आयसीयू – Intensive Care Unite

ऑपरेशन झाल्यानंतर किंवा रोगी अधिकच अत्यवस्थ असेल तर त्याला तेथे ठेवण्याची जागा अतिदक्षता विभाग. चकाचक लाईट्स, मनूष्याच्या आवाजाचा क्वचितच संचार, थंडगार एअर कंडिशन्डने गारठलेलं वातावरण, व्हेंटिलेटरच्या मशीनीचा सातत्याने येणारा बीप साऊंड भल्या भल्यांच्या ऊरात धडकी भरवतो. भरीस भर म्हणून नखशिखांत कपड्यात गुंडाळून घेतलेल्या नर्सेस, वॉर्डबॉईज, मावशी बाया (आया), डॉक्टर… आहट मधल्या सिरियलसारखा फिल यावा फक्त त्यांचे डोळेच तेवढे आपल्याला दृश्यमान. रांगेने बेड्स सलग झोपलेले असतात. हो झोपलेलेच असतात बेड्स. ते कसलाही आवाज करत नाही. कसलीही हालचाल करत नाहीत. पेशंट सोडला तर त्यावर इतर कुणालाही साधा टेकू मिळू देत नाहीत. निष्प्राण पडलेल्या बेडच्या अवयवांना तेवढ्या निरनिराळ्या कॅथरेटरची सवय मात्र झालेली असते. आणि बेड्स सुद्धा आपल्या स्वभावधर्माला जागून साऱ्या कॅथेरटर्सना स्वतःच्या अंगावरून मुक्त संचार करू देतात. पेशंट्स येतात – जातात पण बाकी सारी आहे त्या जागीच स्थिर राहतं.

23 सप्टेंबर 2005 साली माझं ऑपरेशन झालं. संध्याकाळी सहाच्या सुमारास आयसीयूत दाखल केलं. दहाच्या आसपास डोळे उघडले. थोडी शुद्ध आली. संतोष पवार नावाचा ओळखीचा वॉर्डबॉय जवळ आला. म्हणाला आताच मामा येऊन गेले.. तू झोपला होता.. उठून बसवतो तुला फक्त समोर पाहू नको. झोपून घे परत..

मी त्याला मुक्या नजरेनं होकार दिल्याचं मला स्मरतंय. पण समोर पाहू नकोस हे का म्हणाला असावा यावर फार विचार न करता मी पुन्हा झोपी गेलो. साधारण तीनच्या आसपास पुन्हा जाग आली. समोरच्या बेडवर कालपरवा पर्यंत माझ्या बाजूला अॅडमिट असलेला शाहिद नावाचा मुलगा पहुडला होता. युरीन कॅटरेटर, आय वी कॅथरेटर, ऑक्सीजन मास्क, आणि बरंच काही काही त्याला जोडलेलं होतं. हलकेच मान वरून पहायचा प्रय़त्न केला तर त्याला व्हेंटिलेटर वर टाकलाय असं कळालं. शाहीद 14 वर्षाचा मुलगा. त्याला ल्युकेमिया आहे हे फार उशीरा डिटेक्ट झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा तो चौथ्या स्टेज ला होता. एकुलता एक मुलगा. किमोथेरपीसाठी अॅडमीट झाला तेव्हा मला भेटून बराच खुश झाला होता. म्हणाला भाई आप आओगे ना मेरे घर.. इधर ही नूर मुहल्ले में रहता हूँ.. मी त्याला खोटं खोटं हो म्हणून टाकलं. तो हसला. मला बरं वाटलं. हसताना त्याचे खोल खोल गेलेले डोळे थोडे चमकून गेले. डोक्यांवर, भुवयांवर शोधून सापडेल असा एकही केस शिल्लक राहीला नव्हता. जरा काही खाल्लं की उलटी अन् ब्लीडींगही. खंगत चालला होता. त्याचा बाप यायचा. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचा. मिनिट दोन मिनिट त्याच्याकडे पहायचा. आणि तडक परत निघून जायचा. बाप लेकांच्या मुक नजरानजरीकडे पाहून शाहीदची आई मात्र हमसून रडायची. बापाला रडताना मात्र पाहीलं नव्हतं. हा सारा प्रकार सहा दिवस असाच चालू होता. शाहीदच्या बापाचं येणं म्हणजे हातात भरमसाठ औषधं आणि पोरासाठी एखादा ज्युस आणि खिशात पैशांची तजवीज.

माझ्या ऑपरेशनच्या दिवशी सकाळी त्याला ग्रीट केलं आणि निघालो. तशी त्याची तब्येत खूपच खंगली होती. इतक्या लवकर हा खेळ सोडेल अशी काही लक्षणं नव्हती. पण टिकला नाही तो. नंतर मला दिसला तो थेट आयसीयू मध्येच. शाहीदच्या बापाची धावाधावच दिसत होती. त्याची आई त्याच्या बेडजवळ खाली जमीनीवर पडून होती. काहीच हालचाल नाही. अगदी स्तब्ध पुतळ्यासारखी. अंदाज आलाच होता. पोराला व्हेंटिलेटरवर टाकलंय. आता काही फार आशा नाही. पहाटे सहाच्या सुमारास डॉक्टरांनी आणि त्याच्या वडीलांनी अगदी आमच्या दोघांच्या बेडमधल्या जागेवर उभं राहून चर्चा केली. स्पष्ट ऐकू येईल अशा भाषेतच…

बाप म्हणाला.. बच्चे को बस आज के उगते सुरज तक रखना था… अब इसे आझाद कर दो इसका दर्द देखा नही जाता… डॉक्टर म्हणाले.. बस्स आपकी तसल्ली की लिए ये मशीने चालू थी…

डॉक्टरांनी नंतर सगळ्या मशीनी बंद केल्या. त्याच्या बापानं त्यातही मदत केली. नर्सेसनी त्याच्या आईला वॉर्ड बाहेर नेलं. आणि शेवटची क्रिया म्हणून हिरवं कापड आणलं. ( प्रत्येकाला जाड हिरव्या किंवा निळ्या कापडात गुंडाळतात) पूर्ण कापड गुंडाळलं. मग एका प्लास्टिक बॅग मध्ये पार्थिव चैनीने पॅक केलं. पुन्हा त्यावर हिरवा कापड गुंडाळून बॉडी पॅक केली. आत्ता चेहऱ्यावर सुद्धा कापड गुंडाळलं होतं. चेहरा कापडाआड बंदिस्त झाला अन् बापानं इकडं स्वतःला मोकळं केलं. बऱ्याच वेळानंतर तो सावरला. पण तोवर इथं त्या बेडवर नवी चादर आली. नवी उशी आली. आणि नवा क्रिटीकल पेशंट पण आला होता.

 

Advertisements

हॉस्पीटलमधल्या कविता -1

तसं प्रत्येक हॉस्पीटल ही
स्वतःतच असते एक कविता
 
याच्या प्रत्येक पायरीला
एक उन्माद पण खंबीर ताल
बेपत्ता पावसात रोवून राहीलेल्या वडासारखा
 
इथल्या हरेक कोपऱ्याला
एक दर्प
गुटखा खाल्यानंतर स्वतःच्याच तोंडाला येणारा
 
हॉस्पीटलच्या पंख्यानाही असतो
माणसासारखा एकच डोळा
वटारून वटारून भिरभिरत राहतात डोक्यावर
 
तिथल्या भिंतीही असतात
एकदम निलाजऱ्या
फिनाईलनं आंघोळ करून चमक आणणाऱ्या
 
हॉस्पीटलची यंत्रही असतात माणसं
ज्यांना नसते तमा कशाची की
खोटं बोलावं कधीतरी एखाद्याचं मन राखण्यासाठी
 
इथं काम करणारी माणसं असतात
मात्र मशीनीसारखी तेलकटलेली
इच्छा नसतानाही दूःख सारून नव्यानं काम करणारी…
 
म्हणून
प्रत्येक हॉस्पीटल ही
स्वतःतच असते एक कविता
 
वैभव छाया
 
#टाटा_हॉस्पीटलमधल्या_कविता