नामांतराच्या जखमा

वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या लढ्याचे ! विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे. ह्या लढ्याने काय मिळालं हा वादातीत विषय आहे आणि राहील देखील. पण नामांतराच्या चळवळीनं आमच्याकडून जे हिरावून घेतलं ते कधीच परत मिळणारं नव्हतं. आज त्याच विद्यापीठाच्या या महाकाय प्रवेशद्वाराच्या वास्तूला ४० वर्षे पूर्ण झालीत. त्या नामांतराच्या एकुण चळवळीवर आणि त्याच्या परिणामांवर ह्या चाळीशीच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश..

सत्तरच्या दशकात महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशा प्रकारचा ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटाफुटीला बळी पडली होती. या फाटाफुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी.एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथर ला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील  खेड्यापांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधीमंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला. मराठवाड्यातील हिंदू धर्मीय सनातनी जातीयवादी गावगुंडांचा पोटशुळ उठला व त्यांच्या तरुण मुलांना भडकाऊन देऊन महारवाडे पेटवा, त्यांची घरे जाळा, त्यांना बेदम मारा, त्यांच्या लहान मुलांना व महिलांनाही झोडपा असे आदेश देऊन भयानक दंगल ह्या जातीवादी औलादींनी घडवली. ही दंगल भयानक व अतिशय क्रूर होती.

दंगलीत जातियवादी गावगुंडाना दलित पँथरनेही जेरीस आणुन, तरुण पँथर त्याचा मुकाबला करुन रात्रंदिवस लढत होते. जातीयवादी वृत्तीचे सनातनी कट्टर हिंदूत्ववादी औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ याने लोकांना भडकविण्याचे व दलित वस्त्यांचा नायनाट करुन त्यांना बेचिराख करावे म्हणून नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड पाच जिह्यांतील खेड्यापाड्यांतील दलित वस्त्यांवर जाऊन रात्री पेट्रोलचे जळते गोळे फेकून घरांना व झोपड्यांना आगी लावत असे. त्याचवेळी नामांतरवादी कृती समितीमध्ये कॉलेजचे तरुण आणि पँथर्स जश्यास तसे उत्तर देत असत. जवळ जवळ महिनाभर ही दंगल चालू होती. पोलीस अनेकदा हिंदूचीच बाजू घेत असत.दलित समाज अल्पसंख्याक असून देखील महिलाही लढतांना अग्रभागी राहून दलित पँथरच्या तरुणांना अन्यायाविरुध्द लढण्याचे बळ देत होत्या.
 
भिमा कोरेगांव येथील महार बटालियनने पेशव्यांना पळवून लावून त्यांना पराभूत केले. त्याच सामर्थ्याने मराठवाड्यातील दलितांनी दंगलखोर, जातीयवादी गावगुंडांशी मुकाबला  केला. उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्यापाड्यांतील दलितांवर अतिशय अन्याय , अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे, सांग पोच्या तू जयभिम करणार का  पोचिरामला इतक्या वेदना होत असतानाही म्हणाला, जयभिम म्हणणार.  नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्यानंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जयभिम  म्हणून ओरडायचा नंतर दुसराही तोडला तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते.पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यातही पोचीराम जयभिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, “पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जयभिम करणार का? जयभिम” म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच जयभिम हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुलाही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांनाही हाल हाल करुन ठार केले होते.असे असतानाही मराठवाड्यातील नामांतराबाबतची दंगल पत्रकारांना लिहूदेखील वाटत नव्हती. दंगलग्रस्त भागात मुंबईतून दलित पँथरचे नेते प्रा.अरुण कांबळे, रामदास आठवले आले, तेव्हा वातावरणात पँथर काय करतील हे सांगता येत नव्हते.सर्व लोकांना ह्या नेत्यांनी शांतता ठेवण्यात यावी असे सांगितले.
प्रा.अरुण कांबळे म्हणाले,
सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची
संपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची
 
ह्या गंभीर परिस्थितीमुळे पँथरला शासन घाबरुन राहत होते.गंगाधर गाडे यांच्या अटकेमुळे सर्व पँथर चळवळीचा भार तरणाबांड बिबळ्या वाघ रामदास आठवलेंवर पडला. रामदासच्या अंगात पँथर संचारला होता.रामदास आठवलेंना मुंबईत घरदार नव्हते, सिध्दार्थ हॉस्टेल रु.नं. ५० हे त्यांचे निवासस्थान व राज्याचे पँथर कार्यालय होते.रामदास आठवलेंचे लग्न झाले नव्हते.तरणाबांड बिबळ्या वाघाच्या ढांगा खेड्यापाड्यात पँथर तयार करण्यास जात होत्या.रिपाइंचे ऐक्य टिकले नाही रामदास कॅबिनेट मंत्री झाले शरद पवार यांनी आठवलेंची ताकद ओळखून १७ वर्षे सत्तेत घेतले.मंत्री असतांना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवार यांना विश्वासात घेऊन १४ वर्षांचा दलितांच्या अस्मितेचा नामांतराचा प्रश्न आता तरी सोडविण्याचे साकडे घातले. १४ जानेवारी दिवस निवडला आणि राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे वरिष्ठांना आदेश दिले. पोलिस पाटील व सरपंचांची बैठक `सह्याद्रीवर’ बोलविली व तेथे सांगितले की एकाही दलिताचे घर जळताना दिसले नाही पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील व सरपंचावर असणार विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मंजुर करताच संपुर्ण दलित वस्त्यांत दिवाळी साजरी झाली.
 
दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळीभाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते.. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेटपुढे नतमस्तक होतात..एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते.. विद्यापीठ प्रशासनालाही गेटच्या ४0 व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिनानिमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो तेव्हा. चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!
या गेटच्या उभारणीचा इतिहासही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा आजही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. यासंदर्भात ते सांगतात की, डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवीदान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभापूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एकाही वास्तूविशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोडबेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तूद्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्पही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.
 
जोपर्यंत हे विद्यापीठ आहे तोवर त्याचे प्रवेशद्वार आहे. हेच प्रवेशद्वार आमच्यासारख्याना आणि आमच्यानंतर येणार्‍या कैक पिढ्यांना त्या जुलूमाची, त्या अत्याचाराची, त्या त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची आठवण करून देत राहील. त्यातूनच नवे चैतन्य कायम संचारत राहील. नामांतर लढ्याची आठवण आंबेडकरी समाजाला सदैव स्फूर्ती देत राहो.
 
प्रस्तूत लेख हा दै महानायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात अर्जूनराव  कदम यांनी लिहलेल्या लेखाला व विजय सरवदे यांच्या लेखाला संकलित करून येथे टाकताना मी सुद्धा त्यात माझे योग्य योगदान टाकले  आहे. लेखकाला त्याच्या लेखनाचा मालकी हक्क मिळायलाच हवा परंतू  हा लेख म्हणजे आंबेडकरी चळवळीची मालमत्ता असल्याने तो मी कदम साहेबांना न विचारता जरी टाकला तरी ते कोणतीही हरकत घेणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.
 
अर्जूनराव  कदम
विजय सरवदे
वैभव छाया
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s