माझे पुरोगामीत्वाचे आकलन-2

पुरोगामी संकल्पनेचे भारतातील दोन मूळ प्रवाह आपण मागील भागात पाहीले. त्याची युरोपीय राष्ट्रांनी केलेली जडणघडण आणि जगात घडलेली दोन महायुद्धे यांचा फार मोठा प्रभाव प्रोग्रेसिव्ह चळवळ म्हणजेच प्रागतिक चळवळीवर पडलेला दिसून आला आहे. त्यामुळे या प्रगातिक चळवळींची जगभरात होणारी मांडणी ही तीन टप्प्यांत होते. ती म्हणजे युरोप खंडातील रेनेसांस म्हणजे प्रबोधनाचा कालखंड ते एकोणीसाव्या शतकातलं शेवटचं पाव शतक. यात धर्मसुधारणा, औद्योगिक क्रांती, बेसुमार शहरीकरण, मानवी जीवन जगण्याच्या बदललेल्या तऱ्हा यांचा समावेश होतो. पण या साऱ्या घटना फक्त सत्ताधाऱ्यांच्या चष्म्यातूनच लिहील्या गेल्या आहेत. त्यांची उभारणी आणि मांडणी सुद्धा सत्ताधाऱ्यांनीच केलेली होती. म्हणून वीसाव्या शतकाच्या पाव शतकआधी पर्यंत ही सर्व स्वतःला प्रागतिक म्हणवणारी राष्ट्रे अख्ख्या जगाला स्वतःच्या गुलामीखाली वागवत होते. वसाहतवादी धोरणं बाळगून ही राष्ट्रे स्वतःला प्रागतिक म्हणवून घेत होती.

या धारणेला पहिला सुरूंग लागला तो 1890 मध्ये जेव्हा जर्मनीचा तत्कालीन चँसेलर बिस्मार्क याने सुरू केलेला वर्चस्ववादाचा प्रय़त्न युरोपमधलं वातावरण अस्थिर करून गेला. पुढे त्याचे पर्यावसन दुसऱ्या महायुद्धात झाले.
पहिलं महायुद्ध घडून त्याच्या परिणामांतून बाहेर यायला युरोपाला 1920 साल उजाडावं लागलं. तोच हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे महायुद्धानंतरचं दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध, दहशतवाद, फॅसीझम आणि सिक्रेट सोसायटीची कारस्थानं, तंत्रज्ञानाचा जगातील काही मुठभरांकडे असलेला भरणा आणि त्याची सत्ता, अर्थव्यवस्थेतील प्रागतिक पावलं, शहरीकरणाचे बदललेले अर्थ, त्याचा मानवी आयुष्यावर झालेला परिणाम, मानवी मूल्यांमध्ये घडून आलेला कमालीचा बदल, स्वार्थ, विचारधारा या साऱ्या घटकांचा अंतर्भाव तिसऱ्या टप्प्यात होतो.

याच तिसऱ्या टप्प्यात 2001 सालचं ट्विन टॉवर पाडलं गेल्यानंतर एंड ऑफ आयडीयोलॉजीचा जो गवगवा करण्यात आला होता त्याचा सर्वात जास्त व्यापक परिणाम भारतासारख्या चळवळींचं आणि कार्य़कर्त्यांचं मोहोळ
जपणाऱ्या देशावर झालेला आहे. याबाबतचं विवेचन फारच थोड्या समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ते सहजपणे उपलब्ध आहे. वाचता येईल.

मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्सने प्रोग्रेसिव्हीजम च्या अंध आणि बेसुमार अंगिकारामुळे होणाऱ्या परिणामांची जी मांडणी केली होती तीच मांडणी दुसऱ्या टप्प्यात अख्ख्या जगाने पाहीली. त्यानंतर जगात नवीन विचारप्रवाह सुरू झाले. आणि युद्धाच्या परिणामांमुळे संवेदनशील झालेल्यांनी मार्क्स आणि एंजल्स ने सुचवलेल्या, मांडणी केलेल्या प्रोग्रेसेव्हिजमचा अॅक्सेप्टंस करायला सुरूवात केली. युरोपातून आलेल्या या प्रागतिक वादात फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वांचा प्रचंड मोठा रोल होता. इथं मी युरोपातून आलेल्या थॉट बद्दल बोलत आहे. हा थॉट भारतात अतिशय वेगानं दाखल झाला तो १९२० ते १९२५ च्या सुमारास. इथे पुन्हा एक गोष्ट अधोरेखित व्हावी ती अशी की मी इथे तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलत आहे.

पुरोगामी हा शब्द मराठी भाषेतला. पण संपूर्ण भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळीसाठी प्रागतिक, प्रगतीशील हिदीसाठी, तर ऊर्दू भाषेनं तरक्की पसंद शब्द स्विकारला खरा पण जाहीर संबोधनात त्यांनीही प्रगतीशील शब्दाला मान्यता दिली.
ब्रिटीशपूर्व भारतात पहिली प्रोग्रेसिव्ह संघटना उभी राहीली. ( इथे मी संघटना म्हणत आहे.)

ही संघटना होती…
अंजुमन तरक्की पसंद मुस्सनाफिन-ए-हिंद …
ज्याचे इंग्रजी नाम हे प्रोग्रेसिव्ह रायटर्स होते तर
हिंदी आणि मराठी वृत्तपत्रात त्यांचा उल्लेख हा अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ म्हणूनच केला जात असे. ही संघटना प्रागतिक विचारांच्या ऊर्दू लेखक-कवी-शायर-गझलाकारांची चळवळ होती. जी संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत असे. उपलब्ध कागदपत्रांवरून असे लक्षात येते की ही चळवळ सर सय्यद अहमद यांच्या चळवळीच्या ताकदीची होती. यातील सर्वच लेखक-कवी हे डाव्या विचारांचे होते.

आणि हे बिल्कूल नाकारून चालणार नाही की भारतात प्रोग्रेसिव्ह चळवळ ही डाव्यांनीच आणली. भारतातला थॉट हा नंतर त्यात जोडला गेला हा भाग वेगळा. या चळवळीची सुरूवात 1930 च्या दरम्यानची. लंडन, कोलकाता पासून देशातल्या मोठमोठ्या शहरात ही चळवळ पसरली होती. या चळवळीनेच भारताला आणि पाकिस्तानला फैज अहमद फैज, मंटो, ईस्मत चुगताई, साहीर लुधयानवी सारखे विचारवंत, कृतीशील कलावंत दिले.

दुसरा सगळ्यात मोठा पाया भरला गेला तो स्वातंत्र्योत्तर भारतात… जेव्हा सदानंद बाकरे, हरी अंबादास गाडे आणि त्यांच्या सात आठ साथीदारांनी मिळून 1960 च्या दशकात बाँम्बे प्रोग्रेसिव आर्टिस्ट ग्रुपची स्थापना केली. कलेच्या प्रांतातील हा सर्वात मोठा बदल होता. या सोसायटीनं सत्तांतरण झाल्यानंतर आलेल्या सरकारकडून जे अपेक्षाभंग झाले त्यावर कडक ताशेरे ओढायला सुरूवात केली. ते ही आपल्या कलेतून. चित्रांतून. फोटोतून. त्या सहाही चित्रकारांची नावे आता आठवत नाहीत. शोधून जरूर टाकेन. ते सर्वच्या सर्व डावे होते. मार्क्सवादाने प्रभावित होते. त्यांनी भारतीय परिप्रेक्षातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलेतून भाष्य केलं. एम एफ हुसैन सुद्धा याच परंपरेचा भाग.

पण दूर्दैव असं होतं की. या चळवळीचं नेतृत्व स्वातंत्र्यानंतर समाजातील सवर्ण आणि सर्व प्रकारच्या सत्ता उपभोगणाऱ्या समुहाच्या प्रतिनिधींकडेच राहीलेले होते. त्यामुळे डाव्यांखेरीज फारसे कुणी आलेले नव्हते. साठच्या दशकात समाजवाद्यांनी या परिघात स्वतःला जोडून घेणे पसंत केले परंतू परत मुद्दा तोच उद्भभवला अॅप्रोप्रिएशन आणि लीडरशीपचा. तिथं मागासवर्गीयांना तेव्हा कोणतं स्थान होतं ना नंतरच्या काळात मिळेल असं काही वाटलं … त्यातूनच मग मागास चळवळींनी स्वतःचे परिघ उभारले. स्वतःचं साहित्य डेवलप केलं आणि पँथरसारखी संघटना सुद्धा…

प्रोग्रेसिव्ह असणं म्हणजे केवळ उजव्यांविरोधात बोलणं नाही. विरोध करताना सशक्त विद्रोह आणि त्याला पुरक साहित्याची संसाधनाची उभारणी मांडणी करणे गरजेचे असते. ते दूर्दैवाने ऐंशीच्या दशकापासून झालेले नाही.
ही संकल्पना सवर्णांनी दोन प्रकारे वापरून घेतली…
1. स्वतःचा गिल्ट काँशीयसनेस लपवण्यासाठी
2. स्वतःचं उजव राजकारण शाबूत ठेवण्यासाठी त्यांना एका शत्रुची गरज लागते म्हणून… पुरोगामी चळवळीला बदनाम करणे, संकल्पनेला, थॉटला बदनाम करणे घडते…

भारतात मुस्लिम आले आणि मुसलमानांना जात चिकटली. ख्रिश्चनांना चिकटली… मग प्रागतिक चळवळ कशी अपवाद राहील… बरं…

क्रमशः

Advertisements

माझे पुरोगामीत्वाचे आकलन

पुरोगामी ही संकल्पना वेगळी. पुरोगामीत्व वेगळं आणि पुरोगामीत्वाचे वाहक वेगळे. मला पुरोगामीत्वाचे असलेले आकलन या तीनही संज्ञांचे योग्य आणि सैंद्धांतिक पृथ्थःकरण केल्यानंतरच आलेले आहे. ते असे.

भारतात सध्या पुरोगामी विचारधारेचे दोन मूळ प्रवाह नांदत आहेत. ते दोन प्रवाह म्हणजे बुद्ध, महावीर, चार्वाक यांच्या परंपरेतून आलेला प्रगतीचा मार्ग. ज्याची भाषिक अंगाने जरी फोड केली, त्याची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती शोधली तरी प्रागतिक या शब्दाने होते. पुरोगामी हा शब्द फार नंतरच्या काळातला.

दुसरा प्रवाह हा पाश्चात्य जगात असलेला प्रोग्रेसिव्हिझम नावाचा थॉट जो युरोपात जन्माला आला कालांतराने बदलत गेला. बदलत गेला म्हणण्याऐवजी तो अपडेट होत गेला असे म्हणणे जास्त उचित ठरेल. तो प्रोग्रेसिव्हीजम ब्रिटिशांच्या आगमनासोबत भारतात दाखल झाला.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही विचारप्रवाहासंबंधी बोलायचे झाल्यास सध्या भारतात पाश्चात्य विचारांतून आलेला प्रोग्रेसिव्हिजमच कार्य़रत आहे असे म्हणण्यास बराच वाव आहे. कारण 1947 पूर्व भारतात जेव्हा भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता त्या काळात प्रतिक्रांतीनंतर बाबासाहेब येईपर्यंत बुद्ध विचार इथल्या मातीला शिवला नव्हता. महावीरांच्या एकुण विचारांत जितकी भेसळ झाली ते आजचे जैनांचे रुप पाहील्यानंतर आपल्या लक्षात येईलच. जोतीबा फुल्यांचा वैचारिक आधार हा पाश्चात्या शिक्षणाचा होता पण त्यांचे कार्य इथल्या मातीतले होते. त्यांचे एकुण कार्य़ रेनिसांसच्या कालखंडातील कार्याच्या दहापट अधिक तीव्र होते. त्याची पृष्ठभूमीही तेवढीच तीव्र होती. त्यामुळे या विषयावर आपण कालांतराने येऊ.

जगभरात जे पुरोगामीत्वाचे प्रवाह आहेत त्याची सुरूवात युरोपात झाली. त्याला थॉट ऑफ प्रोग्रेसीव्हिजमचे नाव देण्यात आले. या थॉटची अनेक महान राज्यशास्त्र तज्ञांकडून सैद्धांतिक मांडणी करण्यात आली आहे. त्यांच्या व्याख्या लिहील्या गेल्या. एवढेच नव्हे तर त्या व्याख्या क्रमाक्रमाने बदलत रहाव्या यासाठी मोठा वाव सुद्धा ठेवला गेला. याचं संज्ञापण जपताना युरोपीयन आणि अमेरिकन तत्ववेत्यांनी सुरूवातीला या मॉडर्निटी असे म्हटले. कालांतराने याचे रुपांतरण आयडीया ऑफ प्रोग्रेस असे केले गेले.

आयडीया ऑफ प्रोग्रेस मधूनच जन्माला आला मॉडर्न लिब्रलिझम.. ज्याचा जनक होता जॉन स्टुअर्ट मिल. मॉडर्न लिब्रलीझमच्या संकल्पनेला अधिक पुढे नेलं ते कार्ल मार्क्सने कार्ल मार्क्स हा जॉन स्टुअर्ट मिल पेक्षा बारा वर्षांनी लहान होता. मार्क्सने मॉडर्न लिब्रलिझम ला अधिक खोलात जाऊन डेवलप केलं. डेवलप करण्यासोबत त्यावर सडेतोड टिकाही केली. मार्क्सचं म्हणणं होतं ते असं…

मॉडर्न लिब्रलिझम हा ज्या प्रोग्रेसची, प्रगतीची भाषा करतोय ती भाषा गरीबी विरूद्ध शहरीकरण अशी आहे. विचारांतील प्रगती म्हणून ज्या प्रोग्रेसिव्हीजमची चळवळ सुरू झाली होती तीचे रुपांतरण दोन टप्प्यांत झाले आहे. पहिले म्हणजे, प्रगतीचा मार्ग म्हणजे चांगले नागरिक होऊन सर्व सुखसोयी, संधी मिळवणे… दुसरं… त्यासाठी शहरीकरण, औद्योगिकिकरण यांच्या वाढीसाठी वाव देणे. या प्रोसेसमध्ये गरीबीचा धाक दाखवून आणलेले लोक ही मानवी यंत्रे म्हणूनच इथल्या शोषकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या कोणत्याही समुहाने प्रोग्रेसीव्हीजमची भाषा करणे हे निव्वळ फसवे आहे.

(वरिल परिच्छेदाच्या संदर्भासाठी मार्क्सच्या लेखनातील लिनिअर प्रोग्रेसिव्ह हिस्टरी चाळता येईल.)

तर अशा पुरोगामी संकल्पनेला युरोपातून, अमेरिकन विद्यापीठातून गृहितकांचे अधिष्ठान मिळाले. तो थॉट प्रोसेस म्हणून अभ्यासक्रमात स्विकारला गेला. त्यावर थेअरी लिहील्या गेल्या. त्या थेअरी कालानुरूप अपडेट होत राहतील याची काळजीही घेतली गेली. आजही घेतली जाते. रॉबर्ट निस्बेट ने जे कथन करून ठेवलं, जे गृहीतक मांडून ठेवलं ते आज समोरासमोर घेऊन त्या आधारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामुहिक आणि राजकीय प्रागतिक वादाची काय सुत्रे आहेत, त्यांची मांडणी कशी करावी, त्याचे आकलन कसे असावे याची एक संहिता उपलब्ध आहे. त्या संहितेला युरोपीयन एका सशक्त समाजाच्या पायाभरणीची मूल्ये म्हणून स्विकारतात. आचरणात आणतात. भले त्या प्रोग्रेसिव्हीजमला डाव्या चळवळीचा सौम्य भाग अथवा उदारमतवाद म्हणत असले तरी युरोपातले भांडवलवादी देश आणि भांडवलवादी नागरिक प्रोग्रेसिव्हीजमला आपलंसं करतात. कारण ती संकल्पना त्यांनी मिळून आकाराला आणली. त्यासंदर्भातले अनेक किस्से घटना सांगता येतील.

पण भारतात यापैकी काय घडले आहे. पुरोगामी ही संकल्पना, हा शब्द कसा प्रचलित झाला? त्याची उत्पत्ती आणि व्यूत्पत्तीचे श्रेय कुणास द्यावे. त्याची भारतीय परिप्रेक्षातील मांडणी काय ? त्यात किती संशोधकांनी तत्ववेत्त्यांनी, सैद्धांतिक भर घातलीये ते जाणून घेणे येणाऱ्या पिढीपर्य़ंत पोहोचवणे हे खुप महत्त्वाचे आहे. असे किती लोकांना कधी पासून वाटते आहे?

जर फार आधीपासून वाटत असेल तर भारतातील पुरोगामी चळवळीचा आर्थिक कार्यक्रम काय ? किमान जमीन धारणेच्या समस्येवर तोडगा काय? आर्थिक बाबींवर नेमकी भूमिका काय ? धार्मिक बाबींवर युरोपाने चर्चला आव्हान दिले. पोपला आव्हान दिले. भारतातील लोक देव, पुजाऱ्यांना आव्हान देतील काय ? मनुष्यबळ वाया घालवणाऱ्या वारी, मिरवणूका, मूर्तीपुजांना आव्हान देतील काय ? त्यासाठी प्रत्येक संकल्पनेची राज्यशास्त्राच्या हिशोबाने जडणघडण होणे गरजेचे असते. म्हणून रॉबर्ट निस्बेट म्हणाला होता. प्रोग्रेसिव्हीजम ची योग्य मांडणी आणि बांधणी ही सशक्त समाजाचा पाया असते.

क्रमशः

अजून पुढे भरपूर आहे…

किस्सा क्रं. 29 – कार्यकर्ता…

महिन्याभरापूर्वीची गोष्ट.. अंबरनाथ ते मुंबई या एक तास पन्नास मिनिटांच्या प्रवासात आमच्या अपंगांच्या डब्ब्यात दर दिवशी एखादं न एखादं कॅरेक्टर गवसतंच. तसाच किस्सा झाला. घरातून थोडं चिडचिड करून निघालो होतो. मुंबईला जायचं होतं. अंबरनाथ वरून साडेदहाची लोकल पकडली. खोपोली रिटर्न लोकल एकदम खच्चाखच गर्दी घेऊनच आली होती. पण तरी नित्यनेमाने तीच लोकल पकडायची हा शिरस्ता ठरलेला. नेरळ आणि वांगणी ला सगळ्या ब्लाईंड बांधवांची जत्रा एकसाथ डब्ब्यात चढते आणि साडे दहाच्या आसपास कल्याण वरून सुटणाऱ्या सगळ्या मेल एक्सप्रेस मध्ये फिरती विक्री करायला कल्याणलाच उतरते. मग काय जागा फिक्स मिळणारच. असाच त्या दिवशी नेहमीप्रमाणे गाडी धरली. नोव्हेंबरचा पहिला आठवडा होता. कल्याणला गाडी रिकामी होताच एक भांबावलेला इसम गाडीत चढला.

ऐ बाजू व्हा .. बाजू व्हा .. मला बसायचंय.. अंगावरचे मळलेले कपडे पाहून कोणी बाजूला बसायला देईल याची शाश्वती नव्हती. बोलायचा सुर एकदम बेवड्यासारखा.. पण वास काही येत नव्हता. फक्त शुद्ध हरपल्यासारखं भासत होतं. कोणीही आपल्यासाठी जराही जागचं हललेलं नाही हे हेरखून तो लगेच उत्तरला..

बसा बसा मी काय तुमच्या बाजूला बसायचो नाय.. तिकडं दादरला दर्याला भरती आलीये.. भरती आलीये रे दर्याला .. माझा बाबा गेला.. माझा बाबा गेला… बाबासाहेब मी तुला जय भीम करायला येतोय.. नामांतर तर होणारचं..

माझ्याच विचारात गर्क असणारा, स्वतःशीच चिडचिड करणारा मी फटकन भानावर आलो आणि त्या अनोळखी माणसाकडं नीट निरखून पहायला लागलो. कपडे ठिगळानं भरलेले होते.  हातात दोन पिशव्या होत्या. पायांना जखमा झालेल्या होत्या. हातही तशाच अवस्थेत. थोडासा गतीमंद इसम..

तरी रहावलं गेलं नाही.. विचारायला जाणार तोच इतक्यात माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने आणि त्याच्या पत्नीने त्यांना हाताने धरून उचलंलं सीट वर बसवलं… हसऱ्या चेहऱ्यानं जय भीम केला. आणि विचारलं दादा कोण तुम्ही ?

उत्तर आलं माहीत नाय.. ही पिशवी घ्या. पिशवी उघडली. त्यात लॅमिनेटेड केलेलं एक पत्र मिळालं. स्पष्ट लिहीलेलं होतं.

आपणास भेटलेली ही व्यक्ती माझे बाबा आहेत. मराठवाड्यातल्या फुलंब्री तालुक्यात नामांतर लढ्यात लढताना पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे सदर इसमाची अवस्था अशी झालेली आहे. ते कायम घरातून परागंदा होऊन दादरच्या दिशेने निघतात. आपणास हे कुठेही भेटले तर प्लीज माझ्या नंबरवर फोन करा..

ते वाचताक्षणीच माझ्या बाजूला बसलेल्या दांम्पत्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. त्यांनी जराही वेळ न दवडता तात्काळ त्यांच्या मुलाला फोन केला. तुमचे वडिल आम्हाला कल्याणला भेटले आहेत. आम्ही त्यांना परत संध्याकाळच्या गाडीने पाठवतो आहोत भंडाऱ्याला.. तुम्ही रिसिव्ह करायला स्टेशन वर या.. मुलाने उत्तर दिले की भायखळ्याला माझी बहिण राहते मी तीला सांगतो लगेच अर्ध्या तासात ती स्टेशनवर घ्यायला येईल. हा सगळा प्रकार चालू असताना गाडीने डोंबिवली सोडलं होतं. कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्यात दिसणाऱ्या खाडीला पाहून त्या चळवळ्या इसमाला काय जोश आला काय माहित. भायखळ्यापर्यंत वामनदादांची अख्खी गाणी गात राहीले. भायखळा स्टेशनवर मी आणि ते दांम्पत्य त्या चळवळ्या काकांना घेऊन उतरलो. अर्ध्या तासाने त्यांची मुलगी स्टेशनवर आली आणि वडिलांना घरी घेऊन गेली..

पण खरं सांगतो … तो काका तर गेला लेकीच्या घरी .. पण त्याचे शब्द, त्याचा आवाज आणि त्याची तळमळ कानात, मनात अजूनही शाबूत आहे. त्याच्या एका पिशवीत तर कागदं होती. आणि दुसऱ्या पिशवीत परफेक्ट पॅकिंग केलेलं पांढरा शर्ट आणि पँट, माझे बाबासाहेब हे पुस्तक आणि प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक असलेली निळीची पुडी.  कार्यकर्ता मार खाऊन गेला.. पण त्याला आजवर माहीत नाही की नामांतर झालंय.. मुलगी स्टेशनवरून घरी घेऊन जाताना एकच वाक्य म्हणत होती… दादा चला उद्या कवाडे सरांचा मार्च मुंबईला पण येणार आहे…

वैभव छाया

मौन

या टूकार कवितेला सुरूवात करण्यापूर्वी
एक मिनिट मौन धरू
70 व्या स्वातंत्र्यदिनाला
देश स्वतंत्र होऊन झालेल्या शोकांतिकेला
वंदन म्हणून एक मिनिट मौन धरू

तुमच्यासाठी एक मिनिट
मी माझ्यासाठी पूर्ण दिवस राखून ठेवलाय
माझं मौन एक दिवसाचं
दादरीत मारल्या गेलेल्या अखलाख साठी
अन् नंतर माजवलेल्या दंगलीत
मरून पडलेल्या निष्पापांसाठी

दिवस ढळला की
पुन्हा मौन धरेन मी एक आठवड्यासाठी
रोहिथ वेमुलाचं शेवटचं पत्र वाचेन पुन्हा पुन्हा
त्याची डायरी वाचून हतबल झालेला मी
मौन धरूनच राहीन
नंतर आठवडाभरात काही वाचणं शक्य होणार नाही

आठवडा ढळला की
पुन्हा मौन धरेन मी एका महिन्यासाठी
शहरागणिक बदलून शरिर ओरबाडलेल्या पोरींसाठी
ज्यांच्या पोस्टमॉर्टम वाल्या बॉडीलाही नजरा अस्पृश्य नाहीत
त्या झाडांवर गळ्यानं लटकून पडलेल्या
मढ्यासाठी महिन्याभराचं मौन धरणारे मी

पुढचं मौन असेल माझं वर्षभरासाठी
दर सहा मिनिटाला होणाऱ्या अॅट्रोसिटीसाठी
दिवसाकाठी एका बलात्कारासाठी
महिन्याच्या दहा खुनांसाठी
वर्षाला पडणाऱ्या लाखभर मुडद्यासांठी
दंगली घडल्यानंतर
घरं-दारं दप्तरं-पुस्तकं पेट घेतात
त्या आगीत जळणाऱ्या भविष्यासाठी
सोशल मिडीयाच्या कुट्टून भरलेल्या जातीयवादासाठी
गरज नसूनही पिंडाला शिवणाऱ्या सोशालिस्टांसाठी
अन् डाव्या आईतखोरीसाठी

हे मौन
जमीनी हिसकावून बेघर केलेल्या लोकांसाठी आहे
गिरण्या बळकावून कामगारांच्या मढ्यांच्या राशीवर
उभ्या राहीलेल्या ग्लास जंगलसाठी
इतकी सुंदर इमारत
कुणाच्या मढ्यावर उभी राहील का बरं ?
माझं मौन त्या प्रत्येक निष्पापासाठी
ज्याचा जीव चिरडला बलिदानाच्या जात्याखाली
ज्यांना रोखून धरलंय बंदूकीच्या नळीवर

हे मौन त्या सर्वांसाठी
ज्यांना अॅकडमिक् वाले गिनतीत धरत नाही
जे पुस्तकात नाहीत शाळा कॉलेजाच्या
ज्यांना मिडीया धरते अदृश्य म्हणून ग्रांटेड
ज्यांचा सोयीसाठीही कथांमध्ये होत नाही उल्लेख
अशा सर्वांसाठी मी मौन धरत आहे

ही कविता ऐकण्यापूर्वी
शक्य असेल तर काळे चष्मे घालून घ्या
डोळ्यांना काही वावगं दिसणार नाही
कानांच इयरप्लग टाकून बसा
किंकाळ्या ऐकण्यापासून बचावाल
मोबाईल एअरप्लेन मोडवर टाकून ठेवा
हॉलचा एसी बंद करा
जी जी यंत्र करता येतील बंद
ती सारी बंद करा

मग प्रवेश होईल आपला सर्वांचा भयाण शांततेत
जिथं मला मग कविता ऐकवण्याची गरज भासणार नाही
हा तोच मिनटभर आहे
मौन धारण करण्याचा

वैभव छाया

 

नारळ फोडण्याची अघोरी प्रथा

आजही घराघरात अमावस्येच्या दिवशी नारळ फोडण्याची प्रथा आहे. एखादं नवीन काम विशेषतः बांधकाम सुरू करण्यापूर्वी पायाभरणी करण्याच्या जागेवर नारळ फोडण्याची परंपरा हिंदूस्तानी जनतेत फार पूर्वीपासून रूढ आहे. त्या प्रकाराला नारळ वाढवणे असे म्हणतात. पुजेच्या वेळेस नारळ फोडल्यानंतर पुजारी ब्राह्मणाकडून मस्त सुरस भाषेत कथा ऐकवली जाते नारळ वाढवण्याबद्दलची. अमावास्येला मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात. नारळ फोडल्याने पॉझिटिव एनर्जीचा संचार अधिक होतो म्हणून नारळ फोडले जाते. घरभरणीला लाल कापडात तंत्र फुकून नारळ लाल कापडात बांधून वर कुठेतरी लटकवले जाते. वर्षानुवर्षे ते नारळ तसेच राहते.

जेजुरीला लंगर तोडताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. घरची चौकट बांधून झाली की चौकटीला दरवाजा लावण्याआधी घरातल्या कर्त्या पुरूषाकडून नारळ चौकटीवर फोडून घेण्याची प्रथा आहे. यात नारळ उभा फुटावा यासाठी मिस्त्रीकडून आग्रह धरला जातो. असो.. बरंच काही आहे.

नारळच का फोडतात..
नारळा हा गोलाकार, वर शेंडा, केसांची रचना. नारळाला दोन डोळे असतात. त्यात पाणी असतं.

मनूस्मृतीचं राज्य अंमलात आणल्यापासून नरबळीचा प्रकार रुढ झाला. मला आता या घडीला मनूस्मृतीतील तो श्लोक आठवत नाही. पण नव्या बांधकामाच्या ठिकाणी महाराचं डोकं आपटून फोडलं जाई. त्याच्या कवटीतून निघालेल्या रक्तानं पायाभरणीची जमीन ओली केली जाई. चौथऱ्यावर रक्त शिंपडलं जाई.

विधू विनोद चोप्राचा एकलव्य नावाचा सिनेमा आहे. त्यात संजय दत्तला एक डायलॉग आहे.
“जैसे तुम लोग अपनी घर की सुरक्षा के लिए नारियल फोडते हो ना.. वैसे ही राजा लोग अपने महलो के लिए अछुतो का सिर फोडकर अपना गुडलक बनवाते थे। इस हवेली की दिवारो में अछुतो को दफनाया जाता था।

इंग्रज येईपर्यंत ही प्रथा राजरोसपणे सुरूच होती. पहिला सुरूंग लागला तो 1830 साली. १८३० मध्ये इंग्रजांनी नरबळी प्रथा बंदी घातली. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हण शुद्र स्ञी-पुरूषांना मंदिराच्या ठिकाणी डोके आपटुन त्यांचा बळी घेतला जायचा. ती प्रथा कायद्याने बंद केली. त्यानंतर १८६३ मध्ये इंग्रजांनी एक कायदा बनवून चरक पुजा करण्यावर प्रतिबंध घातला. आलिशान वास्तू किंवा पूल तयार करताना शुद्रांना पकडून जिवंत गाडले जात असे. असे केल्यास वास्तू आणि पूल खूप वर्षांपर्यंत टिकून राहतात अशी समजूत होती.

मनूस्मृतीच्या ठिकाणी कायद्याचे राज्य आल्यानंतर ब्राह्मणी सत्तेने धर्मसत्ता टिकवण्यासाठी नारळाचा वापर सुरू केला. आजही नारळ अर्पण होणाऱ्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी धर्मसत्ता आणि आर्थिक सत्ता ताब्यात ठेवण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणच्या मंदिरात विविध भाकडकथा रचून नारळ अर्पण करण्याऐवजी फोडण्याच्या प्रथा सुरू केली.

जेजुरीला खोबरं अन् हळद खाण्याची प्रथा आहे. ही प्रथा खंडेरायाच्या कालावधीत सुरू झाली. जेजुरीच्या परिसरात राहणारी रयत सर्दी, खोकल्यानं बेजार होती. त्यावर उपाय म्हणून सैनिकांनी जेजुरीच्या गडावरून भंडारा उधळला. आणि रयतेला खोबरं खाण्यास सांगितले. अँटीबायोटिक असणाऱ्या हळद आणि खोबऱ्यानं मेळ साधला. नंतर ती प्रथा रुढ झाली ती आजवर कायम आहे.

मी पहिली दुसरीत असेल तेव्हा आजीला विचारलं होतं.. नारळ फोडताना नाव घेतात ते कुणाचं असतं.. आज्जी सांगायची.. जागेवाल्या बाबाच्या नावानं नारळं फोडतात. आपण ज्या जागेवर राहतो त्या जागेवाल्या बाबाच्या नावानं. कुप्रथा वरच्या थरातून सुरू होतात. खालच्या थरांत अंधाधुंद पाळल्या जातात.

लोक म्हणतात प्रसाद म्हणून फोडलेल्या नारळाचं खोबरं नको खाऊ. पदार्थ म्हणून खा. मी तो ही नारळ खातो. काही वाईट वाटत नाही. स्मशानात ही मुद्दाम नारळ खातो. भले ते भयंकर जळालेलं असेल तरी तेव्हा तिथल्या उपस्थितांच्या भयावह नजरा पाहताना मला मजा येते. तीनशे डिग्रीपेक्षा जास्त जळाल्यावर शेटाची जंतू जीवंत राहतात होय तिथं. तर असो..

म्हणून भाषेतही आजवर नारळ वाढवला. शुभमंगल हो. जागेवाल्या बाबाच्या नावानं सारखे प्रकार ठरवून टाळतो. कुणी लिहीलेलं असेल तर ते वाचणंच नाकारतो. ठरवून कराव्या लागतात ह्या गोष्टी.

नरबळी अजूनही संपलेली नाही. ती प्रतिकात्मक स्वरूपात अजूनही जीवंत आहेच. आजही गणपतीला पाच नारळांचं.. दहा नारळांचं तोरण लावलेलं असतं नाट्यगृहात शिरतो तर पडद्याच्या मधोमध एक नारळ फोडून ठेवलेला असतो. सिनेमाचं शुटिंग सुरू करण्यापूर्वी नारळ फोडून मुहूरत शॉट दिला जातो. तेव्हा तिथल्या नारळाच्या तोरणांत मला मला रायनाक महाराच्या पूर्वजांच्या कवट्या तिथं त्या तोरणाला लागलेल्या दिसतात. आणि दोरीला शेठजींच्या पैंशांच्या माळा.

वैभव छाया

स्पेशली एबल्ड

दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी ट्रेन पकडली. डब्यात नेहमी सारखी चर्चा सुरू होती. अमजद शेख नावाचे एक अंध गृहस्थ आहेत. रोज कल्याणहून ते गाडी पकडत. भायखळ्याला एसबीआय मध्ये कामाला आहेत. आमची चर्चा आली ती तीक्ष्ण नजरेवर. त्यांनी सहज म्हटलं, चल वैभवा आज पैज लावतो तुझ्याशी. मी विचारलं कसली पैज.. ते म्हणाले.. आता दिवा क्रॉस होऊ आपण. पारसिकचा बोगदा लागेल. बोगद्यात किती बल्ब लावलेत ते सांगायचे आणि सोबतीनं किती बल्ब चालू होते आणि बंद ते सुद्धा मोजून सांगायचे. जर तु जिंकलास तर संध्याकाळी येताना ठाण्याला चौबेकडून समोसे तू घ्यायचे आणि मी हरलो तर भायखळ्याला माझ्याकडून खिमा पाव. मी पैज झटकन स्विकारली. दिवा क्रॉस झालं. दादू हाल्या पाटील चा बंगला पुन्हा एकदा वाकूल्या दाखवून नजरेआड झाला. मुंब्रादेवी दिसू लागली तसंतसं मी मनातल्या मनात तयारी करू लागलो. खिडकीजवळ डोळे एकदम ताणून लावून बसलो. म्हटलं आज मोजायचेच. तेवढी खिमा पावची सोय होईल. आता डब्यातले काही सिंधी हातात प्लास्टिकच्या पिशवीत गाठ मारलेले पाव खाडीत टाकायला उभे राहीलेले पाहून मी पण तयार झालो होतो. कारण प्रश्न डोळे असणाऱ्यांच्या इज्जतीचा वगैरे वैगेरे होता. जसं प्लास्टिकच्या पिशवीला गाठ मारून पाव पाण्यात सोडल्यावर खाडीतले मासे गाठ सोडवूनच पाव खाणारेत असल्या भ्रमात जगणारे आम्ही डोळस लोकं अंधाकडून हरलो तर लैच इगो दुखावेल ना आपला म्हणून तयार झालो. गाडी फुल्ल स्पीड मध्ये बोगद्यात दाखल झाली. तोच मागच्या डब्यातून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. जय अंबे जय अंबे.. मी लक्ष विचलित होत होत सगळे बल्ब मोजले. गाडी बोगद्यातून बाहेर आली. कान थोडे बधीर झाले होते. डोळ्यांवर पुन्हा आलेल्या प्रकाशाने थोडंसं हायसं वाटलं होतं.

 

BrailleMaleBF26jan2016

अमजद भाऊंना म्हटलं भाऊ.. एकुण 42 बल्ब आहेत. आणि दोनच बंद होते. त्यांनी फटदिशी मध्येच टोकलं आणि म्हणाले. एकुण एकुण बल्ब 46.. त्यातले बंद सहा. दुसऱ्या अंधाने सुद्धा अमजद भाऊं ना दुजोरा दिला. आता मी पैज हरलो होतो हे कबूल करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण 46 च कसे या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काही स्पष्टिकरण दिले. ते असे…

 

  1. गाडी बोगद्यात शिरताना हवेच्या दाबामुळे आपले कान थोडे बधीर होतात तेव्हा गाडी बोगद्यात शिरली हा संकेत असतो. बोगद्याच्या दोन्ही बाजूस.. सुरूवातीला आणि शेवटाला असलेले दोन दोन बल्ब असतात. ते दिवसा सूर्याच्या प्रकाशात दिसत नाहीत. ते तु मोजले असावेत असे मला वाटत नाही.

 

  1. हरेक बल्ब नंतर किमान तीन सेकंदांचा पॉज असतो. एक हलकासा प्रकाश आमच्या डोळ्यांवर चमकून जातो. तेव्हा एक बल्ब गेला हे गणित पक्क असंत. पण सहा सेकंदाच्या किंवा नऊ सेकंदाच्या अंतरानंतर ही प्रकाश चमकून गेला नाही तर समजावं की बल्ब चालू नाहीत.

 

  1. आता गाडीचा वेग ह्या मोजणीवर प्रचंड मॅटर करतो. गाडी स्लो असेल तर हे आवर्तन पाच ते सात सेकंदांवर जातं. ते गणित वेगानुसार नव्या सुत्राने सोडवावं लागतं.

 

अमजद भाईकडे हार कबूल केली. संध्याकाळी त्यांच्या वेळेला ठरलेल्या गाडीत चढलो ठाण्याहून. ते ही पैजेत कबूल केलेले समोसे घेऊन. रात्रीचा अंधार असल्याने आता बोगद्याच्या सुरूवात व शेवटाकडचे न मोजलेले चारही बल्ब मोजले. बंद असलेले बल्बही मोजले. अमजद भाऊंचं उत्तर बरोबर होतं. माझं चुकलेलं होतं. दृष्टी असूनही आता मी अंध ठरलो होतो.

वैभव छाया

आई एक नाव असतं…

शाळेतल्या वर्गात दोन मुलं होती सोबतीला. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांत बरीच साम्य होती. दोघांनाही आई नव्हती. आमच्यापैकी कुणीच त्यांना दहावी पर्यंत हसलेलं पाहीलंच नव्हतं. बापाच्या छत्रछायेत वाढलेली पोरं काहीतरी अजाण दुःखानं ग्रासलेली. लहानपणापासून अनेकांच्या सहानुभूतीवजा अत्याचाराला बळी पडलेली.

पहिली किंवा दुसरीला असू. फारसं आठवत नाही. राज्याच्या नकाश्यावरही स्थान नसलेल्या विठ्ठलवाडीतली राजे शिवाजी विद्यालय. पाच बाय पाच चे कोंदट वर्ग. शाळा सुटली रे सुटली मुलं आपल्या आयांना बिलगून घराची वाट धरायची. ती दोघं पोरं बापाच्या हातात करंगळ्या सोपवून रस्ता कापताना दिसायचे. त्यांच्याकडे बघून इतर मुलं म्हणायची.. “आई-आई… तीला ना आई नाहीए…” त्या वयात ते वाक्य फारसं लागत नव्हतं. आता त्याची तीव्रता कळतेय. कदाचित हाच त्रास अत्याचार बनून त्यांच्या अबोलपणाला कारणीभूत ठरला असावा. तो अबोला स्वभाव दहावीपर्यंत कायम होता.

आठवी ला शाळा बदलली गेली. शिरस्त्याप्रमाणे उल्हासनगरच्या उल्हास विद्यालयात दाखल झालो. पण ही पोरं होती त्याच स्थितीत. त्या दिवशी आमच्या मराठीच्या शिक्षिका रजेवर होत्या. बदली शिक्षिका म्हणून शहाणे मॅडम वर्गावर आल्या. तशा शहाणे मॅडम आमच्या सर्वांच्या लाडक्या. त्या आल्या अन् म्हणाल्या. आज तुम्हाला एक शिकवेन. खरं तर ती तुम्हाला वर्षाच्या शेवटी शिकवायला हवी पण  मी आज शिकवतेच.

अट एकच कोणीही पुस्तक वर काढायचं नाही. जमलं तर बाकांवर मस्त मांडी घालून बसा. आपापली दप्तरं भरून घ्या. शाळा सुटली की घाई नको. आम्ही सर्व मुलांनी होकार दिला. बाईंनी कवितेचं वाचन सुरू केलं. त्याआधी कवीबद्दलची जुजबी माहीती वगैरे सगळं सांगितलं. दुध अन् दुधावरची साय, गाय-वासरू यांच्यातलं अबोल नातं वगैरे वगैरे जेवढं सांगता येईल तेवढं नीट प्रेमानं, आईच्या मायेनं समजावून सांगितलं. बाईंच्या शब्दागणिक आम्ही भान हरपून गुंग होत चाललो होतो. ट्रांस काय असतो ते त्या वेळेस अनुभवलं होतं. त्या क्षणाला फक्त बाईंच्या आवाजाकडेच लक्ष होतं. अन् बाईंनी कवितेचं पहिलं कडवं वाचून काढलं.

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

वर्गातल्या एकुण एका मुला-मुलींच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आपण का रडतोय याचं साधं भान सुद्धा कुणाला नव्हतं. बाईंनी अख्खी कविता ज्या आवेगात वाचली त्यानं आम्ही सारे शहारून गेलो होतो. पण याचा सगळ्यात जबरदस्त परिणाम झाला तो त्या दोन मुलांवर…

ती मुलं त्या दिवशी प्रचंड रडली . कदाचित त्यांच्या जन्मापासून ते आजवरच्या पंधरा वर्षांच्या आयुष्यातलं सगळं रडणं त्यांनी पहिल्यांदाच बाहेर काढलं असावं. कदाचित बाईंना सुद्धा तेच अपेक्षित असावं. बाईंनी हातातलं पुस्तक उपडं तसंच टेबलावर ठेवलं. त्या पोरीजवळ गेल्या. तीचे डोळे पुसले. कपाळाचा मुका घेतला. आणि छातीशी घट्ट दाबून धरलं. आईविना वाढलेली पोरं खुप रडली हमसून हमसून रडली. आणि शांत झाली. त्या मुलाच्या बाबतीतही तेच झालं. त्यानं होत नव्हतं ते सारं बाहेर काढलं. हुंदके देऊन देऊन प्रचंड थकला. पण बाईंना बिलगताच त्यानं ज्या समाधानानं डोळे मिटले कदाचित तो त्याच्या आयुष्यातील वात्सल्य अनुभवण्याचा सर्वोच्च क्षण असावा. आम्ही सारेच स्तब्ध होतो. इतक्यात शेवटची घंटा झाली. पण आम्ही सारे तसेच स्तब्ध. आपापल्या शर्टाच्या बाह्यांनी, ओढणीनं ओले डोळे कोरडे करत राहीलो होतो. वंदे मातरम सुरू झालं. संपलंही. पण आम्ही मांडी घातलेल्या अवस्थेत होतो ते तसेच होतो. इतर वर्गातली पोरं वेगात पळत शाळेच्या आवारात पोहोचली. परंतू आम्ही अजूनही वर्गातच होतो. यथावकाश आम्ही बाहेर पडलो. शांततेत पावलं टाकत घरी आलो. काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळीही सगळी पोरं अजूनही शांत होती. अपवाद त्या दोघांचा. त्या दिवशी ते हसत होते. आपणहून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ठाऊक नाही. फ.मुं. च्या कवितेतून म्हणा की बाईंच्या गर्भातून…पण त्यांना जन्म मिळाला होता… त्यांच्या जन्माचा उषःकालच त्यांना लाभला होता. ती पोरं पुन्हा नव्यानं जन्माला आली होती. ताज्या टवटवीत फुलांसारखी…

वैभव छाया