बुद्ध कथा – सुकेशिनी..

माझे पूर्वाश्रमीचे आजोबा आणि परिव्रज्या ग्रहण केल्यानंतरचे भंते महिंदवंश यांच्याकडून सुकेशिनीची ऐकलेली कथा मला प्रचंड भावली होती. कथा साधीशीच होती. पण त्यातल्या कारुण प्रचंड होतं. माझं सर्वात आवडीचं नाव बनलं होतं. इतकं की माझं पहिलं अपत्य मुलगी असली तर तीचं नाव सुकेशिनीच असेल इतक्या प्रेमात पडलो होतो मी या नावाच्या.

बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धाने आपला विहार चौफेर वाढवला. अनाथपिंडकाच्या नगरातून एका गावात त्यानं आपलं वास्तव्य हलवंल. भिक्खू संघाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्तापूर्वीच भिक्षा मागून मिळवलेलं अन्न ग्रहण करणं बंधनकारक असे. बुद्ध रोज एका घरी जाई, भिक्षा मागे पण तेथून रिकाम्या हातानं परतत. ते घर होतं सुकेशिनीचं. सुकेशिनीच्या घरात दारिद्र्यानं ठाण मांडलेलं. त्यामुळे दारात भिक्षेसाठी आलेल्या बुद्धाला एकवेळचं जेवण वाढणं ही तीच्यासाठी मोठं संकट होतं.

सुकेशिनी रंग, रुपानं अतिशय धनवान. परंतू तिच्या रुपाहून ही अधिक सुंदर होते ते तिचे काळेभोर आणि अगदी गुडघ्यापर्यंत रुळणारे केस. त्या नगरातले सारेच तीच्या सौंदर्यानं विशेषतः तीच्या केसांमुळे भारावलेले होते. अनेकांनी तीच्याकडे तीच्या केसांची मागणी ही केली होती. पण तीनं ती नाकारली ते ही अतीव विनम्रतेनं. स्वभावानं अत्यंत गोड, मनमिळावू आणि संवेदनशील असलेल्या सुकेशिनीला बुद्धाचं असं रिकाम्या हाती परत जाणं छळत होतं. यावर उपाय म्हणून तीनं स्वतःचे सुंदर केस विकून बुद्धाला भोजन दान दिलं होतं. जेव्हा ही गोष्ट बुद्धाला कळाली तेव्हा त्यांनी तीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सन्मानपूर्वक आपल्या संघात सामील करून घेतले.

ही कथा अशी होती.. यात झेन कथाकारांनी बुद्धानं सुकेशिनीच्या डोक्यावरून हाथ फिरवल्यावर क्षणार्धात तीच्या डोक्यावर पुन्हा तसेच केस आले वगैरे वगैरे घुसडवलं गेलं. असो…

सुकेशिनी ही नंतर पुढे भिक्खुणी सुकेशिनी म्हणूनच मान्यता पावली. आजही बौद्ध भिक्खू संघात दाखल झाल्यानंतर अनेक महिलांनी केशवपन केल्यानंतर आनंदानं भिक्खूणी सुकेशिनीचं नाव धारण केलं आहे. जिल्ह्यावार तपासलं तर सुकेशिनी नावाच्या तीन चार महिला भिक्खु सहज आढळून येतील.

इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनी सुकेशिनीची कथा थोडी वेगळ्या अंगाने सांगितलीये. त्यात सुद्धा केसांचं बलिदान आहे. मेरू पर्वतावरील पाण्याच्या स्त्रोत सांगितला तर त्या पर्वतावर राहणारा राक्षस आपल्याला मारून टाकेल आणि त्या स्त्रोताऐवजी माझ्या केसांतून पाणी गळत राहील अशी धमकी सुकेशिनीला देण्यात आली होती. पण ती त्या राक्षसाच्या धमकीला बधली नाही. स्वतःचे सुंदर केस अन् प्राणापेक्षा तीला दुष्काळग्रस्तांची तहान भागवणं अधिक महत्त्वाचं वाटलं. गावकऱ्यांच्या मदतीनं ती स्वतःचा एक हुबेहुब पुतळा बनवते. त्याला स्वतःचे संपूर्ण केस कापून लावते. आणि राक्षसाला स्वाधीन होते. राक्षस जेव्हा तीच्या पुतळ्याला पुरून टाकतो पण दिलेल्या शापाप्रमाणे तीचे केस तसेच बाहेर ठेवतो आणि त्या केसातून पाणी प्रवाही राहील याची व्यवस्था करतो. सुकेशिनीचे केस इतके मजबूत आणि लांब होते की त्या केसांतून झिरपणारं पाणी थेट गावकऱ्यांना मिळू लागलं. यामुळे निराश झालेला राक्षस मेरू पर्वत सोडून निघून जातो. इथं कालांतराने सुकेशिनीचे केस पुन्हा येतात. सर्वत्र आनंदीआनंद होतो.

ख्यातनाम कवयित्री महादेवी वर्मा यांना देखील सुकेशिनी या नावानं भूरळ पाडली. त्यांची रचना इथं देतोय..

जाग-जाग सुकेशिनी री!
अनिल ने आ मृदुल हौले
शिथिल वेणी-बन्धन खोले
पर न तेरे पलक डोले
बिखरती अलकें,
झरे जाते सुमन, वरवेशिनी री!

छाँह में अस्तित्व खोये
अश्रु से सब रंग धोये
मन्दप्रभ दीपक सँजोये,
पंथ किसका देखती तू
अलस स्वप्न – निमेषिनी री?

रजत – तारों घटा बुन बुन
गगन के चिर दाग़ गिन-गिन
श्रान्त जग के श्वास चुन-चुन
सो गई क्या नींद की
अज्ञात- पथ निर्देशिनी री?

दिवस की पदचाप चंचल
श्रान्ति में सुधि-सी मधुर
चल आ रही है निकट प्रतिपल,
निमिष में होगा अरुण-जग
ओ विराग-निवेशिनी री?

रूप-रेखा – उलझनों में
कठिन सीमा – बन्धनों में जग बँधा
निष्ठुर क्षणों में अश्रुमय कोमल
कहाँ तू आ गई परदेशिनी री?

हिजड्यांच्या एकुण कल्चरमध्ये नाव ठेवण्याची प्रथा ही पॉप्युलर कल्चर मधून आलेली असते. त्यामुळे त्यांची नावं. लक्ष्मी, करिना, प्रियंका, पिंका, सोना, मीना अशीच. जी हिरोईल हिट होईल तीचं नाव धारण करण्याकडे अनेकांचा ओढा. पण हिजड्यांतही सुकेशिनी नाव पाहून मी अवाक् झालो होतो. घाटकोपर झुणझुणवाला कॉलेजच्या डाव्या हाताला सुरू होणारा रेड लाईट एरिया आधी हिजड्यांच्या घरांनी सुरू होतो. तिथं एकदा हिजड्यांचा विमा करण्यासंदर्भातील कामासाठी गेलो असता.. कागदोपत्री सुकेशिनी नाव रजिस्टर असलेली 32 वर्षांची ती भेटली. तीचे केसही तसेच सुंदर. छानसा गजरा माळलेला होता. जन्नते फिरदौस चं अत्तर ही केसांना तीनं लावलेलं होतं. त्याच्या सुगंधावरूनच ते कळत होतं. तीला विचारलं तू दिसतेस, वाटतेस सोलापूरची तुला हे नाव दिलं कुणी? तेव्हा ती लगबगीनं घरात गेली. मुखपृष्ठ फाटलेलं एक पुस्तक आणून दिलं. बालभारतीचं पुस्तक होतं. त्यातला पहिलाच धडा होता सुकेशिनीचा. पानं अतिशय फिक्कट पडलेली होती. पण चित्र क्लिअर दिसत होतं. सुकेशिनी बुद्धासमोर कमरेत वाकून त्यास भोजन दान अर्पण करत आहे. ती म्हणाली, मला खुप आवडलं हे वाचल्यावर मग माझं माझं मीच नाव ठरवून घेतलं… सुकेशिनी…
दोन अडिच वर्षे झाली असतील या गोष्टीला. नंतर पुन्हा भेट झाली नाही. भेट झालीच तर तीचा फोटो काढून नक्की टाकीन.

तर हे असं सुकेशिनी नावाचं गारूड मनावर कायम होतं. 2015 ला अगदी सुरूवातीला अमूनं फोन करून सांगितलं की तीला मुलगी झाली. तेव्हा तीनं विचारलं नाव काय ठेऊ रे मुलीचं ? मी क्षणार्धात उत्तरलो.. सुकेशिनी.. ती म्हणाली.. मी आणि समीरनं तेच ठेवलंय.

वैभव छाया

‪#‎Buddha

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s