरखून गेलेलो होतो. हरखून गेलो होतो की हरवलो होतो ते ठाऊक नाही. पण स्वतःला कुठे तरी विसरून जगत होतो. पोस्ट दिसली. दिसताक्षणीच डिलीट केली. डिलीट करतानाही फारसं काही वाटलंच नाही. निर्विकार भावनेनं सहज पोस्ट डिलीट केली. पोस्ट होती तीच्यासोबतच्या मरिनवरच्या पावसाची.

तीची आणि माझी गोष्ट कधी सांगावी का असा प्रश्न मनात नेहमी डोकावून जायचा. पण स्वतःला आवरतं घ्यायचो. मनाला सांगायचो की हे सारं काही पर्सनल आहे. यात सार्वजनिक सांगण्यासारखं तरी काय आहे? पण या जगात पर्सनल असं काहीच नसतं. ती स्त्री आहे. स्त्रीवादी चळवळीनंच जगाला शिकवलंय पर्सनल इज पॉलिटिकल. प्राईवेट इज पॉलिटिकल. आणि म्हणूनच तीची आणि माझी गोष्ट ही पर्सनल ठेवणं त्या घटनांवर, त्या अलवारपणावर अन्याय करणारं ठरू शकेल.
तर ती मुंबईबाहेरची. मुंबईत आली तेव्हा मुंबईचं दमट घामट वातावरण सहन होईना. पण हळूहळू पडायला लागली मुंबईच्या प्रेमात. आणि अखेरिस माझ्याखातर अख्खीच्या अख्खीच पडली. पावसाळा सुरू झाला. तेव्हापासून तीचा हट्ट होता की पावसात भिजायचंय. ते ही तुझ्यासोबतच. मी नेहमीसारखा नकारघंटा वाजवायचो. कारण साधं सुधंच होतं. पाय भिजेल बिनकामाचा खर्च होईल. त्यात ट्रीटमेंट सुरू होती. केसांचं छप्पर गायब होतं. टक्कल फार डेंजर दिसत होतं.
आणि ती अफाट सुंदर. माझ्या नजरेला ती अफाट सुंदरच होती. असो…

जून पासून तीनं लावून धरलेला हट्ट अखेर तीनं सप्टेंबर मध्ये पुरवूनच घेतला. पावसात भिज म्हणून तीनं जबरदस्तीनं जॅकेट गिफ्ट केलं. पायाला प्लास्टिक फॉईलनं रॅप केलं. नवं टि-शर्ट आणलं. चाफ्याची भरपूर फुलं दिमतीला ठेवली. आणि मला राजी केलं.

परतीच्या पावसाचा मौसम सुरू झाला होता आत्तासारखा.
तुफान पाऊस बरसत होता. त्या भर पावसातच गिरगाव पासून ट्रायडंट परत मला चालत नेलं. दोघं पूर्ण भिजलो होतो. या घटनेत काय वेगळं होतं… काही नाही ना.. चारचौघांसारखंच तर भिजलो होतो.

पण त्या भिजण्यानं मला अनेक अंगांनी समृद्ध केलं होतं. ज्या पावसाचा मी प्रचंड रागराग करायचो, घाबरायचो. त्याच्याकडं आता जरा पॉझिटिवली पहायला शिकवलं तीनं मला. आकंठ भिजणं कशाला म्हणतात हे त्या रात्री तीनं मला शिकवलं. इरॉस कसा अंगावर झेलावा आणि स्पर्शविहीन ऑर्गेझम कसा अनुभवून स्वतःला तृप्त करावं हे त्या दिवशी अनुभवलं. पार भिजून शेवटच्या ट्रेननं घरी निघालो तेव्हा ओल्याशार केसांसकट माझ्या चेहऱ्यावर स्वतःला झोकून दिलेली ती … मला ती सोबत असेपर्यंत फक्त त्याच प्रतिमेत दिसायची. घरी पोहोचलो तेव्हा भिजलेल्या अवस्थेतच आईनं वैतागून स्वागत केलं. नंतर काय झालं ते न लिहीणंच बरं… एकुण तो प्रसंग होताच तसा मस्त, रुमानी.

पण आयुष्यात साऱ्या गोष्टी चिरकाल नसतात. काही फळाला जातात तर काही वेळेआधीच मरून पडतात. ज्या जन्माला येतानाच सशक्त नसतात त्यांचं आयुष्य तरी किती असणारे बरं? त्याच न्यायाने जितक्या जलदतेनं ते जन्माला आलं तितक्याच जलदतेनं ते मेलंही. आधी खुप त्रास व्हायचा.. जेव्हा केव्हा समुद्रावर एकटा जाऊन बसायचो तेव्हा. आता चूकून सुद्धा आठवत नाही. आठवलं तरी निर्विकार पणे पाहतो. थोडा आपसूकच हसतो. आणि आपला त्याच्याशी काही संबंध नाही या अर्विभावात सोडून ही देतो.

आपण किती निष्ठूर असतो आपल्याच भावनेशी याचा प्रत्यय वारंवार घेतो. पण प्लाटोनिक रिलेशनशीप जपून स्वतःचा देवदास करण्याचा जमाना दिलीप कुमारच्या रिटायरमेंटसोबतच संपला. प्रेम, नातं, पार्टनर हा प्रॅक्टिकल घटकांमध्ये मोडणारे प्रकार झाले आहेत. कंपॅटिबीलीटी नसेल, आपल्या गरजा पूर्ण होणाऱ्या नसतील तर आपण सहज विलग होतो. थोडक्यात वेळेनुरूप आपण प्रेम आणि त्यातून उमलणारं नातं जपायचं की नाही याचा निर्णय प्रचंड डिप्लोमॅटिकली घेतो. यालाच पॉलिटीकल बिहेविअर म्हणतात. म्हणून म्हटलं नथिंग इज पर्सनल.

याचा अर्थ असा होत नाही की त्या वेळी व्यक्त झालेल्या भावना ह्या खोट्या असतात… त्या अगदी निर्मळ असतात. पण त्याच गर्तेत अडकून राहणारा माणूस हा आजच्या जगात जगण्याचा लायकीचा नाही. हे मला ती सोडून गेल्यानंतरच कळालं. काही निर्णय आणि घटना योग्य गोष्टीसाठीच घडतात. त्या अनुभवांतूनच माणूस समृद्ध होत जातो. माझं समृद्ध होणं यासारख्या अनेक घटनांतून आलेलंय. म्हणून आज मला ना राग आहे ना लोभ ना द्वेष… पूर्णतः त्रयस्थ… अगदी आभाराची देखील भावना नाही.

आणि हा स्वार्थीपणाच कदाचित बाहेरच्या प्रॅक्टिकल असणं म्हणून ओळखलं जातंय.

क्रमशः

गणेशोत्सवाच्या निमित्ताने…

तिसरी चौथीत असेल तेव्हा जिद्दीनं वस्ती-चाळीतल्या पोरांना जमा करून गणपती बसवला होता. सलग आठवीत असेपर्यंत. नववीला बहिष्कृत भारत हाती पडलं त्यानंतर पुन्हा कधी गणपती बाप्पाचा मोरया मोरया केला नाही. नंतर दाभोळकर नावाचा विचार मूर्तीपुजेवर प्रश्न विचारायला शिकवता झाला. असो. मुद्दा हा की, प्रबोधन होण्यासाठी विचाराची गरज असते.
———————————————
तरुण मुलं ही एनर्जीने ओतप्रोत भरलेली असतात. त्यांची एनर्जी ही बाहेर पडणे फार गरजेचे असते. दूर्दैवाने बहुसंख्य तरुण असलेल्या भारतासारख्या देशात तरूणांची एनर्जी योग्य तऱ्हेने बाहेर पडण्यासाठी समाजव्यवस्थेने काही एक पॉझीटीव्ह माध्यम अथवा यंत्रणा विकसित केलेली नाही. चीन, अमेरिकेने ह्याच एनर्जीला वापरून घेत क्रिडा क्षेत्र, विज्ञान, शेती क्षेत्र कैक पटीने विकसित केले आहे. आज गणेत्सोवात नाचणारी, राबणारी मुलं, मुली ही एनर्जी बाहेर निघण्याचे मार्ग न मिळालेली युवा आहेत. त्यांची रग इथेच निघणार. नाचणं तेही रांगडं. रांगड्या नाचण्याला गाणी सुद्धा तशीच रांगडी, त्याच ठोक्यातला खर्जातला आवाज. गणेत्सोवात काम करणारी बहुतांशी मुलं ही ओबीसी, मराठा वर्गातली. त्यांना उत्सवासाठी मनोरंजन पुरवणारी एससी एसटी प्रवर्गातील मुलं. कसदार हातांशिवाय ढोल बडवणं अशक्यच. हा त्यांच्या त्यांच्या राजकीय आकांक्षेचा आणि प्लेजर सिस्टिमचा भाग आहे.
——————————————-
ब्राह्मण कुटूंबात गणपती दीड दिवसाचा असतो. बहुतांश घरात दीडच दिवसाचा. बहुजन या संकल्पनेत मोडणारे दहा दिवस साजरा करतात. अभिजन कुटूंबातील मुलांच्या प्लेजर सिस्टीमचा भाग वेगळा आहे. त्यांना विविध कार्यक्रम लहानपणापासूनच मिळालेले असतात. त्यांचा बहुतांश वेळ अभ्यास, वाचन, करियर (स्पोर्ट्स) यांत कसा गुंतवावा याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घरातून आई वडिलांकडूनच दिलं जातं. याउलट बहुजनांच्या घरात विरूद्ध स्थिती. या मुलांना त्यांच्या आकांशा पल्लवित करणारे, रग जिरवणारे कार्य़क्रम द्या. मग पुन्हा त्यांना रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही कितीही हाका मारा, आमिषं द्या. येणार नाहीत.
रिकाम्या पोटाकडूनच दगड उचलला जातो. आपण तरुण वर्गाला कार्य़क्रम देण्यात अयशस्वी ठरलो आहोत. कारण आपण इतिहासात आणि वादविवादात रमणाऱ्या समाजव्यवस्थेचे गोडवे गातो आहोत. आणि इतरांनाही ते गायला भाग पाडत आहोत. समाज म्हणून, देश म्हणून आपण आजही मध्ययुगीन आहोत.
—————————————-
बाकी वाजंत्री ठरवत असाल तर वाजवणाऱ्या पोरांना योग्य तो मोबदला जरूर द्या. नोटा खाली टाकून ढोलावर आडवं उताणं होऊन नोट उचलण्यास भाग पाडू नका. ताशात गुलाल उतरेस्तोवर ताशा बडवायला लावू नका. हे उच्च कोटीचं ह्युमन ऑब्जेक्टिफिकेशन आहे.