मोहम्मद झायेद…

2005 साली कपडे सुकवण्याच्या नादात पडलो आणि पायतला आर्टिफिशिअल प्रॉस्थेसिस तोडून घेतला. ओघानं पुन्हा ऑपरेशन करणं आलं. पुन्हा हॉस्पीटलचं चक्र सुरू झालं. चांगलं अडीच वर्ष हे चक्र अविरत सुरू होतं. या दरम्यान अनेक लोकं भेटली. लोकं भेटण्यापेक्षा त्यांची दुःखं भेटली. अगदी कडकडून. हिरमुसल्या चेहऱ्याने, कारूण्यानं भरलेली, जगण्याची दुवा भाकणारी संघर्षमय दुःखंच म्हणा ती.. वेगवेगळ्या देशांतून, प्रदेशांतून, राज्यांतून, विविध धर्माची, जातीची लोकं, मुलं, बाया, त्यांच्या आया-बहिणी, हतबल बाप अन् भाऊ, काळजीत असणारे नातेवाईक, त्यांच्यासाठी जीवाची शर्थ लावणारे लोक असं बरंच काही सोबतीला आलं त्या काळात. ती अडिच वर्ष दुःखाचा ब्लॅक होल बवण्याऐवजी संघर्षाची झळाळी देणारी नवी कविता बनून उभी ठाकली. मानवी नातेसंबंधांची अनोखी व्याख्या माझ्यासमोर उजागर करत गेली. मोहम्मद झायेद हा पोरगा सुद्धा त्यातलाच.

मोहम्मद झायेद. राहणारा रांचीचा. गोरा पान मुलगा. रांचीच्याच कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दहावीपर्यंत शिकलेला. फाड-फाड इंग्रजी बोलायचा. मला भेटलाच तो माझ्या बाजूच्या बेडवर. डॉक्टरांचा राऊंड आला की मी आपला तोडकं मोडकं हिंदी मिक्स मराठीत बोलायचो त्यांच्याशी. झायेद अस्खलित इंग्रजीत बोलायचा. हेवा वाटायचा त्याचा. त्या हेव्यापाईच त्याच्याशी बोलायला सुरूवात केली. त्याची किमोथेरेपी सुरू होती. ल्युकेमियाच्या थर्ड स्टेजला असताना डिटेक्ट झाला. बापानं होतं नव्हतं ते सगळं जमा करून थेट मुंबई गाठली. टाटानगर ला टाटा स्टील मध्ये कामाला होते त्याचे वडील म्हणून कंपनीकडून ट्रीटमेंटचा खर्च केला जाणार होता. त्यामुळे खर्चाचं फार काही टेंशन नव्हतंच. पण रांचीवरून थेट मुंबईला येणं, इथं कुणीही नातेवाईक नसताना बायको आणि मुलाचा सांभाळ करणं एका लो इन्कम ग्रुप मधल्या माणसासाठी कठिणच. त्याचे वडिल सांगत होते..
गेल्या वर्षभरापासून हळूहळू याचं वजन कमी होत गेलं. जेवण कमी झालं. एक दिवस चक्कर येऊन पडला. लोकल डॉक्टरांनी सांगितलं की, अशक्तपणामुळे होत असेल. त्यामुळे कुणी फारसं मनावर घेतलं नाही. अशातच एक दिवस रक्ताची उलटी झाली आणि ल्युकेमिया असल्याचं कळालं. तडक मुंबईला घेऊन आलो.

झायेद, हा त्याच्या आई वडिलांचा पाचवा मुलगा. आधीच्या चार बहिणी. चार बहिणींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणून सगळ्यांच्याच लाडात वाढलेला. क्रिकेटचा फॅन. त्यातही धोनीचा डाय-हार्ड फॅन. तेव्हा धोनी नुकताच संघात दाखल झाला होता. त्याला विचारलं, क्यू रे.. ये तो अभी अभी आया है… तो म्हणाला.. वो जिस स्कूल से पढे है, उसी स्कूल से मै भी पास हुआ हूँ… माही भैय्या पहले फुटबॉल खेला करते थे. बादमें क्रिकेट की तरफ मुडे. वो जब भी कभी रांची आते है तो उनके साथ बुलेट पर घुमने जरूर जाना होता है.. वैभव भैय्या आप देखो.. माही भैय्या टॉप में गिने जाएंगे इक दिन..
मी हसायचो आणि शांत रहायचो.

त्याला घरच्या जेवणाची भयंकर आवड. हॉस्पीटलचं जेवण आलं की नाक मुरडायचा. त्यात सगळं व्हेज. अजूनच डोईजड व्हायचं त्याला. आईनं माझ्यासाठी घरून जेवण बनवून आणलं की आधी त्याला द्यायची. पोटभरून जेवायचा. झायेदच्या प्रत्येक घासागणिक त्याची आई रडायची. कारण दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली होती. मध्येच उलट्या करायचा. बेशुद्ध व्हायचा. शुद्धीत आला की म्हणायचा, हाजी अली की दर्गा पे फुल चढाओ, दुवा कबूल होगी.. शायद मैं बच जाऊंगा. हॉस्पीटलमधला येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला आल्या आल्या खोटं का होईना आश्वस्त करायचा. अभी अभी दर्गा पे जाके आया हूँ… पोरगं खुश व्हायचं. याच सगळ्या रहाट्यात झायेदच्या आईशी चांगलं जमलं. हसीना नाव त्याच्या आईचं. झायेद बरोबर ती मलाही मुलगा मानायला लागली. जवळपास सहा महिने आम्ही सोबत राहीलो. हॉस्पीटल मधले बेड बदलत राहीले. पण रोजचं भेटणं, आईनं त्याच्यासाठी डबा आणणं, मामांनी फळं वगैरे आणणं नियमित सुरू राहीलं.
माझे मामा संध्याकाळी आले की, हा पोरगा खूप रडायचा. मागे लागायचा. मेरी दीदी के पास ले चलो. त्याला कसंबसं समजावून शांत करावं लागे. सकाळी कधी त्याला आयसीयुत दाखल केलेलं असायचं तर कधी थेट बाहेर गॅलरीत फिरताना आढळायचा. मी आपला व्हील चेअरवर त्याची गंम्मत पहायचो. उंच आकाशाकडे डोळे लावून बसायचा.

तो म्हणायचा.. एक दिन देखना मेरे नाम का प्लेन उडेगा इस आँसमां में. मैने सब कुछ सोच लिया है. आयआयटी में जाना है. अभी जब घर जाऊंगा तब पहले स्कॉलरशीप की तयारी करूँगा. सबसे बढिया फायटर प्लेन बनाऊंगा.. ताकि हमें पराये मुल्ख से कभी फायटर प्लेन खरिदने की नौबत ना आए… छोट्या वयात, छोट्या डोळ्यांतली मोठी स्वप्नं मला तेव्हाही कमालीची थक्क करत होती आणि आजही करतायेत. ती स्वप्नं काही केल्या पूर्ण होणार नाहीत हे त्याला कदाचित ठाऊक असावं म्हणून की काय जेव्हा केव्हा तो बोलायचा तेव्हा डोळ्याच्या कडा अलगद झालेल्या असायच्या. रडवेल्या डोळ्यांनी हाताची वेन फ्लो नीट करत पुन्हा बेडवर जाऊन झोपल्याचं नाटक करायचा. पण क्रिकेट मॅच असेल तर गडी एकदम एनर्जेटिक. दिवाळीचे दिवस होते. इंडियन टिमची श्रीलंकन बॅट्समन नी मजबूत धुलाई करून 300 च्या पार स्कोरबोर्ड नेला. त्यानंतर धोनीने केलेली 183 रन्सची इनिंग भयंकर एंजॉय केली होती त्याच्यासोबत. प्रचंड खुश झाला पोरगा. त्या दिवशी त्याला उलट्या झाल्या नाहीत. व्यवस्थित जेवला. झोपला. औषधं नीट घेतली. किमोचा त्रासही झाला नाही त्याला. मला मनोमन वाटायचं धोनीची सेंचूरी प्रत्येक मॅचमध्ये व्हावी आणि त्या आनंदातून मिळणाऱ्या एनर्जीतून झायेद बरा व्हावा. पण ते स्वप्नरंजनच शेवटी.

सहा महिन्यांनंतर त्याची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी काही फायनल पेन किलर देऊन घरी घेऊन जाय़ला सांगितलं. त्याची आई प्रचंड भोळी. कुणी काही सांगितली तरी विश्वास ठेवणारी. तीला सांगण्यात आलं की पोरगा बरा झालाय. त्याला घरी घेऊन जा. ती तयार झाली. झायेद नं निरोप घेतला. कडकडून भेटला. मला जाताना म्हणाला, आप आना रांची.. मै आपको मेरे प्लेन के मॉडेल दिखाऊंगा.. मेरी दिदीयाँ आपको याद करती रहेंगी.. आप आना जरूर.. अगर माही भैय्या रहे तो उनसे भी मिलाऊंगा…

पोरगा गेला आनंदात निरोप घेऊन.. वीसेक दिवसांनी त्याच्या वडिलांचा फोन आला आईला. त्यांनी झायेद गेल्याचं कळवलं आईला. आई थोड्या वेळासाठी सुन्न झाली. मी तीला खूप विचारलं पण तीनं सांगितलं नाही. झायेदच्या वडिलांना फोन केला त्यांनीही सांगितलं नाही. मी दर तीन दिवसाच्या अंतराने त्यांना फोन करायचो नेहमी उत्तर यायचं बाहेर खेळतोय, झोपलाय, मित्रांकडे गेलाय.
नंतर मी मनाशी समजूत घालून घेतली की, आपला त्याच्यासोबतच्या मैत्रीचा प्रवास हा तेवढाच होता. नसेल बोलायचं त्याला. जाऊदेत. त्यानंतर माझंही ऑपरेशन झालं. मी नीट झालो थोडा. आणि एके दिवशी त्याच्या मोठ्या बहिणीचा फोन आला. तीनं विचारलं, आप कैसे हो.. मी उत्तरलो.. आप तो भूल ही गए.. मै एकदम ठिक हूँ अभी.. झायेद कैसा है? ती म्हणाली, झायेद को गुजरे तो अब आठ महिने हो चूके.. आपको तकलीफ होगी इस वजह से आपसे बात छुपा कर रखी. लेकीन अब ठिक हो गए हो.. इसलिए बताना जरूरी समझा.

मला सुचत नव्हतं, नेमकं का म्हणून असं करावं? योग्य त्या वेळेला सांगितलं असतं तर कदाचित कमी त्रास झाला असता. मी तीला तडक प्रश्न केला.. लेकीन अभी बतानेका मकसद जानना चाहता हूँ… ती म्हणाली हा.. जी..
मुन्ना (झायेद) के इंतकाल के बाद अम्मी कुछ ठिक सी नही.. बडबडाती रहती है.. आपसे बात करने की जिद करती है.. मेरी गुजारिश है आपसे.. अम्मी को तस्सली दिला दिजीए की झाएद महफुज है. आपके साथ है, पढाई कर रहा है।

हे असलं खोटं बोलणं मला झेपणारं नव्हतं. माझं तरी किती वय होतं. एकोणीस वर्षांचाच होतो त्यावेळी. तरी फोन घेतला. बोलला त्याच्या आईशी. खोटं बोलून तीची समजूत घातली. त्यानंतर नित्याचंच झालं. दर चारेक महिन्यातून एकदा तरी फोन येई. नेहमीचाच खोटा पाढा वाचावा लागे. हे सगळं प्रकरण मी स्वतः माझ्या आईपासून लपवून ठेवलं. कारण ते तीलाही सहन झालं नसतं. हे सर्व 2013 पर्यंत अविरत चालू होतं. 2013 च्या नोव्हेंबर ला झायेदच्या वडिलांचा फोन आला, त्यांनी म्हटलं.. बेटा बंटी, आपको अभी और झूठ नही बोलगा होगा.. झायेद की अम्मी भी चल बसी… चारो दिदीयो की शादी हो चूकी है.. कभी रांची आए तो मिलना जरूर..

बस्स फोन कट.. त्यानंतर परत कधी बोलणं झालं नाही. मी प्रयत्न केला. पण तो फोल गेला. नंतर कधीच संपर्क झाला नाही. ना त्यांनी केला. माणूस असतोच असा. माणूस मरतो, त्याची माती होते. आपण सर्व विसरतो हळूहळू अन् नव्याने मार्गक्रमण करत चालतो. काही आठवणी राहतात. काही आठवणी खूप काही शिकवून जातात. खोटं बोलणं तसं प्रत्येकवेळेस शीलभंग करणं होत नाही. भावनेचा सागर मोठा असतो. आशेनेच माणूस जगण्याचा प्रयत्न करतो. तीच त्याला भूतकाळातून भविष्याकडे पाहण्याची एनर्जी देते. झायेदच्या आईला खोटी आशाच दाखवत राहीलो. त्या आशेवर तीनं आजारपणातही सात वर्षे काढली. किंवा असं म्हणू .. तीनं लेकराची सात वर्षे वाट पाहीली.

(डायरीतल्या नोंदी पाहत होतो तर आढळलं.. मोहम्मद झायेदचा आज वाढदिवस आहे म्हणून शब्दांत उतरलं बस्स.. बाकी शून्य)

वैभव छाया

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s