किस्सा क्रं. 29 – कार्यकर्ता…

महिन्याभरापूर्वीची गोष्ट.. अंबरनाथ ते मुंबई या एक तास पन्नास मिनिटांच्या प्रवासात आमच्या अपंगांच्या डब्ब्यात दर दिवशी एखादं न एखादं कॅरेक्टर गवसतंच. तसाच किस्सा झाला. घरातून थोडं चिडचिड करून निघालो होतो. मुंबईला जायचं होतं. अंबरनाथ वरून साडेदहाची लोकल पकडली. खोपोली रिटर्न लोकल एकदम खच्चाखच गर्दी घेऊनच आली होती. पण तरी नित्यनेमाने तीच लोकल पकडायची हा शिरस्ता ठरलेला. नेरळ आणि वांगणी ला सगळ्या ब्लाईंड बांधवांची जत्रा एकसाथ डब्ब्यात चढते आणि साडे दहाच्या आसपास कल्याण वरून सुटणाऱ्या सगळ्या मेल एक्सप्रेस मध्ये फिरती विक्री करायला कल्याणलाच उतरते. मग काय जागा फिक्स मिळणारच. असाच त्या दिवशी नेहमीप्रमाणे गाडी धरली. नोव्हेंबरचा पहिला आठवडा होता. कल्याणला गाडी रिकामी होताच एक भांबावलेला इसम गाडीत चढला.

ऐ बाजू व्हा .. बाजू व्हा .. मला बसायचंय.. अंगावरचे मळलेले कपडे पाहून कोणी बाजूला बसायला देईल याची शाश्वती नव्हती. बोलायचा सुर एकदम बेवड्यासारखा.. पण वास काही येत नव्हता. फक्त शुद्ध हरपल्यासारखं भासत होतं. कोणीही आपल्यासाठी जराही जागचं हललेलं नाही हे हेरखून तो लगेच उत्तरला..

बसा बसा मी काय तुमच्या बाजूला बसायचो नाय.. तिकडं दादरला दर्याला भरती आलीये.. भरती आलीये रे दर्याला .. माझा बाबा गेला.. माझा बाबा गेला… बाबासाहेब मी तुला जय भीम करायला येतोय.. नामांतर तर होणारचं..

माझ्याच विचारात गर्क असणारा, स्वतःशीच चिडचिड करणारा मी फटकन भानावर आलो आणि त्या अनोळखी माणसाकडं नीट निरखून पहायला लागलो. कपडे ठिगळानं भरलेले होते.  हातात दोन पिशव्या होत्या. पायांना जखमा झालेल्या होत्या. हातही तशाच अवस्थेत. थोडासा गतीमंद इसम..

तरी रहावलं गेलं नाही.. विचारायला जाणार तोच इतक्यात माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने आणि त्याच्या पत्नीने त्यांना हाताने धरून उचलंलं सीट वर बसवलं… हसऱ्या चेहऱ्यानं जय भीम केला. आणि विचारलं दादा कोण तुम्ही ?

उत्तर आलं माहीत नाय.. ही पिशवी घ्या. पिशवी उघडली. त्यात लॅमिनेटेड केलेलं एक पत्र मिळालं. स्पष्ट लिहीलेलं होतं.

आपणास भेटलेली ही व्यक्ती माझे बाबा आहेत. मराठवाड्यातल्या फुलंब्री तालुक्यात नामांतर लढ्यात लढताना पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे सदर इसमाची अवस्था अशी झालेली आहे. ते कायम घरातून परागंदा होऊन दादरच्या दिशेने निघतात. आपणास हे कुठेही भेटले तर प्लीज माझ्या नंबरवर फोन करा..

ते वाचताक्षणीच माझ्या बाजूला बसलेल्या दांम्पत्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. त्यांनी जराही वेळ न दवडता तात्काळ त्यांच्या मुलाला फोन केला. तुमचे वडिल आम्हाला कल्याणला भेटले आहेत. आम्ही त्यांना परत संध्याकाळच्या गाडीने पाठवतो आहोत भंडाऱ्याला.. तुम्ही रिसिव्ह करायला स्टेशन वर या.. मुलाने उत्तर दिले की भायखळ्याला माझी बहिण राहते मी तीला सांगतो लगेच अर्ध्या तासात ती स्टेशनवर घ्यायला येईल. हा सगळा प्रकार चालू असताना गाडीने डोंबिवली सोडलं होतं. कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्यात दिसणाऱ्या खाडीला पाहून त्या चळवळ्या इसमाला काय जोश आला काय माहित. भायखळ्यापर्यंत वामनदादांची अख्खी गाणी गात राहीले. भायखळा स्टेशनवर मी आणि ते दांम्पत्य त्या चळवळ्या काकांना घेऊन उतरलो. अर्ध्या तासाने त्यांची मुलगी स्टेशनवर आली आणि वडिलांना घरी घेऊन गेली..

पण खरं सांगतो … तो काका तर गेला लेकीच्या घरी .. पण त्याचे शब्द, त्याचा आवाज आणि त्याची तळमळ कानात, मनात अजूनही शाबूत आहे. त्याच्या एका पिशवीत तर कागदं होती. आणि दुसऱ्या पिशवीत परफेक्ट पॅकिंग केलेलं पांढरा शर्ट आणि पँट, माझे बाबासाहेब हे पुस्तक आणि प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक असलेली निळीची पुडी.  कार्यकर्ता मार खाऊन गेला.. पण त्याला आजवर माहीत नाही की नामांतर झालंय.. मुलगी स्टेशनवरून घरी घेऊन जाताना एकच वाक्य म्हणत होती… दादा चला उद्या कवाडे सरांचा मार्च मुंबईला पण येणार आहे…

वैभव छाया

Advertisements

स्पेशली एबल्ड

दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी ट्रेन पकडली. डब्यात नेहमी सारखी चर्चा सुरू होती. अमजद शेख नावाचे एक अंध गृहस्थ आहेत. रोज कल्याणहून ते गाडी पकडत. भायखळ्याला एसबीआय मध्ये कामाला आहेत. आमची चर्चा आली ती तीक्ष्ण नजरेवर. त्यांनी सहज म्हटलं, चल वैभवा आज पैज लावतो तुझ्याशी. मी विचारलं कसली पैज.. ते म्हणाले.. आता दिवा क्रॉस होऊ आपण. पारसिकचा बोगदा लागेल. बोगद्यात किती बल्ब लावलेत ते सांगायचे आणि सोबतीनं किती बल्ब चालू होते आणि बंद ते सुद्धा मोजून सांगायचे. जर तु जिंकलास तर संध्याकाळी येताना ठाण्याला चौबेकडून समोसे तू घ्यायचे आणि मी हरलो तर भायखळ्याला माझ्याकडून खिमा पाव. मी पैज झटकन स्विकारली. दिवा क्रॉस झालं. दादू हाल्या पाटील चा बंगला पुन्हा एकदा वाकूल्या दाखवून नजरेआड झाला. मुंब्रादेवी दिसू लागली तसंतसं मी मनातल्या मनात तयारी करू लागलो. खिडकीजवळ डोळे एकदम ताणून लावून बसलो. म्हटलं आज मोजायचेच. तेवढी खिमा पावची सोय होईल. आता डब्यातले काही सिंधी हातात प्लास्टिकच्या पिशवीत गाठ मारलेले पाव खाडीत टाकायला उभे राहीलेले पाहून मी पण तयार झालो होतो. कारण प्रश्न डोळे असणाऱ्यांच्या इज्जतीचा वगैरे वैगेरे होता. जसं प्लास्टिकच्या पिशवीला गाठ मारून पाव पाण्यात सोडल्यावर खाडीतले मासे गाठ सोडवूनच पाव खाणारेत असल्या भ्रमात जगणारे आम्ही डोळस लोकं अंधाकडून हरलो तर लैच इगो दुखावेल ना आपला म्हणून तयार झालो. गाडी फुल्ल स्पीड मध्ये बोगद्यात दाखल झाली. तोच मागच्या डब्यातून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जय अंबे जय अंबे.. मी लक्ष विचलित होत होत सगळे बल्ब मोजले. गाडी बोगद्यातून बाहेर आली. कान थोडे बधीर झाले होते. डोळ्यांवर पुन्हा आलेल्या प्रकाशाने थोडंसं हायसं वाटलं होतं.

 

BrailleMaleBF26jan2016

अमजद भाऊंना म्हटलं भाऊ.. एकुण 42 बल्ब आहेत. आणि दोनच बंद होते. त्यांनी फटदिशी मध्येच टोकलं आणि म्हणाले. एकुण एकुण बल्ब 46.. त्यातले बंद सहा. दुसऱ्या अंधाने सुद्धा अमजद भाऊं ना दुजोरा दिला. आता मी पैज हरलो होतो हे कबूल करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण 46 च कसे या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काही स्पष्टिकरण दिले. ते असे…

 

  1. गाडी बोगद्यात शिरताना हवेच्या दाबामुळे आपले कान थोडे बधीर होतात तेव्हा गाडी बोगद्यात शिरली हा संकेत असतो. बोगद्याच्या दोन्ही बाजूस.. सुरूवातीला आणि शेवटाला असलेले दोन दोन बल्ब असतात. ते दिवसा सूर्याच्या प्रकाशात दिसत नाहीत. ते तु मोजले असावेत असे मला वाटत नाही.

 

  1. हरेक बल्ब नंतर किमान तीन सेकंदांचा पॉज असतो. एक हलकासा प्रकाश आमच्या डोळ्यांवर चमकून जातो. तेव्हा एक बल्ब गेला हे गणित पक्क असंत. पण सहा सेकंदाच्या किंवा नऊ सेकंदाच्या अंतरानंतर ही प्रकाश चमकून गेला नाही तर समजावं की बल्ब चालू नाहीत.

 

  1. आता गाडीचा वेग ह्या मोजणीवर प्रचंड मॅटर करतो. गाडी स्लो असेल तर हे आवर्तन पाच ते सात सेकंदांवर जातं. ते गणित वेगानुसार नव्या सुत्राने सोडवावं लागतं.

 

अमजद भाईकडे हार कबूल केली. संध्याकाळी त्यांच्या वेळेला ठरलेल्या गाडीत चढलो ठाण्याहून. ते ही पैजेत कबूल केलेले समोसे घेऊन. रात्रीचा अंधार असल्याने आता बोगद्याच्या सुरूवात व शेवटाकडचे न मोजलेले चारही बल्ब मोजले. बंद असलेले बल्बही मोजले. अमजद भाऊंचं उत्तर बरोबर होतं. माझं चुकलेलं होतं. दृष्टी असूनही आता मी अंध ठरलो होतो.

वैभव छाया

आई एक नाव असतं…

शाळेतल्या वर्गात दोन मुलं होती सोबतीला. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांत बरीच साम्य होती. दोघांनाही आई नव्हती. आमच्यापैकी कुणीच त्यांना दहावी पर्यंत हसलेलं पाहीलंच नव्हतं. बापाच्या छत्रछायेत वाढलेली पोरं काहीतरी अजाण दुःखानं ग्रासलेली. लहानपणापासून अनेकांच्या सहानुभूतीवजा अत्याचाराला बळी पडलेली.

पहिली किंवा दुसरीला असू. फारसं आठवत नाही. राज्याच्या नकाश्यावरही स्थान नसलेल्या विठ्ठलवाडीतली राजे शिवाजी विद्यालय. पाच बाय पाच चे कोंदट वर्ग. शाळा सुटली रे सुटली मुलं आपल्या आयांना बिलगून घराची वाट धरायची. ती दोघं पोरं बापाच्या हातात करंगळ्या सोपवून रस्ता कापताना दिसायचे. त्यांच्याकडे बघून इतर मुलं म्हणायची.. “आई-आई… तीला ना आई नाहीए…” त्या वयात ते वाक्य फारसं लागत नव्हतं. आता त्याची तीव्रता कळतेय. कदाचित हाच त्रास अत्याचार बनून त्यांच्या अबोलपणाला कारणीभूत ठरला असावा. तो अबोला स्वभाव दहावीपर्यंत कायम होता.

आठवी ला शाळा बदलली गेली. शिरस्त्याप्रमाणे उल्हासनगरच्या उल्हास विद्यालयात दाखल झालो. पण ही पोरं होती त्याच स्थितीत. त्या दिवशी आमच्या मराठीच्या शिक्षिका रजेवर होत्या. बदली शिक्षिका म्हणून शहाणे मॅडम वर्गावर आल्या. तशा शहाणे मॅडम आमच्या सर्वांच्या लाडक्या. त्या आल्या अन् म्हणाल्या. आज तुम्हाला एक शिकवेन. खरं तर ती तुम्हाला वर्षाच्या शेवटी शिकवायला हवी पण  मी आज शिकवतेच.

अट एकच कोणीही पुस्तक वर काढायचं नाही. जमलं तर बाकांवर मस्त मांडी घालून बसा. आपापली दप्तरं भरून घ्या. शाळा सुटली की घाई नको. आम्ही सर्व मुलांनी होकार दिला. बाईंनी कवितेचं वाचन सुरू केलं. त्याआधी कवीबद्दलची जुजबी माहीती वगैरे सगळं सांगितलं. दुध अन् दुधावरची साय, गाय-वासरू यांच्यातलं अबोल नातं वगैरे वगैरे जेवढं सांगता येईल तेवढं नीट प्रेमानं, आईच्या मायेनं समजावून सांगितलं. बाईंच्या शब्दागणिक आम्ही भान हरपून गुंग होत चाललो होतो. ट्रांस काय असतो ते त्या वेळेस अनुभवलं होतं. त्या क्षणाला फक्त बाईंच्या आवाजाकडेच लक्ष होतं. अन् बाईंनी कवितेचं पहिलं कडवं वाचून काढलं.

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

वर्गातल्या एकुण एका मुला-मुलींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आपण का रडतोय याचं साधं भान सुद्धा कुणाला नव्हतं. बाईंनी अख्खी कविता ज्या आवेगात वाचली त्यानं आम्ही सारे शहारून गेलो होतो. पण याचा सगळ्यात जबरदस्त परिणाम झाला तो त्या दोन मुलांवर…

ती मुलं त्या दिवशी प्रचंड रडली . कदाचित त्यांच्या जन्मापासून ते आजवरच्या पंधरा वर्षांच्या आयुष्यातलं सगळं रडणं त्यांनी पहिल्यांदाच बाहेर काढलं असावं. कदाचित बाईंना सुद्धा तेच अपेक्षित असावं. बाईंनी हातातलं पुस्तक उपडं तसंच टेबलावर ठेवलं. त्या पोरीजवळ गेल्या. तीचे डोळे पुसले. कपाळाचा मुका घेतला. आणि छातीशी घट्ट दाबून धरलं. आईविना वाढलेली पोरं खुप रडली हमसून हमसून रडली. आणि शांत झाली. त्या मुलाच्या बाबतीतही तेच झालं. त्यानं होत नव्हतं ते सारं बाहेर काढलं. हुंदके देऊन देऊन प्रचंड थकला. पण बाईंना बिलगताच त्यानं ज्या समाधानानं डोळे मिटले कदाचित तो त्याच्या आयुष्यातील वात्सल्य अनुभवण्याचा सर्वोच्च क्षण असावा. आम्ही सारेच स्तब्ध होतो. इतक्यात शेवटची घंटा झाली. पण आम्ही सारे तसेच स्तब्ध. आपापल्या शर्टाच्या बाह्यांनी, ओढणीनं ओले डोळे कोरडे करत राहीलो होतो. वंदे मातरम सुरू झालं. संपलंही. पण आम्ही मांडी घातलेल्या अवस्थेत होतो ते तसेच होतो. इतर वर्गातली पोरं वेगात पळत शाळेच्या आवारात पोहोचली. परंतू आम्ही अजूनही वर्गातच होतो. यथावकाश आम्ही बाहेर पडलो. शांततेत पावलं टाकत घरी आलो. काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळीही सगळी पोरं अजूनही शांत होती. अपवाद त्या दोघांचा. त्या दिवशी ते हसत होते. आपणहून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ठाऊक नाही. फ.मुं. च्या कवितेतून म्हणा की बाईंच्या गर्भातून…पण त्यांना जन्म मिळाला होता… त्यांच्या जन्माचा उषःकालच त्यांना लाभला होता. ती पोरं पुन्हा नव्यानं जन्माला आली होती. ताज्या टवटवीत फुलांसारखी…

वैभव छाया

बावडी

विठ्ठलवाडीच्या खडेगोलवली गावात राहताना घरच्यांनी पाण्याचे खुप हाल काढलेत अनेकांनी. पाण्याची टाकी आली ती ९८ च्या आसपास. त्यासाठी तिथल्या नगरसेविकेला आमरण उपोषण करावं लागलं. प्रशासन बधत नाही हे पाहून अर्धवट बांधकाम झालेल्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीव देईल ही धमकी द्यावी लागली होती. उपोषण काही केल्या तडीस जाईना हे पाहून रिपाईच्या नगरसेविका रायभोळे यांनी शेवटी टाकीच्या शिड्या चढायला सुरूवात केली. अन् बाईंचा राग काही करता शांत होत नाही पाहून शेवटी कडोमपा … कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं मागणी मान्य केली. सहा महिन्यात टाकीचं बांधकाम पूर्ण झालं. पाणी ही मिळू लागलं. पण जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. ९२-९३ चं साल. मुंबईच्या दंगली उरकल्यानंतर मुंब्रा जसं निर्वासितांचं, पिडीतांचं ठिकाण बनलं तसंच विठ्ठलवाडीच्या बाबतीतही झालं. वडार-बेडारांच्या सेपरेट सेटलमेंटच्या आजूबाजूला असलेल्या घेट्टोज मध्ये हे सारे आपसूक सामावून गेले. कोणतंही नियोजन नाही. अपुऱ्या सोयीसुविधा आणि निष्क्रिय प्रशासन मेहरबानी करत होतं. समस्यांचा पाढा रोज दुपट्टीने वाढत होता.

washimmanjhi2_0.jpg

त्या काळात विठ्ठलवाडीतल्या प्रत्येक चाळीत बावडी खणणं हा सामुहिक कार्यक्रम झाला होता. एक विहीर तर आम्ही राहत होत्या त्या घराला खेटूनच खणण्यात आली. आजही श्रीराम कॉलनीच्या विहीरीच्या कठड्यावर माझ्या मामांनी ओल्या सिमेंटवर कोरलेली तारीख तशीच विराजमान आहे. चाळीतल्या एकुण ३८ कुटूंबानी एकत्र येऊन सर्वसमत्तीने विहीर खोदण्याचे ठरवले. सर्व पुरूष मंडळी जमेल ती हत्यारं घेऊन घरातून बाहेर पडली. महिला वर्ग पडेल ते काम करण्यासाठी पदर खोचून सरसावल्या. कसलंच तंत्र माहीत नाही. काहीच अवगत नाही. फक्त माझ्या आजीनं सांगितलं होतं की माझ्या आजोबानं कैक वर्षापूर्वी असलेली बावडी बुजवली होती. तीला आज पण पाणी लागेल. बस्स .. मग काय झाली सुरूवात. सकाळी हाती घेतलेलं काम संध्याकाळी पूरं झालं. रात्री नऊ च्या आसपास खणलेल्या खड्यातून थोडंसं पाणी लागू लागलं. चांगली बारा फुट खणून झाली असावी. पाणी लागल्या लागल्या जो जल्लोष सर्वांनी मिळून साजरा केला होता तो काहीतरी अप्रतिमच होता. पाणी तर लागलं आता पुढे काय? मग बावडीला शिस्तशिरपणे बांधण्याचं ठरवलं. नेमका त्या दिवशी शुक्रवार. विठ्ठलवाडी, उल्हासनगरचे बाजार बंद. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपुजन.. अमावस्याच… कोणी कारागीर काम करणार नाही हे ओघानं आलंच. पुढचे चार दिवस सणासुदीचे… म्हणजे पाच दिवस सगळं खोदलेलं असंच राहणार.. पण नेमक्या वेळेला तिथल्याच टिल्लू मिस्त्रीनं मदतीचा हात दिला. स्वतःहून पुढे येत सगळ्या सामानाची अरेंजमेंट केली. आणि जबरदस्त बावडी बांधून दिली. सकाळपर्यंत बांधकाम झालं देखील. पुढची दुपार अख्खी चाळ … जमलेला गाळ साफ करण्यात गुंतली होती. सगळेच खुष दिसत होते. हपशीवरची राडेबाजी, मैल दोन मैलावरून पाणी आणण्यासाठी करावी लागलेली धावपळ एकाच फटक्यात थांबली होती. खरंतर… या आनंदातच अनेकांनी नवे मार्ग शोधले. सामुहिक श्रमदान त्यांना नेमकी गोष्ट शिकवून गेलं होतं. समुहानं राहणं किती फायद्याचं असतं हे आत्ता कुठं उमगू लागलं होतं. त्याचाच परिणाम थोड्याच दिवसात दिसून आला. ३७५ दिवसांच्या अथक संघर्षानंतर विठ्ठलवाडीत आमच्या तीन चाळींची एक को-ऑपरेटिव्ह हौ. सोसायटी झाली. त्याचाच कित्ता गिरवत अनेकांनी आपापल्या चाळींना को-ऑपरेटिव्ह मध्ये कनवर्ट केलं.

पण खरं सांगायचं तर या पाण्यानं चाळीतल्या साऱ्याच लोकांना को ऑपरेटिव्ह पद्धत शिकवली. आणि ही लोक जगली देखील…

पाणी बरंच काही शिकवून जातं… हो की नाही …

वैभव छाया

11 जुलैची शोकांतिका

त्या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासात जे घडलं ते कधीच कोणीही साधं स्वप्नात सुद्धा पाहण्याचं धारिष्ट्य केलं नसेल. सकाळी सकाळी गंधकुटीजवळच्या बाबासाहेबांच्या छोट्या अर्धकृती पुतळ्याला चपलांचा हार घातलेला लोकांना आढळला. पोलिस चौकी अगदी समोरच असतानाही पोलिसांना कानोकान खबर पडली नाही की कोणी हार घातला. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभाला आवरणं तसं कठिणच होतं. सकाळी कामाधामाला बाहेर पडलेले लोक संतापाने खवळले होते. पोलिसांकडून कोणताच अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रमाबाई नगरातल्या रहिवाश्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम केला. सकाळचीच वेळ होती. पोलिस दलाला पाचारण करण्यात आलं. हायवेवर जमलेल्या लोकांना व्यवस्थित रित्या पॅक केलं. हायवेवरून पुन्हा कॉलनीत जाणारे असलेले दोन्ही रस्ते पोलिसांनी अगदी पद्धतशीरपणे ब्लॉक करून लाठीचार्ज करायला सुरूवात केली. आणि लागलीच मनोहर कदम या तत्कालीन पोलिस निरिक्षकाने गोळीबाराचा आदेश दिला. अकरा नागरिक शहिद झाले. ज्या कारणासाठी गोळीबार करण्याचा आदेश दिला गेला होता त्या पेट्रोल टँकर पासून निदर्शनाचं ठिकाण नाही म्हणायला गेलं तरी साधारण अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्तच होतं.

जे शहिद झाले त्यात.. रिक्षाचालक नंदू कटारे होता. शाळेत जाणारा प्राथमिकचा विद्यार्थी मंगेश शिवचरण होता. मृत्यूचा, खुन-हत्येचा नंगानाच काय असतो ते त्या दिवशी पाहीलेलंय. वय लहान होतं. पाचवीत होतो. त्यामुळे तीव्रता जाणवली नव्हती. पण आज जाणवतेय. काळ जसा जसा पुढे सरकतोय ती धग अजून वाढत जातेय. जय भीम कॉम्रेड मध्ये अनेक गोष्टींची सत्यता अगदी निरपेक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केलाच आहे.

हत्याकांड घडल्याच्या तीन महिन्यानंतर मनोहर कदम ला पुन्हा सेवेत घेतलं गेलं. आज त्याला कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यानंतरही तो आजही पुण्यात मस्त आऱामाचं आयुष्य जगतोय. हे सगळं युती सरकारच्या काळात घडलं. युती सरकार कायम मनोहर कदमच्या बाजुनेच उभं राहीलं. पोलिस डिपार्टमेंट सुद्धा कदमचीच पाठ राखत होते. आजही राखतेच आहे. कितीही क्रुर मोर्चा असला तरी सुरूवातीला रबराच्या गोळ्यांनी फायरिंग करून मोर्चेकऱ्यांनी दरडावलं जातं. घाबरवून पांगापांग केली जाते. स्विपर असणाऱ्या, गटार काढणाऱ्या, घरकाम करणाऱ्या लोकांच्या जीवाला काहीच किंम्मत नसते का ? पोलिसांच्या लेखी त्या जीवांना काहीच किंम्मत नव्हती का ? पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट स्पष्टपणे बयानी करतायेत की गोळ्या नेम धरूनच मारल्या होत्या. अशा पोलिस खात्याबद्दल का म्हणून सहानूभूती बाळगावी जे आजही त्या नराधम मनोहर कदमाची पाठराखण करतायेत.

बाळ ठाकरेंचा पोलिस डिपार्टमेंट मॅनेज करण्याचा वकूब भल्या भल्या पत्रकारांनी 1992 च्या दंगली दरम्यान अनुभवलेला आहे. 1999 साली युतीचं सरकार पडलं त्यानंतर आघाडीचं सरकार आलं. आघाडी सरकारनं गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत पीडीतांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापलीकडे दुसरं काहीही काम केलेलं नाही. अशोक चव्हाणांनी फक्त बाबासाहेबांचा पुतळा उभा करून देण्यापलीकडे रमाबाई नगराला साधं ढुंकूनही पाहीलेलं नव्हतं कधी. आजही रमाबाई कॉलनी एसआरए च्या गर्तेत अडकलीये. जीवनमान उंचावण्याच्या साऱ्या संधी ह्या घाटकोपरला जरूर येतात पण त्या फक्त गारोडीया कॉम्प्लेक्स च्याच गेटमधून आत शिरतात. जैनांच्या गेटोजमध्ये त्या साऱ्या संधी अडकून पडल्यात. मोदी प्रधानमंत्री नसताना देखील तिथेच येऊन गेले पण रमाबाई नगराकडे गावाबाहेरची वस्ती म्हणून नाक मूरडून गेले होते. मागासवर्गीयांच्या समस्यांवर आता सरकारने पैसे मिळवून देणाऱ्या योजना देखील बंद केल्या आहेत. त्यामुळे आधीसारखे एनजीओवाले सुद्धा दिसत नाहीत कॉलनीमध्ये.

एकदा फक्त आज जेथे शहिद स्मारकचा हॉल आहे तेथे 11 जुलै 1997 रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत, रक्ताळलेल्या थारोळ्यात पडलेली अकरा प्रेतं आठवतात का ते पहा ? मनोहर कदम ला पाठीशी घालणारी भाजप-सेनेची युती आठवून पहा. गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दाखवलेला बहिरेपणा आठवून पहा. हत्याकांड घडल्यानंतर चोप बसलेले रामदास आठवले पण आठवून पहा. त्यांनी सुद्धा नंतर त्यावर कधीही आवाज उठवेल्ला नाही. आजवर न्यायासाठी उपेक्षित राहीलेल्या त्या अकरा शहिदांच्या स्मृती एकदा आठवून पहा.

मग मन झालंच तर .. उद्या कॉलनीत या. आणि या हत्याकांडाचं राजकारण करणाऱ्या स्वघोषित राष्ट्रीय अध्यक्षांच्या राहुट्या पहा. त्यांच्या कागदावरील म्याँव म्याँव पहा. उगाच अहिंसेवर विश्वास ठेवायला शिकवलं. असं वाटत राहतं कधी कधी… मुलगा किंवा मुलगी अठराव्या वर्षात आल्यावर त्यांना सगळे अधिकार मिळतात. संविधान त्यांना सुजाण नागरिक म्हणून मान्यता देतं. ते अकरा शहिद आणि त्यांची प्रेतं सुद्धा उद्या सकाळी सकाळी अठरा वर्षांची होतील. त्यांना न्याय देणारी व्यवस्था कोणत्या बिळात या भडव्यांनी नेऊन रुतवलीये. पत्ता लागेना…

साऱ्या शहिदांना जय भीम…

आत्महत्या ….

आत्महत्या हा तसा प्रचंड गुंतागुंतीचा विषय. लोक आत्महत्या का बरं करत असतील? अशी कोणती परिस्थिती एखाद्याला आपलं आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त करत असेल याबद्दल प्रचंड कुतूहल असायचं. आत्महत्या करणारी लोकं नेमकी कशी असतात? ते कोणत्या क्षणाला आत्महत्येचा निर्णय घेतात आणि तो कसा टिकवून ठेवतात याचा मी सातत्याने शोध घेण्याचा प्रयत्न करायचो. पण स्वतःला अनुभव येईपर्यंत ते नीटसं उमगलेलं नव्हतं. इथं प्रत्येकानं कधी ना कधी तरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेलाच असतो. काही बचावतात तर काही हकनाक बळी पडतात. मी सुद्धा प्रयत्न केला होता. एकदा नव्हे तर तीनदा..

पाय गेल्यानंतर आता स्पर्धेच्या युगात टिकणार कसं ही चिंता मला स्वतःलाच खाऊन टाकायची. किमोथेरपी आणि ओवर ट्रीटमेंट मुळे वजन भरपूर वाढलेलं होतं. हातात स्टिक असायची. रंगाने काळा. कॉलेज सुरू झालं तेव्हा आरक्षणा विषयीची भूमिका ऐकून आपोआपच एकाकी पाडला गेलेलो. थोडक्यात काय तर दोनच नजरा समोर दिसायच्या. एकतर सहानूभूतीच्या ज्यात मी बिच्चारा होतो. तर दुसऱ्या नजरांनी मला अदृश्य केलेलं. इनविसीबल पर्सन होऊन बसलो होतो. बाहेरच्या जगाकडून अशा पद्धतीने वाळीत टाकलं जाणं सहन होत नव्हतं. कायम दहा पंधरा मुलांच्या घोळक्यात वावरणारा मी एकटाच जाई अन् एकटाच येऊ लागलो होतो. हळू चालण्यामुळे इतर कुणाला माझ्यासोबत चालणं जिकीरीचं वाटायचं. हाच एकटेपणा निराशेचं सर्वात मोठं कारण बनलं. घरचे सगळे, आपले आप्त वगैरे सर्व काही विसरून गेलो आणि फक्त स्वतःच्या इनविसिबल असण्यावर केंद्रीत होऊन बसलो. त्या वेळेस पहिल्यांदा आत्महत्येचा विचार डोकावला. वय होतं अठरा वर्षे. सारासार विवेकबुद्धी प्रगल्भ नसलेलं वय ते. म्हटलं ट्रेनमधून उडी मारून जीव द्यावा. ठरल्याप्रमाणे ट्रेनही पकडली. म्हटलं कल्याण डोंबिवलीच्या मध्ये मारावी उडी. किंवा रेल्वे क्रॉसिंग बेस्ट ऑप्शन राहील. पण क्रॉसिंग मध्ये शरीराची फार विटंबना होते. म्हणून नको म्हटलं. उडी मारणं बेस्ट वाटलं. पण त्या दिवशी कल्याणला ट्रेनमध्ये हँडीकॅपच्या डब्यात भरपूर हवालदार चढले आणि प्लान फसला. त्याक्षणी जो विचार मनातून गेला तो नंतर आलाच नाही.

दुसरी वेळ आली ती नोकरी मागायला गेलो असता झालेल्या अपमानानंतर. एका संपादकांनी सरळ म्हटलं, तुझ्यासारख्या अनफिट लोकांचं या फिल्ड मध्ये काही काम नाही. मी विचारलं सर अनफिट म्हणजे? ते म्हणाले.. फिजीकली डिसेबल रे.. मी उत्तरलो .. सर, बट आय एम डिफरंटली एबल्ड.. ते हसले आणि केबिन मधून निघून गेले. हा अपमान पचवू शकलो नाही. काही महिन्यांपूर्वी मनातून गेलेला विचार पुन्हा डोकावू लागला. आणि ह्या वेळेस प्रचंड तीव्रतेने डोकावला. आता काहीच उपाय नाही. आपली काहीच किंमत नाही या जगात. उगाच घरच्यांवर आपण ओझं बनून राहणार. आपण इतरांसारखे नाही. त्यामुळे आपल्याला जगायचा खरंच काहीएक अधिकार नाही. पुन्हा तोच शिरस्ता. यावेळेस ट्रेनमधून उडी मारण्याचं ठिकाण निवडलं ते मुंब्य्राची खाडी. जसं पारसिक टनल क्रॉस होईल तसंच काम उरकायचं हे मनोमन ठरवून घेतलं. त्यावेळेस ना मला आईचा विचार आला. ना अन्य कुणाचा. प्रचंड स्वार्थी झालो होतो. गाडी ठाण्याला पोहोचली. त्या दिवशी गाडीत एकजण ठाण्याला चढले. मला आठवत नाहीत ते कोण आहेत. पण त्यांच्याजवळ एक पुस्तक होतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रचंड सुंदर होतं. बुद्धाचा स्थितप्रज्ञ चेहरा होता. आणि त्याखाली एक वाक्य लिहीलेलं होतं.
“No One can Walk Your Path For You”
बस्स ते वाक्य वाचलं आणि काय माहीत कसा पण शांत झालो. त्या काकांना विनंती केली पुस्तक जवळ घेतलं. त्यातलं पहिलं चॅप्टर बुद्धाच्या मातृत्वावर होतं. तेवढ्यात डोक्यात वीज चमकावी तशी आईची आठवण येऊन गेली. स्वतःच्या स्वार्थीपणाची, स्वतःच्या अपयशाची इतकी लाज वाटून गेली की त्यानंतर पुन्हा मी स्वतःला इतरांच्या डोळ्यात पाहीलंच नाही. माझं शरिर, रंग, वागणं, विचार, खाणं-पिणं जसं असेल तसं उघडपणे मिरवू लागलो. ठामपणे रेटून दाखवू लागलो. मी असा आहे असाच जगेल.. पाहीजे तर स्विकारा नाहीतर मी काय तुमच्या मागे येऊन बसलेलो नाही की मला घ्याच म्हणून. थोडक्यात माजोरडा बनलो. पंधरा दिवस स्वतः प्रचंड काम केलं. आनापानसतीवर भर दिला. माझे आजोबा भंते महिंदवंश यांना जाऊन भेटलो. त्यांना हकिकत सांगितली. त्या संन्याश्याच्या चेहऱ्यावर कसलीच लकेर उमटली नाही. ते शांत राहीले. मला वाटलं आपला नातू असा काही सांगेल म्हटल्यावर साहजिकच काळजी वाटेल. पण त्यांनी खऱ्या अर्थाने बुद्धाचं ते वाक्य कोणत्याही उपदेशाविना माझ्या मनावर कोरून टाकलं. आपण जे काही करतो, जे काही असतो त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो त्यामुळे त्याचा दोष इतरांवर ठेवण्याइतका मोठा मूर्खपणा नाही. स्वतःची तयारी स्वतः केली. आणि नंतर वीस दिवसांतच एका मोठ्या ठिकाणी कामालाही लागलो. तेव्हा वय होतं एकोणीस वर्ष.

तिसरा प्रसंग प्रचंड मजेदार होता. 2014 चा फेब्रुवारीचा महिना.. आजारपण काही केल्या कमी होईना. हातात काही उरलेलं नव्हतं. वर्षभर घरातच होतो. कमाईचं काही साधन नाही. करियर जेमतेम. त्यातच मन प्रचंड दुखावलेलं. आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर अपयशी. त्या दिवशीची ट्रीटमेंट उरकून निघालो. चालत चालतच चैत्यभूमीला पोहोचलो. दुपारचे बारा वाजले असावेत. म्हटलं या समुद्रात नको जायला. आपली मरीनच बरी. मी आणि Pradnya Dilip Deepali Mane मरिनच्या नेकलेस ला फ्रस्ट्रेशन पॉईंट बोलतो. म्हटलं तिथं जाऊन फ्रस्ट्रेशन काढू. पुन्हा तेच विचारांचं चक्र. सारं काही तेच. नाकारलं गेल्याची भावना प्रचंड वाईट. राहीलो उभा कठड्यावर सारा समुद्र न्याहाळून घेतला. मनाशी बोलण्याचे खेळ सुरू होते. ज्या शहरावर आपलं प्रचंड प्रेम आहे, जे शहर जिंकण्याची मनीषा मनात बाळगून आहे. त्याच शहरावर आपण हा डाग सोडून जातोय. इथं आत्महत्या करण्याचा डाग. तेवढ्यात मोबाईल वाजला. Yogesh Pawar यांचा फोन होता. काय माहीत तो कसा उचलला गेला.. फोन घेतला.. म्हटलं हॅलो.. वैभव तुम्हाला आता पाच वाजता फेमस स्टूडीओला जायला जमेल का.. ? मी विचारलं का ? तर तिथं फँड्री नावाच्या एका सिनेमाचं आज प्रेस शो आहे. तुम्ही तो पहाच. मी तिथं तुमचं नाव सांगून ठेवलंय. सरांशी बोलता बोलता कठड्यावरून खाली उतरलो. टॅक्सी पकडून फेमस ला आलो. फँड्री पाहीला. नंतर फँड्री रिलीज होईस्तोवर रोज फँड्री पाचेक पोस्ट लिहीत राहीलो. त्या दिवशी पवारांचा फोन आल्यानंतर विरलेला विचार अाजपोतर पुन्हा आलेला नाही.

असो.. या तीन प्रसंगाकडे आज जेव्हा केव्हा मी पाहतो तेव्हा मी स्वतःला प्रचंड स्वार्थी, घाबरलेला, पळपुटा, डरपोक वगैरे जाणवतो. जगण्याची उमेद गमावलेला, आपल्या इतरांना प्रचंड मानसिक त्रास मिळवून देणारा वाटतो. आत्महत्या करणं गुन्हा आहे. भले कितीही नकार असो, कितीही अवहेलना असो.. आपण समोरच्याच्या नकाराचा सन्मान करायला शिकलं पाहीजे. आपल्यातलं पुरूषपण गाळून पडल्याशिवाय तो नकार आपण स्विकारू शकत नाही याची जाणीव मनात घट्ट रुजली. आत्महत्येचा विचार हा एका क्षणापुरता असतो. त्यावेळेस आपला मेंदू आपल्या ताब्यात नसतो. परिस्थितीशी सामना करण्याचं बळ नसलेल्या मेंदूतच आत्महत्येचे विचार डोकावतात हे स्वतःलाच उमजून आलं. आज झगडून पुन्हा नीट उभा राहीलो. नाही जमत उभं रहायला. नाही जमत नॉर्मल जगायला पण समायोजन साधून राहीलो उभा. या जगात काहीही अशक्य नाही. आपण स्वतःच्या अपयशासाठी इतरांना जबाबदार धरू शकत नाही. तो पळपुटेपणा असतो. मी त्यातून बचावलो नाहीतर मी माझ्या आईचा कायमस्वरूपी गुन्हेगार ठरलो असतो.
पाकिटात किंवा मोबाईल मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो ठेवत चला. विचार आला की पहिलं त्या फोटोला पहा. भरपूर आयुष्य जगाल.

ता.क.
या स्टेटसला रोहिथ वेमुलाशी जोडून पाहणारे सुद्धा येतील. तेव्हा एक ध्यानात ठेवा. काहीही बोलण्याआधी रोहिथनं लिहीलेलं शेवटचं पत्र जरूर वाचा. त्यात तो ज्या करूणेनं व्यक्त झालाय ती करूणा माझ्याठायी नव्हती. माझ्याठायी होती ती फक्त क्रुरता, सुडबुद्धी आणि इतरांना त्रास होईल ही भावना. रोहिथची संस्थात्मक हत्या ही जातीयवादी व्यवस्थेचा निषेध आहे. हा मुद्दा पक्का ध्यान्यात ठेवावा. रोहिथ एका क्रांतिला जन्म देऊन गेलाय. हे त्याचं सर्वात मोठं बलिदान आहे. मी मेलो असतो तर लोकसंख्या एकने कमी झाली असती. आणि पळपुटेपणाला सबळता मिळाली असती.

वैभव छाया