मौन

या टूकार कवितेला सुरूवात करण्यापूर्वी
एक मिनिट मौन धरू
70 व्या स्वातंत्र्यदिनाला
देश स्वतंत्र होऊन झालेल्या शोकांतिकेला
वंदन म्हणून एक मिनिट मौन धरू

तुमच्यासाठी एक मिनिट
मी माझ्यासाठी पूर्ण दिवस राखून ठेवलाय
माझं मौन एक दिवसाचं
दादरीत मारल्या गेलेल्या अखलाख साठी
अन् नंतर माजवलेल्या दंगलीत
मरून पडलेल्या निष्पापांसाठी

दिवस ढळला की
पुन्हा मौन धरेन मी एक आठवड्यासाठी
रोहिथ वेमुलाचं शेवटचं पत्र वाचेन पुन्हा पुन्हा
त्याची डायरी वाचून हतबल झालेला मी
मौन धरूनच राहीन
नंतर आठवडाभरात काही वाचणं शक्य होणार नाही

आठवडा ढळला की
पुन्हा मौन धरेन मी एका महिन्यासाठी
शहरागणिक बदलून शरिर ओरबाडलेल्या पोरींसाठी
ज्यांच्या पोस्टमॉर्टम वाल्या बॉडीलाही नजरा अस्पृश्य नाहीत
त्या झाडांवर गळ्यानं लटकून पडलेल्या
मढ्यासाठी महिन्याभराचं मौन धरणारे मी

पुढचं मौन असेल माझं वर्षभरासाठी
दर सहा मिनिटाला होणाऱ्या अॅट्रोसिटीसाठी
दिवसाकाठी एका बलात्कारासाठी
महिन्याच्या दहा खुनांसाठी
वर्षाला पडणाऱ्या लाखभर मुडद्यासांठी
दंगली घडल्यानंतर
घरं-दारं दप्तरं-पुस्तकं पेट घेतात
त्या आगीत जळणाऱ्या भविष्यासाठी
सोशल मिडीयाच्या कुट्टून भरलेल्या जातीयवादासाठी
गरज नसूनही पिंडाला शिवणाऱ्या सोशालिस्टांसाठी
अन् डाव्या आईतखोरीसाठी

हे मौन
जमीनी हिसकावून बेघर केलेल्या लोकांसाठी आहे
गिरण्या बळकावून कामगारांच्या मढ्यांच्या राशीवर
उभ्या राहीलेल्या ग्लास जंगलसाठी
इतकी सुंदर इमारत
कुणाच्या मढ्यावर उभी राहील का बरं ?
माझं मौन त्या प्रत्येक निष्पापासाठी
ज्याचा जीव चिरडला बलिदानाच्या जात्याखाली
ज्यांना रोखून धरलंय बंदूकीच्या नळीवर

हे मौन त्या सर्वांसाठी
ज्यांना अॅकडमिक् वाले गिनतीत धरत नाही
जे पुस्तकात नाहीत शाळा कॉलेजाच्या
ज्यांना मिडीया धरते अदृश्य म्हणून ग्रांटेड
ज्यांचा सोयीसाठीही कथांमध्ये होत नाही उल्लेख
अशा सर्वांसाठी मी मौन धरत आहे

ही कविता ऐकण्यापूर्वी
शक्य असेल तर काळे चष्मे घालून घ्या
डोळ्यांना काही वावगं दिसणार नाही
कानांच इयरप्लग टाकून बसा
किंकाळ्या ऐकण्यापासून बचावाल
मोबाईल एअरप्लेन मोडवर टाकून ठेवा
हॉलचा एसी बंद करा
जी जी यंत्र करता येतील बंद
ती सारी बंद करा

मग प्रवेश होईल आपला सर्वांचा भयाण शांततेत
जिथं मला मग कविता ऐकवण्याची गरज भासणार नाही
हा तोच मिनटभर आहे
मौन धारण करण्याचा

वैभव छाया

 

Advertisements

समष्टीची खरवड खाऊजाच्या थोबाडावर

आज महाराष्ट्र टाईम्स ने डिलीट केलेलं सारं आकाश या संग्रहावरील समीक्षा प्रकाशित केलीये. वृत्तपत्रीय लेखनाच्या मर्यादा लक्षात घेता शब्दांची काटछाट होणे हे क्रमप्राप्त. तरी इथे आपल्यासाठी पूर्ण समीक्षा देत आहे. डॉ. श्यामल गरूड यांना अपेक्षित असलेल्या शीर्षकासहीत … अभिप्राय नक्की द्या.
आजचा प्रागतिक विचार जात-लिंग-वर्गाच्या संदर्भात कितीही पुढचा असला किंवा विश्वग्राम ही संकल्पना वरवर कितीही गोंडस वाटला तरीही इथल्या मातीतले वेशीबाहेरचे गावकूस व त्यातल्या उतरंडीतले माणूसपणालाच काळिमा फासणारे अनेक प्रश्न या विश्वग्राम संकल्पनेमुळे काही विरघळले नाहीत. आज बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली ग्राहक संस्कृती व आपलंच झालेलं वस्तूकरण हे वरकरणी काही प्रमाणात सत्य जरी असलं तरी जागतिकीकरणात सपाटीकरणाचे महाराजकारण घुसडून ‘कुठलाही विद्रोह हा परंपरावादीच असतो’ ही नवी प्रागतिक सांस्कृतिक, राजकीय खेळी खेळत पोस्टमॉंडर्नीटीच्या डगल्यात चौथ्या आंबेडकरी पिढीला कोंबणे किंवा समीक्षा करणे जरा घाईचेच होईल. नव्या ‘ग्लोबल डिसकोर्स’मध्ये साऱ्या आजारांवर एकच जागतिकीकरणाचे इंजेक्शन लावून ही नवी आर.एम.पी. पुरोगामी डॉक्टरांची फळी वैचारिकतेच्या वेगळ्याच अविर्भावात वावरत आहे.
आपल्या भूमीत समता-न्याय-बंधुता हा स्वातंत्र्योत्तर भारताला मिळालेला आधुनिक संवैधानिक विचारच पुरता रुजला नाही किंवा जिथे अजून फुले-आंबेडकरांचा विचार पचनी पडला नाही तिथे पाश्च्यात्यांचा उत्तर आधुनिक विचार लगेच आमच्या पुरोगाम्यांना रुचला आणि पटलाही. तिकडचा हा ‘डिस्टन ड्रम’चा आवाज यांच्या कानी लगेच पडतोय,पण इथल्या मातीतल्या जातीय क्रूर हिंसा,दलित स्त्रियांची विटंबना व माणूसपण नाकारणाऱ्या व्यवस्थेविरोधात मात्र यांच्या पेनातली जराही शाई खर्च होत नाही किंवा निषेधाचे सूर उमटत नाही. आजही यासाठी पुन्हा त्याच जातीचा पीळ सोसलेल्या तरुण कवी वैभव छायाला आपल्या व्यवस्थेचे दुःख जागतिक वेशीवर टांगण्यासाठी स्वतःचीच लेखणी स्वतःला उचलावी लागते. त्याने तुमचं तथाकथित ‘डिलीट केलेलं आकाश’ या कवितासंग्रहातून. कवी वैभव म्हणतो,
“ माणसानं माणूस म्हणून जगताना करावं बेलगाम बंड
अहिंसेच्या तत्वांना हरताळ फासणाऱ्या
प्रत्येक मेंदू विरोधात
दरेक हाताविरोधात.”

कवी इथल्या पुरोगामित्वाच्या आंतल्या सडलेल्या चिंध्या व लक्तरे ‘ग्लोबल’ गावकुसाच्या वेशीवर टांगायला निघालाय. तो या जागतिक बाजारपेठेत मध्यभागी उभा राहून स्वतःचे वस्तू होणे नाकारतोय. तुम्ही कस्टमर नसाल तर तुमची केअर होणार नाही ही सैद्धांतिक भूमिका या नव्या बाजाराची असतांना कवीला केंद्र नाकारणारी उत्तर आधुनिकतेची चळवळ मान्य नाही. भावनिक-सांस्कृतिक-राजकीय हायब्रीडायझेशनच्या या काळात तुम्ही अस्तित्वात आहात पण तुमचे भान नष्ट करण्याची व दुसऱ्याच ठिकाणी लक्ष वळविण्याची वेगळी खेळी सुरु आहे. आता व्यवस्था बदलण्यापेक्षा त्याच परिस्थितीत मार्ग काढत दुःखाचे सार्वजनीकरण न करता त्या शक्यतांना चळवळीच्या रूपातूनही संपूर्णतः संपवत आता दुःखाचेच खाजगीकरण सर्वत्र झालंय ही पुन्हा वेगळीच अभिजनवादी खेळी खेळवत इथल्या मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या चळवळींना गोंधळात टाकण्याचे काम या काळात सर्वत्र सुरु आहे. वेदना-विद्रोह-नकार ज्या शब्दांची हत्यारे झाली होती, ते सारं जागतिकीकरणाच्या पर्यावरणात लगेच कसे बदलून गेले? सामुहिक चिंतेची हत्यारे हळूहळू बोथट करून टाकण्याची एक रणनीती सुनियोजित पद्धतीने आखल्या जातेय. तिकडे बर्लिनची भित्ताड कोसळली तरी इकडचा लाल बावटा भोवळून पडतो पण इकडचा धर्मांध नंगानाच मात्र थंड डोळ्यांनी बघतोय. या भयाण शीतलहरीच्या बीभत्स गारठ्यात वैभव छाया सारखा कवी अत्यंत महत्वाची भूमिका या साऱ्या गदारोळाविषयी घेऊन पुढे येतो. तो चौथ्या आंबेडकरी पिढीतला टेक्नोसवी जगाचा प्रातिनिधिक नायक आहे. वैभव आपल्या मनोगतात म्हणतो,”अघोषित सेन्सॉरशिपच्या या कालखंडात माझ्या पिढीला मुक्तपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सोशल मिडियालाच माझ्या अभिव्यक्तीचे सारे श्रेय जाते. माझी कविता हीच माझी राजकीय कृती. माझ्या रखरखणाऱ्या जात आणि वर्गचरित्रापलीकडे जाऊन माणूसपण प्रगल्भ करणारी माझी प्रत्येक क्रिया हाच माझा परिचय.” हेही वैभव छाया अत्यंत स्पष्टपणे सांगून टाकतो. या नव्या जगाशी लढताना नव्वदोत्तर चौथ्या आंबेडकरी पिढीला आजच्या तंत्राचे व मंत्राचे बऱ्यापैकी भान आले आहे. त्यांचे विद्रोहाचे भान बदलले म्हणून भाषाही बदलली, आणि बदललेल्या भाषेतून त्यांच्या हाती लढण्याचे शस्त्रही गवसले हेही तो ठळकपणे अधोरेखित करतोय. कवी म्हणतो,

“ आपली सॉंफ्टवेअर्स आपल्यालाच बनवावी लागतील
आणि ती चालवायला लागणारे संगणकदेखील
त्यांना सुरक्षित ठेवणारा अंटीव्हायरसपण
आपल्यालाच बनवावा लागणार
मनगटातली ताकद बोटांत उतरू दे आता
डोळ्यातली आग मेंदूत शिरू दे आता
बघ, हार्डबॉडीपेक्षा
सॉंफ्टवेअरचा जमाना अवतरलाय.”

संघर्षाचे केंद्र बदलले त्यामुळे शस्त्रही.कवी व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड टेक्नोसॉंवी आहे. त्याने स्वतःच्या समविचारी मित्रांना ‘सारे काही समष्टीसाठी’ या माध्यमातून एकत्र आणले.जुने अवकाश पुसून टाकण्याइतपत तो बेधडक होऊन जुन्या दलित अस्तित्वाची वेगळीच झाडाझडती घेतोय. त्याचे संग्रहाचे नाव ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ यातच त्याची नव्या भूमिकेच्या बांधणीची चाहूल लक्षात येते. पोस्ट प्यंथरीयन चिलखत घालून बोलणारी ही कविता आहे. एकेकाळी प्यंथरचा जबरदस्त पगडा होता,ज्याचे आकर्षण आंबेडकरी चळवळीतून आजही संपलेलं नाही.वैभव छाया उघड-उघडपणे नव्या प्यांथरच्या जाहीरनाम्याचे सुतोवाच करू पाहतो.इथल्या बुरसटलेल्या अर्थशास्त्रातून गाभाडलेल्या नीतीत इथली पोरं आता करणार नाहीत स्वतःच्या जीवाची मांडवली, हेही तो ठामपणे
‘शिरच्छेद’ या दीर्घ कवितेत सांगतो.तो पुढे म्हणतो,

“आईच्या पोटातून विद्रोह घेऊन जन्माला येणाऱ्या लेकरांना
तू काय दाखवशील भीती. चार मीटर खाकीचा कपडा
दहा रुपयाची परीटघडी, शंभर रुपयाचा बिल्ला
एम एम 5 ची बुलेट,नाही दाखवू शकत रुबाब आमच्यावर
केसेसच्या केसेस,144 च्या केसेस
नक्षलवादाचे आरोप, दहशतवादाचे खटले
राष्ट्राद्रोहाचे खोटे गुन्हे, घंटा बसवणाराहे दहशत आमच्यावर
इथे जमलेल्या विद्रोहाची पुकार, तू दाबू शकशील काय?”

याच कवितेत पुढे तो म्हणतो,
“ या पँथरला तू कसा जेरबंद करू शकशील?”

भांडवली व्यवस्थेच्या स्खलनातून विकास स्वप्नांच्या नव्या इमारती बांधण्याचे कंत्राटही पुन्हा संस्कृती रक्षकांच्या हाती कसे ? हा मुलभूत प्रश्न विचारून नव्या सांस्कृतिक राजकारणाची तळी उचलणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाडून त्यात जुन्याच सरंजाम्यांचे अभद्र चेहरे तो कवितेभर टराटरा फाडत जातो.पुष्कळदा त्याच्या निम्म्याहून अधिक कवितांवर नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही शब्दकळांचे दाट सावट आढळून येते,पण वैभव नामदेव ढसाळवरचे प्रेम तसेच जाहीर करत त्या शब्दांमध्ये आजच्या जगण्याचे संदर्भ मांडत आजच्या तरुणांची भाषा तो वापरतो.त्यामुळे त्याच्या कवितेतला विद्रोह वरवर प्यांथर काळातला वाटला तरी त्यातले संदर्भ जागतिकीकरणाच्या अनुषंगाने येत तो हळूहळू पोस्ट प्यांथरीयन थेअरीची वेगळी मांडणी करू पाहतो,हे त्यातले ठळक वैशिष्ट्ये आहेत व त्याच्या पिढीची ती भूमिका आहे,हे जास्त स्पष्ट होते.

आपल्याकडे धर्माने जातव्यवस्था बळकट करून संस्कृती निर्माण करत विचारसत्तेचं केंद्र तयार करत उतरंडीची फोकलट समाजसंस्था निर्माण केली. पाश्च्यात्य विचारवंत फुको म्हणतो, ”सत्ता ही ज्ञान निर्माण करीत असते.” जर ज्ञान आणि सत्तेचा एव्हढा महत्वाचा संबंध असेल तर भारतीय परिप्रेक्षात या गुताड्याचा विचार किंवा कवी वैभव छायाला ‘मी माझा पत्ता बदलून घेत आहे’ हे सांगण्याची गरज भासावी,हेच या व्यवस्थेचे अपयशही आहे. कवी म्हणतो स्वतःला,

“हो,खूप आनंद मिळेल,पण तू राहा एकट्यानंच
छाटलेलं डोकं,विहिरीत टाकलेलं डुक्कर
गावावरचा बहिष्कार आणि हजारोंच्या ऑंट्रोसीटी
मोर्च्यातल्या उन्हाची रग,मातीवरला दुष्काळ
फुटपाथवाल्यांचा मान्सून अन पुलाखालचा हिवाळा
जाणवतच नाही या आयव्हरी हाऊसमध्ये
मी माझा पत्ता बदलून घेत आहे
त्या घरातल्या रेशनकार्डावरून
मीच कमी करून टाकलंय आता नाव माझं.”

हा व्यवस्थेने दिलेला आत्मक्लेश आहे. वैभव चळवळीचे व त्याचे झालेले असंख्य तुकड्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोडू पाहतो. ‘सांत्वन’ या दीर्घ कवितेत कवी शहीद विलास घोगरे आणि प्यांथर अरुण कांबळे यांच्या आत्महत्येचे सूत्र पकडून महत्वाचे चिंतन मांडतो. वैभव म्हणतो,

“हिटलरच्या संस्कृतीपासून,संघाच्या संस्कृतीपर्यंत
ग्यासचेंबरपासून रक्तरंजित ऑंट्रोसीटीपर्यंत
बेछूट गोळीबारापासून,सामुहिक बालात्कारापर्यंत
दहशतीच्या सावलीतून,मृत्युच्या तळापर्यंत
मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडपासून,हुसेन सागरच्या पायथ्यापर्यंत
शाहीर विलास घोगरेपासून,प्रा.अरुण कांबळेपर्यंत
या प्रवासाचे यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे आता
रोडम्याप नव्याने लिहिण्याचे साधणार आम्ही.”

दुःखाच्या फांद्या छाटून उपयोग नाही,शोषणाची मुळेच उखडली पाहिजेत. हे सूत्र ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ या संग्रहात सापडते.

या संग्रहात दुसरा टप्पा येतो तो वैभवच्या आतल्या अतीव संवेदनशीलतेचा. ज्यात त्याने आपल्या चार भिंतीतल्या अंधाऱ्या कोनाड्यांना कवितेचे ऊन दाखवून आपल्याच आतली धग काही काळ शांतवण्याचा प्रयत्न केला.त्याची ‘नाव’ ही कविता सहज पचनी पडत नाही.त्यात तो सहज बोलतो,”मरतच असतो बाप सगळ्यांचा,एखाद्याचा लवकर मरतो.माझा बाप मीच मारला.” म्हणून वारसाहक्काने आईचेच नाव मिळाले व स्त्रीत्वाचे अभेद बळ लाभले. याच कवितेत तो पुढे बापाविषयी लिहितो,

“घरातून परागंदा होऊन २४ वर्षे झाली त्याला
पदरात तान्ह मूल आणि ओली बाळंतीण सोडून
फरार झाला कायमचा……
जाताना वारसाहक्काने सोडून गेला
जुगारातली देणी,फंडातलं कर्ज
पत्त्यांचा कॅट,थकलेलं घरभाडं
पठाणाचं उसनं…”
या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘माझा बाप मीच मारला’ हे सांगण्याचं बळ त्याच्यापाशी आपसूकच येत गेलं. यासोबतच वैभवने आई चितारताना स्वतः आतल्या स्त्रैणतेच्या साऱ्याच तारा अत्यंत अलवार
टिपल्यात. आईचा नऊ वेळा झालेला गर्भपात व एकांतात त्या बाळांना ती नऊ नक्षत्रात शोधत असावी का? हे सारं तो तिच्या शांत समयी शोधतो.कवी लिहितो,
“आईनंही
नऊ वेळा सोलटवलंय पोट आपलं
धारेदार रवीनं घुसळलंय विषारी रक्त
अर्धवट पडलेल्या गर्भाच्या जर्द लालसर छटा
कधी दिसतात अधे-मध्ये तिच्या चेहऱ्यावर.”

वैभवच्या प्रेयसीसाठी लिहिलेल्या कविता असतील किंवा इतर नातेसंबंधी…त्यांत तो भावनिक सुख-दुःखाचे वेगवेगळे रंग भरत त्या दुःखातून निसटण्याची पायवाट न शोधता तो त्या त्या दुःखाला कवटाळत आपल्या जगण्याचा भाग मानतो. हे सारं दुःख तो चळवळीच्या खाचखळग्यातही अलवार सांभाळत नव्या भव्य आकाशाचे कॅनव्हास रंगवू पाहतो.जुन्या डिलीट केलेल्या आकाशावरच्या ओरखड्यांना तो मिटवून नव्या स्वच्छ निळाईचे स्वप्न कवितेतून बांधतो.पण नव्या इमारतीची पायाभरणी करताना तो जुन्या काळ्या इतिहासाच्या नोंदी मात्र लख्ख करून ठेवतोय.कारण तो आपल्या उद्धारकर्त्या बापाचे वचन विसरला नाही.” जो इतिहास विसरतो,तो इतिहास निर्माण करू शकत नाही.” ‘सारं एकत्र करावंच लागेल’ या कवितेत वैभव लिहितो,

“ मुरबाड,बोरगाव,रमाबाई नगरातल्या
रस्त्यांवर सांडलेलं रक्त
अजून गोठलेलं नाही
जमल्यास आपण दौतीत भरून घेऊ.”
या देशातल्या दलितांच्या दुःखाच्या व त्याच्या वेदनेच्या कहाण्या लिहिण्यासाठी दौतीच्या जागाच मोठ्या कराव्या लागतील. मित्रा,तुझ्या नाळसुकल्या दिवसांच्या घटना आल्यात कवितेतून.अजून तर खैरलांजी ते खर्डा पर्यंतच्या हत्याकांडाची गोळाबेरीज व इथल्या खाऊजात तुझ्या पिढीच्या विरोधात पसरलेलं सपाटीकरणाचं नवं सांस्कृतिक राजकारण यावरही भूमिका घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या पिढीची दिशा घेऊन फिरणाऱ्या वैभवला किमान त्याच्या पिढीच्या दुःख वेदनेची मागील खरवड खाऊजाच्या थोबाडावर सहज भिरकावता येते आहे,हीच नव्याने आंबेडकरी पिढीच्या चळवळीची दिशा ठरू शकेल.जागतिकीकरणात केंद्र न हरवता माणूसपणाची लढाई करणे अवघड होत असतांना वैभवची कविता नवा आशावाद घेऊन येते,हे महत्वाचे….!!!
श्यामल गरुड

 

कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस मी मांडलेली भूमिका …

जन्म हा जरी अपघात असला तरी देखील आपल्याकडे विशिष्ट वर्गाला बाय बर्थ काही चॉईसेस आहेत. मागास जातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला बाय डिफॉल्ट पुरोगामी बनण्याशिवाय पर्यायच नसतो. याउलट दमनकारी जातींत जन्माला आलेल्यांना प्रतिगामी अथवा पुरोगामी बनण्याची मात्र सोयीस्कर चॉईस असते. जात-पंथ-धर्म-लिंग बंडाच्या चिलखती कुरतडण्याच्या या लढ्याचं रुपांतरण आता पुरोगामी विरूद्ध प्रतिगामी अशा लढ्यात होत आहे.

चळवळीची भाषा वेगाने बदलत आहे. ग्लोबलायझेशन नंतर उपजलेल्या दुसऱ्या पीढीचा मी एक प्रतिनिधी. पहिल्या पीढीला जागतिकिकरणाचा तुटपुंजा फायदा झाला. दुसऱ्या पीढीला आता फायदा आणि चटके दोन्ही बसत आहेत. एकविशी पार केलेल्या खाऊजा धोरणाने मात्र आता नव्याने उदयास येणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या सर्वांगाचे लचके तोडण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे.

आज हा कवितासंग्रह प्रकाशित होताना जी भूमिका मी इथे आपल्यासमोर मांडतोय त्यात पुन्हा पुन्हा मला तेच रिवीजन करण्याची काडीमात्र इच्छा नाही. इथल्या ब्राह्मणी आणि भांडवली वर्गाने केलेलं दमन मला पुन्हा पुन्हा गिरवायचं नाहीए. किंवा मला पुन्हा त्याच जुन्या पद्धतीचे आसूड ओढण्यात वेळ देखील वाया घालवायचा नाही आहे.

आमच्या हक्काचं जे आकाश इथल्या व्यवस्थेने अत्यंत चलाखीनं डिलीट केलंय ते आकाश पुन्हा रिस्टोर करण्याची भूमिका घेऊन मला आपणा सर्वांसोबत यायचं आहे. ह्या रिस्टोरेशनच्या कामात प्रत्येक स्वाभिमानी, पुरोगामी, समताप्रेमी कार्यकर्ता आणि कार्यकर्तीचे सहकार्य अपेक्षित करण्याची भूमिका मला येथे मांडायची आहे. आंबेडकरी चळवळीवर आणि त्यातील कार्यकर्त्यांवर मित्र चळवळींकडून होणारे आरोप मला खोडून काढताना किमान समान कार्यक्रमावर कसं एकत्रित येता येईल या भूमिकेवरच फोकस करायचा आहे. आधीच्या पिढीने प्रसवलेल्या उद्रेकाचं रुपांतरण आता नवनिर्मितीच्या प्रांगणात करण्याची, स्वतःचं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र लिहिण्याची भूमिका, स्वतःचं आकाश नव्याने पांघरण्याची भूमिका मला आपल्यासमोर घेऊन यायचं आहे.

माणूस काळानुरूप बदलत जातो. त्यासोबत बदलत जातं ते त्याचं ज्ञान, आकलन आणि त्याच्या जाणीवा. जाणीवा जसजश्या प्रगल्भ होत जातात तसंतसं त्याचं सामाजिक पातळीवरील अस्तित्व अधिकाधिक गडद होत जातं. आयुष्याच्या एका फ्रेज मधून दुसऱ्या फ्रेज मध्ये त्याचे पक्षांतरच झालेलं असतं. त्याच नियमाला धरून प्रत्येक कलावंताचे आयुष्य घडत अथवा बिघडत असतं. याला कवी अपवाद ठरू शकत नाही.

कवी हा फक्त एका जॉनरपुरता मर्यादित नसतो. किंवा शब्दांपुरता, त्यातील व्याकरणाच्या नियमांपुरता सीमीत नसतो. तो प्रतिनिधी असतो त्याच्या जाणीवांचा, त्याच्यासारख्या जाणीवा जपणाऱ्या असंख्य अव्यक्त मनांचा. म्हणून प्रत्येक कवीला स्वतःचं वर्गचरित्र असतं. त्याचं रखरखणारं जातचरित्र जरी जाणूनबुजून नजरेआड केलं जात असलं तरी त्यामुळे त्याची दाहकता निश्चितच कमी झालेली नसती.

या जातचरित्राच्याच दाहकतेतून सत्तरच्या दशकानंतर ज्वालामुखीच्या वेगानं प्रसवलेल्या आंबेडकरी साहित्यानं आपल्या वेदना अतिशय तीव्र आणि आक्रमक रुपात मांडल्या. विशेष म्हणजे त्या अगदी स्वतःच्या, वेशीबाहेरच्याच भाषेत मांडल्या. ज्या समाजाला जगण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेण्यासाठी पावलापावलांवर संघर्ष करावा लागायचा त्या समाजातून आलेलं साहित्य हे निश्चितच आग ओकणारं असणं हे स्वाभाविकच होतं. या साहित्याच्या मांडणीतील आक्रमकतेमुळे त्याला सरसकटपणे पुरूषी ठरवलं गेलं.

गोलपीठा असो किंवा रॉकगार्डन… नामदेव ढसाळ ते अरुण कांबळे आणि सध्याच्या काळातल्या प्रज्ञा पवारांपासून ते अनेक नवकवींच्या कवितेतील आक्रमकता ही जरी बुरसटलेल्या मेंदूला झिणझिण्या आणणारी असली तरी त्यातील करुणाभाव हा निश्चितच पसायदानापेक्षा काकणभर सरस आहे.

समता, स्वातंत्र्य, बंधुता ही आजच्या अनेक स्वघोषित रॅडिकल छगुन्या म्हणून मिरवणाऱ्या तीनपाटांसाठी प्रचंड मोठं रोमँटीसीझम आहे. पण आंबेडकरी साहित्याच्या प्रसवाची प्रेरणा ही तीन मूलभूत मानवतावादी तत्वेच आहेत. ज्या आंबेडकरी साहित्याला इथल्या व्यवस्थेने दलित साहित्याचा टॅग लावून व्यवस्थित विल्हेवाट लावायचा प्रय़त्न केला त्या साहित्याची मुळ प्रेरणाच ही अस्सल स्त्रीवादीच राहीलेली आहे. परंतू पुरूषसुक्ताची बाऊंड्री सुद्धा बौद्धिक पातळीवर ओलांडू न शकलेल्या तथाकथित उच्चभ्रू जाणिवांतून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिकांकडे पाहणाऱ्या स्त्रीवाद्यांना त्यातली करूणा समजेल अशी अंधश्रद्धा तर मी बिल्कूल पाळू शकत नाही.

आज मराठी साहित्य विविध टप्प्यांतून गेलेलं आपण पाहिलं आहे. मराठी भाषेतील विद्रोही, बंडखोर आणि स्त्रीवादी साहित्याबाबत बोलायचे झालेच तर क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी सुरू केलेल्या स्त्रीवादी साहित्याचा वसा पुढे नेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी इमाने इतबारे केलं. फुले दाम्पंत्यानं मांडलेले विचार प्रक्टिकल कायद्यात रुपांतर करण्यासाठी बाबासाहेबांएवढं कोणीच झटलं नसेल. हिंदू कोड बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब इथल्या बहुतांश उच्चवर्णीय, उच्चजातीय स्त्रीवादी विचारवंताना आठवतच नाही हे विशेष.

आंबेडकरी कालखंडानंतर उदयाला आलेल्या पहिल्या पीढीनं कमालीची गरीबी पाहीली. पहिली पीढी ही तशी गरीबच, बेरोजगार पण पाश्चात्या शिक्षणाचं दुध प्यायलेली, जशास तसे उत्तर देणारी होती. कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणाऱ्या युवांची ती पीढी होती. पेरुमल कमीशनच्या 1172 हत्यांची अस्मिता प्रज्वलित करणाऱ्या मानसिकतेने शेवटी दलित पँथरला जन्माला घातलं. पण पँथर जन्माला येण्यापूर्वीच इथल्या साहित्य जगताने फार मोठे हादरे खाण्यास सुरूवात केली होती. ज.वि. पवार, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ सारखे कार्यकर्ते सारस्वती मराठीला मनाप्रमाणे तोडून-मोडून प्रसंगी वाकवून तीला तीच्या अस्सल रुपात आणण्याचं काम करत होते. आणि अशातच गोलपीठा प्रकाशित झाला.

गोलपीठाच्या आगमनाने जागतिक साहित्यात नव्या वादळाची नांदी अवतरली. स्त्रीवादी साहित्याचं उत्तम उदाहरण असलेला गोलपीठा मात्र कायम वेश्यांच्या वेदना चितारणारा काव्यसंग्रह म्हणूनच स्त्रीवादी चळवळीने पाहीला हे निश्चितच क्लेशकारक होते. इथल्या व्यवस्थेने कायम शुद्र ठरविलेल्या समाजघटकांमध्ये अतिशुद्र असलेल्या महिलावर्गाला त्यांच्या हक्कांचं मुक्तपीठ उभारून देण्याचं काम दलित पँथर आणि विद्रोही साहित्याने केले आहे. आणि हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी स्त्रीवादी चळवळ हे स्वीकारायला का तयार होत नाही याचे नीटसे कारण अजूनही कोणी प्रस्तूत करू शकलेले नाही.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे कायम शोषणाविरोधात दंड थोपटून उभे राहीले आहेत. परंतू दरवेळेस त्या कार्यकर्त्याला दलित पितृसत्तेच्या चौकटीत तपासून पाहणं आणि त्यांच्या प्रत्येक कृत्याला केवळ पुरूषी कृत्य म्हणून ओळख देणे हे कितपत संयुक्तिक आहे ? मागास जातीतील प्रत्येक तरुण स्त्री व पुरूष कार्यकर्ते हे अन्यायविरोधातील चीड आणि संताप अतिशय जहाल भाषेत आणि प्रतिक्रियेत व्यक्त करणारे राहीले आहेत. त्यांची जहाल प्रतिक्रिया ही कायम इथल्या शोषकांच्या अमानवीय क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती हे कसे विसरून चालेल ?

नामदेव ढसाळांना सर्व स्त्रीवाद्यांनी एकसाथपणे पुरूषी वृत्तीचा कवी म्हणून झिडकारले. त्यांच्यासोबत बाबुराव बागुलांपासून अनेक साहित्यिक कार्यकर्त्यांना लँग्वेज पॉलिटिक्स करणारे पुरूषी व्यक्तीमत्त्व म्हणून नाकारले. परंतू त्याचवेळेस जगातील वेश्यांचा सर्वात पहिला मोर्चा काढणारे नामदेव ढसाळ सोयीस्कर पणे विसरले जातात. इजिप्तच्या प्रेमकवितांमधून मागास जातीतींल स्त्रीचं नवं सौंदर्यशास्त्र लिहीणारे राजा ढाले विस्मृतीत ढकलले जातात.

मागे एकदा साप्ताहिक कलमनामामध्ये समीना दलवाई यांनी पूर्णवेळ दलित कार्यकर्त्यांची स्त्रीवादी समीक्षा करणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रीवादी महिलांच्या दृष्टिकोणाबद्दल अगदी थेट भाष्य केले होते. ते अनेकांना रुचले नव्हते. पण त्यानिमित्ताने एक प्रश्न जरूर विचारावासा वाटतो.

वर्षानुवर्षे पोलिसी अत्याचाराचा सामना करणारे कार्यकर्ते अंगाची रग मोडून तुरूंगात खितपत पडतात तेव्हा या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बाजुने केवळ आंबेडकरी संघटना सोडल्या तर अन्य किती संघटना पूर्ण ताकदिनिशी उभ्या राहतात ?

दलित पितृसत्तेची दाहकता मला मान्य आहे. या वृत्तीपायी माझ्या आईचा उद्ध्वस्त झालेला संसार मी पाहीला आहे. माझ्या लहानपणापासून या व्यवस्थेचे खेटरं खात आम्ही आयुष्य नव्याने उभं केलं आहे. पण त्यामुळे मागास जातीतील सर्वच्या सर्व पुरूष हे पितृसत्ताकवादी मानसिकतेचे आहेत असा अर्थ तर निघत नाही ना…

प्रत्येक चळवळीने आणि चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनरलाईज्ड स्टेटमेंट करण्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष वागण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा तरच मित्र चऴवळी जोमाने काम करू शकतील अन्यथा ही नव-अस्पृश्यता खुपच धारधार होत जाईल…

राजकारणी पक्षांतर करू शकतात. नकलाकार (कलाकार नव्हे) सुद्धा पक्षांतर करू शकतात. कारण तेथे वैचारिक भूमिकांचा मुद्दा येतच नाही. त्यामुळे कोणी कुठेही कसाही आला गेला तरी त्याचे सामाजिकदृष्ट्या उमटणारे पडसाद फासरे विशेष असे नसतात.

कवीच्या बाबतीत मात्र तसे म्हणून चालत नाही. कवीचा वर्ग जसा अधोरेखित करता येतो तसाच तो वर्ग कालांतराने बदलला सुद्धा जाऊ शकतो. कारण वर्गचरित्राच्या दृष्टिकोनातून समांतर रेघ आखणाऱ्या कवीची कविता ही मुळातच विद्रोहात उगम पावते आणि प्रस्थापितांना उखडवून फेकत स्वतः प्रस्थापित होते. म्हणून मला भारतीय वास्तवात विचार करताना वर्गचरित्रापेक्षा जातचरित्र अधिक प्रामाणिक आणि महत्त्वाचे वाटते.

दोस्तांनो, आपल्याला वर्गलढ्याला आपले योगदान द्यायचेच आहे. परंतू जातवर्चस्ववाद हा सांप्रत व्यवस्थेतील सर्वात मोठा दहशतवाद मुळापासून उखडवून टाकण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावेच लागेल. एक कवी म्हणून जन्माला येताना मला आणि आपणा सर्वांना आपली राजकीय भूमिका आणि राजकीय कृती ही इतरांना शब्दांतून समजावून सांगण्यासोबतच त्यांची अंमलबजावणीच ही आपली ओळख आपल्याला बनवावी लागणार यात शंका नाही.

कविता ही अभिव्यक्ती असते. त्यापेक्षा ती असते तुमची राजकिय कृती. हे ज्या दिवशी ध्यानात आलं त्याच दिवशी माझ्या जाणीवेतील कवितेचा आकृतीबंध एकदमच मोठा झाला. कविता ही व्यक्त होण्याच्या माध्यमापलीकडची असून ती आपलं जातचरित्र, वर्गचरित्र, लिंगचरित्र अधोरेखित करत असते. ज्या हाडामांसाच्या गोळ्यांचे जात-वर्ग-लिंग चरित्र या व्यवस्थेकडून जबरदस्तीने अधोरेखित केले गेलेले असते त्यांच्यासाठी त्यांची कविता ही लढ्याचं निर्णायक हत्यार असते. ह्या हत्याराची धार जेवढी जहाल तेवढीच फसवी देखील. कारण दुधारी तलवारीचं हत्यार ज्याच्या हातात असतं त्याचे हात आणि मनगट त्या कवितेएवढेच ताकदवर असायला हवेत. अन्यथा शोषकांवर उगारलेलं हत्यार कधी आपल्या गळ्याचा घोट घेईल याची काही ग्यारंटी देता येणार नाही. आज मी डिलीट केलेला सारं आकाश हा कवितासंग्रह आपल्या हातात देत आहे. तो देत असताना मला माझ्या खांद्यावर आलेल्या नव्या जबाबदारींची जाणीव सुद्धा त्याच तीव्रतेने होते आहे. आपली कविता ही आपली राजकीय भूमिका बनावी आणि त्या भूमिकेचे रुपांतरण हे जबरदस्तीने लादलेल्या जात-वर्चस्ववादाविरोधातील युद्धात हत्यार म्हणून व्हावं हीच प्रामाणिक अपेक्षा असेल.

जय भीम.

वैभव छाया

हॉस्पीटलमधल्या कविता -1

तसं प्रत्येक हॉस्पीटल ही
स्वतःतच असते एक कविता
 
याच्या प्रत्येक पायरीला
एक उन्माद पण खंबीर ताल
बेपत्ता पावसात रोवून राहीलेल्या वडासारखा
 
इथल्या हरेक कोपऱ्याला
एक दर्प
गुटखा खाल्यानंतर स्वतःच्याच तोंडाला येणारा
 
हॉस्पीटलच्या पंख्यानाही असतो
माणसासारखा एकच डोळा
वटारून वटारून भिरभिरत राहतात डोक्यावर
 
तिथल्या भिंतीही असतात
एकदम निलाजऱ्या
फिनाईलनं आंघोळ करून चमक आणणाऱ्या
 
हॉस्पीटलची यंत्रही असतात माणसं
ज्यांना नसते तमा कशाची की
खोटं बोलावं कधीतरी एखाद्याचं मन राखण्यासाठी
 
इथं काम करणारी माणसं असतात
मात्र मशीनीसारखी तेलकटलेली
इच्छा नसतानाही दूःख सारून नव्यानं काम करणारी…
 
म्हणून
प्रत्येक हॉस्पीटल ही
स्वतःतच असते एक कविता
 
वैभव छाया
 
#टाटा_हॉस्पीटलमधल्या_कविता
 
 
 
 

प्रिय नागराज…

 

आजीबाईच्या बटव्यातून निघतात ना
तश्या गोष्टींच्या असंख्य तलवारी निपजतात
तुझ्या सैराट गोष्टींतून
तसं तू काय नी… मी काय
आपण सगळेच गोष्टींच्या प्रेमात पडणारे जीव

चीनमध्ये म्हणतात की,
गरजू लागले ढग की, बरसतं पाणी
अन् सुरु होतो खेळ मातीच्या नी पाण्याच्या समागमाचा
तो समागम जन्म देत जातो जगण्याच्या नव्या शक्यतांना
ती माणसं बुटकी करतात साजरा
आभाळाहून उंच उत्सव निसर्गप्रेमाचा
तुझ्या कथेतल्या पात्रांचा उत्सव
आम्ही करतोय आज साजरा
ते ही भासतात तसेच अन्
जागवतायेत आशा नव्या शक्यतांच्या

तू गोष्ट सांगतो
नि आम्ही ऐकत जातो
बिस्किटचा बंगला नी भोपाळ्याची बग्गी
टोपीवाल्याची टोपी नी वाघ सिंहाची मैत्री
सारं सारं काही अंधश्रद्धा वाटू लागतात मग

नि.. मग..
उरतो डोळ्यांसमोर
चिंदचांदक्यातल्या फाटक्या पडद्यातल्या
गोळा मोळा चोळा चून
बरबटलेल्या पोटऱ्या
अर्धवट चिरलेल्या अन् कंठ फुटून बाहेर पडणारे गळे
कवळ्या वयातली पोरं
नि प्रचंड आगतिकता

नि तो फँड्री
बोलून चालून धसमुसळ्या
दगडांनी माखलेला चेहरा राहतो उभा समोर
ज्याचं मांस बोचकारुन ओरबाडून खाल्लेला असतो तो माणूस
जो म्हणवतो स्वतःला सर्वशक्तीमान
त्यालाच करत जातोस तू नेस्तानाबूत

तू बलवत्तर करतो तुझी रग मलंग प्रकाशावर
प्रकाश ज्याला तू म्हणतात
प्रकाशाची मोड-तोड करुन उरणारा तो उजेड
हा उजेड ज्याला तू म्हणतात
विद्रोह ज्याला तू म्हणतात
करूणा ज्याला तू म्हणतात
सृजन ज्याला तू म्हणतात
अन् तू म्हणजे नागराज

 

वेमुला शहीद होतो
सारा देश त्याच्यासाठी येतो
आम्ही जिंदाबाद मुर्दाबाद म्हणतो
तू मात्र उभा राहतो
स्थितप्रज्ञ बुद्धासारखा
गीतासाठी, नितीन आगेसाठी अन् सागर शेजवळ साठी
तसं शाहीर सगळ्यांनाच म्हणत नाहीत
काहीच होऊन जातात लोकशाहीर
कारण ते गात जातात गीत लोकमुक्तीचं

तू लोकमुक्तीचं गीत गाणारा दिग्दर्शक
तू खऱ्या अर्थानं आमचा लोकदिग्दर्शक
उकळत्या डांबरावर पसरवत मखमल
तू येतोस धावून
अन् पसरवतो चोहोर गंध कस्तुरीचा
नि उघडवतो डोळे झोपेच्या सोंगाचे
आता यानंतर काही मागणं नाही
आर्ची परश्या तसं असतात प्रत्येकातच

ते कुस्करली जातात फुलण्याआधीच
त्या कुस्करलेल्या फुलांचा तू यल्गार बनून येतोस
आता शरमेने झुकलेल्या डोळ्यांत लाजही येत नाही रे
हात थरथरतायेत, धडधडतंय
पहाटेचे साडेतीन वाजलेयेत…
चोरुन धरलेला गांजा अन् लपवलेली दारु
सुद्धा प्यावीशी वाटेना

तुझा दगड
जो बरसतो वीजांसारखा
अन् उखडून टाकतोय जातीपातींची डोंगरं
जो भेदत जातो ब्रम्हांडातलं अणू केंद्र अन्
आव्हान करतो सडक्या गॉड पार्टिकलच्या कणांना

 

नागराजा…
तुझा दगड असाच जपून ठेव
तू ज्याला शिवतोय त्याचं परिस होतंय..
पारसमणीच्या गोष्टीतून निघतही असेल परिस कदाचित
तुझ्या गोष्टीतून निघत राहतात असंख्य तलवारी…
ज्या करत जातात उभे आडवे छेद गृहितकांना..

 

तू गोष्ट सांगतो
नि आम्ही ऐकत जातो
बिस्किटचा बंगला नी भोपाळ्याची बग्गी
टोपीवाल्याची टोपी नी वाघ सिंहाची मैत्री
सारं सारं काही अंधश्रद्धा वाटू लागतात मग

 

वैभव छाया

पूर्वप्रकाशित
एबीपी माझा

Poem for Nagraj Manjule by Vaibhav Chhaya

तुच तो आमचा आंबेडकर

माणसाच्या जगात जन्मलो आम्ही
माण्संच नाही राहीली आता
जंगलं नुस्ती.. हैवानांची, सैतानांची
या जंगलातून जाताना आधी वाटायची
भीती.. शांत… चोरपावलांनी हल्ला करणा-या वाघांची
कुत्र्यांचं भुंकणं होतं सुखकारक
आता कुत्रेही पिसाळलेत
लचके तोडतात अंगा खांद्याचे
लुतभ-या नजरांनी पाहत असतात अंगभर
अंधा-या रात्रीची फोड करून उजएड
शिरत नाही शिवारात
वीर्+अर्य शिरत नाही धमन्यांत
सळसळत नाही रगात
उसळत नाही आता
सारं काही हतबल
येतेच आठवड्यागणिक एक बातमी
काळ्या, बोल्ड लाईनीत रंगतो मथळा
इनडिझाईनच्या होतात रेषा एक्सप्रेस
निषेधाच्या छटा गडद

आम्ही त्यांना म्हणतो शहिद
आम्ही देतो भेट त्यांच्या गावाला
आम्ही मोजतो तुकडे
आम्ही काढतो फोटो, लिहीतो रिपोर्ट
आम्हीच शोषकांचे पचवतो सल्ले
अन् सहन करतोय टोमणे
आता हल्लेही सहन करावे लागतायेत
आधी म्हारा-मांगाच्या पोरापोतर ठिक
आता नवी उपाधी दिलीये
आम्ही नक्षलवादी गणलो जातोय

माझ्या शेतात आता पिकत नाही हिरवंकंच दुःख
कोकिळ गात नाही कनकेचं तांबूस गाणं
चिमणी धगधगत नाही आता
कावळे झालेत गलेलठ्ठ पित्तराच्या ताटावरून
गळक्या पत्र्याचं सिमेंट सोडतंय
पाण्याची धार अंथरूणात
अधी मधी सोडत असते सूर्याची बीम
चार प्रहराआधी जन्मलेली अर्भक
इथं मोताद श्वासाश्वासासाठी
धुरानी काळवंडलंय काळीज
तेलकटलेलं अंग
तेलकटलेलं शहर, गाव, वाडी-वस्ती
आणि रक्तानं चिकट अंग
धू धू धूतलं तरी स्वच्छ होत नाही
डाग काही केल्या जात नाही
तेल काही केल्या उतरत नाही
हे जग काही आजच निर्माण झालं नाही
हे जग काही आजच नष्ट होणार नाही
आत्मा, देव, पुनर्जन्म, श्रद्धा
क्षूद्र गोष्टींना मूठमाती देणा-यांची जमात आपली
मेणकापडाचं छत, पत्र्याची भिंत
सिमेंटचा काळसर कोबा
चुन्याचा निळसर गिलावा
बाजरीची भाकरी, लसणाची चटणी
आठवड्याला रश्शीचं कालवण
माळ्यावरची रद्दी, उबट चादरी
आणि नियतीनं गायलेलं गजकर्णाचं गाणं
भोकाड पसरलेल्या भटक्या कुत्र्यांना
रात्रीचा रस्ता देखील पडतो अपुरा
गती आणि प्रगती सहन न होणा-या दोन प्रजाती
अनुक्रमे कुत्रा : माणूस
आता सहन होत नाहीए
पृथ्वीच्या पोटात खोलवर
तू गाडलेलं अस्पृश्यतेचं थडगं
ते थडगं पुन्हा उकरून काढणा-या हातांनी
चालवलीये मनूस्मृतीची दूरूस्ती झोकात
न्यायाचं प्रतिदान नाही घालणार कधीच झोळीत
झोळीची ठिगळं, चिंध्या आणि बाळोतं
फेकून दिलेलं त्यांना पहावत नाहीत
जुनेरी फेकून नवेरी अंगावर सजलेली
सहन होत नाही डोळ्यांना त्यांच्या
बदल्याच्या आगीनं धावताहेत सैरावैरा
त्यांच्या शेंडीवर बसलेला कुठारा घात
त्यांनी तसाच ओला ठेवलाय गँगरीन सारखा…
म्हणून
त्यांना नकोय सुखानं नांदणारी हवा
त्यांना नकोय पाणी खळाळणारं
की नकोय मुक्तपणे घेतलेला श्वास
मसणजोग्यांच्या संस्कृतीतलं गीत
विकृत करून रागात सजवायचंय त्यांना
पावित्र्याच्या संकल्पना मखमलात गुंडाळून
ते लादू पाहतायेत लेकी बाळींवर
जीणं-जगणं सा-यांचा अंत निर्विकार
रमाबाई पासून जवखेडा व्हाया खैरलांजी
केसेसचा न्याय अंडरग्राऊंडच
नियतीचं भेसूर गाणं आजही भयावह
सामुहिक प्रोग्राम करत वाजतंय
फक्त त्याचे वर्जन्स बदलतायेत
त्या गाण्यानं साद घातलेली आरोळी
मी रुजवू पाहतोय
प्रेयसीच्या, बहीणीच्या, आईच्या कानात
त्यांच्या केसांत माळेन म्हणतो चाकू-सु-यांनी बांधलेला गजरा
खांद्यावर लटकवेन कुऱ्हाडी
ही हत्यारं हिसेंसाठी नाहीत
ही हत्यारं युद्धाची आहेत
युद्ध आहे स्वतःशीच
स्वतःच्या रक्षणाशी
त्यांनी एसआरए आणला
त्यांनी झोपड्या बळकावल्या
त्यांनी काँट्रॅक्ट आणला
आमच्या नोक-या हिसकावल्या
आभाळमुका घेणार्‍या घरांची बेगडी माया
लाल डोंगर, लाल बावट्याची चाळ
लाल मुंग्यांची भाजी
पिवळसर आभाळ
नदी गढूळलेली
जसा बीएमसीचा पाईप गळतो अधी मधी
पेपरातून जातीचं नाव झळकतं अधी मधी
जमीन होते चिकट लालेलाल
वातावरण होतं ऊबट, कोंदट
पुन्हा पुन्हा एकच हेडलाईन फिरते
यांच्या मेंटेनंसलेस पेपरातून
तीच नक्षली बातमी फिरत
यांच्या सेंसलेस सदरातून
सोशल मिडीया ही ओकतो गरळ
पीटीलेस मनगटातून
आमच्या मयताला मृत्यु करून मांडणारे
हे सनातनी करतील पक्षपातीपणाच !!!
ज्यांनी कधी चढली नाही पायरी आपल्या उंबराची
ज्यांनी कधी वाचली नाही कविता आपल्या भळभळत्या जखमांची
ज्यांनी कधी म्हटलं नाही सुक्त आपल्या मुक्तीचं
ज्यांनी कधीच गायलं नाही गान आपल्या क्रांतीचं
ज्यांनी साधा फुलू दिला नाही रानमोगरा आपल्या सुगंधाचा
ज्यांनी कधी मांडू दिलं नाही आपलं अस्तित्व
जेव्हा तू नाकारला होता अपमान
जेव्हा तू फडकावलं होतं बंडाचं निशाण
जेव्हा तू नागवलं होतं त्यांच्या लिंगगंडाला
जेव्हा तू नागवलं होतं त्यांच्या स्मृतीला
त्यांच्या तेहतीस कोटींच्या टेस्ट ट्यूब बेबींना
जेव्हा तू नाकारली होतीस त्यांची चाकरी
जेव्हा तू हाकारली होतीस स्वतःची अस्मिता
जेव्हा तु उगारली होतीस गौरांग मुठ
तेव्हाचा सूड अजूनही ठसठसतोय जखमेत खपलीखालच्या…
अशा तमाम छप्पनचाट्यांचा तु चोळाबोळा केला होतास ना
त्या चोळ्याबोळ्याची आठवण अजूनही रखरखते आहे त्यांच्या नजरेत
त्यांच्या जाणीवेतून गेलेली नाही आज अजूनही त्यांच्या पराभवाची
त्यांना जाणवला होता पराभव तेव्हाच
तु लोकशाही दिली
आम्ही ती स्विकारली
तु मानवता दिली
आम्ही अंगिकारली
तु क्रांतिसूर्य दिलास
तु कबीर दिलास
तु बुद्ध दिलास
आम्ही आंधळ्या डोळ्यांनी बुद्ध कुरवाळला
आम्ही बुद्धाला ध्यानस्थ केलं
आम्ही बुद्धाचं फेंगशुई केलं
आम्ही त्याचे पाय बसवले
आम्ही त्याचे डोळे बंद केले
आम्ही संविधानाला पोथी बनवली
आम्ही अहिंसेनं हात बांधून घेतले
आम्ही डोळे घट्ट मिटून घेतले
आम्ही जखडून टाकली बुद्धीची कवाडं
आम्ही बंदिस्त केलं द्यानाला
आम्ही कैद केलं तुझ्या विचारांना
तु म्हणाला होतास
ब्राह्मण्य न् भांडवलवाद वाहक आहेत शोषणाचे
त्यांचा नित्यवाद असतो अमर कायम
आम्ही तुझे ऐकून न ऐकल्यासारखे केले
आम्ही संघटना काढल्या
आम्ही पक्ष काढले
आम्ही गट मांडले
आम्ही तट बांधले
आम्ही लाचार झालो
आम्ही स्वतःहून बेजार झालो
वेशीबाहेर मुंडकं छाटलं गेलं की
आमची अस्मिता जागी होते
आम्ही रडतो, बोंबलतो
आक्रोश करतो
भडास निघाल्यावर शांत होतो
पुन्हा त्याच वळचणीला जातो
पुन्हा त्याच शोषकांचा आसरा
त्याच शोषकांचे वाहक
डिक्कीचे चॅप्टर उघडतो
सेटिंग करतो
चिटींग करतो
तुझ्या दुष्मनाशी महायुती करतो
आम्ही बंद केलीये चिकित्सा केव्हाच
चिकित्सा करणा-याला आम्ही बाटगा ठरवतो
तु माणूस बनवलं होतंस आम्हाला
तु येऊन बघ आम्ही कसे सिस्टमॅटीक गांडू झालो आहोत…
२०१४ सालच्या शेवटच्या सहा तारखेला
सारे स्मरण करत येतील तुझे
समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी
तुझ्या लेकरांची लाट धडकेल इथे
पानांतून, फुलांतून, हवेतून,
नजरेतून, प्रकाशातून, उजेडातून
सर्वत्र समतेचा सळसळता निखारा चैतन्यदायी होऊन
पसरेल इथल्या आभाळात
आम्ही तिथेच असू…
जसे १९५६ साली आलो होतो तसेच
२०१४ साली सुद्धा आलेलो असू…
सालाबादप्रमाणे एखादी नवी संघटना,
एखादा नवा पक्ष, फार्फार तर एखादा नव गट करू स्थापन
बाबा…
आम्हाला वाटत नाही लाज कसलीही
आजही आम्ही भांडत राहतोय वितभर जमीनीसाठी
मला ठावूक आहे…
तुझा रूद्रावतार…
तुच माणसाला मुक्त केलंयस पुनर्जन्मातून
म्हणून तु काही परत येऊ शकणार नाहीस
पण जर आलास तर आम्हाला कधीच माफ करणार नाहीस
आम्हीच तुला पुतळ्यात डांबलंय
आम्हीच तुला कव्वालीत जेरबंद केलाय
तुझ्यातल्या प्रकाश घेतलाय ओरबाडून
पिसाळलेल्या कुत्र्यांसारखा
त्यावर सांगतोय आम्ही आमचीच मालकी
पैतृक संपत्तीतून आल्यासारखी
तु नाकारलीस व्यक्तीपुजा
तु नाकारलीस मूर्तीपुजा
तु नाकारलीस विभूतीपुजा
तु नाकारलास अन्याय
तु नाकारलीस लाचारी
पण बा भीमा माफ कर आम्हाला
आम्ही तुला देव बनवला
सुटा बुटातला
तुझे पुतळे उभारलेत आम्ही चौकाचौकात
इथल्या प्रशासनानं तुझ्या पुतळ्यांवर
घडवल्यात दंगली, घडवलेत हत्याकांड
घडवलेत जळीतकांड अन् समग्र बलात्कार
आम्हीच तुझ्या अस्थी घेऊन
मागत फिरतोय मतांचा जोगवा
शोषकांच्याच मांडीला मांडी लावून
आम्ही केलाय खून तू दिलेल्या स्वाभिमानाचा
जग मेलं तरी आपल्याला मरून चालणार नाही
मेलेल्या जगाची प्रेतसमीक्षा करावीच लागेल
मुडद्यांचे चिंदबाटे, जाळी-जळमटे, खोपटे-घरटे
सारं काही उन्मळून पडली तरी
रचावाच लागतो एकेक कोपरा नव्यानं
धागा गुंफावाच लागतो पुन्हा पुन्हा
घरधन्यानं हार मानून चालत नाही
घरधन्यानं निराश होऊन जमत नाही…
घरधन्यानं उमेदीचं धन जमवायचं असतं आपल्या शेतात
आणि नव्यानं रचायचं असतं सुक्त नवनिर्मितीचं…
तुच शिकवलेस रे आम्हाला
सदगुणांवर प्रेम करायला
शत्रुशी प्रेमानं वागायला
सूड बुद्धीचा कलंक तु काढून घेतलास आमच्यातून
इथल्या भिंती, नद्या, नाले, इमारती
दुष्मनदाव्याच्या हिशोबाने अजूनही डोळे टवकारतायेत आमच्यावर
रक्त न सांडता वै-याला जिंकण्याचं ट्रेनिंग दिलं तू आम्हाला
तुझ्या लेखणीनं लिहीलं संविधान
अधिकार दिला इथल्या फकिराला, नंग्या-बुच्याला
देश चालवण्याचा, शासक होण्याचा
पण जात नाकारणारा अजून शासक होऊ शकला नाही
बाबा…
पोरं तुझी चालतात ऐटीत आता
म्हणून सूर्य देखील डागाळतोय यांचा
लेकरं तुझी शिकतात दैदिप्यमान
म्हणून जळफळतोय चंद्र देखील यांचा
२०१४ सालचं काटेरी दार बंद होण्याअगोदर
मी उघडत आहे २०१५ चं महाद्वार
महाद्वारातून तू येशीलच पुन्हा
राजबिंडं रूपाचा
सातमजली हास्याचा धनी
प्रचंड, प्रकांड पांडित्य
बुद्धी सामर्थ्य, ज्ञानचातुर्य उधळशील पुन्हा आमच्या दारात
प्रेमाचे झरे फुलवशील अंगणात
आखात करशील हिरवंगार
युद्ध भूमीवर सुक्त गाशील पुन्हा
माणसाचं गाणं गाशील पुन्हा
तुच तो आमचा आंबेडकर
तुच तो आमचा आंबेडकर

वैभव छाया

पूर्वप्रकाशित
दिव्य मराठी
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-poem-on-ambedkar-by-vaibhav-chhaya-4830712-NOR.html

Dec 06, 2014, 08:21 AM IST

बा भीमा… (दीर्घ कविता)

मण्या ओवणारी आई म्हणते
ही तुझी पाटी पेन्सिल
गिरव धडा बाबासाहेबांचा
सुरूवात कर..
आ आंबेडकरांचा
अन् गिरव त्यासोबतच
घ घामाचा
क कष्टाचा
ल लढ्याचा
स संघर्षाचा…
आता शाळेत बसतात एकाच बाकावर
डॉक्टर, इंजीनिअर अन् सफाई कामागाराची मूलं
शिकतात तेच सारखे धडे
येतो फी-माफीचा फॉर्म
येतो अफजलखानाचा धडा
फिरफिरतात नजरा
बाकं मग इकडून तिकडे सरसरतात
बुक्याचा मार खाऊन मुका
आटपतं वंदे मातरम अन् घास म्हणून पाणी डोळ्यातलं
गिळलं जातं आतल्याआत…
बा भीमा…
एकांतात असताना मी करतो विचार
आज तू असतास तर..
तू फक्त नऊ कोटी जीवांनांच नसतं दिलं अभयदान
तू उगारली असती तुझी वज्रमुठ
अन् सांगितलं असतं ठणकावून
इराक, इराण, सिरीया, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, रेड कॉरीडॉर
नाहीयेत नावं फक्त युद्धांची
तिथं जमा होऊन येतेय रास मढ्यांची
तू जोडून पाहीली असती ती आपल्याच देशातल्या मढ्यांशी
तू जोडून सांगितला असतास दूवा वैश्विक शोषितांचा
अन् उगारला असतास यल्गार सार्वभौम मुक्तीचा

बा भीमा… तू असतास तर …
लागला नसता वेळ अंधश्रद्धा विरोधी कायद्याला
अन् वाचलेही असते दाभोळकर, पानसरे अन् कलबुर्गी
कायदे – न्याय वगैरे तूझ्यासाठी हातचा खेळच
त्यांना जन्माला घालताना तू शिकवलास थॉट
जगभरातील शोषितांना समान धाग्यावर आणण्याचा
अन् पवित्रा निर्णायक बंडाचा

म्हणूनच…
ते घाबरताहेत तुला अन् तुझ्या सावलीलाही
ते भितात तुझ्या रोखठोक तर्जनीला
जी दिशानिर्देश करतेय सामाजिक न्यायाकडे
जी खुणावतेय प्रगतीच्या मार्गांना
जी सांगतेय विचार स्वतःकडून स्वतंत्रतेकडे
जी चेतवतेय यल्गार
जी रंगवतेय कॅनव्हास लढ्याचा
जी दाखवतेय रस्ता सूर्याचा
ते घाबरताहेत तुला
कारण तू एकच पूर्ण सूर्य
ज्याच्या हातातल्या एका पुस्तकानं
त्यांना रोखून धरलं 68 वर्ष
त्यांना बांधलंय अनंतकाळासाठी
म्हणून रचतायेत ते कट
तुला बांधतायेत स्मारकात

बा भीमा…
सगळ्यांनाच माहीत असतं
26/11, 7/11, 6/12
पण बाथे टाकलं जातं विस्मृतीत
भेद पाळला जातो शिवाशिवीचा रमाबाई नगराशी
नी खर्डा, जवखेडा, शिर्डी, फरिदाबाद ब्रेकिंग पुरतं वापरलं जातं
अन् त्यांचा अट्टाहास फक्त स्टेटस अपडेटचा…

सोकावलाय काळ
अन् सोकावलेयत त्याचे मक्तेदार
त्यांनी माणसाला बनवलंय हैवान
त्यांना मजा घ्यायचीये माणूस हरल्याची
अन् गाडलेल्या माणूसकीची
तुझ्या घटनेची खेळी खेळून
त्यांनी खुन्याला केलं प्रधान
सत्यमेव जयते.. बहुजन हिताय.. बहुजन सुखाय
बिरूद मिरवणारं आसन
खुनी हाताचा सहन करतंय अपमान
मग तिथं राष्ट्रगीत ठरलंच 52 सेकंदापुरतीची राष्ट्रभक्ती
नी बीफ नाकारण्याचा अट्टाहास ठरला पवित्र नी देशभक्ती
तर नवल त्यात काय ?
तोंडी लावायला कॉर्पोरेटचे दरवाजे उघडलेय थोडेसे
कारण अफर्मेटिव्ह अक्शन नसतोच डिक्शनरीत
भांडवलदारांना हवीय फक्त
त्यांच्या सोयीनं परवडणारी श्रमशक्ती…
श्रमाची बोली कमी जीवाहून
रिकाम्या पोटानं कष्टणाऱ्यांसाठी
विचारांपेक्षा मोठी असते रगती
ती रगती जीवंत रहायला दिवसाचं बळ देते
ही काँन्स्पिरसी दिसत नाही भुकेल्या डोळ्यांना
भूक मात करते विचारांवर
नी आम्ही बनतो लुंपेन
पोटाची भूक करत जाते हलाल जीवंत माणसांना
चिरत जाते दगडाचंही काळीज लेकीबाळांसाठी
तसं पोट असतंच भूकाळलेल्या राक्षसांचं आगार
दोन वेळच्या भाकरीत गुंतवून करून टाकलाय आमचा बूर्झ्वा
पण, खरंच आमच्याठाई तेवढंही औदार्य नाही
की यावं फिरून तुझ्या पायी, मागावी माफी
करावा कबूल गुन्हा
की मानली भाकरी मोठी स्वाभिमानापेक्षा
की हरलो आम्ही अर्थकारणाच्या गणितात
नी निष्प्रभ ठरलो जात-वर्गांच्या दऱ्या सांधायला
नव-ब्राह्मण म्हणतील मला असहिष्णू
फिकीर नाही
जर हवी असेल सर्वांनाच सहिष्णूता
त्यांनी सिद्ध करावी स्वतःची मानवता
रोखून धरावेत हिऱ्यांचे दागीने
ज्यात मला दिसतात फक्त शस्त्रधारी
अन् लहानपण हरवलेली काळी मुलं
भोकं पाडावी लेवीश क्रुजर्सना जी नासवतात पर्यावरण
फोडून टाका स्टॉक मार्केटच्या रेड्याचे वृषण
जो संपत्तीच्या असमान वाटपाचं प्रतिक
टेस्टेस्टेरॉनसारख नेतोय वाढवत
उद्धवस्त करून टाका ते सारे मॉल्स आणि चकाकती उंची दुकाने
जिथे कधी काळी वसत होता कामगार
आता त्याची थडगी सुद्धा बेसमेंटमध्ये विरलीयेत
बंद करा विकत घेणं प्लेबॉय अन् सबस्क्राईब करणं पॉर्न साईट
जी आहेत महाद्वारं स्त्री-शोषणाची
एक तरी दगड भिरकावून मारा त्या मल्टिनॅशनल्सवर
ज्यांनी चोरल्या नद्याच्या नद्या, आणि जमीनी, डोंगर आणि हवा
टांगलं शेतकऱ्यांना फासावर
उद्धवस्त केली सुपीक जमीन जीएम फुडनं
आणि हडप केलं कामागारांचं वेतन
या साथीला, तुरूंग फोडायला
ज्यात कैद आहेत कित्येक पूर्वास्पृश्य फक्त
जातीची कैद भोगत पुन्हा पुन्हा ट्रायलची वाट पाहत…
बा भीमा
मला माहीतीये ह्यात ते येणार नाहीत कुणी
त्यांचा अपराधबोध छळतोय त्यांना
गिल्ट काँन्शीयसनेस
मी म्हटलं आंबेडकरी त्यांनी म्हटलं महारच
मी म्हटलं संविधानवादी त्यांनी म्हंटलं नक्षली
मी म्हटलं स्वतःला पुरोगामी त्यांनी म्हटलं जातीयवादी

हो आम्ही हरणार नाही, थांबणार नाही…
तुझी प्रेरणा चेतवतेय
अन् राहील निरंतर
मनात आणलं अस्तंस तर तू घेऊ शकला अस्तास सूड
तुझ्या सहस्त्रांतील दुश्मनांचा
पण तू दरियादिल बादशहा
दुश्मनाच्या ओंजळीतही टाकलंस दान प्रेमाचं

बा भीमा…
6 डिसेंबर 2015 ला भरलाय पुन्हा सोहळा कृतज्ञतेचा
पण तुझ्या जागेवर उभा राहणारा सूर्य़ जन्माला येणं आता शक्य नाही
तूझ्या निग्रही छायेखाली नांदणारे असंख्य समुद्र
वाकवत राहतीलच या तुफानी संकटांना
बाबा, तुझी लेकरं साधीभोळी
संत, महामानव, युगंधर यांपेक्षाही तू
खूप काही सर्वांसाठी
तुझा शब्द न शब्द जागवतो ऊर्जा
वादळात झाडं उन्मळून पडावी
एवढी शक्ती भरत जाते हातांत
ही हवा, पाणी, जमीन, वारा, आकाश सारं काही
गदगदून जातं फक्त तुझ्या असण्यानं…
गदगदून जातं फक्त तुझ्या असण्यानं…

कवी – वैभव छाया…
पूर्वप्रकाशित – दिव्य मराठी
6 डिसेंबर 2015