समष्टीची खरवड खाऊजाच्या थोबाडावर

आज महाराष्ट्र टाईम्स ने डिलीट केलेलं सारं आकाश या संग्रहावरील समीक्षा प्रकाशित केलीये. वृत्तपत्रीय लेखनाच्या मर्यादा लक्षात घेता शब्दांची काटछाट होणे हे क्रमप्राप्त. तरी इथे आपल्यासाठी पूर्ण समीक्षा देत आहे. डॉ. श्यामल गरूड यांना अपेक्षित असलेल्या शीर्षकासहीत … अभिप्राय नक्की द्या.
आजचा प्रागतिक विचार जात-लिंग-वर्गाच्या संदर्भात कितीही पुढचा असला किंवा विश्वग्राम ही संकल्पना वरवर कितीही गोंडस वाटला तरीही इथल्या मातीतले वेशीबाहेरचे गावकूस व त्यातल्या उतरंडीतले माणूसपणालाच काळिमा फासणारे अनेक प्रश्न या विश्वग्राम संकल्पनेमुळे काही विरघळले नाहीत. आज बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली ग्राहक संस्कृती व आपलंच झालेलं वस्तूकरण हे वरकरणी काही प्रमाणात सत्य जरी असलं तरी जागतिकीकरणात सपाटीकरणाचे महाराजकारण घुसडून ‘कुठलाही विद्रोह हा परंपरावादीच असतो’ ही नवी प्रागतिक सांस्कृतिक, राजकीय खेळी खेळत पोस्टमॉंडर्नीटीच्या डगल्यात चौथ्या आंबेडकरी पिढीला कोंबणे किंवा समीक्षा करणे जरा घाईचेच होईल. नव्या ‘ग्लोबल डिसकोर्स’मध्ये साऱ्या आजारांवर एकच जागतिकीकरणाचे इंजेक्शन लावून ही नवी आर.एम.पी. पुरोगामी डॉक्टरांची फळी वैचारिकतेच्या वेगळ्याच अविर्भावात वावरत आहे.
आपल्या भूमीत समता-न्याय-बंधुता हा स्वातंत्र्योत्तर भारताला मिळालेला आधुनिक संवैधानिक विचारच पुरता रुजला नाही किंवा जिथे अजून फुले-आंबेडकरांचा विचार पचनी पडला नाही तिथे पाश्च्यात्यांचा उत्तर आधुनिक विचार लगेच आमच्या पुरोगाम्यांना रुचला आणि पटलाही. तिकडचा हा ‘डिस्टन ड्रम’चा आवाज यांच्या कानी लगेच पडतोय,पण इथल्या मातीतल्या जातीय क्रूर हिंसा,दलित स्त्रियांची विटंबना व माणूसपण नाकारणाऱ्या व्यवस्थेविरोधात मात्र यांच्या पेनातली जराही शाई खर्च होत नाही किंवा निषेधाचे सूर उमटत नाही. आजही यासाठी पुन्हा त्याच जातीचा पीळ सोसलेल्या तरुण कवी वैभव छायाला आपल्या व्यवस्थेचे दुःख जागतिक वेशीवर टांगण्यासाठी स्वतःचीच लेखणी स्वतःला उचलावी लागते. त्याने तुमचं तथाकथित ‘डिलीट केलेलं आकाश’ या कवितासंग्रहातून. कवी वैभव म्हणतो,
“ माणसानं माणूस म्हणून जगताना करावं बेलगाम बंड
अहिंसेच्या तत्वांना हरताळ फासणाऱ्या
प्रत्येक मेंदू विरोधात
दरेक हाताविरोधात.”

कवी इथल्या पुरोगामित्वाच्या आंतल्या सडलेल्या चिंध्या व लक्तरे ‘ग्लोबल’ गावकुसाच्या वेशीवर टांगायला निघालाय. तो या जागतिक बाजारपेठेत मध्यभागी उभा राहून स्वतःचे वस्तू होणे नाकारतोय. तुम्ही कस्टमर नसाल तर तुमची केअर होणार नाही ही सैद्धांतिक भूमिका या नव्या बाजाराची असतांना कवीला केंद्र नाकारणारी उत्तर आधुनिकतेची चळवळ मान्य नाही. भावनिक-सांस्कृतिक-राजकीय हायब्रीडायझेशनच्या या काळात तुम्ही अस्तित्वात आहात पण तुमचे भान नष्ट करण्याची व दुसऱ्याच ठिकाणी लक्ष वळविण्याची वेगळी खेळी सुरु आहे. आता व्यवस्था बदलण्यापेक्षा त्याच परिस्थितीत मार्ग काढत दुःखाचे सार्वजनीकरण न करता त्या शक्यतांना चळवळीच्या रूपातूनही संपूर्णतः संपवत आता दुःखाचेच खाजगीकरण सर्वत्र झालंय ही पुन्हा वेगळीच अभिजनवादी खेळी खेळवत इथल्या मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या चळवळींना गोंधळात टाकण्याचे काम या काळात सर्वत्र सुरु आहे. वेदना-विद्रोह-नकार ज्या शब्दांची हत्यारे झाली होती, ते सारं जागतिकीकरणाच्या पर्यावरणात लगेच कसे बदलून गेले? सामुहिक चिंतेची हत्यारे हळूहळू बोथट करून टाकण्याची एक रणनीती सुनियोजित पद्धतीने आखल्या जातेय. तिकडे बर्लिनची भित्ताड कोसळली तरी इकडचा लाल बावटा भोवळून पडतो पण इकडचा धर्मांध नंगानाच मात्र थंड डोळ्यांनी बघतोय. या भयाण शीतलहरीच्या बीभत्स गारठ्यात वैभव छाया सारखा कवी अत्यंत महत्वाची भूमिका या साऱ्या गदारोळाविषयी घेऊन पुढे येतो. तो चौथ्या आंबेडकरी पिढीतला टेक्नोसवी जगाचा प्रातिनिधिक नायक आहे. वैभव आपल्या मनोगतात म्हणतो,”अघोषित सेन्सॉरशिपच्या या कालखंडात माझ्या पिढीला मुक्तपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सोशल मिडियालाच माझ्या अभिव्यक्तीचे सारे श्रेय जाते. माझी कविता हीच माझी राजकीय कृती. माझ्या रखरखणाऱ्या जात आणि वर्गचरित्रापलीकडे जाऊन माणूसपण प्रगल्भ करणारी माझी प्रत्येक क्रिया हाच माझा परिचय.” हेही वैभव छाया अत्यंत स्पष्टपणे सांगून टाकतो. या नव्या जगाशी लढताना नव्वदोत्तर चौथ्या आंबेडकरी पिढीला आजच्या तंत्राचे व मंत्राचे बऱ्यापैकी भान आले आहे. त्यांचे विद्रोहाचे भान बदलले म्हणून भाषाही बदलली, आणि बदललेल्या भाषेतून त्यांच्या हाती लढण्याचे शस्त्रही गवसले हेही तो ठळकपणे अधोरेखित करतोय. कवी म्हणतो,

“ आपली सॉंफ्टवेअर्स आपल्यालाच बनवावी लागतील
आणि ती चालवायला लागणारे संगणकदेखील
त्यांना सुरक्षित ठेवणारा अंटीव्हायरसपण
आपल्यालाच बनवावा लागणार
मनगटातली ताकद बोटांत उतरू दे आता
डोळ्यातली आग मेंदूत शिरू दे आता
बघ, हार्डबॉडीपेक्षा
सॉंफ्टवेअरचा जमाना अवतरलाय.”

संघर्षाचे केंद्र बदलले त्यामुळे शस्त्रही.कवी व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड टेक्नोसॉंवी आहे. त्याने स्वतःच्या समविचारी मित्रांना ‘सारे काही समष्टीसाठी’ या माध्यमातून एकत्र आणले.जुने अवकाश पुसून टाकण्याइतपत तो बेधडक होऊन जुन्या दलित अस्तित्वाची वेगळीच झाडाझडती घेतोय. त्याचे संग्रहाचे नाव ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ यातच त्याची नव्या भूमिकेच्या बांधणीची चाहूल लक्षात येते. पोस्ट प्यंथरीयन चिलखत घालून बोलणारी ही कविता आहे. एकेकाळी प्यंथरचा जबरदस्त पगडा होता,ज्याचे आकर्षण आंबेडकरी चळवळीतून आजही संपलेलं नाही.वैभव छाया उघड-उघडपणे नव्या प्यांथरच्या जाहीरनाम्याचे सुतोवाच करू पाहतो.इथल्या बुरसटलेल्या अर्थशास्त्रातून गाभाडलेल्या नीतीत इथली पोरं आता करणार नाहीत स्वतःच्या जीवाची मांडवली, हेही तो ठामपणे
‘शिरच्छेद’ या दीर्घ कवितेत सांगतो.तो पुढे म्हणतो,

“आईच्या पोटातून विद्रोह घेऊन जन्माला येणाऱ्या लेकरांना
तू काय दाखवशील भीती. चार मीटर खाकीचा कपडा
दहा रुपयाची परीटघडी, शंभर रुपयाचा बिल्ला
एम एम 5 ची बुलेट,नाही दाखवू शकत रुबाब आमच्यावर
केसेसच्या केसेस,144 च्या केसेस
नक्षलवादाचे आरोप, दहशतवादाचे खटले
राष्ट्राद्रोहाचे खोटे गुन्हे, घंटा बसवणाराहे दहशत आमच्यावर
इथे जमलेल्या विद्रोहाची पुकार, तू दाबू शकशील काय?”

याच कवितेत पुढे तो म्हणतो,
“ या पँथरला तू कसा जेरबंद करू शकशील?”

भांडवली व्यवस्थेच्या स्खलनातून विकास स्वप्नांच्या नव्या इमारती बांधण्याचे कंत्राटही पुन्हा संस्कृती रक्षकांच्या हाती कसे ? हा मुलभूत प्रश्न विचारून नव्या सांस्कृतिक राजकारणाची तळी उचलणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाडून त्यात जुन्याच सरंजाम्यांचे अभद्र चेहरे तो कवितेभर टराटरा फाडत जातो.पुष्कळदा त्याच्या निम्म्याहून अधिक कवितांवर नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही शब्दकळांचे दाट सावट आढळून येते,पण वैभव नामदेव ढसाळवरचे प्रेम तसेच जाहीर करत त्या शब्दांमध्ये आजच्या जगण्याचे संदर्भ मांडत आजच्या तरुणांची भाषा तो वापरतो.त्यामुळे त्याच्या कवितेतला विद्रोह वरवर प्यांथर काळातला वाटला तरी त्यातले संदर्भ जागतिकीकरणाच्या अनुषंगाने येत तो हळूहळू पोस्ट प्यांथरीयन थेअरीची वेगळी मांडणी करू पाहतो,हे त्यातले ठळक वैशिष्ट्ये आहेत व त्याच्या पिढीची ती भूमिका आहे,हे जास्त स्पष्ट होते.

आपल्याकडे धर्माने जातव्यवस्था बळकट करून संस्कृती निर्माण करत विचारसत्तेचं केंद्र तयार करत उतरंडीची फोकलट समाजसंस्था निर्माण केली. पाश्च्यात्य विचारवंत फुको म्हणतो, ”सत्ता ही ज्ञान निर्माण करीत असते.” जर ज्ञान आणि सत्तेचा एव्हढा महत्वाचा संबंध असेल तर भारतीय परिप्रेक्षात या गुताड्याचा विचार किंवा कवी वैभव छायाला ‘मी माझा पत्ता बदलून घेत आहे’ हे सांगण्याची गरज भासावी,हेच या व्यवस्थेचे अपयशही आहे. कवी म्हणतो स्वतःला,

“हो,खूप आनंद मिळेल,पण तू राहा एकट्यानंच
छाटलेलं डोकं,विहिरीत टाकलेलं डुक्कर
गावावरचा बहिष्कार आणि हजारोंच्या ऑंट्रोसीटी
मोर्च्यातल्या उन्हाची रग,मातीवरला दुष्काळ
फुटपाथवाल्यांचा मान्सून अन पुलाखालचा हिवाळा
जाणवतच नाही या आयव्हरी हाऊसमध्ये
मी माझा पत्ता बदलून घेत आहे
त्या घरातल्या रेशनकार्डावरून
मीच कमी करून टाकलंय आता नाव माझं.”

हा व्यवस्थेने दिलेला आत्मक्लेश आहे. वैभव चळवळीचे व त्याचे झालेले असंख्य तुकड्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोडू पाहतो. ‘सांत्वन’ या दीर्घ कवितेत कवी शहीद विलास घोगरे आणि प्यांथर अरुण कांबळे यांच्या आत्महत्येचे सूत्र पकडून महत्वाचे चिंतन मांडतो. वैभव म्हणतो,

“हिटलरच्या संस्कृतीपासून,संघाच्या संस्कृतीपर्यंत
ग्यासचेंबरपासून रक्तरंजित ऑंट्रोसीटीपर्यंत
बेछूट गोळीबारापासून,सामुहिक बालात्कारापर्यंत
दहशतीच्या सावलीतून,मृत्युच्या तळापर्यंत
मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडपासून,हुसेन सागरच्या पायथ्यापर्यंत
शाहीर विलास घोगरेपासून,प्रा.अरुण कांबळेपर्यंत
या प्रवासाचे यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे आता
रोडम्याप नव्याने लिहिण्याचे साधणार आम्ही.”

दुःखाच्या फांद्या छाटून उपयोग नाही,शोषणाची मुळेच उखडली पाहिजेत. हे सूत्र ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ या संग्रहात सापडते.

या संग्रहात दुसरा टप्पा येतो तो वैभवच्या आतल्या अतीव संवेदनशीलतेचा. ज्यात त्याने आपल्या चार भिंतीतल्या अंधाऱ्या कोनाड्यांना कवितेचे ऊन दाखवून आपल्याच आतली धग काही काळ शांतवण्याचा प्रयत्न केला.त्याची ‘नाव’ ही कविता सहज पचनी पडत नाही.त्यात तो सहज बोलतो,”मरतच असतो बाप सगळ्यांचा,एखाद्याचा लवकर मरतो.माझा बाप मीच मारला.” म्हणून वारसाहक्काने आईचेच नाव मिळाले व स्त्रीत्वाचे अभेद बळ लाभले. याच कवितेत तो पुढे बापाविषयी लिहितो,

“घरातून परागंदा होऊन २४ वर्षे झाली त्याला
पदरात तान्ह मूल आणि ओली बाळंतीण सोडून
फरार झाला कायमचा……
जाताना वारसाहक्काने सोडून गेला
जुगारातली देणी,फंडातलं कर्ज
पत्त्यांचा कॅट,थकलेलं घरभाडं
पठाणाचं उसनं…”
या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘माझा बाप मीच मारला’ हे सांगण्याचं बळ त्याच्यापाशी आपसूकच येत गेलं. यासोबतच वैभवने आई चितारताना स्वतः आतल्या स्त्रैणतेच्या साऱ्याच तारा अत्यंत अलवार
टिपल्यात. आईचा नऊ वेळा झालेला गर्भपात व एकांतात त्या बाळांना ती नऊ नक्षत्रात शोधत असावी का? हे सारं तो तिच्या शांत समयी शोधतो.कवी लिहितो,
“आईनंही
नऊ वेळा सोलटवलंय पोट आपलं
धारेदार रवीनं घुसळलंय विषारी रक्त
अर्धवट पडलेल्या गर्भाच्या जर्द लालसर छटा
कधी दिसतात अधे-मध्ये तिच्या चेहऱ्यावर.”

वैभवच्या प्रेयसीसाठी लिहिलेल्या कविता असतील किंवा इतर नातेसंबंधी…त्यांत तो भावनिक सुख-दुःखाचे वेगवेगळे रंग भरत त्या दुःखातून निसटण्याची पायवाट न शोधता तो त्या त्या दुःखाला कवटाळत आपल्या जगण्याचा भाग मानतो. हे सारं दुःख तो चळवळीच्या खाचखळग्यातही अलवार सांभाळत नव्या भव्य आकाशाचे कॅनव्हास रंगवू पाहतो.जुन्या डिलीट केलेल्या आकाशावरच्या ओरखड्यांना तो मिटवून नव्या स्वच्छ निळाईचे स्वप्न कवितेतून बांधतो.पण नव्या इमारतीची पायाभरणी करताना तो जुन्या काळ्या इतिहासाच्या नोंदी मात्र लख्ख करून ठेवतोय.कारण तो आपल्या उद्धारकर्त्या बापाचे वचन विसरला नाही.” जो इतिहास विसरतो,तो इतिहास निर्माण करू शकत नाही.” ‘सारं एकत्र करावंच लागेल’ या कवितेत वैभव लिहितो,

“ मुरबाड,बोरगाव,रमाबाई नगरातल्या
रस्त्यांवर सांडलेलं रक्त
अजून गोठलेलं नाही
जमल्यास आपण दौतीत भरून घेऊ.”
या देशातल्या दलितांच्या दुःखाच्या व त्याच्या वेदनेच्या कहाण्या लिहिण्यासाठी दौतीच्या जागाच मोठ्या कराव्या लागतील. मित्रा,तुझ्या नाळसुकल्या दिवसांच्या घटना आल्यात कवितेतून.अजून तर खैरलांजी ते खर्डा पर्यंतच्या हत्याकांडाची गोळाबेरीज व इथल्या खाऊजात तुझ्या पिढीच्या विरोधात पसरलेलं सपाटीकरणाचं नवं सांस्कृतिक राजकारण यावरही भूमिका घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या पिढीची दिशा घेऊन फिरणाऱ्या वैभवला किमान त्याच्या पिढीच्या दुःख वेदनेची मागील खरवड खाऊजाच्या थोबाडावर सहज भिरकावता येते आहे,हीच नव्याने आंबेडकरी पिढीच्या चळवळीची दिशा ठरू शकेल.जागतिकीकरणात केंद्र न हरवता माणूसपणाची लढाई करणे अवघड होत असतांना वैभवची कविता नवा आशावाद घेऊन येते,हे महत्वाचे….!!!
श्यामल गरुड

 

Advertisements