आयसीयू – Intensive Care Unite

ऑपरेशन झाल्यानंतर किंवा रोगी अधिकच अत्यवस्थ असेल तर त्याला तेथे ठेवण्याची जागा अतिदक्षता विभाग. चकाचक लाईट्स, मनूष्याच्या आवाजाचा क्वचितच संचार, थंडगार एअर कंडिशन्डने गारठलेलं वातावरण, व्हेंटिलेटरच्या मशीनीचा सातत्याने येणारा बीप साऊंड भल्या भल्यांच्या ऊरात धडकी भरवतो. भरीस भर म्हणून नखशिखांत कपड्यात गुंडाळून घेतलेल्या नर्सेस, वॉर्डबॉईज, मावशी बाया (आया), डॉक्टर… आहट मधल्या सिरियलसारखा फिल यावा फक्त त्यांचे डोळेच तेवढे आपल्याला दृश्यमान. रांगेने बेड्स सलग झोपलेले असतात. हो झोपलेलेच असतात बेड्स. ते कसलाही आवाज करत नाही. कसलीही हालचाल करत नाहीत. पेशंट सोडला तर त्यावर इतर कुणालाही साधा टेकू मिळू देत नाहीत. निष्प्राण पडलेल्या बेडच्या अवयवांना तेवढ्या निरनिराळ्या कॅथरेटरची सवय मात्र झालेली असते. आणि बेड्स सुद्धा आपल्या स्वभावधर्माला जागून साऱ्या कॅथेरटर्सना स्वतःच्या अंगावरून मुक्त संचार करू देतात. पेशंट्स येतात – जातात पण बाकी सारी आहे त्या जागीच स्थिर राहतं.

23 सप्टेंबर 2005 साली माझं ऑपरेशन झालं. संध्याकाळी सहाच्या सुमारास आयसीयूत दाखल केलं. दहाच्या आसपास डोळे उघडले. थोडी शुद्ध आली. संतोष पवार नावाचा ओळखीचा वॉर्डबॉय जवळ आला. म्हणाला आताच मामा येऊन गेले.. तू झोपला होता.. उठून बसवतो तुला फक्त समोर पाहू नको. झोपून घे परत..

मी त्याला मुक्या नजरेनं होकार दिल्याचं मला स्मरतंय. पण समोर पाहू नकोस हे का म्हणाला असावा यावर फार विचार न करता मी पुन्हा झोपी गेलो. साधारण तीनच्या आसपास पुन्हा जाग आली. समोरच्या बेडवर कालपरवा पर्यंत माझ्या बाजूला अॅडमिट असलेला शाहिद नावाचा मुलगा पहुडला होता. युरीन कॅटरेटर, आय वी कॅथरेटर, ऑक्सीजन मास्क, आणि बरंच काही काही त्याला जोडलेलं होतं. हलकेच मान वरून पहायचा प्रय़त्न केला तर त्याला व्हेंटिलेटर वर टाकलाय असं कळालं. शाहीद 14 वर्षाचा मुलगा. त्याला ल्युकेमिया आहे हे फार उशीरा डिटेक्ट झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा तो चौथ्या स्टेज ला होता. एकुलता एक मुलगा. किमोथेरपीसाठी अॅडमीट झाला तेव्हा मला भेटून बराच खुश झाला होता. म्हणाला भाई आप आओगे ना मेरे घर.. इधर ही नूर मुहल्ले में रहता हूँ.. मी त्याला खोटं खोटं हो म्हणून टाकलं. तो हसला. मला बरं वाटलं. हसताना त्याचे खोल खोल गेलेले डोळे थोडे चमकून गेले. डोक्यांवर, भुवयांवर शोधून सापडेल असा एकही केस शिल्लक राहीला नव्हता. जरा काही खाल्लं की उलटी अन् ब्लीडींगही. खंगत चालला होता. त्याचा बाप यायचा. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचा. मिनिट दोन मिनिट त्याच्याकडे पहायचा. आणि तडक परत निघून जायचा. बाप लेकांच्या मुक नजरानजरीकडे पाहून शाहीदची आई मात्र हमसून रडायची. बापाला रडताना मात्र पाहीलं नव्हतं. हा सारा प्रकार सहा दिवस असाच चालू होता. शाहीदच्या बापाचं येणं म्हणजे हातात भरमसाठ औषधं आणि पोरासाठी एखादा ज्युस आणि खिशात पैशांची तजवीज.

माझ्या ऑपरेशनच्या दिवशी सकाळी त्याला ग्रीट केलं आणि निघालो. तशी त्याची तब्येत खूपच खंगली होती. इतक्या लवकर हा खेळ सोडेल अशी काही लक्षणं नव्हती. पण टिकला नाही तो. नंतर मला दिसला तो थेट आयसीयू मध्येच. शाहीदच्या बापाची धावाधावच दिसत होती. त्याची आई त्याच्या बेडजवळ खाली जमीनीवर पडून होती. काहीच हालचाल नाही. अगदी स्तब्ध पुतळ्यासारखी. अंदाज आलाच होता. पोराला व्हेंटिलेटरवर टाकलंय. आता काही फार आशा नाही. पहाटे सहाच्या सुमारास डॉक्टरांनी आणि त्याच्या वडीलांनी अगदी आमच्या दोघांच्या बेडमधल्या जागेवर उभं राहून चर्चा केली. स्पष्ट ऐकू येईल अशा भाषेतच…

बाप म्हणाला.. बच्चे को बस आज के उगते सुरज तक रखना था… अब इसे आझाद कर दो इसका दर्द देखा नही जाता… डॉक्टर म्हणाले.. बस्स आपकी तसल्ली की लिए ये मशीने चालू थी…

डॉक्टरांनी नंतर सगळ्या मशीनी बंद केल्या. त्याच्या बापानं त्यातही मदत केली. नर्सेसनी त्याच्या आईला वॉर्ड बाहेर नेलं. आणि शेवटची क्रिया म्हणून हिरवं कापड आणलं. ( प्रत्येकाला जाड हिरव्या किंवा निळ्या कापडात गुंडाळतात) पूर्ण कापड गुंडाळलं. मग एका प्लास्टिक बॅग मध्ये पार्थिव चैनीने पॅक केलं. पुन्हा त्यावर हिरवा कापड गुंडाळून बॉडी पॅक केली. आत्ता चेहऱ्यावर सुद्धा कापड गुंडाळलं होतं. चेहरा कापडाआड बंदिस्त झाला अन् बापानं इकडं स्वतःला मोकळं केलं. बऱ्याच वेळानंतर तो सावरला. पण तोवर इथं त्या बेडवर नवी चादर आली. नवी उशी आली. आणि नवा क्रिटीकल पेशंट पण आला होता.

 

Advertisements

कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस मी मांडलेली भूमिका …

जन्म हा जरी अपघात असला तरी देखील आपल्याकडे विशिष्ट वर्गाला बाय बर्थ काही चॉईसेस आहेत. मागास जातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला बाय डिफॉल्ट पुरोगामी बनण्याशिवाय पर्यायच नसतो. याउलट दमनकारी जातींत जन्माला आलेल्यांना प्रतिगामी अथवा पुरोगामी बनण्याची मात्र सोयीस्कर चॉईस असते. जात-पंथ-धर्म-लिंग बंडाच्या चिलखती कुरतडण्याच्या या लढ्याचं रुपांतरण आता पुरोगामी विरूद्ध प्रतिगामी अशा लढ्यात होत आहे.

चळवळीची भाषा वेगाने बदलत आहे. ग्लोबलायझेशन नंतर उपजलेल्या दुसऱ्या पीढीचा मी एक प्रतिनिधी. पहिल्या पीढीला जागतिकिकरणाचा तुटपुंजा फायदा झाला. दुसऱ्या पीढीला आता फायदा आणि चटके दोन्ही बसत आहेत. एकविशी पार केलेल्या खाऊजा धोरणाने मात्र आता नव्याने उदयास येणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या सर्वांगाचे लचके तोडण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे.

आज हा कवितासंग्रह प्रकाशित होताना जी भूमिका मी इथे आपल्यासमोर मांडतोय त्यात पुन्हा पुन्हा मला तेच रिवीजन करण्याची काडीमात्र इच्छा नाही. इथल्या ब्राह्मणी आणि भांडवली वर्गाने केलेलं दमन मला पुन्हा पुन्हा गिरवायचं नाहीए. किंवा मला पुन्हा त्याच जुन्या पद्धतीचे आसूड ओढण्यात वेळ देखील वाया घालवायचा नाही आहे.

आमच्या हक्काचं जे आकाश इथल्या व्यवस्थेने अत्यंत चलाखीनं डिलीट केलंय ते आकाश पुन्हा रिस्टोर करण्याची भूमिका घेऊन मला आपणा सर्वांसोबत यायचं आहे. ह्या रिस्टोरेशनच्या कामात प्रत्येक स्वाभिमानी, पुरोगामी, समताप्रेमी कार्यकर्ता आणि कार्यकर्तीचे सहकार्य अपेक्षित करण्याची भूमिका मला येथे मांडायची आहे. आंबेडकरी चळवळीवर आणि त्यातील कार्यकर्त्यांवर मित्र चळवळींकडून होणारे आरोप मला खोडून काढताना किमान समान कार्यक्रमावर कसं एकत्रित येता येईल या भूमिकेवरच फोकस करायचा आहे. आधीच्या पिढीने प्रसवलेल्या उद्रेकाचं रुपांतरण आता नवनिर्मितीच्या प्रांगणात करण्याची, स्वतःचं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र लिहिण्याची भूमिका, स्वतःचं आकाश नव्याने पांघरण्याची भूमिका मला आपल्यासमोर घेऊन यायचं आहे.

माणूस काळानुरूप बदलत जातो. त्यासोबत बदलत जातं ते त्याचं ज्ञान, आकलन आणि त्याच्या जाणीवा. जाणीवा जसजश्या प्रगल्भ होत जातात तसंतसं त्याचं सामाजिक पातळीवरील अस्तित्व अधिकाधिक गडद होत जातं. आयुष्याच्या एका फ्रेज मधून दुसऱ्या फ्रेज मध्ये त्याचे पक्षांतरच झालेलं असतं. त्याच नियमाला धरून प्रत्येक कलावंताचे आयुष्य घडत अथवा बिघडत असतं. याला कवी अपवाद ठरू शकत नाही.

कवी हा फक्त एका जॉनरपुरता मर्यादित नसतो. किंवा शब्दांपुरता, त्यातील व्याकरणाच्या नियमांपुरता सीमीत नसतो. तो प्रतिनिधी असतो त्याच्या जाणीवांचा, त्याच्यासारख्या जाणीवा जपणाऱ्या असंख्य अव्यक्त मनांचा. म्हणून प्रत्येक कवीला स्वतःचं वर्गचरित्र असतं. त्याचं रखरखणारं जातचरित्र जरी जाणूनबुजून नजरेआड केलं जात असलं तरी त्यामुळे त्याची दाहकता निश्चितच कमी झालेली नसती.

या जातचरित्राच्याच दाहकतेतून सत्तरच्या दशकानंतर ज्वालामुखीच्या वेगानं प्रसवलेल्या आंबेडकरी साहित्यानं आपल्या वेदना अतिशय तीव्र आणि आक्रमक रुपात मांडल्या. विशेष म्हणजे त्या अगदी स्वतःच्या, वेशीबाहेरच्याच भाषेत मांडल्या. ज्या समाजाला जगण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेण्यासाठी पावलापावलांवर संघर्ष करावा लागायचा त्या समाजातून आलेलं साहित्य हे निश्चितच आग ओकणारं असणं हे स्वाभाविकच होतं. या साहित्याच्या मांडणीतील आक्रमकतेमुळे त्याला सरसकटपणे पुरूषी ठरवलं गेलं.

गोलपीठा असो किंवा रॉकगार्डन… नामदेव ढसाळ ते अरुण कांबळे आणि सध्याच्या काळातल्या प्रज्ञा पवारांपासून ते अनेक नवकवींच्या कवितेतील आक्रमकता ही जरी बुरसटलेल्या मेंदूला झिणझिण्या आणणारी असली तरी त्यातील करुणाभाव हा निश्चितच पसायदानापेक्षा काकणभर सरस आहे.

समता, स्वातंत्र्य, बंधुता ही आजच्या अनेक स्वघोषित रॅडिकल छगुन्या म्हणून मिरवणाऱ्या तीनपाटांसाठी प्रचंड मोठं रोमँटीसीझम आहे. पण आंबेडकरी साहित्याच्या प्रसवाची प्रेरणा ही तीन मूलभूत मानवतावादी तत्वेच आहेत. ज्या आंबेडकरी साहित्याला इथल्या व्यवस्थेने दलित साहित्याचा टॅग लावून व्यवस्थित विल्हेवाट लावायचा प्रय़त्न केला त्या साहित्याची मुळ प्रेरणाच ही अस्सल स्त्रीवादीच राहीलेली आहे. परंतू पुरूषसुक्ताची बाऊंड्री सुद्धा बौद्धिक पातळीवर ओलांडू न शकलेल्या तथाकथित उच्चभ्रू जाणिवांतून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिकांकडे पाहणाऱ्या स्त्रीवाद्यांना त्यातली करूणा समजेल अशी अंधश्रद्धा तर मी बिल्कूल पाळू शकत नाही.

आज मराठी साहित्य विविध टप्प्यांतून गेलेलं आपण पाहिलं आहे. मराठी भाषेतील विद्रोही, बंडखोर आणि स्त्रीवादी साहित्याबाबत बोलायचे झालेच तर क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी सुरू केलेल्या स्त्रीवादी साहित्याचा वसा पुढे नेण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी इमाने इतबारे केलं. फुले दाम्पंत्यानं मांडलेले विचार प्रक्टिकल कायद्यात रुपांतर करण्यासाठी बाबासाहेबांएवढं कोणीच झटलं नसेल. हिंदू कोड बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब इथल्या बहुतांश उच्चवर्णीय, उच्चजातीय स्त्रीवादी विचारवंताना आठवतच नाही हे विशेष.

आंबेडकरी कालखंडानंतर उदयाला आलेल्या पहिल्या पीढीनं कमालीची गरीबी पाहीली. पहिली पीढी ही तशी गरीबच, बेरोजगार पण पाश्चात्या शिक्षणाचं दुध प्यायलेली, जशास तसे उत्तर देणारी होती. कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणाऱ्या युवांची ती पीढी होती. पेरुमल कमीशनच्या 1172 हत्यांची अस्मिता प्रज्वलित करणाऱ्या मानसिकतेने शेवटी दलित पँथरला जन्माला घातलं. पण पँथर जन्माला येण्यापूर्वीच इथल्या साहित्य जगताने फार मोठे हादरे खाण्यास सुरूवात केली होती. ज.वि. पवार, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ सारखे कार्यकर्ते सारस्वती मराठीला मनाप्रमाणे तोडून-मोडून प्रसंगी वाकवून तीला तीच्या अस्सल रुपात आणण्याचं काम करत होते. आणि अशातच गोलपीठा प्रकाशित झाला.

गोलपीठाच्या आगमनाने जागतिक साहित्यात नव्या वादळाची नांदी अवतरली. स्त्रीवादी साहित्याचं उत्तम उदाहरण असलेला गोलपीठा मात्र कायम वेश्यांच्या वेदना चितारणारा काव्यसंग्रह म्हणूनच स्त्रीवादी चळवळीने पाहीला हे निश्चितच क्लेशकारक होते. इथल्या व्यवस्थेने कायम शुद्र ठरविलेल्या समाजघटकांमध्ये अतिशुद्र असलेल्या महिलावर्गाला त्यांच्या हक्कांचं मुक्तपीठ उभारून देण्याचं काम दलित पँथर आणि विद्रोही साहित्याने केले आहे. आणि हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले तरी स्त्रीवादी चळवळ हे स्वीकारायला का तयार होत नाही याचे नीटसे कारण अजूनही कोणी प्रस्तूत करू शकलेले नाही.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे कायम शोषणाविरोधात दंड थोपटून उभे राहीले आहेत. परंतू दरवेळेस त्या कार्यकर्त्याला दलित पितृसत्तेच्या चौकटीत तपासून पाहणं आणि त्यांच्या प्रत्येक कृत्याला केवळ पुरूषी कृत्य म्हणून ओळख देणे हे कितपत संयुक्तिक आहे ? मागास जातीतील प्रत्येक तरुण स्त्री व पुरूष कार्यकर्ते हे अन्यायविरोधातील चीड आणि संताप अतिशय जहाल भाषेत आणि प्रतिक्रियेत व्यक्त करणारे राहीले आहेत. त्यांची जहाल प्रतिक्रिया ही कायम इथल्या शोषकांच्या अमानवीय क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती हे कसे विसरून चालेल ?

नामदेव ढसाळांना सर्व स्त्रीवाद्यांनी एकसाथपणे पुरूषी वृत्तीचा कवी म्हणून झिडकारले. त्यांच्यासोबत बाबुराव बागुलांपासून अनेक साहित्यिक कार्यकर्त्यांना लँग्वेज पॉलिटिक्स करणारे पुरूषी व्यक्तीमत्त्व म्हणून नाकारले. परंतू त्याचवेळेस जगातील वेश्यांचा सर्वात पहिला मोर्चा काढणारे नामदेव ढसाळ सोयीस्कर पणे विसरले जातात. इजिप्तच्या प्रेमकवितांमधून मागास जातीतींल स्त्रीचं नवं सौंदर्यशास्त्र लिहीणारे राजा ढाले विस्मृतीत ढकलले जातात.

मागे एकदा साप्ताहिक कलमनामामध्ये समीना दलवाई यांनी पूर्णवेळ दलित कार्यकर्त्यांची स्त्रीवादी समीक्षा करणाऱ्या उच्चवर्णीय स्त्रीवादी महिलांच्या दृष्टिकोणाबद्दल अगदी थेट भाष्य केले होते. ते अनेकांना रुचले नव्हते. पण त्यानिमित्ताने एक प्रश्न जरूर विचारावासा वाटतो.

वर्षानुवर्षे पोलिसी अत्याचाराचा सामना करणारे कार्यकर्ते अंगाची रग मोडून तुरूंगात खितपत पडतात तेव्हा या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बाजुने केवळ आंबेडकरी संघटना सोडल्या तर अन्य किती संघटना पूर्ण ताकदिनिशी उभ्या राहतात ?

दलित पितृसत्तेची दाहकता मला मान्य आहे. या वृत्तीपायी माझ्या आईचा उद्ध्वस्त झालेला संसार मी पाहीला आहे. माझ्या लहानपणापासून या व्यवस्थेचे खेटरं खात आम्ही आयुष्य नव्याने उभं केलं आहे. पण त्यामुळे मागास जातीतील सर्वच्या सर्व पुरूष हे पितृसत्ताकवादी मानसिकतेचे आहेत असा अर्थ तर निघत नाही ना…

प्रत्येक चळवळीने आणि चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनरलाईज्ड स्टेटमेंट करण्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष वागण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा तरच मित्र चऴवळी जोमाने काम करू शकतील अन्यथा ही नव-अस्पृश्यता खुपच धारधार होत जाईल…

राजकारणी पक्षांतर करू शकतात. नकलाकार (कलाकार नव्हे) सुद्धा पक्षांतर करू शकतात. कारण तेथे वैचारिक भूमिकांचा मुद्दा येतच नाही. त्यामुळे कोणी कुठेही कसाही आला गेला तरी त्याचे सामाजिकदृष्ट्या उमटणारे पडसाद फासरे विशेष असे नसतात.

कवीच्या बाबतीत मात्र तसे म्हणून चालत नाही. कवीचा वर्ग जसा अधोरेखित करता येतो तसाच तो वर्ग कालांतराने बदलला सुद्धा जाऊ शकतो. कारण वर्गचरित्राच्या दृष्टिकोनातून समांतर रेघ आखणाऱ्या कवीची कविता ही मुळातच विद्रोहात उगम पावते आणि प्रस्थापितांना उखडवून फेकत स्वतः प्रस्थापित होते. म्हणून मला भारतीय वास्तवात विचार करताना वर्गचरित्रापेक्षा जातचरित्र अधिक प्रामाणिक आणि महत्त्वाचे वाटते.

दोस्तांनो, आपल्याला वर्गलढ्याला आपले योगदान द्यायचेच आहे. परंतू जातवर्चस्ववाद हा सांप्रत व्यवस्थेतील सर्वात मोठा दहशतवाद मुळापासून उखडवून टाकण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावेच लागेल. एक कवी म्हणून जन्माला येताना मला आणि आपणा सर्वांना आपली राजकीय भूमिका आणि राजकीय कृती ही इतरांना शब्दांतून समजावून सांगण्यासोबतच त्यांची अंमलबजावणीच ही आपली ओळख आपल्याला बनवावी लागणार यात शंका नाही.

कविता ही अभिव्यक्ती असते. त्यापेक्षा ती असते तुमची राजकिय कृती. हे ज्या दिवशी ध्यानात आलं त्याच दिवशी माझ्या जाणीवेतील कवितेचा आकृतीबंध एकदमच मोठा झाला. कविता ही व्यक्त होण्याच्या माध्यमापलीकडची असून ती आपलं जातचरित्र, वर्गचरित्र, लिंगचरित्र अधोरेखित करत असते. ज्या हाडामांसाच्या गोळ्यांचे जात-वर्ग-लिंग चरित्र या व्यवस्थेकडून जबरदस्तीने अधोरेखित केले गेलेले असते त्यांच्यासाठी त्यांची कविता ही लढ्याचं निर्णायक हत्यार असते. ह्या हत्याराची धार जेवढी जहाल तेवढीच फसवी देखील. कारण दुधारी तलवारीचं हत्यार ज्याच्या हातात असतं त्याचे हात आणि मनगट त्या कवितेएवढेच ताकदवर असायला हवेत. अन्यथा शोषकांवर उगारलेलं हत्यार कधी आपल्या गळ्याचा घोट घेईल याची काही ग्यारंटी देता येणार नाही. आज मी डिलीट केलेला सारं आकाश हा कवितासंग्रह आपल्या हातात देत आहे. तो देत असताना मला माझ्या खांद्यावर आलेल्या नव्या जबाबदारींची जाणीव सुद्धा त्याच तीव्रतेने होते आहे. आपली कविता ही आपली राजकीय भूमिका बनावी आणि त्या भूमिकेचे रुपांतरण हे जबरदस्तीने लादलेल्या जात-वर्चस्ववादाविरोधातील युद्धात हत्यार म्हणून व्हावं हीच प्रामाणिक अपेक्षा असेल.

जय भीम.

वैभव छाया

नामदेव ढसाळ – किस्सा क्रं. 9

दलित पँथरच्या आंदोलनांना दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने सरळ सरळ दडपसत्रच चालू केले. पँथरच्या नेत्यांना सातत्याने स्वबचावासाठी भूमिगत रहावे लागत होते. नामदेव ढसाळ यांच्यावर अनेक ठिकणी खटले भरले गेले . केव्हाही पोलिसांनी यावे आणि जमा करावे अशी वेळ आली. राजकीय पाठबळ संपुष्टात आलेले. तसेही ते कधी नव्हतेच. सततच्या तारखा, कोर्ट-कचेऱ्या. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या कवितासंग्रहात कस्टडीतल्या कविता या सेक्शन मध्ये ढसाळांनी त्यांच्या कस्टडीतल्या अनुभवांना कवितेत बद्ध केले आहे.

अशाच एका खटल्या संदर्भात तारखांवर जावून जाउन घाण झालेली त्यात अगदी जवळच्या नातलगाकडे ते रात्री मुक्कामी आले होते. कारण त्याच ठिकाणी त्यांची दुसऱ्या दिवशी पुन्हा हजेरी होती. परंतू मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेल्या नातलगानं थोडंसं नाक मुरडतच नामदेवाच्या मुक्कामाला नापसंती दर्शवली. त्यांच्याकडून मिळालेलं उत्तर असं… (नावाचा ,गावाचा उल्लेख मुद्दाम टाळलेला आहे)

“अरे नामदेवा तसा तर तुझ्याप्रती मी नेहमी सकारात्मक होतोच आणि आहेच पण इथे पोलिस आले तर आमचीही बदनामी होईल . आणि तुझी सध्याची गत पाहता तू इथे न थांबलेले बरे .
नामदेवांनी रात्रीच जागा बदलावयाचे ठरवले , एक परिचयातील शिवसैनिक होता तिथेच रात्र काढली .

(सांगायचं तात्पर्य हे नाहीच कि शिवसैनिक किती दर्यादिल वा नामदेवांना किती मानणारे होते पण या नंतर जेव्हा केव्हा नामदेवांना तिथे तारीख असायची ते त्याच्याकडेच राहायचे)
.
या दरम्यान आर्थिक अडचणी , राजकीय मदतीची उणीव , दबाव गट तयार करून केस निकाली काढण्यासाठी कुणी मदत केली ? मदतीचा हेतू , उद्देश प्रामाणिक नसेलही पण मदत कारण-यांची शेवट पर्यंत साथ सोडणार नाही हि पँथर ची भूमिका नामदेवांनी शेवटपर्यंत निभावली . (समाज यावेळी कुठे होता? तेच मित्र आणि इतर पँथर वगळता)

सौजन्य–
प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, अकोला …
प्रा. Jayant Mohod, अकोला …

किस्सा ट्रेनमधला.. मुकबधीरांचा

 

मुकबधीर.. डम्ब अँड डेफ हे भन्नाट रसायन असतं. ऐकू ये येणारे, बोलता न येणारे लोक. दिसायला चारचौघांसारखेच स्थितप्रज्ञ. शरिरात कोणतेही बदल नसतात. उलट छानसे कपडे, फिट अँड स्लिम बॉडी, स्टाईलिश राहणीमान असा सारा तामझाम असतो त्यांचा. यातली बहुतांश पोरं-पोरी केएफसी मध्ये कामाला आहेत. खात्री करून घ्यायची असल्यास ठाण्याच्या व्हिवियाना मॉल मध्ये असलेल्या केएफसीच्या सेंटरला एकदा जरूर भेट द्या. तिथे त्या शॉपमध्ये काम करणारे सर्वच कामगार हे मूक बधीर आहेत. फक्त त्यांचा मॅनेजर तेवढा बोलका प्राणी. बाकी सारे शुकशुकाटच. बहिणींनी जिद्द केली म्हणून केएफसीचं चिकन खाऊ घालायला घेऊन गेलो अंबरनाथहून थेट ठाण्याला. सगळे मित्र-मैत्रिणीच. त्यांच्याच साईन लँग्वेजमध्ये बोललो त्यांच्याशी. फायदा म्हणून बिलावर वीस टक्के डिस्कांऊट सुद्धा दिलं. तर असा हा प्रकार… जरा थोडं मागे येऊयात.

लोकल ट्रेनमधल्या अपंगांमध्येही आपापल्या पद्धतीची जातीयता असते. किंवा आपण त्याला ग्रेडेड इनइक्वालिटी म्हणू. पायाने आणि पाठीने अपंग असणारे हाताने अधू असणाऱ्यांना कमी महत्त्व देतात. हाताने अधू असलेले लोक कमी उंचीच्या लोकांना तिरक्या नजरेने पाहतात. अंध असलेले अनेक स्वतःपुढे इतरांचं दुखणं, अपंगत्व गौण मानतात. कँसर पेशंट्स आणि गरोदर महिला मात्र स्पेशल रिजर्वेशन राखून असतात. त्यांची गाडीत एंट्री होताच थोडे बरे असणारे, थोडा काईंडनेस बाळगणारे आपली जागा रिकामी करून देतात. यात मुकबधीरांना कोणी विचारतही नाही. ते आपल्या ज्या ठिकाणी उभे असतात तिथेच त्यांचा एखादा जोडीदार असतो. त्यांची साईन लँग्वेज चालू असते. जर ते बसलेले असतील तर डोंबिवलीत चढलेला एखादा म्हातारा शिव्या देऊन उठवतोच उठवतो. या बाबतीत मराठी म्हातारा- म्हातारींना मी कमालीचे सहिष्णू असलेले पाहीले आहे. गुजराती मारवाड्यांची असहिष्णूता कमालीचे हाय असलेली अनुभवलीये. त्यामुळे मूकबधीरांचं इतर अपंगांसोबत फारसं जुळत नाही. दुनिया काय बोलतेय बोलो. आपण आपल्या धुंदीत जगायचं हा बाणा त्यांचा ठरलेला. सोबत कुणी मुकबधीर नसेल तर सरळ मोबाईलवर व्हीडीओ काँन्फरंसिंग ने संवाद साधायला सुरूवात करतात हे.. अनेकदा तावातावाने बोलताना त्यांच्या हाताचे फकटे अनेकांनी खाल्लेले असतात. बऱ्याचदा भांडणंही होतात. मारामाऱ्या ही झालेल्या आहेत. एकदा असंच साईन लँग्वेज मध्ये पोलिसांला हँडिकॅपच्या डब्ब्यातून उतर म्हणून सांगायला गेलेला पोरगा.. मधलं बोट दाखवलं म्हणून बेदम मार खाऊन गेला. तरण्या पोलिसाचं मारणं फार भयानक असतं. बिच्चारा आम्ही सगळे मध्ये पडलो म्हणून वाचला. पोलिस पळून गेला. त्याच्यामागे पळण्याइतपत आम्ही कोणी सक्षम नव्हतो. डब्यातल्या लोकांनी त्यालाच बोल लावला. कशाला आय घालायला गेला होता तिकडं. गप गुमान उभा होता ना… तर.. हे असं…

असाच एकदा घाटकोपरला ट्रेन पकडली. गर्दीची वेळ. ठाण्याला ट्रेन अजून फुल पॅक. त्या गर्दीत अगदी पोटाला खेटूनच सुनीत यादव उभा होता. हा सुनीत उंचीने अगदी जेमतेम. देढफुट्याच बोलायचो आम्ही त्याला सगळे. आयटीआयचा फिटर. मशीनवर काम करताना चूक झाली. दोन्ही हातांची बोटे गेली. त्यामुळे गाडीत चढताना उतरताना कोणाचातरी आधार घेतल्याशिवाय पुढचं सारं अशक्य. आता एका फार्मा कंपनीत कुरियर डिलीवरीचं काम करतो. तर असा हा सुनीत. गाडीत भेटला. पाठीवर प्रचंड वजन. डोळ्यांनीच खुणावलं की त्याची आता एनर्जी संपल्यातच जमा. मी हलकेच बॅग काढून घेतली त्याच्या पाठीवरची. आणि त्याला आधार मिळावा म्हणून नीट कमरेला घट्ट पकडू दिलं. आपली बोटं नसतील तर आपली पकड कशी असेल यावर एकदा जरूर विचार करून पहा. सुनीतनं माझ्या कमरेला घट्ट धरून असणं बाजूला उभ्या असलेल्या मूकबधीरांनी चेष्टेचा विषय बनवला. हातवाऱ्यांतूनच होमो लोग खडे है.. असं समोरच्याला सुचवलं. माझं डोकं गरम झालं होतं त्याच्या इशाऱ्यांनी. तरी त्याचे डिवचणे सुरूच होते. कदाचित त्याला ठाऊक नसेलही की मला ती भाषा समजत असावी. पण त्यांचं आपलं सुरूच होतं. आता त्यात काही मुली देखील सामील झाल्या. आणि त्यांचं संभाषण मात्र आता जोरदार सुरू झालं. गाडी डोंबिवलीला येता असतानाच त्यांच्यातल्या एकाचं कोपर बसलं माझ्या डोळ्यावर. तिथेच कळवळलो. सुनीत अंगावर रेलून उभा होता त्यामुळे तोल सावरला गेला नाही. सीटवर बसलेल्या एका म्हातारीच्या अंगावर 90 किलोचा देह विसावून मोकळा झालो. सुनीत ही पडला. तो ही नेमका पायावर. नस पकडली गेली पायाची. डोळा आधीच बधीर झाला होता. त्यात डोकं आता तणाणलं होतं. चैन खेचून तिथेच त्यांना कानफटावलं. मी का मारत होतो तेव्हा काही कळत नव्हतं. फक्त यांना फटकवायचंच हेच ध्यानात होतं. डोंबिवली स्टेशनला स्टेशन मास्तरला बोलावण्यापर्यंत प्रकरण गेलं. पण डब्ब्यातल्या लोकांनी सावरून घेतलं. वाद तिथेच मिटला. नंतर जेव्हा केव्हा मी डब्यात असताना मुकबधीरांनी पाहीलं तेव्हा त्यांनी गाडी सोडणं पसंत केलं. हे साधारण 2014 च्या ऑगस्ट पर्यंत चालंलं. 

गर्दीच्या वेळेत मुकबधीर बोलायला लागले की मी रागीट नजर द्यायचो. काही शांत व्हायचे. काहींना दम देऊन शांत करावं लागायचं. असो. ही चूक लवकरच कळून आली. 2014 च्या ऑगस्ट महिन्यात माझा एक लेख एका बड्या संपादकानं केवळ सरकार आणि कंपनीच्या पॉलीसीविरुद्ध बोलणारा हा लेख असल्यामुळे मी छापू शकणार नाही. आणि तू कुठे छापू ही नको असं सुचवलं. हा माझ्या अभिव्यक्तीवर घातलेला घाला होता. तीन दिवसांनी ह्या घटनेची आठवण झाली. डोंबिवली स्टेशनला जाऊन त्या मुकबधीर पोरांच्या ग्रुपला हुडकून काढलं. हात जोडून माफी मागितली.

साला मला काय अधिकार होता त्यांच्या संवादावर हिंसक पद्धतीने गदा आणण्याचा… आपल्याला आपलंच दुःख लै मोठं असतं. कान बंद करून रेल्वेचा ट्रॅक ओलांडण्याची हिंम्मत नाही आपली. साधं दुखतंय हे सांगण्याची सुद्धा सोय नसलेल्यांचं दुखणं आपल्यासारख्या बिनहाडेच्या जीभेची लोकं कधीच समजू शकणार नाहीत.

वैभव छाया

पूर्वांचलचा दत्ता अंकल…

ही पूर्वांचलची माणसं ना फार कमाल असतात. त्यांची राज्यं छोटी छोटी. निसर्गानं भरभरून दान दिलेली राज्यं. अंगकाठी जेमतेमच. पण भलतीच गोड अन् प्रामाणिक असतात ही माणसं. दत्ता अंकल हा त्याच मातीतला.

नाव दिपक दत्ता. वय जेमतेम पन्नास वर्षे, बक्कळ पैसा, दोन तरणीबांड पोरं. राहणारा गुवाहाटी, आसामचा. तसं गुवाहाटीतलं हॉटेल व्यवसायतलं नावाजलेलं प्रस्थंच होतं ते. मला भेटले ते २००५ ला. टाटा हॉस्पीटलमध्ये. माझ्या बाजूच्या बेडवरच अॅडमिट झाले होते. अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. उपचारासाठी आसाम, कोलकाता करून शेवटी मुंबईला दाखल झाले. सोबतीला मोठा मुलगा, शेजारचे दोघं जणं होते. पहिल्यांदाच मुंबईला आले होते ते. मुलगा आसामच्या बाहेर कधी निघालेला नव्हता. इंग्रजी यायची ती सुद्धा फारशी नीट नव्हती. त्यामुळे त्या सर्वांचा इथं भाषेचा पहिला प्रॉब्लेम. त्यामुळे कुणाशी संवाद कसा साधावा याची भयंकर गोची असायची. अशातच ट्रीटमेंट सुरू झाली. अनपेक्षितपणे त्यांना लवकर नंबर मिळाला आणि बेड सुद्धा. अॅडमिट झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ट्रीटमेंट सुरू होणार होती. तीन रेडीएशन, तीन किमो मग सर्जरी आणि त्यानंतर परत दिवसभराचा डोस असेलेल्या तीन किमोथेरपी. डॉक्टरांनी व्यवस्थित सुचवलं. किमान तीन महिन्याचा मुक्काम करावा लागेल मुंबईतच. राहण्याची व्यवस्था पाहून घ्या. औषध पाण्यासाठी पैसे जमवून ठेवा वगैरे वगैरे.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ऑपरेशन साधारण चौदा तास चालेल, तर रक्त, प्लेटलेट्स सगळ्यांचं मॅनेजमेंट करायला तुम्हाला अवघा आठवडा असेल. हा सगळा घटनाक्रम घडला तो सहा ते साडे सहाच्या दरम्यान. सहा वाजता त्यांना अॅडमिशन मिळालं ते बेड नंबर ३१४ वर. सव्वा सहा वाजता डॉक्टर आले. साडे सहा वाजता निघून गेले. बस्स.. आता बारा तासांचा अवधी शिल्लक होता त्यांच्यासाठी. या नव्या पोकळीशी जुळवून घ्यायला.

मी पोकळी यासाठी म्हणालो की… हे रुग्णालय नुसतं रुग्णालय नाही. इथं प्रत्येकाच्या संयमाची कसोटी पाहीली जाते. असं शून्यागारातलं अवकाश इथं बनून गेलंय की त्यात गेल्यानंतर गुरत्वाचं एक भयानंक प्रतल तुम्हाला स्वतःजवळ ओढून ठेवतं. त्यातून ना निघणं शक्य होत ना त्यात अडकून राहणं. अजीब धाकधूक असते. ती अनुभवल्याबिगर तीव्रता समजून येणं तसं कठिणच. साडे सहा वाजून गेले. डॉक्टरही गेले. दत्ता अंकलचा मुलगा, त्याच्यासोबतचे दोन साथीदारही गेले खाली. डॉक्टरांनी बरीच औषधं लिहून दिली होती. मी ही एकटाच होतो. मामा खाली गेले होते. बस्सं.. जेल मध्ये अडकलेल्या कैदीसारखे आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. जवळपास पंधरा मिनिटं आम्हा दोघांची बुब्बुळं एकमेकांना खुणावत होती पण संवादासाठी शब्द फुटत नव्हते. त्यावेळस लहानच होतो तसा मी. जेमतेम सतरा वर्षांचा. असे प्रसंग अनेकदा घडून गेले होते त्या काळात पण दत्ता अंकल सोबतची ती पंधरा मिनिटं फार भयंकर होती. त्याच्या डोळ्यात ओढ होती की भीती याचा अंदाजा लागत नव्हता. नोकिया ३३१० च्या मोबाईलवरून बायकोशी आसामी भाषेत बोलण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न समजून घेऊ पाहत होतो. पण भाषा परकी होती. तसा मी ही त्यांच्या भावनांशी, मनात चाललेल्या लगबगीशी अपिरिचितच. दत्ता अंकल नुसता एकामागोमाग एकाला फोन करत चाललाय. साडे सात वाजता मामा आले सोबतीला. मामांनी विचारलं, कोण आलंय रे बाजूला. म्हटलं माहीत नाही. पण जरा पाणी वेगळं दिसतंय. आठ वाजले, नऊ वाजले. साडे नऊ ही झाले. पण हा बाबा फोन काही सोडेना. साडे नऊ वाजता मोबाईलची बॅटरी संपली आणि त्याचा फोन थांबला. एव्हाना त्याच्या बडबडीनं जाम वैतागलो होतो. म्हणून कावूनच विचारलं. ये हॉस्पीटल है अंकल, कितना बात करने का.. जरा आराम भी करो. कल किमो है ना आपका.. मला वाटलं म्हातारं बोंब मारेल..पण चक्क गोड हसला. तेवढ्यात त्याचा मुलगा आला. स्ट्रेचर भरून औषधं आणली होती त्यानं. बिल ही चांगलंच झालं होतं. तब्बल ४१ हजार रुपये. अकरा वर्षांपूर्वी ही प्रचंड रक्कम होती. असो. मामा त्या पोराला औषधं नीट ठेवायला मदत करत होते. आणि तिथूनच संवाद सुरू झाला आमचा. दत्ता अंकल म्हणाला.
” ओ तुम्हारा नाम बांटी है ना…? ( मामांनी मला हाक मारताना ऐकलं असावं)
मी म्हटलं हा. खुश रहो. हम ग्यारा तारिख तक बहोत बात करेगा. तुम कान बंद करके रखना. मला कळेना, तीन महिने थांबायला सांगितलेला हा माणूस अकरा दिवसांवरच का थांबतोय बरं.. त्याचा मुलगा तोडक्या मोडक्या हिंदीत बोलला. वो ऑपरेशन के बाद, आवाज जाएगा बोला डॉक्टर. वो पिताजी मम्मी से बात करेगा. लव मैरेज है दोनोका. वो गुंगा हो जाएगा ग्यारा तारीख के बाद.

तेवढं ऐकून मी थोडा नरमलो. आश्चर्यचकित वगैरे होणं सारखे प्रकार आता स्वभावात नव्हतेच. म्हणून थोडंसंच वाईट वाटलं. त्या दिवसाचा तेवढाच संवाद होता. मग ते झोपी गेले. मी खिडकीतून केईमच्या धुडमल बिल्डींगजवळ चालू असलेली भांडणं पाहत जागाच होतो. रात्रीची शांतता होती त्यामुळे भांडणाचा आवाज वरपर्यंत येत होता. बेडसाठी अॅडमिशन न मिळालेल्या दोन पेशंटचं भांडण होतं. फुटपाथवरील जागा बळकावल्याचा इश्श्यू होता. थोडा वेळ चाललं भांडण. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर थांबलं ते. पण प्रचंड गोंधळ माजवला होता त्या आवाजानं. आणि आता गोंधळ माजला होता तो माझ्या डोक्यात. पाय जाणार म्हणून स्वतःशी संघर्ष करत होतो. सर्वांशी बोलून दुःख हलकं करत होतो. पण म्हटलं जर माझा आवाजच गेला तर… वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आवाज गमावून बसलेली लोकं कसे जगत असतील? काय चालत असेल त्यांच्या मनात.. संवादाचं माध्यम जरी भाषा असली तरी आवाज हा प्राथमिक घटक आहे ना. आवाजाशिवाय कोण समजेल तरी कसा.. पोटात कळ निघाली तर, काही गरज लागली तर कुणाला हाक तरी कशी मारेल बरं कुणी? आपलं बोलणं अबाधित रहावं म्हणून त्याला आपण स्वातंत्र्याच्या कक्षेत आणलं. त्याला संवैधानिक हक्कांच्या चौकटीत बसवलं. पण शरिरानंच जर हा अधिकार बजावण्यापासून आपल्याला रोखलं तर नेमकी दाद मागावी कोणाकडे बरं… एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते आता. दत्ता अंकल का म्हणून बायकोशी साडेतीन सात बोलला ते उमगलं होतं. मनाशीच निर्णय घेतला मी. म्हटलं अकरा दिवस तर अकरा दिवस आपण भरपूर आनंद देऊयात यांना. भरपूर गप्पा मारूयात. नायतरी दिवसभर इंजेक्शन घेण्यापलीकडे मला काम तरी काय असतं. चौदावा खंड त्या दिवसापर्यंत १०० एक पानांपर्यंत वाचून झाला होता. पण ठेवला तो आत. आणि झोपी गेलो.

सकाळी सहा वाजताच मला जागवलं गेलं. डाव्या हातानं डोळे चोळून पाहीलं तर मामांच्या जागी दत्ता अंकल उभा होता. मस्त हातात चहा होता. उठून बसवलं मला त्यांनी. हातातला चहा दिला. स्वतःही घेतला. अन् स्वतःबद्दल सांगायला सुरूवात केली. पूर्ण नाव दिपक दत्ता. बंगालमध्ये जन्म झालेला. आई वडिल खाण कामगार होते. शाळा शिकायची नाही म्हणून आठ वर्षांचा असतानाच घर सोडून पळाला. जी ट्रेन पकडली ती घेऊन गेली गुवाहाटीला. वय लहान, शिक्षण नाही, पैसा नाही. मग मिळेल ते काम करून दिवस ढकलू लागला. त्यातच गांजा आणि स्पिरीटचा नाद जडला. जोडीला पत्ते पण आले. मला सांगत होता दत्ता अंकल.. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत रोज हेच चालत होतं. मग एक दिवस बस स्टँडवरच्या दुकानाजवळ काम करत असताना दुकानदाराची पोरगी नजरेत भरली. त्या पोरीच्या प्रेमात वेडा झालेला हा दत्ता अंकल.. मग सुधरूनच गेला. पोरगी म्हणाली. दारू सोड.. यानं सोडली. स्पीरीट पीणं सोडलं. गांजा सोडला. ऊदरनिर्वाह म्हणून मच्छीचा धंदा सुरू केला. हळूहळू धंदा वाढला. हॉटेल टाकलं छोटंसं. पाहता पाहता ते ही मोठं झालं. दरम्यानच्या काळात आई वडिलांना स्वतःकडे आणलं. तो दुकानदार राजी नव्हता तर पोरीला पळवून नेऊन लग्न ही केलं. हॉटेल इतकं जबरदस्त चाललं की आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरूण गोगोई त्यांचा खास मित्र बनला होता. तो महिन्यातून एकदा तरी तिथं जेवायला येईल. असं सगळं छान होतं. पण अचानक हा गळ्याचा कर्करोग उद्भवला अन्.. आसाममधलं आयुष्य सोडून मुंबईला यावं लागलं. मी ऐकत होतो. ते सांगत होते. म्हटलं माणसाचं आयुष्य कधी पलटी मारेल याचा कधीच भरवसा देता येत नाही. बोलता बोलता दत्ता अंकल रडू लागला.. म्हणाला.. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आहे. लॉज मध्ये गेलो तर म्हणतात पासपोर्ट दाखवा. तुम्ही नेपाळी आहात का असे विचारतात. रहायला जागा मिळत नाही कुठे.. ये मेरा बच्चा कैसा करेगा.. ही सगळी रामकहाणी ऐकायला माझ्यासोबत बॉर्डबॉय तांबे सुद्धा होता. हे एक वेगळं प्रकरण आहे त्याबद्दल नक्कीच लिहील. तांबे म्हणाला, मै कर दूंगा रहने का बंदोबस्त. लेकीन जगह मुल्ला लोगो की है.. चलेगा क्या ? दत्ता अंकल बोलला.. हा…
परेल ला मीनाक्षी भुवन च्या बाजूच्या गल्लीत केजीएन लॉज आहे. केजीएन म्हणजे ख्वाजा गरिब नवाज. इथं आसऱ्याला सगळी मुस्लिम बिऱ्हाडंच. पोरांनं हॉटेलमध्ये पैसे वाया जाऊ नयेत म्हणून साध्या लॉजची निवड करायला सांगितलं होतं. तो आता त्याला मिळाला. हळूहळू संबंध वाढत गेले. बोलणं वाढत गेलं. खुप मायाळू हा माणूस. माझ्या दोन्ही मामांना तो सुद्धा मामाच बोलायचा. अम्माला सुद्दा मम्मी बोलायचा. मी ज्यांना ज्या नावाने हाक मारेल त्याच नावाने हाक मारायचा. आई रोज सकाळी येताना त्याचा मोठा मुलगा अजॉय साठी जेवण आणायची. पोटभर जेवायचा अजॉय. सकाळी आठ वाजले की त्याचे डोळे आईची वाट पाहत बसायचे.

अशातच रेडीएशन संपल्या. पहिल्या तीन किमोही संपल्या. सर्जरीचा दिवस उजाडला. अंकल रात्रभर बायकोशी बोलत होता. दर दिवशी सकाळी सहा वाजता हसऱ्या चेहऱ्यानं मला उठवणाऱा अंकल त्या दिवशी रडवेला होता. आज मलाही बरंच बोलायचं होतं. पण शब्द फुटत नव्हते. तो ही काही बोलला नाही. तसाच गेला रुमबाहेर. अजॉय पण गेला मागोमाग. नऊला ओटीत घेतलं. गेले पंधरा दिवस अजॉय बरीच मेहनत करत होता. बी निगेटिव ब्लड ग्रुप होता अंकलचा. त्यामुळे ब्लड डोनर आणि प्लेटलेट डोनर मिळवणं कठिण गेलं. शेवटी महत्प्रयासानं दोन पेंटर भेटले नाका कामगार. प्रत्येकी तीस तीस हजारांवर बोलणं झालं. कॅश रक्कम मोजली अजॉयनं. आणि बापासाठी रक्त मॅनेज केलं.
डॉक्टर म्हणालेच होते खुप वेळ लागेल ऑपरेशनला. अजॉय येऊन बसला रुममध्ये आणि बराच वेळ रडला. मी त्याला हाका मारत होतो. पण तो काहीच लक्ष देईना. मामा म्हणाले. रडू दे. थांबवू नकोस. तासाभरानंतर तो थांबला. आणि कोणतंतरी गाणं म्हणायला लागला. बराच वेळ गाणं गुणगुणत होता. गाणंही संपलं अन् त्याला झोप लागली. जेमतेम पंधरा मिनिटं झोपला असेल. झोपेतून उठल्यावर फक्त एवढाच म्हणाला.. “माझ्या वडिलांचं आवडतं गाणं होतं ते.. आता पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाही”…

प्रचंड तणावात गेला तो दिवस. रात्री दहा वाजता ऑपरेशन संपलं. सहा दिवसांनी दत्ता अंकल ला आयसीयू मधून परत वॉर्ड मध्ये आणलं. दत्ता अंकल पुरा सुकला होता. डोळे खोल गेले होते. डोकं, गळा, हात कसल्या बसल्या पट्ट्यांनी बांधून ठेवले होते. पाईपलाईन जोडाव्या तश्या सक्शनबॉक्स गळ्यातून आरपार केलेले होते. मानेच्या भागातून हळहळू रक्त बाहेर येत होतं. हनुवटीपासून ते थेट बेंबीपोतर टाक्यांची रांगच लागलेली होती. आता पंधरा दिवस तोंड उघडायला बंदी होती. अशातच पुढचे नऊ दिवसही निघून गेले. अजॉय सतत उभाच असायचा बापासाठी त्याचं सक्शन बॉक्स भरलं की ब्लड काढ, ते मोजून नोंदव, युरीन काढ, मोजून नोंदव. किती ऑक्सीजन घेतला.. कधी खोकला.. सगळं नोंद करून ठेवायचा. दर दोन तासाला बापाला लिक्वीड द्यायचा कॅथरटरने. त्याची भयंकर धावपळ होतीच चालू. पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी टाके काढले. आता हळूहळू तोंड उघडायची परवानगी दिली. दत्ता अंकलनं तोंड उघडलं. आणि हळूच स्वरयंत्रावर ताण दिला.. तर आश्यर्य .. आवाज आला. स्वतःचा आवाज ऐकून खुश झालेला दत्ता अंकल आणि अजॉय एकमेकांकडे पाहून हसत हसत रडत होते. कदाचित वाटलंही असेल त्यांना मिठी मारावी एकमेकांना पण ते शक्य नव्हतं. पण दत्ता अकंल रडत होता. पण रडतानाही खुप हसत होता. आता तो रोज हसायचा. पंधरा दिवसांनी त्याचा आवाज आला पुन्हा सकाळी सहा वाजता. मी सुद्धा एका फटक्यात उठलो. वेळ जात राहीला. हळूहळू तब्येत सुधारत गेली. तीन महिन्याऐवजी अवघ्या पंचेचाळीस दिवसात दत्ता अंकल रिकवर झाला. अन् लगेच परतीच्या प्रवासालाही गेला. पण जाताना त्याच्या पूर्वीच्याच आवाजात बोलू गेला… माझी फॅमिली इथं सोडून चाललोय. तिकडच्या कुटूंबाला इकडच्या कुटूंबाला भेटायला घेऊनच येईल. पण त्या दिवशी मी अॅनेस्थेशिआच्या गुंगीत होतो. मला फक्त त्याची पाठमोरी आकृती दिसली. बस्स…

आज दत्ता अंकल ला भेटून अकरा वर्ष पूर्ण झाल्याची नोंद डायरीत आढळली. म्हणून लिहावंसं वाटलं.

 वैभव छाया

#Kissa

 

किस्सा ड्रेनेजचा..

घरातली कामं करणं तसं प्रत्येक पुरूषाला बायकीच वाटतं. सध्या आई आहे म्हणून एका टिपिकल भारतीय मेंटालिटीनुसार आईला मदत व्हावी म्हणून काम करणं क्रमप्राप्तच. मुद्दा असा.. भांड्यांचा खच पडला होता. साडे अकराच्या आसपास आवरायला घेतलं. घासून झालंच होतं की पायाला ओलावा लागू लागला. ड्रेनेज तुंबलं होतं. सगळं खरकटं जमीनीवर अख्ख्या किचनभर पसरलं. तेलाचा तवंग सगळाच. पाय सरकत होते. नीट उभं राहता येत नव्हतं. तेलाचा उग्र वास नाकाचे केस जाळत होता. शेवटी बेसिनचा पाईप काढून .. होल मध्ये हात घालून साफ करायचा प्रचंड प्रयत्न केला. पण पाणी काही केल्या जाईना. हात मनगटापर्यंत खरचटला. गुडघ्याला मजबूत कळ बसली. पाय ओल्याव्यात राहून अगदीच कसेनुसे झाले होते. श्वास घ्यावा तरी कसा अशी पंचाईत. शेवटी वैतागून आईला फोन केला. सांगितलं सगळं.. म्हटलं, अम्मा ते बेसिन तुंबलंय गं.. ती म्हणाली.. काळजी करू नकोस. एक पॅकेट आहे. त्यातली पावडर टाक. आणि अर्ध्या तासाने पाणी ओत सगळं निघून जाईल. म्हटलं ठिक आहे. पाकीट हातात घेतलं. इन्स्ट्रक्शन वाचल्या. होल मधलं सगळं पाणी, कचरा काढून पावडर टाकण्याचे निर्देश होते. वैगातलेल्या अवस्थेत उशीचं कवर काढून सगळं पाणी भरून काढलं. पूर्ण होल रिकामं केलं. तोवर कोपरापर्यंतचा हात घाण पाण्याने माखला होता. सगळं स्वच्छ केलं. पावडर टाकली अन् वाट पाहत राहीलो अर्ध्या तासाची. ठरलेल्या वेळेला पाणी टाकलं. दणादणा ड्रेनेज क्लिन. पुन्हा सगळी लादी पुसून काढली. तरी वास जाईना. मग फिनाईल ओतून पुन्हा स्वच्छ केलं. तेव्हा हायसं वाटलं. आंघोळ केली. पँट भिजत घातलीये एरियल मध्ये. सकाळी यथावकाश धुईनच. आता हात बेकार कडक झाले होते. मध्ये मध्ये स्किन फुटलीये. खरचटलंय. बसलो शांतपणे आता किबोर्ड बडवत..
अम्माची बोटं इंकला प्रचंड घाबरतात. सगळी बोटं काळी तपकिरी पडलीयेत. तरी ती सर्व करतेच आहे. माझ्या अंगावर आलं की मी करतो कधी मधी..
लिहायचं कारण एवढंच की.. सुधारक ओलवेंचं सफाई कामगारांच्या आयुष्यावरील फोटो पुस्तकाची आठवण झाली. तेवढ्यात ती एका दोस्ताच्या वॉलवर सुद्धा दिसलीत. मन गलबलून आलं. आपण येड्यागांड्याची माजोरड्या मुलग्यांनी आपल्या आया-बहिणी-बायकांचं आयुष्य ह्या फोर्थ क्लास वर्करसारखंच बनवून ठेवलंय ते ही त्यांच्या हक्काच्या घरातच..नाय नाय म्हणता किती अन्याय होत असतो आपल्याच कुटूंबव्यवस्थेत याचा साधा अंदाज सुद्धा बांधता येत नाही. साला घंट्याची स्त्री मुक्ती होणारे या देशात..
लिहवत नाही.. बोलवत नाही. ही शोषण व्यवस्था लाडापोटी उपजलीये की अन्य कशापोटी यावर विचार देखील करवत नाही…

वैभव छाया