व्यंगचित्रामागील मानसिकता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल वादग्रस्त व्यंगचित्रामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्याची परिणीती पुण्यात प्रा. पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाली. जवळपास सार्‍याच प्रसारमाध्यमांनी एकसुरी प्रतिक्रिया देताना व्यंगचित्रात कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. काही पत्रकारांनी पुण्यातील हल्ल्याचा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीच्या अभ्यासाचे वावडे असल्याचे  बेजबाबदार विधान देखील करून टाकले. चित्रसाक्षरतेचा मुद्दा उपस्थित करून व्यंगचित्राला विरोध करणार्‍या सार्‍या विरोधकांना चित्र-निरक्षर ठरवले गेले. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीतील तरुणाईची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया…

समाजातील अपप्रवृत्तींवर मार्मिक भाष्य करण्याचे एक ताकदवर साधन म्हणून व्यंगचित्रे फार मोलाची भूमिका बजावतात.  वर्तमानपत्रे, नियतकालिकात व्यंगचित्रे प्रकाशित होणे हा एक वेगळा भाग असतो. कारण वृत्तपत्रांतील संपादकीय सदरे वाचणार्‍या वाचकांचे विचार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळे क्वचितच एखादे व्यंगचित्र प्रभाव पाडते. परंतू क्रमिक पाठ्यपुस्तकांत एखादे कार्टून छापण्याची परिमाणे ही पूर्णतः वेगळी आहेत. अभ्यासक्रमातील पुस्तकात असणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्याच्या मनावर संस्कार करत असते. पाठ्यपुस्तके ही ज्ञानाचे भंडार असून त्यात मांडलेले विचार हे आयुष्यातील प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे मुल्यशिक्षण आपण प्रत्येक इयत्तेत घेत असतो. त्या वादग्रस्त व्यंगचित्रात नेहरु चाबुक उगारताना दाखवले गेले आहेत. संविधान स्विकृतीअगोदर हजारो वर्षे येथील मनूवादी व्यवस्थेने येथील शोषित उपेक्षित आणि वंचिताना कायम पायदळी तुडविले. त्यासाठी चितारल्या गेलेल्या अनेक चित्रांत चाबकाचा वापर सर्रास केला गेला आहे. मग कार्टूनिस्ट शंकर यांनी काढलेले चित्र हे कोणत्या मानसिकतेचे प्रतिक मानण्यात यावे हा पहिला सवाल उपस्थित होतो.

नियमितपणे प्रकाशित होणार्‍या व्यंगचित्राचे आयुष्य हे जेमतेम दिवसभराचे.  अर्थात काही व्यंगचित्रे याला अपवाद आहेत. मात्र  प्रा. पळशीकर आणि डॉ. योगेंद्र यादव यांच्या कमेटीने त्या वादग्रस्त व्यंगचित्राला अजरामर करून टाकले. खरे तर उगारलेला हंटर असलेले ते व्यंगचित्र पुस्तकात टाकण्याची गरज नसताना देखील ते का टाकले गेले याचे समर्पक उत्तर दिले गेले नाही.  या व्यंगचित्राचे समर्थन करता येईल असा एकही ठोस मुद्दा मांडला नाही. बरं जे बुद्धिवादी विचारवंत सदर व्यंगचित्राचे समर्थन करीत आहेत ते या चित्राचा व्हिज्युअल इम्पॅक्ट हा किती विचित्र आहे याकडे ज्या पद्धतीने दूर्लक्ष करित आहेत त्याला काय म्हणावे ?

व्यंगचित्रात चितारलेले हंटर हे हिंसेचे प्रतीक आहे. गुलामांवर अत्याचार करण्यासाठी कायमच हंटरचा वापर करण्यात येई. मग उगारलेल्या हंटरने विद्यार्थ्यांना नेमके काय सुचित करवून द्यायचे असेल ? कोणतेही काम जलद गतीने करवून घ्यायचे असेल तर त्यासाठी चाबकाने फटकावण्याचा विचार पेरणार आहोत काय ? शिक्षक सदर प्रकरण शिकवत असताना व्यंगचित्राची समीक्षा नेमकी कोणत्या अंगाने करत असतील ? त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची नेमकी काय प्रतिमा तयार होत असेल ? ज्या पंडित नेहरू आणि आंबेडकरांनी  हंटरवादासारख्या नीच रुढी आणि प्रवृत्तींना कायम कडाडून विरोध केला त्यांच्याच हातात हंटर दाखवून नेमके काय साध्य होणार आहे या प्रश्नांची उत्तरे आजवर नाही मिळालीत. कदाचित त्या व्यंगचित्राचा उलटा परिणाम बाजूला दाखवल्या गेलेल्या चित्राप्रमाणे देखील झाला असावा. संविधान निर्मितीला उशीर होत आहे असे दाखवणारे चित्र छापताना त्याच्याच अगदी बाजूला कारणीमीमांसा छापणे देखील गरजेचे होते. संविधान सभेची काटेकोर शिस्त, प्रत्येक विषयावर झालेली गहन चर्चा, महिलांना संप्पत्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना करावा लागलेला संघर्ष, मसुदा समितीच्या इतर सहा सदस्यांची निष्क्रियता देखील मांडायला हवी होती.  पण तसे केले गेले नाही. किंवा चित्राचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी देखील हे वास्तव मांडले नाही.

एनसाईआरटीने तयार केलेला अभ्यायक्रम पहिल्यांदाच वादात अडकलाय असेही नाही. याआधी १९७७ ते १९८० या जनता पार्टीच्या तर १९९८ ते २००४ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात सीबीएसईचा अभ्यासक्रम हा हींदूत्ववादी विचारधारेला अनुसरून बनवला गेला असल्याचे आरोप एनसीईआरटीवर झालेले आहेत. जे डॉ. योगेंद्र यादव यांना आपण एक उत्कृष्ट राजकीय समीक्षक म्हणून ओळखतो. परंतू त्यांनी विविध आंदोलनासंबंधी घेतलेल्या भूमिका मात्र प्रतिगामीच राहिल्या आहेत. देशातील सो-कॉल्ड बुद्धिजीवी वर्ग जेव्हा जेव्हा स्व-अस्मिता जागृत करण्यासाठी टोकाची भुमिका घेतो तेव्हा त्यांचे पक्षधर असणारे योगेंद्र यादव हे नेहमी पुढेच असतात. रामलीला साकारताना लोकपालच्या हुकुमशाही अटींचे समर्थन करणारे असो किंवा ओबीसी आरक्षणाला विरोध करणारा सल्ला देणारे लेख लिहीणे असो, जातिनिहाय जनगणनेला विरोध असो किंवा अपूर्ण महिला आरक्षण विधेयकाला दिलेले उथळ समर्थन असो.  यासंदर्भात जेएनयूचे प्रा. तुलसी राम यांनी व्यक्त केलेलं मत दूर्लक्षित करून चालणार नाही. “एनसीईआरटीच्या कमिटीमध्ये सामाजिक न्यायाचे समर्थन करणारा एखादा जरी सदस्य असता तर कदाचित ह्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी संमती मिळालीच नसती.

आत्ता मुद्दा उरला तो प्रा. पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या सचिन खरात आणि त्यांच्या साथीदारांचा. त्यांनी केलेलं कृत्य हे निंदनीयच आहे. बाबासाहेबांना अस्खलितपणे अभ्यासलेला तरुण कधीच अशा भ्याड हल्ल्यांचे समर्थन करीत नाही. परंतु, सचिन खरात आणि त्यांचे तीन-चार मित्र म्हणजे अख्खा आंबेडकरी तरुण वर्ग नव्हे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा मार्ग म्हणजे तोडफोड करणे नव्हे. आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणार्‍या तरुणांची कृती ही कायमच परिवर्तनवादी राहीली आहे. राडेबाजीला थोडेसेही स्थान या चळवळीत मिळू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर्वोत्कृष्ट बुद्धिवादी कृतीशील विचारवंत होते. त्यांना आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा दर्जा मिळण्याऐवजी त्यांची ओळख कायम दलितांचे कैवारी अशी बिंबवण्यात इथल्या शिक्षणव्यवस्थेने फार मोठा हातभार लावला. डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या सामुहिक शेतीचा विचार आजच्या काळासाठी परफेक्ट आहे. त्यांचे लोकसंख्या धोरण, जलनीती, नदीजोड प्रकल्प, भाषावार प्रांत-पुनर्रचना पासून ते राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे तत्वज्ञान कायमच असपृश्य ठरवले गेले. बाबासाहेबांना विचारात उतरवण्याऐवजी पुतळ्यात बंदिस्त करून टाकले.  बाबासाहेबांना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर  विचार म्हणून स्विकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मनूवादी संस्कारांनी लिप्त असलेल्या मेंदूला एकदा रिफ्रेश करण्याची.  

वैभव छाया
9 जुलै 2012

Advertisements