लोकल सुरळीत चालण्यासाठी अविरत धावणारे ‘गँगमन’

 

गँगमन तसे आपल्या परिचयाचेच. लाल टोपी, भगवा शर्ट, खाकी पँट, काळे मळकटलेले बुट, रापलेला हात अन् सुरकुत्या पडलेला चेहरा. खांद्यावर रिंगा, हातात पहार, पँटच्या लुपला अडकवलेली मोठ्ठाली पक्कड असा अवतार.

आपण प्रवास करतो लोकलनं. पण आपलं लक्ष सहसा त्यांच्याकडे जात नाही. व्यवस्थेतल्या खालच्या घटकातले लोक. देवांच्या राज्यात महारकीचं काम करणारा यम सगळ्यांचे मढे गोळा करत हिंडत असतो. तसेच हे गँगमन लोकं रेल्वेच्या लाईनीचे मढे खांद्यावर घेऊन हिंडत असतात.

रेल्वेचं बजेट सादर होतं दरवर्षी पण, क्वचितच गँगमनचा त्यात विचार होतो. शेवटी चतुर्थ श्रेणी कामगारच तो. त्यांचा विचार होईल, अशी अपेक्षा करणं देखील आता चुकीचं वाटू लागलंय. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना गँगमनला पगारवाढ मिळाली. महागाई भत्ता वाढवून मिळाला. सुरक्षेची हमी मिळाली. त्यानंतर आता भाजप सरकारनं रक्षक नावाची योजना आणून त्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे म्हटले तरी आहे. पण ती योजना अंमलात येईल की नाही, याबद्दल फारसं शाश्वत काही वाटेना.

आजमितीला भारतीय रेल्वेत साधारण चार लाखाच्या आसपास गँगमन कार्यरत आहेत. त्या सेक्शनमध्ये काम करणाऱ्यात शंभर टक्के भर्ती ही मागास जातीतील कर्मचाऱ्यांचीच. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालंच तर महार, मांग, चांभार, ढोर, नामदेव कोळी या जातीतील कामगारांचाच भरणा अधिक.

बारीकशी देहयष्टी असलेल्या या गँगमनचं काम तसं सर्वात धोकादायक. दरवर्षी रेल्वे ट्रॅकवर काम करताना सरासरी हजारेक गँगमन आपला जीव गमावतात. भरपाई म्हणून रेल्वे अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना पुन्हा गँगमन म्हणून सामील करूनच घेते. शिवाय तुटपुंजी रक्कम ही देते. साडे तीन हजार रुपये पेंशनही चालू करते. गँगमन म्हणूनच वारसाहक्क चालवत असतो. जसं जातीचा जोहार वारसाहक्कानं मुलाकडं येतो तसा हा गँगमनचा वारसा.

कधी कोणता गँगमन तुम्हाला भेटला तर नीट निरीक्षण करून पहा. हातांना जखमा दिसतील. कुठे कापलेले, फाटलेले, टाके पडलेले दिसतील. काळे चामड्याचे बुट तर पायात दिसतील पण ते बुटही निरखून पहा. अर्धवट जळालेले, अंगठा बाहेर डोकावून पाहणारे ते बुट त्यांच्या हलाखीची साक्ष देत राहतील. मी आपला उगाच त्यांच्यात जाऊन बसायचो. गप्पा मारायचो. गप्पा मारण्यासाठीची बेस्ट जागा म्हणजे आमचा हँडीकॅपचा डब्बा. त्यांचं सामान, अवजारं वाहून नेण्यासाठीचा त्यांचा हक्काचा डब्बा. अपंगाच्या डब्ब्यात इतर कोणालाही सामान वाहू दिलं जात नाही, पण गँगमन जेव्हा चढतात तेव्हा त्यांना कुणीच हटकत नाही. उलट बसायला जागा ऑफर केली जाते.

रेल्वेचा रुळ तुटला, ओव्हरहेड वायर तुटली, ब्रीज निखळला, गाडी घसरली, ट्रॅकचं अलाईनमेंट बिघडलं की यांचं युद्धपातळीवरलं काम सुरू होतं. मग पाऊस असो वा कडाक्याचं ऊन किंवा मरणाची थंडी. दिवस असो रात्र त्यांना काम करावं लागतं. उघड्या हातांनी सिग्लनचे खांब चढावे लागतात. सिग्नलच्या पोलमध्ये कधी अचानक करंट उतरला तर आपलं काय होईल हा प्रश्न विचारण्याची मुभा त्यांना नसते. ओव्हरहेड वायरमध्ये कावळा अडकला की लाईन बंद पडते तेव्हा 22 हजार व्होल्टच्या वायरीला साफ करणं, वास मारणाऱ्या अर्धवट जळालेल्या पक्षांना हातानं बाहरे काढणं त्यांच्यासाठी जरी रोजचं काम असलं तरी ते मढं उचलण्यासारखंच. ट्रॅकचं अलाईनमेंट बिघडलं की ट्रॅक कट करणं. ते कट करत असताना अंगावर उडणाऱ्या ठिणग्या आपल्याला दिसत नाही. त्याचे चटके मात्र त्यांच्या अंगावर पडत असतात.

आज बऱ्याच ठिकाणी मानवरहित सिग्नल यंत्रणेवर गँगमन काम करतात. समोरून गाडी येतेय का, आपण ज्या ट्रॅकवर काम करतोय तिथं आपण सुरक्षित आहोत का हे असले विचार त्यांनी करायचे नसतात हा समजच रुढ झाला असावा कदाचित त्यांच्यात. त्यांना फावल्या वेळेत वाचायला आवडतं. पुण्य नगरी हा त्यातल्या त्यात त्यांचा आवडीचा पेपर. जेवण सुद्धा ग्रुपनं करतात. माळकरी असेल एखादा तरी त्याला पर्वा नसते की कुणाच्या डब्ब्यात सुकट आहे की अंड्याची बुर्जी. त्यांच्यात तशी शिवाशिव नसते. कधी कधी हाताला लागलेलं ग्रीस धुवायला ट्रॅकवर पाणीही नसतं कागदाला, रुमालाला, फडक्याला हात पुसून तसंच जेवायला बसणं ही त्यांची गरज असते. जेवण झालं की एखादा अख्खी ओम पुडी, सातारी बाहेर काढतो. आवडीनुसार चुना त्यात मळतो. प्रसाद वाटावा तशी तंबाखू सोबतीच्या सहकाऱ्यांना वाटतो. प्रत्येकजण तंबाखू मळलेल्या हातातून प्रसादासारखी चिमुटभर काढून समाधी लावतात. ही समाधी डोळे बंद करणारी नसतेच. ती कामात त्यांना एकाग्र करणारी असते.

अनेकदा गँगमन ट्रॅकवर काम करत असतात. बाजूने लोकल जाते. दारात उभे असलेले टवाळखोर मुद्दाम ओरडून जातील. क्वचित प्रसंगी त्यांना शिव्या देणारे हरामखोरही कमी नाहीत. काही गँगमन म्हणतात, वेस्टर्न लाईनवर काम करणं खुप किळसवाणं वाटतं. लोक पचापच थुकतात. बऱ्याचदा अंगावर पडतं. पण पर्याय नसतो. आम्ही काय धावत जाणार आहोत त्यांच्या मागं. आम्ही आपले एका हातात हाथोडा आणि छिन्नी घेऊन अख्खा ट्रॅक शोधत असतो. एखादा तरी हुक निसटलेला असेल तर अख्खी गाडी पलटी होऊ शकते.

हो बरोबरचे.. एखादा तरी हुक निसटलेला दिसला तर त्याला तो ठोकत जातो. जमेल तिथं, गरज असेल तिथं ऑईलिंग करत जातो. त्यानं लोकल स्मुथ जाते. पण त्या गँगमनचं आयुष्य स्मुथ करणारं साधं फिलिंगही आपल्यात आपण बाणवत नाही. आपल्यासाठी तो इनविजिबल कॅरेक्टर असतो. गँगमन हँडल करणारे अधिकारीही त्यांच्याशी गुलामासारखाच व्यवहार करतात. त्यांना अत्याधुनिक साधनं, सुरक्षेची हमी, तात्काळ वैद्यकिय सुविधा, रेग्युलर चेकअप पुरवणं गरजेचं वाटत नसावं रेल्वे प्रशासनाला.

आपण तरी काय वेगळं करतो बरं? आपण त्याच्या श्रमाला योग्य ती प्रतिष्ठा, किंमत देण्याच्याही तयारीत नसतो. जर ह्या सगळ्यांनी मिळून संप पुकारलाच तर काय होईल बरं? काही होणार नाही. शेवटच्या लोकलमध्ये त्यांचं सामान वाहून नेणं आणि त्यांचं तेवढा दिलखुलास गप्पा मारत आनंद शोधणं तेवढं कमी होईल बरोबर ना?

वैभव छाया

पूर्वप्रकाशित
एबीपी माझा ब्लॉग

Vaibhav Chhaya’s blog on Railway Gangman

फेसबुक लिंक

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s