कृतज्ञता म्हणून

व्यक्तीला नाव मिळणं हा अपघातच असतो. जन्मदाते किंवा पालक आपल्या मुलाचं व पाल्याचं नाव ठरवतात. त्या अपत्याची ओळख अन् अस्तित्व ठरवण्याची पहिली पायरी सुद्धा त्यांच्याच निर्णयप्रक्रियेचा भाग असतो. नाव लावणं, नाव काढणं, नाव राखणं हा मुद्दा भारतासारख्या पुरूषप्रधान व्यवस्था जोपासणाऱ्या देशात मात्र प्रतिष्ठेचा, सरंजामी वागण्याचे प्रतिक बनून आहे. अशा स्थितीत आईचं नाव लावणं आणि त्यातही फक्त आईचंच नाव लावून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा दिसतो तितका निश्चितच सोपा नसतो. माझ्यासाठीही हे सोपं नव्हतं.

ठाणे जिल्ह्यातलं विठ्ठलवाडी हे छोटंसं गावच. जिथं माझं बालपण गेलं. विठ्ठलवाडी नकाशावर शोधून देखील मिळणार असं होतं गेल्या दशकभरापर्यंत. अनेक छोटी-मोठी गावं, गाववाले, दारूवाले, मुंबई-ठाणे-पुण्यातून तडीपार केलेल्या अनेक लोकांच्या बळकावलेल्या जमीनींतून बनलेलं हे छोटंसं नगर. तरी जिद्दीनं उभं राहीलेलं. बेडार, वडार, कैकाडीं पासून अनेकविध जातसमुहांच्या अघोषित सेपरेट सेटलमेंट च्या वातावरणात, पाण्यासाठीची भांडणं, चांगल्या शाळांची वानवा, अपुऱ्या सोयी सुविधा, शासकिय अनास्था अन् दूर्लक्षित दृष्टिकोणातच एक प्रकारचं जगणं घडत गेलं. आजूबाजूला शिक्षणाचा वारसा दिसेल असं वातावरण अभावानेच आढळून येई.  कदाचित या वातावरणातूनच जाणिवा जागृत झाल्या. अन् ओघानं त्याचा परिणाम नेणिवेत झाला असं म्हणणंच उचित राहील.

आंबेडकरी विचारधारेचा मी केलेला स्विकार हा काही माझ्यावर कुणी केलेला अथवा वारसहक्काने आलेला संस्कार नव्हता. लहानपणापासूनच आंबेडकरी साहित्य वाचनाची गोडी माझ्यात रुळू लागली होती. आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्त्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचं कार्य़ मला प्रचंड आकर्षित करत असत. समग्र आंबेडकर अभ्यासत असताना हिंदू कोड बिल वाचनात आलं. त्याच वेळेस बाबासाहेबांनी लिहीलेलं इतर स्त्री-विषयक साहित्य सुद्धा वाचनात आलं. आणि मनात काहूर सुरू झालं. स्त्रीयांच्या एकुण जगण्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेला. यासंदर्भातील माझं पहिलं निरिक्षण होतं ते माझ्या आईवरच. आजपर्य़ंत एका रोमँटिसझमच्या अँगल मधून आईकडे पाहणारा मी आता आईकडे व्यक्ती म्हणून पाहू लागलो. परितक्त्या गटात मोडणारी आई नेमकी कशी जगतेय याचा विचार आता माझ्या मनात सतत घोळू लागला. यातूनच तीच्याबद्दलचं आणि एकुणच पूर्ण स्त्री-वर्गाबद्दल असलेलं माझं मत क्रमाक्रमाने प्रगल्भ होत गेलं. माझ्या आजवरच्या जगण्यात, मला वाढवण्यात, माझं शिक्षण, करियर घडण्यात केवळ आणि केवळ आईचाच सहभाग होता. त्यामुळे तीच्याबद्दल माझी असलेली कृतज्ञतेची भावना म्हणून मी माझं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यात कुणाचा दुस्वास करण्याचा हेतू नव्हताच मूळीच कधी माझा. हा निर्णय घेतला तो 2010 साली. मी पत्रकारितेच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो. आणि तेथूनच सुरू झाला आयडेंटिटी क्रायसीसचा इश्श्यू.

नाव बदलणं, बदललेलं नाव घरातल्या सदस्यांना सांगणं, आणि त्यानंतर ते जाहीर करणं हे फार जिकीरीचे काम असते. सर्वात आधी आईला सांगितलं, आईनं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेला आश्चर्याचा भाव हा मला मी कोणता तरी मोठा गुन्हाच केलाय अशी भावना देऊन गेला. तरी मी माझ्या मतावर ठाम राहीलो. मी ज्या परिसरात वाढलो, ज्यांच्यासोबत वाढलो त्यांनाही हे अनपेक्षित होतं. बापाचं नाव काढून फक्त आईचं नाव लावण्याच्या माझ्या कृतीवर अनेकांनी घाणेरडी शेरेबाजीही केली. मी शांत राहीलो. घरातल्या अनेकांनी या निर्णयावर ना नीट सहमती दर्शवली ना विरोध. नेमकं हे काय होतंय हे कुणालाही नीट कळालं नाही. परंतू तू असं बापाचं नाव काढायला नको. ते पण ठेव असा अनाहूत सल्ला दिला गेला. एकदा असाच एका नातेवाईकांकडे गेलो असता त्यांनी सरळ कपाळालाच हात लावला, “बापाचं नाव लावत नाही तू, तुझ्या आईवर लोक संशयाने पाहतील ना” मी म्हणालो पाहूदे. त्यानंतर बरेच दिवस असले प्रश्न कानावर पडत होते. एका एनजीओधारी समाजसुधारकाने माझ्या नावावर मला प्रश्न विचारताना मी रेड लाईट एरिया मधला तर नाही ना याची सुद्धा खातरजमा करून घेतली. त्यावर उत्तर देताना म्हटलं… बापाचं नाव न लावणारी सगळीच मूलं रेड लाईट एरियातली नसतात हो. जोपर्यंत मी पूर्णवेळ शिक्षण घेत होतो तोपर्यंत तर हे ठिक होतं. जसजसं माझा सामाजिक परिघातील राबता वाढायला लागला तसंतसं माझ्यावर मी जात लपवतो म्हणून आरोप झाला. आरोप होण्याचं कारण हे खुद्द माझं आडनाव न लावणं सांगितलं गेलं. दलित पँथरच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मी वॉरियर सरनेम काढून टाकलं म्हणून मला बामणी म्हणून हिणवलं. मी वरिल सर्व प्रसंगात अतिशय शांत राहीलो. सर्वांचा विरोध, आरोप शांतपणे ऐकून घेत राहीलो. कारण एकतर ती वेळ त्यांना उत्तरे देण्याची नव्हती आणि मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान होईल इतकी बौद्धिक कुवत तरी आरोपकर्त्यांकडे होती का याबद्दल मी साशंक होतो. पण हळूहळू मी करत असलेल्या कामामुळे, लेखनामुळे हे आरोप मागे पडले. वैभव छाया हे नाव लावून वावरताना, जगताना आता ते कोणत्याही फुकट आरोपांना बळी पडेनासे झाले आहे.

मुळात आडनावांची गरजच काय असावी? हा माझा मला पडलेला मूलभूत प्रश्न होता. आडनावे जात अधोरेखित करतात. मी आडनाव काढलं, आईचं नावं लावलं म्हणून मी माझी राजकिय बदलली असा अर्थ तर होत नाही. नाव बदलण्याआधीही आंबेडकरी विचारधारेचाच पाईक होतो आणि नंतर ही. फक्त जन्मदात्या पुरूषाचं नाव मिरवणं ही समाजात अतोनात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धती पुन्हा एकदा अंडरलाईन करतात. मग या जात-वर्ग-लिंगाच्या चिलखतींना मुळापासून उखडून काढण्याचे प्रयत्न किमान आपण वैयक्तिक पातळीवर तरी सुरू करायला हवेत. या विचाराने माझ्या मेंदूत घोळ घालायला सुरूवात केली. आणि त्यातूनच नाव बदलण्याचा निर्णय अंमलात आला. बरं वाटतंय, माझी ओळख माझ्या आईच्या नावानं होतेय. तसा हा वारसा खूप जुना. चंद्रगुप्त मौर्यापासूनचा. चंद्रगुप्ताच्या मातेचं नाव मुरा. तीच्यापासून चंद्रगुप्ताची ओळख बनली चंद्रगुप्त मौर्य. मातृसत्ताक पद्धतीत समानता हा केंद्रबिंदू असतो. माझ्यासाठी सुद्धा समानता हाच केंद्रबिंदू आहे जगण्याचा. शेवटी नाव बदलणं ही प्रोसेस त्रासदायकच असते. कारण आपण नुसतं नाव बदलत नसतो तर आपली ओळख नव्याने लिहीत असतो. आपल्याला हवी तशी. आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला आपल्या आईसमोर जातीयवादी व्यवस्थेने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंम्मत सुद्धा बाळगायची असते. ऑल इन ऑल बरंच काही बदलता येतं. फक्त आपली बदलण्याची तयारी असायला हवी.

वैभव छाया

प्रकाशित
दिव्य मराठी

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-ambernath-about-appreciation-5268850-NOR.html

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s