नामदेव आभाळ झालाय…

15 तारखेच्या पहाटे पाच वाजता फोन खणाणला. फोन उचलण्याआधीच कुणकुण लागली होती. दादांचाच काही तरी निरोप असेल. पलीकडून फोन केलेल्या पत्रकार मित्रानं फारच केविलवाण्या आवाजात सांगितलं दादांनी डोळे मिटले रे.. आदल्या दिवशी जेव्हा ढसाळांना आयसीयु मध्ये हलवल्याचे वृत्त कळले तेव्हापासून मनात धाकधूक निर्माण झाली होती. आजच दादांच्या मातीला जाऊन आलो आहे पण मन काही मानेना. दादा आपल्यात नाहीत हे स्विकारायलाच अजून तरी मन तयार होईना.

ज्या नावाने, ज्यांच्या कवितांनी विद्रोहाची व्याख्या नव्याने लिहीली ते नामदेव लक्ष्मण ढसाळ समजून घेणे आणि ढसाळ अनुभवणे हे दोन वेगवेगळे विश्व आहेत. तेंडूलकरांसारखा ग्रेट नाटककार म्हणाले होते की मला ढसाळ चं विश्व समजून घेताना त्याचा विद्यार्थी बनून बसावं लागायचं. ढसाळ जे विश्व जगले ते विश्वच नागडं होतं. ढसाळांनी त्या जगाचा नागडेपणा पांढरपेशी समाजासमोर जशाच्या तसा चित्रित केला. आणि स्वतःच्या भावविश्वात गुरफटलेल्या अभिजन वर्गाच्या मक्तेदारीला जोरदार हादरे दिले.

दादांचं व्यक्तित्व अगदी अस्सल होतं. बेदरकार पणे जगणाऱ्या दादांच्या सानिध्यात येणाऱ्याला दादा अवघ्या पाचेक मिनिटात आपलंसं करून घ्यायचे. त्यांना नव्याने भेटलेल्या कोणत्याही माणसाशी झालेली मैत्री काही क्षणांतच जुनी करून टाकण्याच्या त्यांच्या खेळकर स्वभावाने ते कायमच सर्वांच्याच गळ्यातल्या ताईत बनून राहीले होते. आज त्यांच्या जाण्यानंतरच पोकळी निर्माण होणे म्हणजे काय असते हे खऱ्या अर्थाने उमगत आहे.

दादा स्वतःच एक महाकाव्य होते. परंतू त्या महाकाव्याला वाचणे जेवढे सोपे होते तेवढेच समजायला अवघड देखील. त्यांचे संपूर्ण आयुष्य मुक्तछंदात रचलेल्या कल्पनारम्य काव्यासारखेच होते. म्हणून आत्ताही दादांच्या टिकाकारांना त्यांना कोणत्याही एका ठराविक वैचारिक चौकटित जबरदस्तीने बसवायला यश मिळालेले नाही. त्यांचं एकुण व्यक्तित्वातूनच अन्याय, अहंकार, वर्ण, लिंग, जात, धर्मवर्चस्ववादाविरोधातील चीड प्रकर्षाने व्यक्त व्हायची. व्यवस्थेने अधिष्ठान प्राप्त करून दिलेल्या कोणत्याही विषमतेविरोधात आग पाखडणाऱ्या दादांच्या भाषेत प्रचंड संताप जरी असला तरी त्यात कधीही द्वेषभावना नव्हती. खाजगी बैठकांत बिनधास्त गप्पा मारताना देखील एखाद्या विशिष्ट व्यक्ती समुहाबद्दल कधीच आकस दाखवला नाही.

नामदेव ढसाळ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिडीयाच्या लाईमलाईट मध्ये राहीले. त्यांचं आजारपण असो अथवा त्यांनी शोषितांच्या राजकारणावर व्यक्त केलेले त्यांचे परखड भाष्य असो. मिडीयाने कायम त्यांना बातम्यांमध्ये का होईना पण जीवंत ठेवले. परंतू त्याच वेळेस नामदेव ढसाळांना आणि त्यांच्यातील वैश्विक दर्जाच्या कवीला कायम जातीच्या स्थितीवादी ओळखीत बांधून ठेवले.

ढसाळ यांची कविता सर्व आयाम, सर्व क्षितिजे मोडणारी होती. त्यांना आंबेडकरी तत्वज्ञानावर जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास त्यांना जगभरातील सर्वच क्रांतिकारी महामानवांनी मांडलेल्या तत्वज्ञानावावर होता. त्यांच्या एकुण एक कवितांमध्ये आपल्याला कुठे ना कुठे तरी ते प्रतित होतच आले आहे. तरी देखील त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सर्वच बातम्यांत त्यांना केवळ दलित कवी म्हणूनच उल्लेखले गेले. दलितपणाची स्थिती, जुलूमी व्यवस्थेखाली दळणं भरडणं त्या माणसानं कधीच सहन केलं नव्हतं. ते आणि त्यांच्या क्रांतिकारी कविता कायमच बंडाचं निशाण फडकावणाऱ्या होत्या. नामदेव ढसाळांचा उदय ज्या कालखंडात झाला त्या काळातील स्थितीवाद आणि आत्ताचं त्यांचं स्थान यात प्रचंड फरक आहे. परंतू जातीय कोनातूनच त्यांची अस्मिता अधिक गडद करण्याचं काम इथल्या पारंपारिक माध्यमांनी अतिशय कसून केलं आहे असा आरोप केला तर बिल्कूल वावगं ठरणार नाही.

ढसाळांवर अलीकडच्या अनेक नव-बुद्धिजीवींनी शिवराळ वगैरे म्हटल्याचं फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर आढळून आले होते. या तथाकथित नवबुद्धिजीवींमध्ये सोशल मिडीयावरील नवखे लेखक, नवखे इझमवादी यांचाच जास्त भरणा आहे. खरे तर या “बुद्धीजीवी” वर्गाला ‘दलित’ स्थितीवाचक संकल्पनेचा हवा तसा उपयोग करून घ्यायला जमते. परंतू प्रत्यक्षात शोषितांच्या भावविश्वात, त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची साधी इच्छाशक्ती देखील कोणी उराशी बाळगून असल्याचे गेल्या दोन ते तीन दशकात फारच अभावाने आढळले आहे. आपल्या पुढ्यात आलेले नेमक्या वेळी निभावून नेण्याची स्वार्थवृत्ती बळावली आहे. म्हणून ढसाळांचं धगधगतं कोणी जाणून घेत नाही. आणि आपल्या देशात माणूस मेल्या नंतरच त्याची किंमत कळते, असे म्हणतात. माणूस हयातीत असताना कोणी विचारत नाही. पण तो गेल्यावर मात्र सर्व येतात. या दांभिकपणाला काय म्हणावे ? आज ढसाळ नाहीत. त्यांच्यासारखे कवी किती निर्माण होतील, माहित नाहीत. पण शोषितांचे, पिडीतांचे भाव विश्व उलगडवून देणाऱ्या ढसाळांना आपण भाषेच्या नियमात बसवू शकत नाही.

असे शब्दछल करणारे हे नवे नवे मुल्ला बनून बेंबीच्या देठापासून बाँग द्यायला सरसावलेले असतात. आयुष्यात कधीच कोणत्याही चळवळीत प्रत्यक्ष सहभा न घेतलेले हे लोक रस्त्यावरचं विद्यापीठ काय समजून घेणार. स्वतःमधली बूर्झ्वा वृत्ती लपवून आम्ही सुद्धा वेगळे आहोत हे दाखवण्याच्या कोडग्या अट्टाहासापायी जो समोर येईल त्यावर बिनबोभाटपणे अर्थहीन टिका करत बसणे हाच यांचा स्थायीभाव. घरदार सुखी असलं की स्वतःची वृत्ती अभिजन बनत जाते. मग नकळतपणे श्लील – अश्लीलतेचा वाद मनात उभा राहतो. जे शब्द तुम्हाला लिंगवाचक अथवा घाणवाचक वाटतात ते सारेच शब्द या रस्त्याच्या गल्लोगल्लीत वापरून गुळगुळीत झालेले असतात. म्हणून कामाठीपुऱ्यात माणसं राहणाऱ्या चाळीला ढोर चाळ म्हटलं तरी तिथले लोक माणसासारखेच जगत असतात.

असो. हा फरक विश्वभानाचा आहे. ढसाळांच्या निमित्ताने तरी का होईना पुस्तकी शिक्षण हस्तगत केलेले आणि रस्त्यावरचे जगणं शिकलेलं यांत कोठेही समान दुवा वृत्तीने अभिजन असणाऱ्या लोकांना निर्माणच होऊ द्यायचा नाही आहे. त्यांना दलित (माफ करा त्यांना हाच शब्द कळतो) दलित-स्त्रीया यांचे प्रश्न हवेत पण ते फक्त चर्चा करायला. सेमिनार भरवायला. यांना दलितांचे प्रश्न कळतात पण त्यांचे भावविश्व कधीच कळत नाहीत. कारण त्यांना ते समजून घेण्यासाठी लागणारी कोनविरहीत नजरच डोळ्यांना द्यायची नसते. म्हणून ढसाळांना एकाच कोनातून पाहणारे हे दलित प्रश्न समजून घेत असले तरी ते दलित प्रश्नांवर कधीच काम करू शकणार नाहीत. ढसाळ कामाठीपुऱ्यात भाच्याबा नावानं फेमस होते. वेश्याव्यवसायात असलेल्या स्त्रिया सहसा आपलं अंतरंग कोणासाठी खुलं करत नाही. कधीच कोणाशीही अनामिक नातं देखील जोडत नाहीत. पण दादांना त्यांचं अंतरंग जगण्याची पूर्ण मुभा होती म्हणूनच गोलपीठा जन्माला आला.

आयुष्याच्या शेवटपर्यंत दादांना उत्पन्नाचे असे कोणतेच हमखास साधन कधीच गवसले नाही. किंबहूना त्यांनी कधीच ते शोधायचा प्रयत्न देखील केला नाही. उद्याचं उद्या पाहू म्हणत वर्तमानात जगणारा हा अवलिया कधीच कोणत्याही चौकटीत फिट बसला नाही. कारण त्यांचा बाज एका श्रीमंत फकिरासारखाच असायचा. हो फकिरच.. कायम आपल्या अटींवर जगले.. त्यांच्या मनाला ज्या वेळेस जे पटले त्यांनी तेच केले. ते करताना कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही.

एक वृद्ध कवी, थकलेला माणूस, फसलेला राजकारणी, बेईमान नेता, बाळ ठाकरेंशी दोस्ती करून चळवळीशी दगाबाज झालेला नेता किंवा मल्लिका शेख यांच्या मला उद्धवस्त व्हायचंय च्या अँगलमधून ढसाळांना पाहीले तर ढसाळ कधीच कळणार नाहीत. ढसाळांना नुसते दलित कवी म्हणता येणार नाही त्या काळी ते त्यानी जे भोगलं अनुभवलं ते नागडं सत्य जगापुढे मांडलं. त्या काळी भोगत असलेल्या समाज्याचा त्या यातना जगापुढे त्याच जगाच्या अस्सल भाषेत मांडल्या. ती कवी कल्पना नव्हती ते एक धगधतं सत्य होतं. आज ढसाळ जरी आपल्यासोबत नसले तरी त्यांनी घडवलेली लढाऊ प्रवृत्ती आपल्यासोबत आहे आणि कायम राहील. कारण आयुष्यभर मागास समुहघटकांना आभाळाएवढं मोठं करणारे ढसाळ आज खुद्द आभाळ झालेत. होय आज माझा नामदेव आभाळ झालाय..

वैभव छाया

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s