पळून गेलेल्या लेकराची आई…

आईचा जीव नाय मानत.. लेकरू पळून भाऊ घरातून.. बाप बसलाय सावकाराचं कर्ज फेडीत. थोरल्या पोरीच्या लग्नाला दोन लाखानं मुतला माझा नवरा त्या हाय-फाय जावयाच्या मढ्यावर.. तो बी घरात घेईना. दोन महिने झालेत भाऊ लेकराला शोधतेय. नवऱ्याला फोन करतेय तो म्हणतोय ये परत मी आहे ना तुझ्या जोडीला. पण जीव होईना. तुम्ही जय भीम केला फोन वर बोलताना म्हटलं आपलं माणूस हाये .. बोलून बघावं. शहरातल्या लोकांच्या पोलिसांशी वळखी असतात. दौंड वरून फोन आला होता पोराचा.. तेव्हापासून मी शोधतेय. अंगावर पांघरायला चादर तेवढी राहीली माझ्याकडे.. बघा ना जरा एखाद्या पोलिसाला फोन लावून माझा पोरगा कुठं दावतोय का त्यांना.. मावा खातो.. बीअरमधी बसतो.. पोरींचा नाद नाय त्याला.. कुठं बीअर मधी बसला असंल तर पोलिस गावतील ना त्याला.
काय करू.. बापानं दारू प्यायला म्हणून मुस्कटात हाणली तेव्हापासून रागं रागं घर सोडून गेलाय.
दादा.. मीच कधीची बोलतेय .. तुम्ही पण बोला ना.. जय भीम वाले ना तुम्ही बी.. बोला की..

बाईचं नरडं ताणलेलं पाहून रहावलं गेलं नाही. बर्बनचं पाकिट काढून दिलं बॅगेतलं.. पाण्याची बाटली ठेवली तिच्या बाजूला. कळेना काय करावं .. काय म्हणावं.. म्हटलं मावशी हे धरा पाकीट.. भूक लागेल तेव्हा उघडा. माझं बोलणं पुरं व्हायच्या आतच म्हणाली.. साहेब लेकीनं जावयानं घरात घेतलं नाय.. का तर गोल साडी नेसत नाय म्हणून.. आत्ता तुम्ही कागद खायला लावताय.

जाऊंद्या.. माणसावर येळ आली की आपले काय आणि परके काय ? चला टिटवाळा गाडी हाय.. मागून कर्जत आली की त्या गाडीनं जाईल परत दौंडला.. दोघंही गर्दीच्या घोळक्यात कल्याणला उतरलो. म्हटलं ही बाई फक्त इथवरची सोबतीण असावी. म्हणून गप स्टेशनला उभा राहीलो.
बदलापूर लोकल आली. परत माझ्यामागोमाग ट्रेन मध्ये ती मावशी चढली. अंगावरची चादर सांभाळत दोन्ही हातात चहाचे ग्लास घेऊन. माझ्याजवळ आली आणि म्हणाली.. भाऊ हा धरा चहा.. शहरातल्या लोकांना बिस्किटाबरोबर चहाची सवय असती .. पाहीलंय लेकीच्या घरी मी..

ती हसतच होती. लेकाचं रुप वर्णन करत होती.. आनंदाने सांगत होती. तीच्या बडबडीत अंबरनाथ आलं केव्हा ते कळलंच नाही. हातात चहाचा ग्लास तसाच होता. उतरताना म्हटलं.. मावशी पैसे आहेत का .. की देऊ थोडेसे.. त्या पाकिटात शंभर रुपये ठेवलेत. लागले तर अजून देतो .. नको म्हणाली तरी बळजबरीने अजून दोनशे रुपये ठेवले..

मी उतरलो.. खिडकीतून हलकेच पाहीलं. मघास पर्यंत हसणारी ती अचानक रडायला लागली. लांबूनच आकाळावरून बोटे फिरवून मोडत रडताना दिसली.. मनात जाम कालवाकालव झाली. हातात चहाचा ग्लास तसाच होता. आणि तिच्या पोटातली आग आत्ता माझ्या डोळ्यातून वहायला लागली होती..

आई आईच असते..तीच्या पोटचा गोळा चुकला माकला तरी ती त्याला पदराखाली घेतच असते.. ती माय.. पदर पसरून लेकराला मुर्दाडांच्या जगात शोधत हिंडतेय..

घरी आलो.. घामेजलेल्या अवस्थेत.. आणि फटकन आईला बिलगलो.. ती झोपेपर्यंत विचारत होती.. का रे काय झालं.. का घाबरला होतास असा.. माझ्याकडे उत्तर नव्हतं..

वैभव छाया

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s