इस्लाम आणि मी

सदर लेखन वाचण्यापूर्वी वाचकाने लक्षात घेण्याजोगी गोष्ट. मी इस्लाम समर्थक नाही. मी मुसलमान विरोधक नाही. मी इस्लामशत्रु नाही परंतू मुस्लिम हितचिंतक जरूर आहे. हे सांगण्यामागचे कारण ही साधेसेच आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर एका बंधूंनी मी अँटी इस्लामिस्ट असल्याची अप्रत्यक्षरित्या टिपणी केली होती. माझा इस्लाम आणि मुसलमानांशी आलेला संबंध हा अशा प्रकारे …

मी तिसरीत असेपर्यंत मुसलमान म्हणजे नेमके कोण हे नीट ठाऊक नव्हतं. इयत्ता चौथीत प्रवेश केला आणि आपण म्हणजे हिंदू जे चांगले लोक आणि आपले शत्रु म्हणजे मुसलमान अतिशय वाईट लोक. जे लोक दाढी ठेवतात. काळे बुरखे घालतात. दंगली करतात. कत्तली करतात. जुलूम करतात. अन्याय करतात. त्यांना वाचवण्यासाठी शिवाजी राजा हाच आपला एकमेव हिंदू राजा अशा पद्धतीचं शिकवणारे शिक्षक लाभलेले होते. असो वाद नाही. तो काळ होता 95-96 सालचा. आजच्यासारखाच युतीचं सरकार येण्याचा. 92-93 च्या दंगलीची पार्श्वभूमी. 93 चे बाँम्बब्लास्ट. त्यामुळे मुसलमान म्हणजे गुंड-डाकू-अंडरवर्ल्ड हा समज अतिशय खोलवर रुजलेला. तरी त्या वयात आमचं उपद्रव मूल्य अतिशय नगण्य असल्याने फारसा फरक पडला नाही.

1997 साली झालेला रमाबाई हत्याकांडाचा अमानुष प्रकार आयडेंटीटी क्रायसीस मधून सोडवून गेला. आपण हिंदू नसून मागासवर्गीय आहोत. आपलं स्वतःचं एक जातवास्तव आहे हे अधोरेखित करून गेला. असो. शाळेत कधी मुसलमान मित्र नव्हते. कॉलेजमध्येही एक दोन मुसलमान मित्र होते तर ते ही अतिशय कातडी चोरून राहत. जे काही ऐकून होतो त्यामुळे विशेष कुतूहूल होतं. कल्याणच्या गोविंदवाडीला छोटा पाकिस्तान का म्हणतात? मुसलमानांच्या घरी जेवायचं नाही असा अलिखित नियम का म्हणून आहे. हे ठाऊक नव्हतं. ते मांस खातात हे ठाऊक होतं. पण बैलाचं मांस खातात ते आपल्याला निषिद्ध आहे हे ठसवून आजूबाजूवाल्यांकडून सांगितलं जात होतं. आणि या लोकांचेच आमीर खान, शाहरूख खान फेवरिट हिरो होते.

माझ्या मामांचे मित्र प्रा. मारूफ बशीर यांच्याशी माझी ओळख झाली ती 2002 साली. मुसलमान माणूस. मुल्ला सारखा पेहराव. पायाच्या घोट्यांपर्यंत ओढून घेतलेला पायजमा. काळा डाग पडलेलं कपाळ, पांढऱ्य कुर्त्यावरचं उंची अत्तर, छानसा चष्मा अन् मेहनतीनं वाढवलेली दाढी. सरांशी भेटलो तेव्हा प्रचंड इंप्रेस झालो. अतिशय जबरदस्त वक्तृत्व शैली असलेला हा माणूस माझ्यावर प्रचंड प्रभाव पाडून गेला. तेव्हा मी मिलिंद प्रश्न वाचत होतो. म्हटलं आता कुराण वाचावयास हवं. सरांकडे डिमांड केली. म्हटलं मला कुराण आणून द्या. मराठी भाषांतर तर असेलच. सरांनी डिमांड पूर्ण केली. कुराण आणून दिलं. लागलीच सात दिवसात ते वाचून पूर्ण केलं. वाचत असताना लक्षात आलं की हे तर भाषांतर आहे. अजूनही लोकांनी याचं भाषांतर केलेलं असेलच. म्हणून कुराणच्या एक नव्हे तर तब्बल सहा संस्करण वाचून काढले. त्यातली आयतं तपासून पाहीली. त्यातल्या अनेक आयतांवर सरांशी, त्यांचे सहकारी आरिफ उस्मानी, आमीन मोईनतुल्ले, सिया काबीर आणि अन्य अभ्यासकांशी चर्चा केली. खरं तर मला कुराण फारसं काही पटलेलं नव्हतं. एकेश्वरवाद हा न पटणारा कंसेप्ट. इस्लाममध्ये मूर्तीपुजा अमान्य आहे. पण इतर मूर्तीपुजकांना प्रबोधनाऐवजी तुच्छतेने लेखण्याचा जो काही प्रकार इस्लामवाद्यांकडून केला जातो तो ही अमान्य असल्याचे सांगितले. इस्लाममध्ये महिलांना बुरख्यांची सक्ती आहे. वाळवंटी प्रदेशात पुरूष पांढऱ्या कपड्यात तर स्त्रिया काळ्या बुरख्यात ही अमानवीय गोष्ट आहे. हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय इस्लाममध्ये डफ वगळला तर इतर वाद्य हराम का आहेत? दारू हराम आहे, सुअर हराम आहे पण सुका नषा का हराम नाही. असे कैक प्रश्न विचारले. तर आता वेळ होती उत्तराची… वर उल्लेखलेल्या नावांनी उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. पण एक गोष्ट क्लिअर कट सांगितली की, अल्ला-कुराण यांपेक्षा आम्हाला मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक जवळचा आहे. त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मुलं आम्हाला मदत करतील का? मी सरळ संमती दर्शवली.
त्यानंतर अनेक चांगल्या वाईट गोष्टींशी परिचय झाला. मुस्लिम परिसरांकडे असलेलं शासनाचं दूर्लक्ष, पाण्याची कमतरता, ते राहत असलेल्या परिसरात सातत्याने उभा असणारा पोलिसांचा ताफा, स्त्रियांना झालेले दंतक्षय रोग, विद्यार्थ्यांचं सातवी-आठवी नंतर वाढलेलं ड्रॉपआऊटचं प्रमाण, जॉबचा बॅकलॉग, विविध बँकांकडून असलेलं ब्लॅकलिस्टचं लोढणं, तरूण मुलांमध्ये वाढलेलं व्यसनाचं प्रमाण यासारख्या अनेक गोष्टी पाहून मी सून्न झालो होतो. आजवर ज्या पद्धतीचं चित्र आपल्यासमोर उभं केलं गेलं होतं त्यापेक्षा अधिक भयानक पद्धतीचं आयुष्य जगणाऱ्या या समुहावर ही अट्रोसिटी का म्हणून लादली जात आहे… या प्रश्नांचं उत्तर नव्हतं. नंतर तीनेक करियर फेस्टचं आयोजन झालं. त्यात हजारो मुलांपर्यंत पोहोचता आलं. कधी डॉ. भालचंद्रे मुणगेकर तर कधी डॉ. नरेंद्र जाधव यांच्यामार्फत निधी आणि जागा मिळवल्या गेल्या. माझ्या संपर्कात असलेले केतन वैद्य सारखे अनेक मित्र या कामी धावून आले. मी त्या कामात थोडासा सहभाग दाखवू शकलो हाच काय तो माझा रोल. पण ह्या करियर फेस्ट आढळून आलेली अजून एक भयंकर गोष्ट ती अशी…

राज्यात कुठेही दंगली होवोत, मोहल्ल्यातील तरणी पोरं पोलिस धरून नेतात. पंधरा वीस दिवसांनी आणून सोडतात. आणल्यावर पोरं किमान महिना दोन महिने उठायच्या लायकीची राहत नाही. शाळेत असतील तर शाळेतून, कॉलेजात असतील तर कॉलेजातून हाकलून दिली जातात. काही पोरं परत येतात तर काही अजूनही परतलेली नाहीत. ती कधी परततील याची आसही आई बापांनी सोडून दिलेली आहे. या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांना अनेकदा पत्रं लिहीली, निवेदनं दिली, शिष्टमंडळं नेली. दरवेळेस दालनात बसवून माघारी धाडण्यात आलं. कोण कोणत्या गुन्ह्याखाली आत आहे याचा अजून पत्ता नाही. असो. हे त्यांचं समाजवास्तव आता त्यांनीही अक्सेप्ट केलंय. त्यामुळे आता दार-उल-इस्लाम आणि दार-ऊल-हरब वर बोलण्यास मन धजावत नाही. आपण भारताचे नागरिक म्हणून त्यांना इक्वल दर्जा दिलेला नाही. शेख-पठाण तेवढे वर आलेले. अजलाफ-कासार सारख्या समुहांना तर तिथं मागासवर्गीयांसारखंच आयुष्य.

मुस्लिम कट्टर आहेत. आहेतच. ते चूक आहे. असंवैधानिक आहे. पण त्यांची कट्टरता कुणी जोपासली हा सुद्धा प्रश्न आहे. मुस्लिम शिवसेनेत जाणं पसंत करतात. कारण त्यांना भाजपापासून संरक्षण पाहीजे असतं म्हणून. मुसलमानांना धर्मप्रसारापेक्षा प्रबोधनाची गरज अधिक आहे. कुराणापेक्षा आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गरज अधिक आहे. आणि हे काम जे करतायेत त्यांच्याविरोधात फतवे काढणारे देखील मुसलमानच आहेत. यात शंका नाही. सगळेच मुस्लिम गाई ओरबाडून खात नाही. कत्तलखान्यात चामडं कमावण्यासाठी बैल कापला जातो. त्या चामड्यावर बाटा सारख्या कंपन्या पैसा कमावतात ज्या उच्चवर्णीय हिंदूंच्या मालकीच्या आहेत. त्यानंतर उरणारं मांस विकलं जातं. बीफ खाणं हे जगभरात कॉमन आहे. फक्त भारतात त्याला धर्म आडवा येतो. सगळेच मुसलमान रोज मांस खात नाहीत. त्यांच्यात शाकाहाराचा अंतर्भाव अधिक आहे. सगळेच मुसलमान पाच वेळेचा नमाज पडत नाहीत. पण पाच वेळा कर्णकर्कश आवाजात अझान देऊन नमाज पडणारे अन् महाआरत्या करणारे यात कोणताही फरक नाही. असो…

मोहल्ला कमीटीत काम करताना आजवर अनेक कडू – गोड अनूभव आले. अमर हबीब सरांना त्या काळच्या रिपब्लिकन नेत्यानं म्हटलं होतं.. “नामांतराच्या लढ्यात याचं काय काम” मलाही अनेकांनी विचारलं इसका इधर क्या काम? तिरकी नजर टाकली की परत तो प्रश्न येत नव्हता. गेल्या कैक महिन्यात तो आला नाही. ऊर्दू इंस्टीट्यूट मध्ये आजही मी सहज वावरू शकतो. तिथंच गुलजार साहेबांशी भेट झाली होती. मीनाकुमारी आणि तीच्या कवितांवर त्यांचं भाष्य ऐकलं होतं. अत्तराचा शौक इथंच जडला. अगदी लांबूनही कोणतं अत्तर, किती दिवस मुरवलेलं सहज सांगू शकलो. मिठाईचे पदार्थ किती कसे याबद्दल शिकलो. असो..
स्टँटहर्स्ट रोडला असलेल्या ऊर्दू इंस्टिट्यूट मध्ये फारूख शेख अधून मधून यायचे. कॉमन मॅन चा हिरो असलेला माणूस आतून अतिशय संवेदनशील. त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथूनच मला दावत-ए-इस्लाम चं आवतण आलं होतं. ते विनम्रतेने नाकारलं. नाकारल्याचं कारण विचारलं तर सहज सांगून गेलो. धर्माचं आणि माझं पटत नाही. माझं लोकांशी पटतं. धर्माचं आवरण काढून टाका अगर नका.. तुम्ही लोकं आहात.. माझं नातं तुमच्याशी आहे. शोषणाच्या धाग्याशी आहे. इस्लामचं आणि माझं काही नातं नाही. माझं नातं बुद्धाशी आहे. बौद्ध असण्याशी नाही. फारूख शेख मागे उभे होते. ऐकत होते. जवळ आले. डोक्यावर हाथ फिरवला. स्माईल दिली आणि निघून गेले.

कधी लिहीणार नव्हतो. कारण हा फारच पर्सनल प्रसंग आहे. यात एक चूक तर एक बरोबर आहे. अशा स्थितीचं वर्णन करणं नैतिकतेला पटलेलं नव्हतं. पण लिहावं लागलं. लोकांना गैरसमज असतात स्वतःबद्दलही आणि इतरांबद्दलही. ते वाढण्याआधीच वेळीच शमवलेले बरे.

वैभव छाया

हाच लेख फेसबुकवर सर्व प्रतिक्रियांसहित वाचण्यासाठी ..

‪#‎bittertruth‬

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s