जग बदल घालूनी घाव…

#भीमगीतं क्रं. 2
 
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर तब्बल आठवडाभर तमाम चळवळीतील वातावरणावर एक प्रकारची निराशा उमटलेली होती. आठवडाभरानंतर संपूर्ण देशात बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याची कार्यक्रम सुरू झाले. मुंबईत तर दर दिवसाला चार ते पाच कार्यक्रम होत होते. खेडो-पाडी, गल्ली मोहल्ल्यातून, शाळा कॉलेजांतून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जात होती.
 
बाबासाहेबांचं लोकशाहीरांवर प्रचंड प्रेम. ते म्हणायचे.. माझी दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं एकदम समान तोडीचं. मी दहा भाषणात जे सांगतो ते सांगायला शाहिर फक्त एकच गाणं घेतो आणि माझ्यापेक्षाही ताकदीनं ते पोहोचवतो. सर्व लोकशाहिरांचंही बाबासाहेबांवर अपार प्रेम होतं. अशातच तत्कालीन सर्व शाहिरांना एकत्रितपणे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले.
 
या कार्यक्रमाला सर्वच थरातून प्रतिसाद मिळाला. सर्वच ख्यातनाम गायक, कवी, शाहिर, लेखक एकत्र आले. अंधेरी इलाख्यातला एक हॉल बुक केला. कार्यक्रमाची आखणी केली गेली. वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, भिकू भंडारे, अण्णाभाऊ साठे यांनी आपापले एक गीत सादर करून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करायची असे ठरवले गेले.
 
ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. वामनदादांपासून विठ्ठल उमपांपर्यंत सर्वच शाहिरांनी आपापलं गाणं सादर केलं. पण अण्णाभाऊंच्या चेहऱ्यावर मात्र एक स्तब्ध भाव झळकत होता. गोविंद म्हशीलकर यांनी अण्णाभाऊंना अखेर न रहावून विचारलंच.. अण्णा काय झालंय? तुम्हाला काही सादर नाही करायचं का? तुम्ही तर गाणंही लिहून आणलेलं नाही.. मग श्रद्धांजली कशी वाहणार?
 
गोविंद म्हशीलकरांच्या प्रश्नांनी थोडी जाग आलेल्या अण्णा भाऊंनी तात्काळ पेन आणि कागद हातात घेतला आणि हे अजरामर गीत लिहून काढलं. आणि स्वतःच सादर केलं. अण्णा भाऊंचा गळा गोड. त्याला सुरांची जबरदस्त अशी साथ आणि रोम रोम चेतवून टाकणारा त्यांचा आवेश त्या वेळेस प्रत्येकाच्या मनातून बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आलेली दुःखछटा काढून टाकण्यात यशस्वी झाला होता.
 
आज अण्णाभाऊंची जयंती … या थोर शाहिरास.. मराठी भाषेस समृद्ध करणाऱ्या ग्रेट साहित्यसम्राटास मानाचा जय भीम…
 
जग बदल घालुनी घाव…
 
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।।
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s