मेमरी

काल कधी नव्हे ते 2013 सालची मेमरी पोस्ट दिसली. लिहीलंच नव्हतं काहीही फारसं अख्ख्या वर्षात. हरखून गेलेलो होतो. हरखून गेलो होतो की हरवलो होतो ते ठाऊक नाही. पण स्वतःला कुठे तरी विसरून जगत होतो. पोस्ट दिसली. दिसताक्षणीच डिलीट केली. डिलीट करतानाही फारसं काही वाटलंच नाही. निर्विकार भावनेनं सहज पोस्ट डिलीट केली. पोस्ट होती तीच्यासोबतच्या मरिनवरच्या पावसाची.

तीची आणि माझी गोष्ट कधी सांगावी का असा प्रश्न मनात नेहमी डोकावून जायचा. पण स्वतःला आवरतं घ्यायचो. मनाला सांगायचो की हे सारं काही पर्सनल आहे. यात सार्वजनिक सांगण्यासारखं तरी काय आहे? पण या जगात पर्सनल असं काहीच नसतं. ती स्त्री आहे. स्त्रीवादी चळवळीनंच जगाला शिकवलंय पर्सनल इज पॉलिटिकल. प्राईवेट इज पॉलिटिकल. आणि म्हणूनच तीची आणि माझी गोष्ट ही पर्सनल ठेवणं त्या घटनांवर, त्या अलवारपणावर अन्याय करणारं ठरू शकेल.
तर ती मुंबईबाहेरची. मुंबईत आली तेव्हा मुंबईचं दमट घामट वातावरण सहन होईना. पण हळूहळू पडायला लागली मुंबईच्या प्रेमात. आणि अखेरिस माझ्याखातर अख्खीच्या अख्खीच पडली. पावसाळा सुरू झाला. तेव्हापासून तीचा हट्ट होता की पावसात भिजायचंय. ते ही तुझ्यासोबतच. मी नेहमीसारखा नकारघंटा वाजवायचो. कारण साधं सुधंच होतं. पाय भिजेल बिनकामाचा खर्च होईल. त्यात ट्रीटमेंट सुरू होती. केसांचं छप्पर गायब होतं. टक्कल फार डेंजर दिसत होतं.
आणि ती अफाट सुंदर. माझ्या नजरेला ती अफाट सुंदरच होती. असो…

जून पासून तीनं लावून धरलेला हट्ट अखेर तीनं सप्टेंबर मध्ये पुरवूनच घेतला. पावसात भिज म्हणून तीनं जबरदस्तीनं जॅकेट गिफ्ट केलं. पायाला प्लास्टिक फॉईलनं रॅप केलं. नवं टि-शर्ट आणलं. चाफ्याची भरपूर फुलं दिमतीला ठेवली. आणि मला राजी केलं.

परतीच्या पावसाचा मौसम सुरू झाला होता आत्तासारखा.
तुफान पाऊस बरसत होता. त्या भर पावसातच गिरगाव पासून ट्रायडंट परत मला चालत नेलं. दोघं पूर्ण भिजलो होतो. या घटनेत काय वेगळं होतं… काही नाही ना.. चारचौघांसारखंच तर भिजलो होतो.

पण त्या भिजण्यानं मला अनेक अंगांनी समृद्ध केलं होतं. ज्या पावसाचा मी प्रचंड रागराग करायचो, घाबरायचो. त्याच्याकडं आता जरा पॉझिटिवली पहायला शिकवलं तीनं मला. आकंठ भिजणं कशाला म्हणतात हे त्या रात्री तीनं मला शिकवलं. इरॉस कसा अंगावर झेलावा आणि स्पर्शविहीन ऑर्गेझम कसा अनुभवून स्वतःला तृप्त करावं हे त्या दिवशी अनुभवलं. पार भिजून शेवटच्या ट्रेननं घरी निघालो तेव्हा ओल्याशार केसांसकट माझ्या चेहऱ्यावर स्वतःला झोकून दिलेली ती … मला ती सोबत असेपर्यंत फक्त त्याच प्रतिमेत दिसायची. घरी पोहोचलो तेव्हा भिजलेल्या अवस्थेतच आईनं वैतागून स्वागत केलं. नंतर काय झालं ते न लिहीणंच बरं… एकुण तो प्रसंग होताच तसा मस्त, रुमानी.

पण आयुष्यात साऱ्या गोष्टी चिरकाल नसतात. काही फळाला जातात तर काही वेळेआधीच मरून पडतात. ज्या जन्माला येतानाच सशक्त नसतात त्यांचं आयुष्य तरी किती असणारे बरं? त्याच न्यायाने जितक्या जलदतेनं ते जन्माला आलं तितक्याच जलदतेनं ते मेलंही. आधी खुप त्रास व्हायचा.. जेव्हा केव्हा समुद्रावर एकटा जाऊन बसायचो तेव्हा. आता चूकून सुद्धा आठवत नाही. आठवलं तरी निर्विकार पणे पाहतो. थोडा आपसूकच हसतो. आणि आपला त्याच्याशी काही संबंध नाही या अर्विभावात सोडून ही देतो.

आपण किती निष्ठूर असतो आपल्याच भावनेशी याचा प्रत्यय वारंवार घेतो. पण प्लाटोनिक रिलेशनशीप जपून स्वतःचा देवदास करण्याचा जमाना दिलीप कुमारच्या रिटायरमेंटसोबतच संपला. प्रेम, नातं, पार्टनर हा प्रॅक्टिकल घटकांमध्ये मोडणारे प्रकार झाले आहेत. कंपॅटिबीलीटी नसेल, आपल्या गरजा पूर्ण होणाऱ्या नसतील तर आपण सहज विलग होतो. थोडक्यात वेळेनुरूप आपण प्रेम आणि त्यातून उमलणारं नातं जपायचं की नाही याचा निर्णय प्रचंड डिप्लोमॅटिकली घेतो. यालाच पॉलिटीकल बिहेविअर म्हणतात. म्हणून म्हटलं नथिंग इज पर्सनल.

याचा अर्थ असा होत नाही की त्या वेळी व्यक्त झालेल्या भावना ह्या खोट्या असतात… त्या अगदी निर्मळ असतात. पण त्याच गर्तेत अडकून राहणारा माणूस हा आजच्या जगात जगण्याचा लायकीचा नाही. हे मला ती सोडून गेल्यानंतरच कळालं. काही निर्णय आणि घटना योग्य गोष्टीसाठीच घडतात. त्या अनुभवांतूनच माणूस समृद्ध होत जातो. माझं समृद्ध होणं यासारख्या अनेक घटनांतून आलेलंय. म्हणून आज मला ना राग आहे ना लोभ ना द्वेष… पूर्णतः त्रयस्थ… अगदी आभाराची देखील भावना नाही.

आणि हा स्वार्थीपणाच कदाचित बाहेरच्या प्रॅक्टिकल असणं म्हणून ओळखलं जातंय.

क्रमशः

Advertisements