लोकलचा गार्ड

मोटरमनवर लिहीलेल्या प्रकरणानंतर अनेकांनी मला हा विषय एका डॉक्युमेंटरीचा अथवा शॉर्ट फिल्मचा विषय होऊ शकतो असं सांगितलं. आपण ते करूयात असंही सुचवलं. मोटरमनचं आयुष्य वेगळ्या धाटणीतलं. पण त्याहूनही अलग रंगातलं आयुष्य असतं गार्डचं. लोकल गार्ड नावाची जमात प्रचंड जबरदस्त असते. प्रत्येक प्रवाशाकडून शिव्या खाणारी पण तरीही तितकीच कार्यतत्पर असणारी जमात. गार्ड लोकं थोडेसे एक्स्ट्रोवर्ट असतात. ते भरपूर बोलतात. त्यांची हालचाल प्रचंड एनर्जेटिक असते. ते अनेक विषयांवर भरभरून बोलतात. त्यांना सातत्याने स्वतःला बोलतं ठेवणं गरजेचं असतं. त्याची काही कारणंही आहेत.

जोपर्यंत लोकल गार्ड हॉर्न वाजवत नाही तोवर सिग्नल असूनसुद्धा मोटरमन गाडी पुढे नेऊ शकत नाही. गार्ड हा पूर्ण लोकलचा गार्ड असतो. प्रवाशांच्या जीवीताची काळजी घेणं हे सर्वस्वी गार्डच्या जबाबदारीचं काम. गार्डचे ड्युटी अवर्स सुद्धा चार तासच. ट्रेनच्या रनिंग टाईमचे चार तास. मुंबईतल्या मुंबईत अनेक लग्न होतात. लग्नाचं वऱ्हाड बसनं घेऊन जाणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. बऱ्याच लग्नांची वऱ्हाडं लोकलने जातात. तेव्हा घरातला मोठा माणूस एक शर्ट पीस, थोडेसे तांदूळ, एखादं नारळ गार्डला भेट देतो. कधी कधी एखादी भेटवस्तू असते. भेट देताना एक विनंतीही असते. अमक्या अमक्या स्टेशनला वऱ्हाड उतरेल जरा गाडी थोडा वेळ जास्त थांबवा. सिग्नल असतानाही जास्त वेळ गाडी थांबवणं सगळ्या लोकलच्या टाईमटेबलवर परिणाम करणारं असतं हे माहीत असूनही तो गाडी मिनिटभर तरी थांबवतो. सगळे उतरलेत का याची खात्री करतो. भेट घेऊन आलेला माणूस जोवर हात करत नाही तोवर गार्ड लोकलला हॉर्न देत नाही. तीच गत गरोदर बाई बाळंतपणासाठी दवाखान्यात भर्ती व्हायला जात असेल तर, एखादा पेशंट व्हील चेअर वरून नेला जात असेल तर गार्ड लोकांची अदृश्य मदत लागतच असते. अनेकदा गाडी सुटते, प्रवाशी मागून पळत येत असतो. तसं मुंबईत प्रत्येक गाडीमागे पळणारे प्रवासी पाहणं ही काही नवीन गोष्ट नाही. काही वेळेस गार्ड अचानक गाडी थांबवतोही तर कधी तसंच त्या पळणाऱ्या जीवाकडे पाहत राहतो. कारण गाडी थांबवणं नियमात बसणारं नसतं. पळून थकलेला प्रवासी लांबूनच दोन तीन जबर शिव्या हासडतो. लोकल गार्ड त्या शिव्याही खाऊन घेतो. पण तो प्रतिकार करत नाही. करूही शकत नाही.

ट्रेन अॅक्सिडेंट होतो, पेंटोग्राफ पडतो, रुळ निसटतो, सिग्नल काम करणं बंद करतो तेव्हा गार्डच्या जिम्म्यावर अख्खी ट्रेन आणि ट्रेनमधले प्रवासी असतात. ट्रेन ठरलेल्या वेळेपेक्षा मिनिटभर जरी लेट झाली तर ती नेमकी कुठे लेट झाली, मोटरमनने नेमक्या कोणत्या क्षेत्रात अनावश्यक स्पीड मेंटेन केला होता पासूनचे सगळे डिटेल्स मेंटन करावे लागतात. सध्या गार्डच्या भरतीत कमालीची कमतरता केलीये सरकारने. नवीन भर्ती अभावानेच आढळून येत आहे. एकाच गार्डला दोन दोन कधी कधी तर तीन शिफ्ट सलग कराव्या लागतात. तरी न थकता ते करतात.

गार्ड लोकांचं सख्य असतं ते स्टेशनवर हमाली करणाऱ्या हमालांशी. अवजड बोजा लगेजच्या डब्ब्यात भरणाऱ्या ओझे वाहणाऱ्यांशी. ते फक्त हात करतात. पूर्ण सामान आता भरेपर्यंत तो बेल मारत नाही. थातूर मातूर कारण सांगून वेळ टाळून नेतो.

आपल्या घरांतल्या बाया ज्या क्वचितच प्रवासासाठी बाहेर पडतात त्यांना ट्रेन मध्ये कसं चढावं हे माहीत नसतं. अनेकदा ट्रेनमध्ये चढताना त्या पडतात. दारात शिरायला जागा नसते तरी बळंच दारात उभं राहण्याचा आपण धोका पत्करतो. बऱ्याचदा पडतोही. काही प्रसंगी सरळ खाली घुसून अपंग होतात. मरतात. अपंगांच्या डब्यातले काही घुसखोर चैन खेचायला भाग पाडतात. तेव्हा ट्रेन थांबवावी की थांबवू नये या विवंचनेत गार्डला टाकलं जातं. आपण सामान्य प्रवाशी, आपल्या चुकांवर पांघरूण घालून आपण त्याचं खापर गार्ड वर फोडतो. त्याला केबिनमधून बाहेर खेचतो. त्याच्या आई बहिणींच्या नावाने प्रचंड उद्धार करतो. मारतो, धमकावतो. आपण विसरतो तो या तासाभराच्या प्रवासातला आपला गार्ड असतो. प्रवास करताना आपण जे तिकीट काढतो त्यात सेफ्टी चार्ज आकारलेला असतो .. याचा अर्थ असा नाही की आपण कसेही वागलो तरी आपण सुरक्षित राहू. सुरक्षित प्रवास करणं ही आपली सुद्धी तेवढीच जबाबदारी असते.

वैभव छाया

पूर्वप्रकाशित

‪#‎LastLocal‬

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s