बॉम्बे हॉस्पीटल : रुम नं. 909

मी जन्माला घातलेला ”सूर्य” सांभाळता आला तर बघ
मी जाताना माझा ”दिवस” इथेच सोडून जाणार आहे
— तनवीर

तनवीर सिद्दीकी यांच्या या दोन ओळींतच ढसाळांची समग्र समष्टी परावर्तित होते आहे. नामदेव ढसाळ आपल्यात नाहीत ही कल्पना करणं सुद्धा शक्य नाही. आज खऱ्या अर्थाने पोकळी निर्माण होणे म्हणजे काय असते याची पुरेपूर अनुभूती आली. मराठी साहित्याला, मराठी कवितेला तीच्या मूळ रुपात जन्माला घालणारा असा महाकवी पुन्हा होणे नाही.

नामदेव ढसाळ नावाचा कोणीतरी नेता आहे हे फार लहान असतानाच कळलं होतं. पण त्या नावामागचा धगधगता अंगार कळण्याएवढी प्रगल्भता असण्याचे ते वय नव्हतंच. एफवाय ला असताना माणसाने पहिल्याप्रथम ही ढसाळांची दिर्घ कविता वाचली होती. कवितेचं असंही स्वरूप असू शकतं ! या चक्रातच मी अडकून गेलो होतो. कविता ही नुसती गुणगुणण्यापुरती नसते. कवितेने शब्द पेटतात आणि तेच शब्द पेटवतात घरे – दारे आणि माणसे सुद्धा. हे ढसाळांच्याच कवितेतून मी शिकलो.

ढसाळांशी पहिली भेट झाली होती ती आयबीएन लोकमतच्या ग्रेट-भेट कार्यक्रमानिमित्त. आयबीएन-लोकमत मध्ये इंटर्नशिप करत असताना ढसाळांना आँखो देखी पाहण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्यातल्या धगधगत्या ज्वालामुखीला अनुभवण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. निखील वागळेंच्या खोचक प्रश्नांना खुमासदार उत्तरे देताना त्यांची झालेली जुगलबंदी मला ढसाळ नावाचा फेनॉमेनॉ समजावत गेली. ढसाळ म्हणजे कुणी पानं-फुलं-वेली.. पक्षी-चंद्र-तारे गिरवित बसणारा कवी नाही. ते एक अनोखेच रसायन आहे. आणि तेथूनच ढसाळांना अभ्यासण्याचा माझा प्रवास सुरू झाला.

ढसाळ गेल्या अनेक महिन्यांपासून कँसरशी झुंजत होते. सप्टेंबर महिन्यात त्यांच्याशी झालेली भेट माझ्या आयुष्याला निश्चितच वेगळं वळण देणारी होती. बॉम्बे हॉस्पीटलच्या नवव्या मजल्यावर त्यानी स्वतः चितारलेल्या मुंबईच्या नग्न लखलखाटाकडे डोळे भरून पाहणारे ढसाळ पहिल्याच नजेरत माझ्या काळजाला चिरून गेले. मुंबईच्या नागड्या वास्तवाच्या जखमा आपल्या कवितेतून रेखाटणारा हा महाकवी आज कँसरशी लढा देतोय तरी देखील त्याच्या डोळ्यांतली चमक अजूनही मुक्त गगनात भरारी घेणारी आहे. त्याच क्षणाला मनात म्हटलं.. बॉस जिंदगी इसी चीज का नाम है.. जियेंगे तो अपने दम पर और मरेंगे तो भी अपने दम पर..

कलमनामाचे संपादक युवराज मोहितेंनी ढसाळांशी माझा परिचय करून दिला तेव्हा मला बाकी काही विचारण्याआधी त्यांचा पहिला प्रश्न होता.. “काय रे काय – काय वाचतोस?” मी उत्तरलो दादा जवळपास सर्वच वाचतो.. उत्तर संपतंय ना संपतंय तोच त्यांचा आवाज गरजला.. “अरे हाड… जिंदगी वाचायला शिक, माणसं वाचायला शिक… माणसातल्या माणुसकीला वाचायला शिक.. आणि ती इतरांना शिकवायचं पण शिक.. जर तुला माणूस वाचता नाय आला तर जिंदगी झाटभरची तुझी..” माणसं वाचली पाहीजेत, त्यांच्यातल्या माणूसकीचा मळा समानतेच्या, सन्मानाच्या फुला-फळांनी फुलवला पाहीजे याचं सोप्या भाषेत शिक्षण देणारा त्यांचा सल्ला माझ्यातल्या विचार करण्याच्या वृत्तीला मूळापासून बदलवून गेला.

बॉम्बे हॉस्पीटलमध्ये एडमिट असताना दादांना भेटायला येणाऱ्यांची सतत रिघ लागलेली असायची. सकाळीच किमोथेरेपीचा डोस संपवून संध्याकाळी दादा त्यांच्या चाहत्यांना भेटायला एकदम तय्यार होऊन बसलेले असायचे. पांढरा शुभ्र शर्ट, मस्त कडक इस्त्रीतील लुंगी, माथ्यावर हलकेच विसावलेला त्यांचा चष्मा, चेहऱ्यावरचा पिकलेला फ्रेंच कट, सोबतीला निरागस पण एकदम खळखळून हसणारं व्यक्तिमत्त्व ते कँसरसारख्या प्रचंड भयंकरातून जात आहेत याची पुसटशी जाणीव देखील होऊ देत नव्हतं. माणसं आणि त्यांच्याशी गप्पा हेच दादांचं खरं टॉनिक होतं. आपल्याला भेटायला येणारी माणसे हीच माझी संपत्ती, त्यांचं प्रेम हीच माझी कमाई असं सांगणारे दादा पायांना प्रचंड सुज असताना देखील तासंतास व्हिल चेअर बसून लोकांशी गप्पा मारत रहायचे.

वाघाच्या त्वेषाने आणि पँथरच्या वेगाने जुलूमी व्यवस्थेवर आसूड ओढणारा पँथर जेव्हा स्वतःच्या भूतकाळात रमायचे तेव्हा मात्र त्यांच्यातला फक्त आणि फक्त नामदेव ढसाळ हा किती निरागस आहे हे जाणवूनच मन गदगदून जायचं. शाळकरी वयातच बसलेले जातीयतेचे दाहक चटके, त्यांचं बालपण, एकाच घरात चार-चार बिऱ्हाडं राहताना यायची गंम्मत, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आवडलेल्या मुली, त्यांच्या प्रेमात असलेल्या मुली, ढाले-ढसाळ वादांवर टिप्पणी करताना मी स्वतः कुठे कुठे चुकलोय हे सांगताना त्यांनी कधीच कोणताही अभिनिवेष बाळगला नाही. पुण्यात शंकराचार्यांसोबत झालेली झटापट, अनेक प्रकरणात झालेली जेल, भर रस्त्यावर बसलेली पोलिसांची थर्ड डिग्री, दाऊद साधासा चोर असताना त्याला सज्जड दम देऊन मिळवून दिलेला जामीन असो किंवा ढाले – ढसाळ वादत ज. वि. पवार यांनी कायमच ढालेंची बाजू घेतल्याचे मला आश्चर्य जरी असले तरी अजिबात दुःख नाही असे धीरगंभीर आवाजात सांगणारे ढसाळ पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. बावड्याचे प्रकरण असो किंवा दलित पँथर आणि शिवसैनिकांची आमने-सामने झालेली राडेबाजी असो नाहीतर हिरव्या मटणावरचं त्यांचं प्रेम आणि आतड्यांच्या त्रासामुळे आत्ता चव चाखता येत नाही हा सल बोलून दाखवणारा पँथर एकदम खराखुरा वाटायचा.

दादांबद्दल अजून काय बोलावं !! आमच्या पीढीसाठी ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. भाषेतून सांडणारा रखरखता अंगार होता. एक कार्यकर्ता म्हणून घडत असताना मनातलं आत्मभान दादांच्या कवितेनेच जागवलं होतं. स्वतःच्या कवितेकडे वळून पाहताना दादा अनेकदा म्हणायचे सत्तरच्या दशकातली स्थिती वेगळी होती. तेव्हा प्रत्येकाच्या जखमा भळभळत असायच्या त्या जखमांना धारधार शस्त्र बनवणं त्या काळाची गरज होती. बाबासाहेबांचा संघर्ष करा हा नारा डोक्यात ठेवूनच आम्ही रचनात्मक साहित्याची निर्मिती केली होती. मात्र आज त्यापुढे जाण्याची गरज असतानाही अनेक नवकवी त्याच बाजातलं लिहीतायेत. काहीतरी वेगळं लिहिण्याच्या नावाखाली सवंगपणाच जास्त करतायेत. अशा कवितांमध्ये ओढून ताढून कंटेपररी लिहिण्याच्या हव्यासापोटी लैंगिक अश्लिलताच जास्त डोकावतेय. अंडरवर्ल्डच्या कविता अंडरवर्ल्डच्या जाणिवेत जगल्याशिवाय समृद्ध बनत नाहीत. जाणीवा प्रगल्भ व्हायला हव्यात ह्या पोरा-पोरींच्या.. कविता इनोसंट असली पाहीजे. अगदी अस्सल असली पाहीजे.

शेवटच्या दिवसात ते पँथरच्या भल्या-बुऱ्या आठवणी लिहिण्यात गर्क होते. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या आगामी प्रकाशनातील पँथरच्या भल्या आणि बुऱ्या आठवणी स्वतः वाचून दाखवायचे. हॉस्पीटलमध्ये असताना त्यांनी प्रचंड कविता लिहील्या आहेत. बॉम्बे हॉस्पीटलच्या रुम नंबर 909 मध्ये जणू काही लायब्ररीच उघडलीये असा आभास व्हावा इतकी पुस्तकं, लिखितं, पेपर्स पडून असायची.

मल्लिकाताई दादांनी लिहीलेल्या कवितांचे फाईलिंग करत असतानाचा उत्साह मात्र मला कायम त्यांच्या आणि मल्लिकाताईंच्या संबंधांवर दादांनी किंवा खुद्द मल्लिका शेख यांनी काही तरी बोलावं यासाठी खुणावत असायचा. शेवटी तो क्षण आलाच. चर्चगेटच्या दर्ग्यावरून आणलेली लाल गुलाबाची फुलं दादांना आम्ही देतो न देतोच तेच दादांनी मल्लिका शेख यांना हाक मारली आणि हातातली गुलाबाची फुलं मल्लिकाताईंना देत म्हणाले.. धीस ब्युटिफूल रोझेस फॉर माय लवली लाईफ लाईफ पार्टनर .. आणि ती फुले स्विकारताना मल्लिकाताईंनी त्यांना दिलेली स्माईल ही त्यांच्या अतुट प्रेमाचा ताजेपणाच दर्शवत होती. परंतू हा सीन पाहील्यावर मात्र मीच काही काळ अचंबित झालो होतो. विद्यापीठीत एम. ए. च्या पहिल्या वर्षात असताना मल्लिका शेख यांचं मला उद्धवस्त व्हायचंय हे आत्मकथन वाचलं. नामदेव ढसाळांची अगदी विरूद्ध बाजू डोळ्यांसमोर उभी राहीली होती. आणि आत्ता जे पाहतोय ते वेगळे आहे की काय ? पण जीव जाम खुष होता. दादांच्या आयुष्यातले एकुण एक पैलू त्यांच्या कवितेसारखेच अस्सलपणए उलगडत होते. आणि त्या सर्व क्षणांचा मी साक्षीदार होतो त्यांनी केलेल्या एकुण एक अनुभव कथनाचा मी काही काळ का होईना पण दादांच्या संम्मतीने झालेला एक भागीदार होतो.

पँथर नामदेव ढसाळ चा यल्गार हा कधीच ऊरबडवेपणा नव्हता. मानवमुक्तीसाठी पुकारलेलं मूर्तीमंत बंड होते ढसाळ. ते आयुष्यभर माणसाचे गीत गात राहीले. माणसावर सुक्त रचत राहीले. जखमेतून वाहिलेल्या रक्ताच्या थेंबाथेबातून अगणित सूर्यांना जन्म देत राहीले. व्यवस्थेची उभी आडवी फाडणारा हा महाकवी कायम वैश्विक काव्य रचत राहीला. संबंध मानवी समाज हा फक्त मानवतेचा धागा पकडून आभाळ नावाच्या छताखाली एक व्हावा असं मानवतेचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणारा कवी आजवर झालेला नाही.

दादांच्या कवीमनाने यल्गाराचा उत्सव साजरा करण्याचे आपल्याला शिकवले. त्यांच्या कवितेने विद्रोहाचे नवे इमले उभारले. काव्यरचनेचे रचित देव्हाऱ्यांचे खांब कलथून टाकणारे शब्द त्यांच्या लेखणीतून पाजळलेत. दादांचं निर्वाण जरी मनाला चटका लावून जाणारं असलं तरी त्यांच्या वादळी क्रांतीचे वारे प्रत्येक मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या प्रत्येक श्वासात कायम जीवंत राहतील.

वैभव छाया
दिव्य मराठी
दि. 16 जानेवारी 2014

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s