मंगळसुत्र !!!

साल २००३. नुकताच दहावी झालेलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कामात सकाळी अडकलेलो. दुपारी माश्या मारायच्या. संध्याकाळी मैदानात खेळायला जायंचं. रात्री काही वाचलं तर वाचलं. यापलीकडे फारसं काम नसायचं. याच काळात जेवण बनवायचं शिकलो. घरातल्या कामांमध्ये लक्ष घातलं. याच काळात जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचे खेटे सुरू झाले. ठाणे कलेक्टर ऑफिसपासून ते कल्याणच्या सेतू कार्य़ालयात सर्वत्र आधी बाप दाखव मग कास्ट सर्टिफिकेट घे चे प्रकार सुरू झाले. साधीशी अट होती. पन्नास वर्षे वास्तव्याचं सर्टिफिकेट आण मग देतो कास्ट सर्टिफिकेट. बापाला पाहून मलाच जमाना झाला होता. कुठे असेल काय असेल काही कल्पना नव्हती. बरं कागदपत्रं वगैरे काही असतील याबद्दल माहीत नव्हतं. शिवाय त्याचंच वय ४९ वर्षे. मग पन्नास वर्षांच्या वास्तव्याचा दाखला आणायचा तरी कुठून हा प्रश्न सतत सतावत होता. आईला म्हटलं.. नाय मिळाला तर नाय मिळाला तू का टेंशन घेतेस. मला मार्क चांगले पडतील. मी पाहून घेईन. ती हसायची अन् बोलायची तूला सांगितलं तेवढं कर. ती का मागे लागायची हे उशीरा कळालं. सायंस स्ट्रीमची फीच १२ हजार होती. कास्ट क्रायटेरियामुळे ती तीन हजार होणार होती. २००३ साली १२ हजार रुपये खरंच मोठी रक्कम होती. किमान माझ्यासाठी, आईसाठी तरी मोठीच रक्कम होती. ८ बाय ८ च्या खोलीत राहणारे आम्ही दोघं. साहजिकच मोठी रक्कम वाटणारच. तर असो..
सेतू कार्यालयापासून कलेक्टर कचेरीपर्यंत प्रत्येकानं बाप दाखवायला सांगितला. एकदा असाच ताबा सुटला आणि जोरात ओरडून बोल्लो. मेला तो तोंड वासून तुला द्यायचं असेल तर दे नायतर बंद कर तूझी खिडकी.
या सगळ्या प्रकरणांनंतर मला त्या लहान वयात सगळ्यात जास्त राग मात्र आईचा यायला लागला होता. जो बाप आपल्या काही कामाचा नाही त्याच्या नावाचं मंगळसुत्र गळ्यात का घालून ठेवलंय हा खडा सवालच केला तीला.. तीनं क्षणभर भांबावून पाहीलं. पण हसली आणि शांत झाली. मी तब्बल तीन दिवस तीला हाच प्रश्न रिपीट करत राहीलो. तीनं उत्तर दिलं नाही. चौथ्या दिवशी मात्र बोलली.. तू मोठा होशील तेव्हा कळेल तूला..

मी जिद्दीला पेटलो. पुस्तकं चाळू लागलो. मंगळसुत्राचा कुठे काही संदर्भ मिळतोय का तो तपासू लागलो. अशातच अठराव्या खंडात स्त्रीयांचा अवनतीस जबाबदार कोण हे प्रकरण हाताला लागलं.. मग काय शांतपणे एक निबंध लिहीला. आणि आईला वाचून दाखवला. म्हटलं.. हे काळे मणी गुलामाला बांधलं जाणारं वेसण आहे. हा धागा गुलामीचा आहे. तो आता तू काढून टाकला पाहीजे. ही महिलांच्या विरूद्ध आहे. बघ बाबासाहेबच म्हणालेत आता तरी काढ.. (त्या क्षणापर्यंत आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद अशा दोन गोष्टी अस्तित्वात आहेत हे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं.)
आई… आता मात्र चिंतेत पडली. ती म्हणाली पोरं सायकल मागतात, कपडे मागतात तू हे काय भलतंच खुळ लावलंय रे.. जास्त डोक्यात जावू नकोस नाहीतर तू आहे अन् माझा झाडू.. म्हटलं ठिकाये.. माराला घाबरलो नव्हतो. तो तीस रुपयाचा झाडू परत आणावा लागला असता म्हणून शांत झालो. कळायला मार्गच नव्हता. सतत डोक्यात येत रहायचं. की हिंदूत्वाचा असा काही पगडा बायकांच्या डोक्यावर बसलाय की त्यांना स्वतःची गुलामी सुद्धा कशी मान्य होत नाही. बापावर राग म्हणून नाही तर आता ही प्रथा मोडायची म्हणून तरी तीला ते मंगळसुत्र काढायला लावलंच पाहीजे. मी अनेक मार्ग वापरून पाहीले. पण हतबल राहीलो.
पण…त्या वयात खरंच कळत नव्हतं. एकटी बाई… कामाला जाते. बाजारात जाते, दवाखान्यात जाते, बँकेत जाते. ती एकटीच जात असते. पण तीच्या मागे वखवखलेल्या नजरा तशाच वेगात धावत असतात. तेवढं कळण्याइतपत नक्कीच वय नव्हतं. कच्चा मटका होतो. चाळीचा परिसर, आजुबाजूचं वातावरण, सततच्या हाणामाऱ्या, पोलिसी रहदाऱ्या आणि बिननवऱ्याची मुलासोबत राहणारी बाई… हे जगणं किती कठीण असतं हे ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून आजवर आईला म्हटलं नाही की ते मंगळसुत्र का नाही काढत. कदाचित त्या क्षणापासूनच माझ्यात मुलगा कमी सेव्हीअर जास्त बळावू लागला असेल. का हा परिस्थितीचा दोष मानावा..? आज माझ्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक पुरूष मित्राची हीच त्यांना स्वतःला न उमगलेली अथवा उमगली असली तरी बोलू न शकलेली कैफियत आहे…

वैभव छाया

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s