आंबेडकर भवन मागील राजकारण…

आंबेडकर भवन वर झालेला हल्ला हा सहजासहजी कुणालाही पचवता आलेला नाही. ती जागा केवळ ऐतिहासिक वास्तू नव्हती तर तो हक्काचा आधार आणि स्वाभिमानाची जाणीव जागवणारा बहुमोल ठेवा होता. ही तीच जागा होती जेथून बाबासाहेबांनी त्यांची लढाऊ वृत्तपत्रे चालवली. तब्बल 18 महार बटालिअन उभ्या केल्या. लेबर मिनिस्टर म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात रात्रंदिवस इथं चर्चा घडल्यात. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान वेस्टर्न विंग चे कमांडर इन चिफ म्हणून वावरताना बाबासाहेबांनी याच वास्तूतून सारी सुत्रं हलवली. आंबेडकर भवन आणि प्रेस वर झालेला हल्ला खरंच प्रचंड वेदनादायी होता.

एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला कॅबीनेट सेक्रेटरी होणं ही प्रचंड मोठी अचिवमेंट असते. रत्नाकर गायकवाड जेव्हा कॅबीनेट सेक्रेटरी झाले तेव्हा प्रचंड अभिमान वाटला होता. बार्टी हे त्यांचं ब्रेनचाईल्ड आहे. तेथून अनेक विधायक गोष्टींना आरंभ होईल याचाही सार्थ अभिमान होता. पण राहून राहून एक गोष्ट मात्र प्रचंड छळत होती की, रत्नाकर गायकवाड कॅबीनेट सेक्रेटरी झालेच कसे? जिथं मागासवर्गातून येणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला टिकू दिलं जात नाही तिथं हा माणूस कॅबीनेट सेक्रेटरी होतो आणि कुणाच्याही डोळ्यात सलत नाही हा प्रश्न सतावत होता. तोवर बहुजन हिताय वगैरेंच्या माध्यमातून रत्नाकर गायकवाडांचे गोडवे गाणारे अनेक जण आजूबाजूला होते. त्यामुळे इंप्रेस होणं वगैरे ओघानेच आलं होतं. या माणसाचा विपश्यनेवर असलेला प्रचंड जोर, त्यासाठी जाहीर केलेली भरपगारी रजा वगैरे वगैरे अनेक गोष्टींमुळे हा माणूस कायम लाईमलाईटमध्ये राहण्याची पुरी सोय करून होता. अशातच त्यांचा कार्यकाळ संपला. सेवानिवृत्त झाले तरी शासनाकडून बढती मिळाली. माहीती आयोगाचे कमीश्नर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून वावरत आहेत. एवढी मेहरबानी का म्हणून… त्याची उत्तरे आज जगजाहीर होत आहेत…

यासंदर्भात सुमीत वासनिक ने पुराव्यानिशी केलेली सत्यमांडणी ती अशी..
दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही खोटे आरोप केले आहेत. पण स्वतःला ट्रस्टी म्हणविणारी ही चांडाळ चौकडी खरोखर ट्रस्टी आहेत का ? रत्नाकर गायकवाड आणि कंपू ट्रस्ट बद्दल जे दावे करत आहेत ते खरे आहेत की खोटे? याचाही शोध आपण घेतला पाहिजे.

२००४ साली प्रा.आसवारे हे पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टचे सचिव असतांना ट्रस्टच्या घटनेत बदल करुन ट्रस्टिंचे निवृत्तिचे नियम ठरविण्यात आले होते. या नियमांनुसार ट्रस्टवर असलेल्या व्यक्तिने वयाचे ७५ वर्ष पूर्ण केले असतील तर त्या व्यक्तिस ट्रस्टवरुन सेवानिवृत्त करण्यात येते. पण या नियमासोबत एक नियम अजुन आहे ज्यानुसार ट्रस्टवर असलेलि व्यक्ति ७५ वर्ष वयाचि असेल आणि शारिरिक दृष्ट्या ट्रस्टचे काम करण्यास सुदृढ असेल तर त्या व्यक्तिस निवृत्त न करता पुढचे पाच वर्ष ट्रस्टवरच राहु द्यावे. प्रा.आसवारे यांचे वय ७५ झाले असतांनाहि ते सुदृढ होते त्यामुळे त्यांना पुढचि पाच वर्षे ट्रस्टवर ठेवणे हे ट्रस्टच्या घटनेनुसार बंधनकारक होते. पण रत्नाकर गायकवाड या व्यक्तिने ईतर ट्रस्टिंना हाताशि धरुन प्रा.आसवारे यांना बेकायदेशिरपणे ट्रस्ट बाहेर केल्याचे खोटे पुरावे सादर केले आहेत. तोतया ट्रस्टिंनि यासंबंधिचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे पण हा रिपोर्ट अजुन मान्य झालेला नाहि. कायदेशिरपणे आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातिल कागदपत्रांवर प्रा.आसवारे हेच ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. प्रा.आसवारे यांनि या तोतया कंपु विरोधात धर्मदाय आयुक्ताजवळ कंम्प्लेंट सुध्दा नोदविलेलि आहे.

प्रा.आसवारे यांना वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यावर नियमांच्या विरुद्ध जाऊन ट्रस्ट बाहेर करण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर लगेच रत्नाकर गायकवाडने आणि त्याच्या कंपूने मागच्या ३०-३५ वर्षांपासुन कॅनडा मधे स्थायिक असलेल्या ७४ वर्षीय योगेश वराडे या NRI व्यक्तिला बेकायदेशिरपणे छल करुन पिपल्स ईम्पृव्हमेंट ट्रस्टवर घेतले आहे. ७५ वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रा.आसवारे यांना काढले आणि ७४ वर्षे वय पूर्ण असलेल्या वराडे या व्यक्तीस बेकायदेशीर पणे ट्रस्टवर घेतले. योगेश वराडे आज ७६-७७ वर्षांचे झाले आहेत पण त्यांना अजूनही सेवानिवृत्त करण्यात आलेले नाही. NRI असलेल्या व्यक्तिस ट्रस्टवर घेण्यासंबंधीची कोणतीही तरतूद ट्रस्टच्या घटनेत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ३० वर्षांपासून भारताबाहेर असलेल्या योगेश वराडे याचा आंबेडकरि समुदायाशि दुर पर्यंत कुठलाहि संबंध नाहि.

रत्नाकर गायकवाड शासकीय अधिकारी असतांना स्वतः या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून आला. पण शासकीय अधिकारी अश्या कुठल्याही ट्रस्टवर राहू शकत नाही म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात ज्या व्यक्तीने ट्रस्टला पैसे दान केले होते, त्या व्यक्तीच्या पुत्राने RTI कायद्याखाली अर्ज टाकून गायकवाडच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर गायकवाडच्या मागे चौकशी लागली होती . या प्रकरणात आणि इतर प्रकरणात अडकलेल्या रत्नाकर गायकवाड ने ट्रस्ट मधून राजीनामा दिला होता. रत्नाकर गायकवाडने ने राजीनामा दिल्यानंतर ट्रस्ट आपल्या बापजाद्याची प्रॉपर्टी असल्या प्रमाणे त्याचा मेहुणा असलेल्या विजय रणपिसे याला ट्रस्ट मध्ये सामील केले आणि स्वतःला ट्रस्टचा सल्लागार म्हणून घोषित केले. ट्रस्टमध्ये सल्लागार अश्या कोणत्याच पदाच्या नेमणुकीची व्यवस्था नाही त्यामुळे रत्नाकर गायकवाडची सल्लागार म्हणून असलेली नेमणूकही बेकायदेशीर आहे. ट्रस्टवर घेण्यात आलेला विजय रणपिसे हा मुंबईतील लोढा बिल्डर कडे काम करतो. मुंबई मध्ये बेकायदेशीर पणे जागा लाटण्यात लोढा बिल्डर पटाईत आहे. विजय रणपिसे याचा सुद्धा चळवळीशी दूर पर्यंत कुठलाही संबंध नाही. उलट संस्था स्थापन करून लोकांकडून देणग्या गोळा करणे आणि सरकारी अनुदान लाटणे हे विजय रणपिसे या व्यक्तीचे धंधे आहेत.

रत्नाकर गायकवाड आणि कंपू , जे स्वतःला ट्रस्टी म्हणून सांगतात त्या पैकी श्रीकांत गवारे नावाचा व्यक्ती जो सचिव आहे तो एकच ट्रस्टी खरा आहे उरलेले सर्व बेकायदेशीर आहेत आणि यांच्या या बेकायदेशीर ट्रस्ट कार्यकारिणीला धर्मदाय आयुक्त कार्यालयातूनही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रा.आसवारे हेच या ट्रस्टचे खरे अध्यक्ष आहेत.

रत्नाकर गायकवाड आणि कंपू हा दावा सुद्धा करतायत की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता नसून ट्रस्टची मालमत्ता आहे. हा दावा करतांना ते एक पत्र दाखवत आहेत. जेष्ठ आंबेडकरी नेते ज.वि. पवार यांनी ते पत्र खोटं असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मुंबई कोर्ट सूट क्र. ४९२० १९५४ मध्ये ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही ट्रस्टची मालमत्ता नाही.प्रेस माझी वैयक्तिक मालमत्ता आहे.’ असे लिहून दिलेले आहे. ज्यावरून हे सिद्ध होते की बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ही आंबेडकर परिवाराची वैयक्तिक मालमत्ता आहे. रत्नाकर गायकवाड ने ५०० गुंड सोबत घेऊन आंबेडकर परिवाराच्या वैयक्तिक मालमत्तेस तोडले आहे.

रत्नाकर गायकवाडने आंबेडकर भवन बद्दल एक दावा अजून केला आहे की आंबेडकर भवन हे फक्त मंगलकार्य आहे आणि आंबेडकर बंधूंनी त्याला गुंडांचा अड्डा बनविले आहे. रत्नाकर गायकवाडचा हा दावा शुद्ध खोटा आहे कारण आंबेडकर भवन हे रिडल्स आंदोलना वेळी , रमाबाई नगर हत्याकांड प्रकरणी , खैरलांजी प्रकरणी आणि आताच झालेल्या रोहित वेमुला आंदोलनाचे केंद्रस्थान राहिलेले आहे. रोहित वेमुलाच्या आई आणि भावाने काही दिवसांच्या आधी इथेच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. मुंबईतील सर्वच आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय संघटना आपल्या मिटींग्स आणि आपले कार्यक्रम इथेच विनामूल्य आयोजित करतात. मुंबईतील प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यासाठी सदैव उपलब्ध असलेले हे एकमेव ठिकाण आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी मुंबई येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना रात्री कुठेच आसरा नाही मिळाला तर ते सरळ आंबेडकर भवन गाठतात. त्यामुळे रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवन बद्दल करत असलेला दावा अत्यंत खोटाच नाही तर आंबेडकरी चळवळीचे अपमान करणारा आहे.

सुमीत वासनिक ने अगदी नेमकेपणाने केलेल्या मांडणीमुळे तोतया ट्रस्टींची सारी हकीकत सर्वांसमोर येण्यास मोलाचा हातभार लागला. त्याच वेळेस साक्य नितीन ने लिहीलेली एक कमेंट रत्नाकर गायकवाडांबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करते…

साक्य नितीन…

रत्नाकर गायकवाड़ हे नाव मी सरकारी अधिकारी म्हणून ऐकले पण आंबेडकरी चळवळीत मात्र कधी ऐकले नाही. आदर्श घोटाळा, 650 कोटींचा मेट्रोपॉलिटन जमीन घोटाळा यात नाव असलेले , एमएमआरडीए मधे असताना स्वताच्या मुलीच्या संस्थेला नियमबाह्य रित्या कंत्राट देणारे रत्नाकर गायकवाड़ जेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या वारसांना ट्रस्ट मधे प्रवेश बंद केला असे कारण देतात, भैयासाहेबांवर बीनबुडाचे आरोप करतात तेव्हा त्यांची कीव कराविशी वाटते. संपूर्ण कारकिर्दीत कधीही समाजाच्या प्रश्नावर ठाम भूमिका न घेणारे गायकवाड़ निवृत्ती नंतर मिळालेल्या मुख्य माहिती अधिकारी या पदाच्या ग्रेस पीरियड मधे अचानक पीपल्स इम्प्रूवमेंट ट्रस्ट मधे रस दाखवतात आणि रातोरात 400 बाउंसरच्या उपस्थितीत आंबेडकर भवन पाडतात ही बाब अत्यंत क्लेशकारक आहे. बर भवन पाडून तीथे हे काय बांधनार आहेत याचा पूर्ण खुलासा ते करत नाहीत, यात लोढ़ा बिल्डरला त्यांनी आणला आहे. हा लोढ़ा बिल्डर आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांचा सगळा खर्च पुरवतो. आंबेडकर भवनची जागा लोढाच्या घशात घालून तीथे फ़क्त 5 माळे आंबेडकर भवन म्हणून मिळवायाचे आणि वरचे सगळे माळे कारपोरेट्सना विकुन बक्कळ पैसा कमवायचा आहे का रत्नाकर गायकवाड़ यांना. डिमोलिशनच्या रात्री आणलेल्या 400 बाउंसराचा खर्च कोणी केला असेल? लोढ़ा बिल्डरने केला की गायकवाडांनी? ट्र्स्टच्या ताब्यात देशातील व राज्यातील इतर जमीन असताना गायकवाड़ यांना फ़क्त दादारच्या आंबेडकर भवन मधेच रस का आहे? उत्तर आहे दादर मधील जमिनीचे सोन्याचे भाव. घोटाळेबाज रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवनचा पुनर्विकास करेल असा ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी खुशाल ठेवावा पण आम्ही मात्र मुळीच विश्वास ठेवणार नाही.

सिद्धार्थ मोकळे ने लिहीलेली ही नोट सुद्धा तितकीच महत्तवपूर्ण अशी आहे.. ती सविस्तर खालीलप्रमाणे…

रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टी कंपनीने जे अकलेचे तारे तोडलेत त्याबद्दल सत्ताधारी आणि हिंदुत्ववादी कायम त्यांना मांडीवर बसवून चुचकारतील. पण आंबेडकरी समाज कधीच त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकरांशी जनतेचं भावनीक नातं तर आहेच पण त्यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल समाजात ‘सर्वाधिक आदर’ असणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत. आनंदराज आंबेडकर आणि भिमराव आंबेडकर यांच्याबद्दलही कधीच अनादराने कोणी बोलल्याचं ऐकिवात नाही. बाबासाहेबांच्या या तिन्ही नातूंबद्दल राजकीय मतभेद असतानाही साधा एकेरी उल्लेख सुद्धा कोणी केला नाही. मात्र रत्नाकर गायकवाड सारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने वृत्तवाहिन्यांवर खालच्या भाषेत आणि अभिनिवेशाने डोळे वटारत आंबेडकर कुटुंबाची बदनामी करण्याचा जो डाव मांडलाय तो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रचंड जिव्हारी लागणारा आहे.   रत्नाकर गायकवाड हे ट्रस्टचे सल्लागार म्हणून बोलत आहेत तर मग त्यांचा अभिनिवेश हा आंबेडकर कुटुंबाशी खानदानी दुश्मनी असल्या सारखा का आहे?

आंबेडकर भवनचा भुखंड यांना लाटायचा आहे, असा आरोप करणाऱ्या रत्नाकर गायकवाडांनी कोर्टात जाऊन जागा खाली करुन का घेतली नाही?

 MMRD चे आयुक्त असताना आणि त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव असताना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी लाटलेले कीती भुखंड गायकवाडांनी शासनाला परत मिळवून दिले? त्यासाठी किती पत्रकार परिषदा घेतल्या? किती राजकीय नेत्यांची लायकी काढली? राजकारणातील बड्या समजल्या जाणाऱ्या घराण्यांमधील किती नेत्यांच्या बापजाद्यांचा उद्धार केला?

रत्नाकर गायकवाड इतक्या त्वेषाने कधिच कोणावर घसरले नाही मग आंबेडकरी समाजाच्या अस्मितेवरच इतक्या त्वेषाने हल्ला का चढवत आहेत?

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सतत राबता असलेल्या आंबेडकर भवनला ‘गुंडांचा अड्डा’ म्हणणाऱ्या रत्नाकर गायकवाडांनी रात्री २ वाजता आंबेडकर भवन पाडायला आलेले ५०० साधु महात्मे कोणत्या आखाड्यातून आणले होते ते ही सांगावे.

बार्टीला नवीन इमारतीत ३० वर्षाच्या लिजवर जागा देऊन त्याबदल्यात इमारतीचा बांधकाम खर्च शासनाकडून घेण्याचा प्रस्ताव रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टने शासनाला दिला आहे. असा प्रस्ताव गोराईचा विपश्यना पॅगोडा बांधताना का नाही दिला शासनाला? जर कोट्यवधीचा पॅगोडा लोकसहभागातून निर्माण होऊ शकतो तर आंबेडकर भवन का नाही होऊ शकत?

राज्यभरातील विविध ट्रस्ट शासनाकडून भुखंड लिजवर घेऊन इमारत उभारत असताना रत्नाकर गायकवाड बाबासाहेबांनी विकत घेतलेली जमीन लिजवर शासनाच्या ताब्यात देण्याचा घाट का घालताहेत?

रत्नाकर गायकवाडांनी प्रशासकीय अनुभवाच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर टेक्निकल बाजू मांडत समाजाच्या अस्मितेवर बुलडोजर चालवला आहे. बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या बुद्धभुषन प्रिंटिंग प्रेसला इमारतीच्या मलब्याखाली गाडण्याचा प्रमाद केला आहे. आजवर समाजाने ज्यांना विविध कार्यक्रमात बोलावून इज्जत दिली तेच गायकवाड चॅनेलवरील कार्यक्रमात समाजाची इज्जत काढत होते. गायकवाड आणि ट्रस्टींनी समाजमनावर वार केले आहेत. पण आता केवळ त्यांचा निषेध करुन किंवा शिव्याची लाखोली वाहून प्रश्न सुटणार नाहीये. आंबेडकर भवन पाडणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करने, बुद्धभुषन प्रेसचे रिस्टोरेशन, बाबासाहेबांच्या वस्तू पाडकाम करताना ज्यांनी चोरुन नेल्या त्या सर्व परत मिळवने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर आंबेडकर भवन पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कायदेशिर लढा लढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर एकटे सक्षम आहेत. मात्र आंबेडकर भवन पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि बार्टीच्या माध्यमातून शासनाची घुसखोरी थांबवण्यासाठी जनरेटा उभा करने हे आपले सर्वांचे काम आहे.

 

माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी…

मी स्वतः कधी कोणत्याही सनदी अधिकाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. कारण हे फार पोटेंशिअल करप्ट असतात असा नव्वद टक्के लोकांच्या बाबतीतला अनुभव. रत्नाकर गायकवाडांसारख्या अधिकाऱ्यांनी खुद्द मागासवर्गीयांच्या अधिकारांची जी खांडोळी केलीये ती आपल्याला स्वतः पाहता येऊ शकते त्यावर वेगळं बोलायची गरज नाही. बार्टीसारख्या संस्थेत आजवर किती जणांचे प्रोजेक्ट कसे पास झालेत याबद्दल खाजगीत कुणाशीही चर्चा करून पहा सत्य कळेल… बार्टीच्या मुख्यपदी आर. के. गायकवाड असताना किती प्रोजेक्ट पास केले गेलेत याबद्दलही विचारणा करून पहा. समोरचा माणूस कसाही असला तर त्याला सर्वात आधी विपश्यना केलीये का याबद्दल अगदी ताठरतेने विचारून घाबरवणारा हा अधिकारी माणूस. आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये करप्ट ऑफिसर अशी बिरूदावली मिरवणारा हा माणूस कोणत्या तोंडाने स्वतःला आंबेडकरी चळवळीचा म्हणवतो यासाठी त्याची किव करावीशी वाटते.

रत्नाकर गायकवाडांनी बाबासाहेब आणि भय्यासाहेब यांच्यात जो पत्रव्यवहार झाला असल्याचे म्हटले आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. मुळात ते पत्रच अस्तित्वात नाही. गेल्या अठ्ठेचाळीस तासांत अख्खा दस्ताऐवज खंगाळून काढला पण तसलं काही मिळालं नाही.

रत्नाकर गायकवाड ज्या पत्रांचा उल्लेख करत आहेत ती पत्रे सरकारने छापली आहेत असे म्हणतायेत.. शिवाय ती पत्रे शांताबाई दाणी यांच्याकडून सरकारपर्यंत गेली असे सांगतायेत ते साफ खोटे आहे. बाबासाहेबांनी लिहीलेली शेकडो पत्रे दादासाहेब गायकवाडांकडे होती. दादासाहेबांकडे असलेली पत्रे ही औपचारिक पत्रे होती. त्यात कोणतीही पर्सनल पत्रे नव्हती. वार्धक्याकडे झुकलेल्या दादासाहेबांनी ही पत्रे नंतर शांताबाई दाणी यांच्याकडे सोपवली. नंतर एका खाजगी प्रकाशनानं ती पत्रे पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशित केलेली आहेत. बाबासाहेबांची पत्रे असे टाका ढिगभर लिंक देईल गुगल. रत्नाकर गायकवाड ज्या तडफेने खोटे बोलत होता त्यावरून खरंच कमाल वाटत होती.

उदय निरगुडकरांनी झी 24 तासवर जी चर्चा घेतली ती पत्रकारीतेतील बायस्ड असण्याचा उत्तम नमुना. निरगुडकरांना कदाचित विसर पडला असावा की त्यांच्या चॅनेलचं नाव झी 24 तास आहे … मी 24 तास नाही. त्यांनी लिहीलेला इंट्रो, त्याचा व्हिडीओ बनवून स्वतःच्या हिरोगिरीचा होरा दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न, चळवळीशी सुतराम संबंध नसताना चळवळीवर भाष्य करण्याचा नाटकीपणा त्यांनी का करावा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एका संवेदनशील विषयावर चर्चा करत आहात परंतू स्वतःच्या प्रेमात प्रचंड आंधळे झाल्यामुळे तुम्ही चळवळीच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याला असल्या फालतू प्रश्नांनी मोजलेच कसे हा सरळ सवाल आहे…  हा वाद आंबेडकर घराण्याच्या प्रॉपर्टीचा आहे असे वारंवार सजेस्टीव क्वेश्चन करण्याचा प्रोपोगेंडा का म्हणून केला या प्रश्नाचे उत्तर दिले तर बरे होईल…

असो…

बाबासाहेबांची एकुण एक वस्तू ऐतिहासिक आहे. सर्वव्यापीच्या पहिल्या भागाची सुरूवात करताना प्रकाश आंबेडकर स्वतः बाबासाहेबांच्या ऐतिहासिक ठेव्याबद्दल ज्या भावुकतेने व्यक्त झालेत ते पाहता बुद्धभूषण प्रेसची झालेली वाताहत त्यांना किती त्रासदायक असेल याची कल्पना करवत नाही. हा झाला त्यांचा वैयक्तिक भाग. परंतू आत्ताची अन् येणारी पिढी कैक ऐतिहासिक दस्ताऐवजांना मुकणार आहे याची साधी कल्पना ही आपण करू शकत नाही. कुणी काहीही म्हणोत… हा हल्ला सरळ सरळ संघर्षाच्या केंद्रावर घालण्यात आलेला आहे. लोढा बिल्डर तर माध्यम आहे. आंबेडकरी चळवळीला परक्या शत्रुंची गरज नाही. नव्याने सत्ता धारण केलेल्या या अडमिनिस्ट्रेशनमधल्या बूर्झ्वा वर्गाने ती गरज भागवलीये. प्रिंटींग प्रेस गेली.. मशीनी गेल्या. महत्त्वाची कागदपत्रे गेली. ती परत मिळणार नाहीत. आज भावना संतप्त आहेत. पण किती मोठं नुकसान झालंय हे येत्या काळात उमगून येईल तेव्हा पश्चाताप सुद्धा अपूरा पडेल… इतिहास फक्त लिहीला जातो. परत रचला जात नाही. इथं तर इतिहासाची पाळंमूळंच उखडून फेकली अन् त्यासाठी आपलेच हाथ वापरलेत.

 संकलन
वैभव छाया

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s